शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1675

सोलापूर जिल्हा पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; ११७ अर्ज प्राप्त, ६८ निर्गमित

सोलापूरदि. 13 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात आले असून, या संपर्क  कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  मनिषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली -उगले आदिसह मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील विकास कामे तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ  मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून कार्यालयाचा संपर्क क्रमांक 0217-2731004 आहे. संपर्क कार्यालयाच्या समन्वयक म्हणून माढाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क कार्यालयात नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसिलदार वाकसे नागु हरीबा (भ्रमणध्वनी क्र. 9096792147)

व तीन कर्मचारी व एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत पालकमंत्री संपर्क कार्यालयात 117 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 68 अर्ज निर्गमित केले आहेत. 49 अर्ज प्रलंबित आहेत.

00000

‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा उपक्रम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ :- रस्ते हे विकासाचा मार्ग असतात, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारत उपक्रमातील महत्त्वाचा भाग ठरेल, म्हणूनच या स्पर्धा महाराष्ट्रातही व्हाव्यात, असे निमंत्रणही आज येथे दिले.

भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्स च्या कार रेसमधील कारचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच तेलंगणाचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते येथे अनावरण करण्यात आले. यासाठी गेटवे ऑफ इंडियांच्या प्रांगणात शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार अनावरण सोहळ्यास तेलंगणाच्या नगर विकास विभागाचे सचिव अरविंद कुमार, तसेच ग्रीनको समूहाचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चलमाशेट्टी आदी उपस्थित होते. तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस’ पार पडणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या ‘ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप’ या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरुवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे. मुंबई ही देशाची शान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा होतो आहे, यालाही वेगळे स्थान आहे. नुकतीच जी-२० ची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची बैठक इथे झाली. त्यांना परिसर खूप आवडला होता. अशी ही फार्म्युला- रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी इथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकतेच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल. त्यामुळे यात सहभागी होणारेही खुश होतील, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा आयोजकांना आपल्या भाषणात दिले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांच्या रस्ते विकास आणि पायाभूतसुविधा क्षेत्रातील कामांची प्रशंसाही केली. त्यांच्यामुळेच मुंबईत ५५ उड्डाण पुल उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. इथे उद्योगांसाठी अनेक पोषक घटक उपलब्ध आहेत. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि एक खिडकी योजना सारख्या सवलती आहेत. महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरु आहे. आम्ही वेगाने या महाराष्ट्राने प्रगतीपथावर नेत आहोत. यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह केंद्रातील अनेक मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे. या सहकार्यातूनच आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, आपल्याला ई-व्हेईकल्सच्या वापरावर भर द्यायचा आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. याशिवाय ईथेनॉलसारख्या ग्रीन फ्युईलच्या वापरालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. यातून आपल्या इंधनाची आयात कमी करायची आहे. पुढे जाऊन फाईव्ह ट्रीलीयन ईकॉनॉमीचे उद्दिष्टही गाठायचे आहे. यात आपला ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा वाटा असेल. कारण आज हेच क्षेत्र सर्वाधिक जीएसटी भरते. हेच क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करते. आपल्याला अधिकाधिक ई-व्हेईकल्स, कार-ट्रक्सची निर्मिती करायची आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा मुबलक आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही याच साऱ्या गोष्टींवर भर असतो. म्हणूनच येत्या काळात आपल्याला ई-व्हेईकल्सचा वापर आणि त्यांच्या निर्मितीवर भर द्यायचा आहे. आपल्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दीष्टांपैकी एक असे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित करत आहोत.

सुरुवातीला या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पिनयनशिप विषयीही माहिती सादर करण्यात आली.

0000

नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई, दि. १३ : नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

00000

अनाथांच्या आरक्षणात बदल करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : राज्यातील अनाथांना एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. त्यात सकारात्मक बदल करण्याची गरज असून येत्या काळात अनाथ आरक्षणात बदल करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर्पण युवा पुरस्कार प्रदान समारंभात दिली.

