शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1674

अमृत महाआवास अभियानातील पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते वितरण

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या अमृत महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कामगार मंत्री आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रकल्प संचालक दिपक चव्हाण यांच्यासह गटविकास अधिकारी व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक कवठेमहांकाळ तालुका, द्वितीय क्रमांक खानापूर तालुका, तृतीय क्रमांक आटपाडी तालुका यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक खानापूर तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील पाडळेवाडी ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक शिराळा तालुक्यातील येळापुर ग्रामपंचायत यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कारामध्ये खानापूर तालुक्यातील लेंगरे जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक मिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आला.

राज्य पुरस्कृत योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक शिराळा तालुका, द्वितीय क्रमांक खानापुर व कवठेमहांकाळ यांना विभागून व तृतीय क्रमांक पलुस तालुका यांना वितरित करण्यात आला.  ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, द्वितीय क्रमांक कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी, तृतीय क्रमांक खानापुर तालुक्यातील आळसंद यांना वितरित करण्यात आला.  ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्करामध्ये प्रथम क्रमांक खानापुर तालक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील मांगले जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील वाटेगाव जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आले.

00000

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ४१६ कोटी ६४ लाखाच्या प्रारूप आराखड्यास मान्यता – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी 416 कोटी 64 लाखाच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर सन 2022-23 मधील मंजूर नियतव्यय यंत्रणांनी 31 मार्च पूर्वी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. यावेळी खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 प्रारूप आराखडा (सर्वसाधारण) करीता 331 कोटी 82 लाख रूपये,  अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 416 कोटी 64 लाख रूपये नियतव्ययाची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती. त्यानुसार एकूण 416 कोटी 64 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. दि. 28 जानेवारी 2023 रोजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यासाठी 112 कोटी 84 लाख रूपये इतक्या वाढीव निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बैठकीत सांगितले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२४ च्या प्रारूप आराखड्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ३६ कोटी, कोरोना उद्भवल्यास त्यावरील खर्च भागविण्यासाठी ३० कोटी आणि लम्पी चर्मरोग औषधोपचारासाठी 2 कोटीचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. प्रारूप आराखड्यातील निधी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वीत यंत्रणांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 (सर्वसाधारण) करीता 364 कोटी रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरीता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 448 कोटी 82 लाख रूपये नियतव्यय मंजूर आहे.  माहे डिसेंबर 2022 अखेर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये शासनाकडून एकूण 255 कोटी 28 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. यामधील 51 कोटी 72 लाख रूपये इतका निधी खर्च झाला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला संपूर्ण निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेली निवेदने यावर यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. वन विभागाकडील रस्त्याच्या कामाबाबत पालकमंत्री महोदयांनी एक विशेष बैठक घ्यावी अशी मागणी आमदार महोदयांनी केली. याबाबत येत्या सोमवारी बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले. या  बैठकीस वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात विषारी सर्प दंश रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास या रुग्णांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडून औषधे पुरविण्याबाबत चर्चा होवून राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी जी अतिक्रमणे झाली आहेत ती संबंधित विभागानी तातडीने काढून घ्यावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. खाडे यानी बैठकीत दिले. तसेच आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर शेंडगेवाडी गावाबाबत शासन निर्णय होईपर्यंत या गावातील ग्रामस्थांना हवे असणारे सर्व प्रकारचे दाखले बनपुरी ग्रामपंचायतीमार्फत दिले जावेत, असे आदेश पालकमंत्री डॉ. खाडे यांनी  संबंधीत यंत्रणांना दिले. शासकीय वसतिगृहातील मुलांना तातडीने अनुदान मिळावे यासाठी समाज कल्याण विभागाने येत्या आठ दिवसात निधी वर्ग करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात 39 कोटी 65 लाख रूपये रक्कमेची एकूण 50 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यास तसेच 500 स्मार्ट अंगणवाडी करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज मेडीकल कॉलेज करीता MRI मशीन खरेदी करण्यासाठी 16 कोटी रूपये रकमेस मान्यता देण्यात आली आहे. मिरज मेडिकल कॉलेज येथे 600 कि. वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सौर प्रकल्प आस्थापित करण्यासाठी 3 कोटी 81 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. लम्पी आजारावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 1 कोटी 86 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जलनि:सारण विभागाकरीता अत्याधुनिक पध्दतीचा मॅन होल मधील गाळ काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर रोबोट खरेदी करण्यासाठी 40 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

