शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1683

८.६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड ६ फेब्रुवारीला

मुंबई, दि ६ : शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड देय असलेल्या व्याजासह ६ फेब्रुवारी रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए. यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-११.१२/प्र.क्र.१८/ अर्थोपाय दि. ०१ फेब्रुवारी, २०१३ अनुसार ८.६७% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ अदत्त शिल्लक रकमेची दि. ०५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. ०६ फेब्रुवारी, २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ०६ फेब्रुवारी, २०२३ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.   बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी ८.६७% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

रोख्यांच्या मागील बाजूस ‘प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे नमूद करून भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकाच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत.  लोक ऋण कार्यालय  महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करतील.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं

शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 6 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी प्रणालीवरुन नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती दिनांक २२ सप्टेंबर, २०२२  पासून सुरु झालेली आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर करावेत. दरवर्षी प्रमाणे नोंदणीकृत झालेल्या अर्जापैकी नूतनीकरण अर्जाचे प्रमाण नविन अर्जाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपले स्तरावरील नुतनीकरणाचे अर्ज प्रथम प्राधान्याने पडताळणी करुन ऑनलाईन मंजूर करुन संबधित सहायक आयुकत, समाज कल्याण, ( मुंबई शहर/उपनगर) यांचे लॉगीनकरिता तात्काळ पाठवावेत. तसेच महाविद्यालयांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाही, यांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन मुंबई उपनगर आणि मुंबई शहरचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

000

महापालिकेच्या विकास कामांना अधिकचा निधी देणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 6  (जि.मा.का.) :- शहरातील नागरीकांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याबरोबरच  महापालिका क्षेत्रात विविध विकास कामेही महापालिकेमार्फत केली जातात. या विकास कामांना शासन स्तरावरुन तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून अधिकचा निधी उपलब्ध करुन दिला जाईलअशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिली.

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरण आणि महापालिकेत लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण पालकमंत्री डॉ.  सुरेश खाडे यांच्याहस्ते आज करण्यात आले. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटीलआमदार सुधीर गाडगीळमहापौर दिग्विजय सुर्यवंशीउपमहापौर उमेश पाटीलमाजी आमदार दिनकर पाटीलमहापालिका आयुक्त सुनिल पवार यांच्यासह महापालिकेचे मान्यवर पदाधिकारीनगरसेवकअधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणालेमहापालिकेकडील विकास कामे गतीने पूर्ण होऊन नागरीकांना दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात.  विकास कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी या कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल. सांगलीमिरज आणि कुपवाड शहरातील रस्त्यांची कामे गतीने करण्यास प्राधान्य दिले जाईल.  विकास कामात महापालिका राज्यात आदर्शवत व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी बोलताना केले.

कोरोना काळात महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून या काळात चांगले काम केले आहे. या कळात महापालिकेकडील 12  कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र महापालिका प्रशासनाने या 12 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 10 लाखाची मदत केली. तसेच या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करुन त्यांना 50 लाखाच्या सानुग्रह अनुदानाची मदत मिळवून देऊन सामाजिक भान जपले असल्याचे पालकमंत्री श्री. खाडे म्हणाले. शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक सहाय्याचा विनियोग चांगल्या कामासाठी करावाअशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. खाडे यांनी यावेळी व्यक्त केली.   चिनअमेरिकाजपान यासह काही देशा कोरोनाच रुग्ण  पुन्हा वाढत आहेत त्यामुळे नागरीकांन घाबरुन न जाता  कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. ज्यांचे लसीकरणाचे डोस घ्यावयाचे राहिले  आहेत त्यांनी ते घ्यावेतअसे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेकडील विकास कामांना अधिकचा निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु अशी ग्वाही देऊन खासदार श्री. पाटील म्हणालेकोरोना काळात राज्य व केंद्र सरकारने चांगले काम केल्यामुळे आपण कोविडची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळू शकलो. लसीकरणाचे काम गतीने झाल्याने आपल्याकडे रुग्णांची संख्या अटोक्यात राहिली. त्यामुळे ज्या नागरीकांनी लसीचा डोस घेतलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न केल्याबद्दल आमदार श्री. गाडगीळ यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले.

महापौर दिग्विज सुर्यवंशीज्येष्ठ नगरसेवक शेखर ईनामदार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. महापालिका आयुक्त श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी आभा मानले.

00000000

बाल विज्ञान काँग्रेसमधून निर्माण होतील उद्याचे अब्दुल कलाम – डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना

नागपूर, दि.6- भारतात विविध शोध लावणाऱ्या प्रतिभावंत बालकांची कमी नाही. विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. या बाल विज्ञान काँग्रेस मधूनच उद्याचे अब्दुल कलाम निर्माण होतील, असा आशावाद भारतीय विज्ञान काँग्रेसच्या महासचिव डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी व्यक्त केला.