चर्चगेट परिसरातील गरवारे क्लब येथे स्वामी विवेकानंद जन्मदिन आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तर्पण फाऊंडेशनद्वारे आयोजित तर्पण युवा पुरस्कार हभप नवनाथ महाराज आणि मयुरी सुषमा यांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासकीय पद्धतीमध्ये अनाथांचे क्षेत्र दुर्लक्षित राहू नये यासाठी राज्य शासनाने अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न उद्भवले होते त्यांचे निराकरण करुन हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने काही बदल करण्याची गरज आहे. येत्या काळात तसे बदल देखील करणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

तर्पण फाऊंडेशनतर्फे १८ वर्षावरील अनाथांना सुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाच्या व्यवस्थेबरोबर काम करण्यासाठी राज्य शासनाने तर्पण फाऊंडेशनसमवेत सामंजस्य करार केला. या मुलामुलींना तर्पण संस्थेकडून आवश्यक सुविधा आणि संस्थात्मक संरक्षण दिले जाते. अशा चांगल्या कामांना पाठबळ दिले पाहिजे. अनाथांसाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन आहे, असेही श्री. फडणवीस यांनी आश्वस्त केले.

महंत भगवानगड न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या अध्यात्मिक व सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला. संत ज्ञानेश्वर महाराजांना अध्यात्मिक दृष्टिकोनातून न पाहता त्यांचा सामाजिक दृष्टिकोनही पाहण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरीमध्ये साहित्य आणि तत्वज्ञ एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. भगवानगडावर शंभर अनाथ मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनाथांसह त्यांच्यासाठी  काम करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत महंत डॅा. शास्त्री यांनी व्यक्त केले. प्रारंभी तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी तर्पण फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेतून अनाथांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्याबद्दल अनाथ मुलामुलींनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार नितेश राणे, भूमी वर्ल्डचे संचालक प्रकाश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

पवन राठोड/विसंअ/

स्वामी विवेकानंद यांनी भारताला नवी ओळख दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : स्वामी विवेकानंद यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या कार्याने भारताला नवी ओळख प्राप्त करून दिली. भारताला पुन्हा स्वर्णिम युगात नेण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भारत विकास परिषद, महाराष्ट्र, मुंबई प्रांत यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंती निमित्त आयोजित नाट्य मंचन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमरावसिंह ओस्तवाल, उपाध्यक्ष संपत खुरदिया, विद्याधर मोरवाल, महासचिव दिलीप माहेश्वरी, अनिल गग्गड, मार्गर्शक वीरेंद्र याज्ञिक आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राजीव श्रीवास्तव, मुंबई मेट्रोचे विभागीय संचालक शंतनू चॅटर्जी, सुनील कर्वे, अनुप श्रीवास्तव, भावेश चंदुलाल शहा, आशुतोष राठोड, अनुप बलराज, डॉ. अमूल्य साहू, डॉ. दिलीप रामदास पवार, अनुप शेट्टी आदींचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.  यावेळी नागपूरच्या राधिका क्रिएशनच्या सारिका पेंडसे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य मंचन सादर केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी जगाला जिंकले. त्यांचे अमेरिकेतील भाषण दिग्विजयी होते. या भाषणाने जगाला नवा विचार दिला. भारतीय संस्कृतीबरोबरील विविध संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मात्र, भारतीय संस्कृती टिकून राहिली. भारतीय संस्कृती जगात महान आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची स्वामी विवेकानंद यांनी जगाला ओळख करून दिली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एमईटीचे व्हाइस चेअमन सुनील कर्वे, परिषदेचे उपाध्यक्ष श्री. खुरदिया, डॉ. अनुप श्रीवास्तव आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री. माहेश्वरी, श्री. याज्ञिक यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग शिबिरात २०० हून अधिक प्रकरणांवर सुनावणी पूर्ण

मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मुंबईमध्ये आयोजित दोन दिवसीय शिबिरामध्ये राज्यातील  मानवाधिकार उल्लंघनाच्या २०० हून अधिक प्रलंबित प्रकरणांची सुनावणी झाली. सात प्रकरणांमध्ये आयोगाने नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली. त्यापैकी राज्य सरकारने सहा प्रकरणांमध्ये ३२.५लाख रुपये दिल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि राजीव जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीबरोबरच, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना मानवी हक्कांबद्दल जागरूक करणे आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी आणि मानवी हक्क रक्षकांशी संवाद साधणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या प्रलंबित प्रकरणी राज्य शासनाचे संबंधित अधिकारी आणि तक्रारदारांना थेट विचारविनिमय करण्यासाठी सुनावणीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असेही श्री. मुळे यांनी सांगितले.