00000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त सोमवारी आणि मंगळवारी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत

मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 16 जानेवारी व मंगळवार दि. 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात लौकिक निर्माण केला आहे. देशाच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप निर्माण झाले आहेत. नव उद्योजकांसाठी महाराष्ट्राने  नेहमीच लाल गालिचा अंथरलेला आहे. राज्यात आतापर्यंत 18 टक्के स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्ताने शासनाच्यावतीने रोजगारक्षम उमेदवारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे कशाप्रकारे आयोजन करण्यात येत आहे याविषयी सविस्तर माहिती डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महिला व बालविकास, पर्यटन क्षेत्र आणि कौशल्य विकासासाठी इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी – मंत्री मंगलप्रभात लोढा  

मुंबई, दि. १३ : राज्यातील महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बाल सुधारगृहांचे बळकटीकरण, पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराच्या माध्यमातून पर्यटन आणि कौशल्य विकासात एक लाख रोजगार निर्माण होतील. तसेच महिला व बालविकास विभागाच्या विकासाला चालना मिळेल, असे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

मंत्रालयातील दालनात आज मूळ भारतीय वंशाचे कॅनडास्थित नागरिक इंडो-कॅनेडियन चेंबर कॉमर्सच्या शिष्टमंडळासोबत पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला बाल विकास या विषयाच्या अनुषंगाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,कौशल्य विकास आयुक्त रामास्वामी एन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल,महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि.रा.ठाकूर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर, कॅनडा येथील इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारव्दाज, सदस्य राकेश जोशी, चिराग शहा, विरेंद्र राठी, राजेश शर्मा, दीपक शमाणी, अनिल शर्मा, चिन्मय चिक्रमने उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. सागरी गड-किल्ले येथील पर्यटन वाढीसाठी इंडो-कॅनेडियन चेंबर कॉमर्स सहकार्य करणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. पर्यटन क्षेत्रात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासन महिला धोरण, कॅराव्हॅन धोरण आणत आहे. कौशल्य विकास विभागाअंतर्गत कॅनडा मध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण भारतात देण्यासाठी त्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल. या माध्यमातून पाच हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. सामाजिक क्षेत्रात देखील १०० च्या वर अंगणवाड्या दत्तक घेण्याचा मानस इंडो-कॅनेडियन चेंबर कॉमर्सचा आहे त्यामुळे अंगणवाड्यांचा विकास होण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी सहकार्य करणार :- अरविंद भारद्वाज

इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. भारद्वाज म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटन वाढावे यासाठी आमच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. वॉटर स्पोर्टस, सागरी गड किल्ले या पर्यटनात नक्कीच प्राधान्याने काम करण्यात येईल त्याच बरोबर कौशल्य विकास आणि महिला व बालविकास क्षेत्रातही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करण्यात येईल, असेही श्री. भारव्दाज यांनी स्पष्ट केले.                                                                                                                 ००००

संध्या गरवारे/विसंअ

परळ येथील महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती संपन्न

मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत परळ येथील कामगार मैदान येथे गुरुवारी झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी विविध उद्योग, कंपन्या, आस्थापनांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे. १ हजार २०० उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. उर्वरित उमेदवारांनी कंपन्यांकडे नोंदणी केली असून पात्रतेनुसार त्यांना संधी मिळणार आहे. मेळाव्यात विविध ३१ कंपन्यांनी सहभागी होत त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी मुलाखती घेतल्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.

पाच लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये मागील महिन्याभरात हा चौथा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.