शिबिराच्या बैठकीदरम्यान, आयोगाने मानवाधिकार उल्लंघनाच्या २०० हून अधिक प्रकरणांची सुनावणी केली. यामध्ये वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, सेवानिवृत्तीचे लाभ नाकारणे, ‘कोळी’ समाजबांधवांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात कथित निष्काळजीपणा, इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, बालकामगारांचा समावेश असलेल्या बंधनकारक मजुरीच्या घटना आणि न्यायालयीन/पोलीस कोठडीत मृत्यू अशा गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणांच्या समावेश आहे. आयोगाने शिपिंग महासंचालक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित तीन बाबी देखील विचारात घेतल्याचे श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.

प्रलंबित सात प्रकरणांमध्ये आयोगाने नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली होती. त्यापैकी राज्य सरकारने सहा प्रकरणांमध्ये ३२.५लाख रुपये संबंधितांना दिले आहेत. राज्य सरकारने आयोगाच्या आदेशानुसार उर्वरित एका प्रकरणात भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

मानवी हक्क उल्लंघनाची प्रकरणे उजेडात आणण्यासाठी माध्यमांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि मदतीसाठी प्रसारमाध्यमांचे आभार मानून प्रसारमाध्यमांच्या अहवालांच्या आधारे आयोगाला अनेक  तक्रारी  स्वतःहून दाखल करता आल्याचेही श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.

या दोन दिवसात आयोगाने महाराष्ट्र सरकारला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या. मानवाधिकाराशी संबंधित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय आयोगाने विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये पीडितांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकसमान धोरण तयार करण्याची शिफारसही केली आहे, असे सदस्य राजीव जैन यांनी सांगितले.

सुनावणी दरम्यान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कारागृह सुधारणा, सुधारित  निवारागृह, बंधपत्रित मजुरांना अंतरिम नुकसान भरपाई तसेच पुनर्वसन आणि अंतिम नुकसान भरपाईसाठी इतर तरतुदी वेगाने आणि संवेदनशीलतेने हाती घेण्यावर भर दिला. वीजेच्या धक्क्याने मृत्यू होऊ नये यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचा सल्ला सदस्यांनी मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयाला दिला आहे.

प्रकरणे निकाली काढल्यानंतर, आयोगाने स्वयंसेवी संस्था/मानव संसाधन विकास संस्थांशी संवाद साधला. तक्रार दाखल करण्यासाठी आयोगाच्या hrcnet.nic.in या संकेतस्थळाचा उपयोग करण्याची माहिती या प्रतिनिधींना देण्यात आली.

आयोगाने महाराष्ट्र राज्यातील स्वयंसेवी संस्था आणि मानवाधिकार रक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच भय न बाळगता किंवा पक्षपात न करता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच स्वयंसेवी संस्था आणि मानव संसाधन विकास संस्थांची सातत्याने होणारी भागीदारी देशातील मानवाधिकार व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने बरीच प्रगती करेल  असे सांगितले.

मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत आयोग जागरूकता कशी निर्माण करतो याविषयीची भूमिका आयोगाच्या सदस्य अनिता सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली. कायद्याचे इंटर्न आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पंचायती राज संस्था, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि नेहरू युवा केंद्र स्वयंसेवकांसाठी आयोग प्रशिक्षण कार्यक्रम घेतो. याशिवाय लघुपट स्पर्धा, परिषदा, कार्यशाळा यासारखे उपक्रम मानवी हक्कांबाबत जागरूकता वाढविण्यास मदत करतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

000

मनीषा पिंगळे/विसंअ/

आविष्कार-२०२३ द्वारे नव्या संशोधनाला चालना मिळेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि. 12: आविष्कार -2023 महोत्सवाच्या माध्यमातून देशात नव्या संशोधनाला चालना मिळेल आणि त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित 15 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ‘आविष्कार -2023’ च्या उद्घाटन प्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी, कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अविष्कार समितीचे राजेश पांडे, डॉ.संजय ढोले आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, देशातील विद्यापीठातून नाविन्य आणि नवोन्मेशाला चालना देण्यात येत आहे.  राज्यातल्या विद्यापीठातील विद्यार्थी या दिशेने चांगले प्रयत्न करीत आहेत. आविष्कार महोत्सवात सहभागी होणारे हे विद्यार्थी भविष्यात समूह भावनेने काम करून संशोधनाला अधिक वेळ देत देशाला आपल्या प्रतिभेचा परिचय देतील. त्यातून समाजासाठी उपयुक्त संशोधन होऊन स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे विद्यापीठ उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनावरही भर द्यावा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

यावेळी महसूलमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, आविष्कार महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळते. उद्याचा भारत या माध्यमातून पहायला मिळतो. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेचा वापर करून केलेल्या संशोधनामुळे देशाची मान उंचावण्याचे काम होते. शिवाय अशा उपक्रमाद्वारे मिळणाऱ्या आत्मविश्वासाच्या बळावर ते जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सक्षम होतात.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार विद्यार्थी केंद्रीत दृष्टीकोन स्वीकारण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक स्टार्टअप्स भारतात आहे. यात विद्यापीठांचाही मोलाचा सहभाग आहे.  साधनांच्या मर्यादा असूनही आपले विद्यार्थी पुढे जात आहेत. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून 24 स्टार्टअप्स देशपातळीवर सुरू आहेत. विद्यापीठांमधील क्षमता आणि ज्ञानाचे आदानप्रदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना गती मिळेल आणि स्पर्धेच्या युगात त्यांची चांगली तयारी होऊ शकेल. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्याच्यादृष्टीने कृषि क्षेत्रातील संशोधनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता विकसीत व्हावी यासाठी विद्यापीठांनी उद्योगाभिमुख, गरजाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. विद्यापीठाकडून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्यास शासन सहकार्य करेल, असेही  मंत्री विखे-पाटील म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होतानाच नोकरी उपलब्ध करून देणारा व्हावे -कुलगुरू डॉ.कारभारी काळे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, ‘अविष्कार’मध्ये सहा विविध विभागात विद्यार्थ्यांकडून संशोधन प्रकल्प स्वीकारले जातात. यात आंतरविद्याशाखीय, तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणणे, स्वावलंबी होतांनाच नोकरी उपलब्ध करून देणारा व्हावे ही या उपक्रमामागची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नवा आविष्कार घडवून देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाले आहे. जगातील विविध मानांकनामध्ये विद्यापीठाने आपला ठसा उमटवला आहे. विद्यापीठाने मागील 14 आविष्कार महोत्सवात यश संपादन केले आहे. देशातील नामांकित विद्यापीठात याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी देशाला आणि जगाला कसे समर्पित करता येईल याचा विचार करावा, असेही डॉ.काळे म्हणाले.

विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागेल-डॉ.मोहन वाणी

डॉ.वाणी म्हणाले, आविष्कार हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्ती  वाढविण्यासाठी, नव्या कल्पना शोधण्यासाठी महत्वाचा आहे. या महोत्सवाद्वारे विद्यार्थी विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी आंतरविद्याशाखीय संशोधनाला महत्त्व आहे. गेल्या दोन दशकात भारताने संशोधन आणि विकास क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे.  ही प्रक्रीया पुढे नेताना अशा उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण क्षेत्राला अधिक बळ देता येईल.

जगात वेगाने बदल होत असताना, स्पर्धा वाढत असताना, विद्यार्थ्यांनीदेखील अधिक प्रमाणात संशोधनात सहभाग घेतला पाहिजे. संशोधन प्रकल्प अयशस्वी होण्याची कारण शोधून त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा.  योग्य वेळ व्यवस्थापन, संशोधन कार्यातील अचूकता, संशोधन प्रकल्पाचे योग्य नियोजन,  आंतरविद्याशाखीय चर्चासत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करणे याद्वारे अधिक प्रकल्प यशस्वी करता येतील, असे त्यांनी सांगितले.

राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी रुची वाढावी आणि त्या माध्यमातून संशोधन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. समाजाला उपयुक्त संशोधन करण्याची प्रेरणाही विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळेल. कृषि क्षेत्रात संशोधनाला खूप वाव आहे. कमी खर्चात अन्नधान्याचे उत्पादन वाढवावे, पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबाबत संशोधनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा. कृषि क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा, रोबोटीक्सचा उपयोग वाढविण्याबाबतही विचार व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी निरीक्षण समिती अध्यक्ष प्रा.सुनिल पाटील यांनीही विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी म्हणून आविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 6  विद्याशाखांमधील 636 विद्यार्थी सहभाग होणार आहेत. मुंबई येथे नामवंत उद्योगपतींसमोर यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ. ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यात 2006 पासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. 15 व्या स्पर्धेत 22 विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. अणूशास्त्रज्ञ स्व. प्रा.एम.आर.भिडे यांचे नाव अविष्कार नगरीला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी महोत्सवात सहभागी प्रकल्पांची पाहणी केली.