एअरटेल, अथेना बीपीओ, फन अँड जॉय ॲट वर्क, करिअर एंट्री, मॅजिक बस, एसएम रिक्रूटमेंट, हिंदू रोजगार डॉट कॉम, उडान ५०५, कल्पवृक्ष प्रा. लि., जीएस जॉब सोल्यूशन, आरटीईसी प्रा. लि., सॅपिओ ॲनेलिटिका, कॅटेलिस्ट टॅलेंट मॅनेजमेंट, बझवर्क्स, इंपेरेटिव्ह बिझनेस, मनी क्रिएशन, स्पॉटलाईट, टीएनएस एंटरप्राईजेस आदी विविध ३१ कंपन्या, उद्योग, आस्थापनांनी त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी या मेळाव्यात मुलाखती घेतल्या.

स्वयंरोजगारविषयक योजनांचे मार्गदर्शन

मेळाव्यामध्ये उमेदवारांना नोकरीविषयक विविध संधींबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्याचबरोबर बायोडाटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी याबाबतही माहिती देण्यात आली. उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये राज्य शासनाच्या विविध महामंडळांनी सहभाग घेतला. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

००००

इरशाद बागवान/विसंअ

बचत गट स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांचे महत्त्व रुजण्यास मदत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. 13: संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्यास व रूजण्यास मदत होईल. महिला बचत गटांच्या उत्पादनाचे ब्रँडिग होणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आर्थिक निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन भवन आवारात महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलला भेटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषि उपसंचालक श्री. मोरे आदिंसह अन्य मान्यवर, महिला बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होत्या.

नियोजन भवन आवारात लागलेले स्टॉल – गौरी सोहम गृह उद्योग माळीनगर (ता. माळशिरस) (रागी, ज्वारी, बाजरीचे कुकीज), सिद्धशोभा ज्वारी प्रक्रिया युनिट कुंभारी (ता. द. सोलापूर) (ज्वारी रवा, डोसा, इडली), गणेश तानाजी गुंड औंढी (ता.मोहोळ) (ज्वारी कडक भाकरी), शंतनु पाटील बार्शी (ज्वारी पोहे, चिवडा, बिस्कीटे, नाचणी बिस्कीटे), प्रियदर्शनी महिला बचत गट अक्कलकोट (ज्वारी, बाजरी, नाचणीपासूनचे कुकीज) 

ट्रॅक्टरचे वितरण

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. यामध्ये उत्तम साठे, किसन साठे, अभिजीत मनसावले, श्रीमती वैशाली सरवळे, यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.  तसेच, नव्याने ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दत्तात्रय कोंडीबा दोडतले (औज- आहेरवाडी), शशिकला अप्पासाहेब लाळसंगे (मंद्रुप) उत्तर सोलापूर तालुक्यातील सखुबाई अच्युत कोकाडे, अकोलेकारी, प्रियंका देविदास लामकाने अकोलेकारी आणि अभिमन्यु विभुते, नानज यांना ट्रॅक्टरकरिता तर सरिता धोंडीबा खराडे (मंद्रुप, ता. द. सोलापूर) यांना पेरणी यंत्राकरिता पूर्व संमती पत्र वाटप करण्यात आले.

दरम्यान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत भिंतीपत्रकाचे पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त  नियोजन भवन आवारात उभारण्यात आलेल्या सेल्फी पाईन्टवर पालकमंत्री यांनी सेल्फी काढली.

00000

साेलापूर पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर, दि. 13: जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात आले असून, या संपर्क  कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे महसूल पालकमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  मनिषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले आदिसह मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ  मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून कार्यालयाचा संपर्क क्रमांक 0217-2731004 आहे. संपर्क कार्यालयाच्या समन्वयक म्हणून माढाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क कार्यालयात नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसिलदार वाकसे नागु हरीबा (भ्रमणध्वनी क्र. 9096792147) व तीन कर्मचारी व एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत पालकमंत्री संपर्क कार्यालयात 117 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 68 अर्ज निर्गमित केले आहेत. 49 अर्ज प्रलंबित आहेत.

00000

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली  कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर, दि. १३: केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत. तसेच पायाभूत सुविधा, विकास कामे दर्जेदार होतील, यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केल्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या नियोजन भवन सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, श्रीमती प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार तसेच महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. नव्याने करण्यात येणाऱ्या कामांसाठी नियमावली तयार करावी.  सोलापूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच नागरिकांना समप्रमाणात व समान दाबाने पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावावी. सांडपाण्यातून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानासह इतर आवश्यक ठिकाणी करावा. तसेच जल शुद्धीकरण केंद्रावरती सोलर यंत्रणा बसवावी, जेणेकरून खर्चात बचत होईल. सार्वजनिक नळ जोडण्याबाबत महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सोलापूर स्मार्ट सिटीसाठी एकूण 753.48 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून विकास कामांसाठी 700.55 कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे.  स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ओपन जिम, ई-टॉयलेट, घंटागाडी  खरेदी, पाणीपुरवठा यंत्रणा सुधारणा, होम मैदान नूतनीकरण, उद्यान सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम, रंगभवन चौक पब्लिक प्लाझाची निर्मिती, ट्रान्सफर स्टेशन, सिद्धेश्वर तलावाचा विकास, महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, स्ट्रीट लाईट, इंद्र भवन इमारत, रूफ टॉप सोलर पॅनल आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली.

सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उजनी जलाशय ते सोलापूर समांतर जलवाहिनी वाढीव पाणीपुरवठा  योजना मार्गी लावण्यासाठी  तात्काळ योग्यती कार्यवाही केली जाईल. असेही आयुक्त तेली-उगले यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी मौलिक सूचना केल्या.

00000

नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी; तृणधान्य आहेत पौष्टिक भारी

पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मकर संक्रांती भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे. तृणधान्याचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत.

तृणधान्य सेवनाचे अनेक फायदे आहेत त्याविषयी राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख…..

 भारत हा जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. आजकालची तरुण पिढी आरोग्यदायी खाणे व राहणे यावर लक्ष केंद्रित करत आहे. तृणधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थ असल्यामुळे याकडे लोकं ‘सुपरफूड’ म्हणून पाहू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारखे पौष्टिक तृणधान्ये ही कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध आहेत.

उत्पादकता वाढवण्यावर भर 

पौष्टिक तृणधान्य पिकाचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहू भागात होते. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पद्धती टिकून रहावी, याकरिता सुधारित बियाणे व अवजारे यांचा विविध योजनांद्वारे पुरवठा करुन उत्पादकता वाढवण्यावर महाराष्ट्र शासनातर्फे भर देण्यात येणार आहे. तसेच शासनातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रिया व मूल्यसाखळी विकसनावर भर देण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन होईल.या निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचा खप वाढेल आणि त्याचा फायदा कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरेल.

तृणधान्यांचे पोषणमूल्य

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.

राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल तर पौ‍ष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन व उत्पन्न वाढीमुळे बळीराजा सुखावेल.

000000

संकलन : विभागीय माहिती कार्यालय, पुणे

 

 

 

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूरदि. १३ (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत. तसेच पायाभूत सुविधा, विकास कामे दर्जेदार होतील, यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांच्या नियोजन भवन सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, श्रीमती प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार तसेच महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. नव्याने करण्यात येणाऱ्या कामांसाठी नियमावली तयार करावी.  सोलापूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच नागरिकांना समप्रमाणात व समान दाबाने पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावावी. सांडपाण्यातून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानासह इतर आवश्यक ठिकाणी करावा. तसेच जल शुद्धीकरण केंद्रावरती सोलर यंत्रणा बसवावी, जेणेकरून खर्चात बचत होईल. सार्वजनिक नळ जोडण्याबाबत महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी साठी एकूण 753.48 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून विकास कामांसाठी 700.55 कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे.  स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ओपन जिम, ई टॉयलेट, घंटागाडी खरेदी, पाणीपुरवठा यंत्रणा सुधारणा, होम मैदान नूतनीकरण, उद्यान सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम, रंगभवन चौक पब्लिक प्लाझाची निर्मिती, ट्रान्सफर स्टेशन, सिद्धेश्वर तलावाचा विकास, महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, स्ट्रीट लाईट, इंद्र भवन इमारत, रूफ टॉप सोलर पॅनल आदि कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली.

तसेच, सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उजनी जलाशय ते सोलापूर समांतर जलवाहिनी वाढीव पाणीपुरवठा  योजना मार्गी लावण्यासाठी तात्काळ योग्यती कार्यवाही केली जाईल. असेही आयुक्त तेली उगले यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी मौलिक सूचना केल्या.

00000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...