****

पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला महाबळेश्वर व तापोळा पर्यटन विकास कामांचा आढावा

सातारा दि. 12 :  महाबळेश्वर व  तापोळा परिसरातील पयर्टन विकासाच्या अनुषंगाने करावयाच्या विविध विकास कामांचा राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस खासदार डॉ. शिंदे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाबळेश्वर येथील साबणे रोड सुशोभीकरणबाबत तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, साबणे रोड सुशोभीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या गटारांवरील अतिक्रमण काढून ती जागा सुशोभीकरणासाठी अंतिम करावी.  महाबळेश्वर-तापोळा रस्ता सुधारणेची निविदा अंतिम करुन कामाला सुरुवात करावी तसेच या कामाचा दर्जा चांगला ठेवावा. तापोळा ते अहिर या पुलाचे काम लवकरात लवकर करावे.

श्री. देसाई पुढे म्हणाले, तापोळा परिसर पर्यटन क्षमता वाढीबाबत 4.17 कोटींचा पर्यटन विकास आराखडा प्रादेशिक पर्यटन कार्यालयास सादर करण्यात आला आहे. यामधून तापोळा  परिसरातील विकास कामे करण्यात येणार आहे. याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा. दरे येथील उत्तेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर उतेश्वर तीर्थक्षेत्र विकास कामांना निधी मंजूर झाला आहे. त्यातून तेथील विकास कामे हाती घेण्यात यावीत. दरे गावची गावठाणाची हद्द निश्चित करण्यासाठी नव्याने सर्व्हे करुन भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन गावठाण विस्तारवाढ  करावी.

तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करावयाचे आहे, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, हे ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी महसूल विभागाने  शासकीय जागा उपलब्ध करुन द्यावी. शासकीय जागा उपलब्ध होत नसल्यास खासगी जागा खरेदी करण्याबरोबर ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.

वेण्णा लेक पर्यायी रस्त्याच्या अडचणी दूर करुन पर्यायी रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे. पाचगणी- महाबळेश्वर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पर्यटकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याबाबत पोलीस विभागाने अंमलबजावणी करावी. तसेच पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्यांना नोटीसा देऊन अतिक्रमण काढावे यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले, महाबळेश्वर येथील साबणे रोड सुशोभीकरणाचा आराखडा चांगल्या पद्धतीने तयार करावा. महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याचे काम लवकर सुरु होईल यासाठी प्रयत्न करावेत. वन विभागाच्या जागेबाबत काही अडचणी असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा.  तापोळा येथे नव्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. दरे गाठवण विस्तारवाढीसाठी कार्यवाही करावी. दरे येथील नागरिकांची घरे मातीची आहेत त्यांना आवास योजनेचा लाभ देवून पक्के घरे बांधून द्यावीत. तापोळा व दरे गावठाणचा विषय जिल्हा प्रशासनाने मार्गी लावावा, अशा सूचनाही डॉ. शिंदे यांनी  यावेळी केल्या.

या बैठकीमध्ये महाबळेश्वर साबणे रोड सुशोभीकरण, महाबळेश्वर-तापोळा रोड सुधारणा, अहिर तापोळा रस्ता सुधारणा, तापोळा परिसर पर्यटन क्षमता वाढ, पाचगणी-महाबळेश्वर रस्ता सुधारणा व अतिक्रमण काढणे, वेण्णालेक पर्यायी रस्ता, दरे उत्तेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र दर्जा देणे, दरे गावठाण विस्तार वाढ करणे, तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केद्र सुधारणा व पाचगणी महाबळेश्वर वाहतूक कोंडी सुरळीत करणे या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करुन पालकमंत्री श्री. देसाई व खासदार डॉ. शिंदे यांनी संबंधित विभागांनी कामे लवकरात लवकर सुरु करण्याबाबत योग्य ती  कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.

उदित नारायण, कुमार सानू, रणवीर शोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 12 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार २०२३’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धम्मदान ट्रस्ट व ‘परफेक्ट वुमन’ मासिकातर्फे करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण व कुमार सानू, अभिनेते रणवीर शोरे, पर्यावरण परिषदेचे विजयराजे धमाल, दीपशिखा देशमुख, रिना त्रिवेदी, डॉ खुशी गुरुभाई, कैलास मासूम, सीताराम गायकवाड, मोहम्मद सईद शेख व राखी राजाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे निमंत्रक गुरुभाई सुरेशभाई ठक्कर, वास्तू तज्ज्ञ बसंत रसिवासिया, डॉ.गीत ठक्कर व चंद्रमणी जाधव यावेळी उपस्थित होते.

००००

 

Governor presents Dr Babasaheb Ambedkar National Awards to Udit Narayan, Kumar Sanu, Ranvir Shorey

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Dr Babasaheb Ambedkar National Contribution Awards 2023’ to eminent persons from various walks of life at Raj Bhavan Mumbai on Thursday (12 Jan).

The awards were instituted by the Dhammadan Trust and the ‘Perfect Woman’ magazine.

Renowned playback singers Udit Narayan and Kumar Shanu, actor Ranvir Shorey, Vijayraje Dhamal of Paryavaran Parishad, winner of Perfect Miss Of India Reena Trivedi, Dr Khooshi Gurubhai, Kailash Masoom, Sitaram Gaikwad, Deepshika Deshmukh, Mohd Sayeed Shaikh and Rakhee Rajadhyaksha were among those felicitated by the Governor.

Organisers of the event Dr Geet Thakkar, Chandramani Jadhav, Gurubhai Sureshbhai Thakkar and Vaastu & Numerologist Basannt R Rasiwasia were present.

0000

बँकांनी ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना प्राधान्याने पतपुरवठा करावा – ग्रामविकास अपर मुख्य सचिव राजेश कुमार

नवी मुंबई, दि. १२ :- महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आज नवी मुंबई येथे राज्यस्तरीय बँकर्स परिषद पार पडली. यावेळी श्री.राजेश कुमार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा गरिबी निर्मुलन आणि उपजीविका साधनांची निर्मिती करणारा देशातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात बचत गटांची ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना भरीव अर्थ सहाय्य करणे आवश्यक आहे. या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त कर्जपुरवठा करणारे राज्य ठरावे, यासाठी सर्व बँकांची साथ मोलाची ठरणार आहे.

कर्जपुरवठा अधिक व्हावा यासाठी सर्व बँकांनी आपल्या ग्रामीण क्षेत्रात काम करत असलेल्या शाखा व्यवस्थापकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. बचत गटांना कर्ज देऊन व्यवसाय वृद्धी करणे म्हणजे बँकेचा व्यवसाय वाढविणे असेच समीकरण आहे, हे समीकरण सर्व बँकांनी ओळखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘उमेद’च्या बचत गटाच्या महिलांनी आजपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या उर्वरित रकमेच्या परतफेडीचे प्रयत्न सुरू आहेत. बचत गटांना कर्ज देऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी २०२२ – २३ या आर्थिक वर्षात ५ हजार कोटीपेक्षा जास्त पतपुरवठा करून राज्य प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी सहकार्याचे त्यांनी बँकांना आवाहन केले.

या कार्यक्रमात राज्यातील बँकांनी या आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीचा तपशील मांडतांना उमेद अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राउत यांनी सार्वजनिक क्षेत्रातील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी त्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.  खासगी आणि सहकारी क्षेत्रातील एच डी एफ सी बँक, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असल्याचे निदर्शनास आणून दिले.

अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी मनोगतात सांगितले की, बचत गटांचे प्रस्ताव कमीत कमी कालावधीत मंजूर करून त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. ग्रामीण महिला आपली व्यावसायिकता सिद्ध करू लागल्या आहेत. या चळवळीला गती देण्यासाठी सर्वच बँकांनी आपल्या शेवटच्या स्तरावरील कामाचे सनियंत्रण करून बचत गटांचा पतपुरवठा वाढविणे आवश्यक आहे.

या विशेष कार्यक्रमात नाबार्ड आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी ग्रामीण महिलांच्या बचत गटांसाठी राष्ट्रीय धोरण रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचना यांचा ऊहापोह करून सर्व बँकर्सनी सकारात्मकतेने गटांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्व‍ितेसाठी उमेद अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...