बाल विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला.  अध्यक्षस्थानी डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना होत्या तर नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक उमेश कुमार रस्तोगी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राज कुमार जोशी, बाल विज्ञान काँग्रेसच्या शैक्षणिक समितीचे अध्यक्ष डॉ. ललीतकुमार शर्मा, नागपूर विद्यापीठाचे आंतरशाखीय प्रमुख डॉ. प्रशांत कडू, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॅा.एस.रामकृष्णन, डॅा.अनुपकुमार जैन, डॅा.सुजित बॅनर्जी, संयोजक डॅा.निशिकांत राऊत याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. उमेशकुमार रस्तोगी म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी सादर केलेल्या संशोधन व कल्पना पाहुन आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित आहे. ललीत शर्मा म्हणाले की, सामान्यांपेक्षा वेगळा विचार करून व जग बदलेल असे शोध लावा.

प्रशांत कडू यांनी प्रास्ताविकेतून बाल विज्ञान काँग्रेसच्या आयोजनाची माहिती दिली.

बाल विज्ञान काँग्रेसमध्ये देशभरातील 29 राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांना त्यांचे संशोधन दाखवण्याची आणि वैज्ञानिक समुदायातील त्यांच्या समवयस्कांशी संलग्न होण्याची संधी मिळाली, असे संयोजक डॉ. निशीकांत राऊत यांनी सांगितले संचालन योगेश्वरी भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमाला बालवैज्ञानिक, विद्यार्थी उपस्थित होते.

000

आता चर्चा महिलांच्या कर्तृत्वाची व्हावी – डॉ.द्रिती बॅनर्जी

नागपूर, दि. 6 : देशातील महिलांनी मेहनतीच्या बळावर विविध क्षेत्रातील सर्वोच्च पदे प्राप्त केले आहे. स्वबळावर विविध क्षेत्रात त्या नावलौकिक मिळवित आहे, सातत्याने पुढे जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा व्हावी, असे आवाहन कोलकाता येथील भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक डॉ.द्रिती बॅनर्जी यांनी केले.

भारतीय विज्ञान काँग्रेस निमित्त आयोजित महिला विज्ञान काँग्रेसच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ.अदा योनथ, डॉ.हॅगीथ योनथ, राष्ट्रीय फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालक डॉ.शशी बाला सिंग, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना, सचिव डॉ.एस.रामकृष्णन, महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे आदी यावेळी उपस्थित होत्या.

भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या 105 वर्षाच्या इतिहासातील डॉ.द्रिती बॅनर्जी या पहिल्या महिला संचालक आहे. पुढे त्या म्हणाल्या, वैदीक काळात महिला सर्वच क्षेत्रात पुढे होत्या. समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्या सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडत होत्या. नंतरच्या काळात मात्र त्या चुल आणि कौटुंबिक जबाबदारीत बांधल्या गेल्या आणि समस्या निर्माण झाल्या. आता महिलांनी स्वबळावर पुन्हा विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे  आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा झाली पाहिजे,असे डॉ.बॅनर्जी म्हणाल्या.

महिलांना मुक्तपणे विविध क्षेत्रात जाता आले पाहिजे. यासाठी तिच्यावर असलेल्या जबाबदारीचे विभाजन होणे आवश्यक आहे. महिला म्हणून ती करत असलेल्या काही कामांची जबाबदारी पुरुषांनी स्विकारावी. महिलांनी स्वत:वर विश्वास ठेवावा. प्रत्येक गोष्ट मी करु शकते हा आत्मविश्वास असला पाहिजे. आताची महिला सर्वच क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका बजावत आहे, असे डॉ.बॅनर्जी यांनी सांगितले.               डॉ.शशी बाला सिंग म्हणाल्या, महिलांनी आव्हाने स्विकारली पाहिजेत. संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार करावा. महिलांना त्या स्वत:च पुढे नेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी.

डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या, महिला शास्त्रज्ञांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने त्यांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याची व त्यावर मंथन करण्याची संधी मिळते. महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे गेले पाहिजे.               नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ.अदा योनथ यांनी, ‘विज्ञान तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे पुरुषांसह महिलांसाठीही तितकेच खुले आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना उत्तम काम करण्याची संधी आहे. खऱ्या अर्थाने जगभर महिला सक्षमीकरणाचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक संयोजक डॉ.कल्पना पांडे यांनी केले.

या आयोजनात देशातील विविध विद्यापिठे, महाविद्यालयातून आलेल्या महिला शास्त्रज्ञांनी आपल्या नाविन्यपुर्ण संकल्पना, यशोगाथा सादर केल्या. विज्ञान काँग्रेसच्या द्वितीय आणि अंतिम सत्रात देशभरातील महिला शास्त्रज्ञ, डॅाक्टर्स, प्राध्यापक, अधिव्याख्याता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन व आभार डॉ.मंजु दुबे यांनी केले.

00000000

विदर्भातील समृद्ध इतिहास : पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित करणारे ‘समृद्ध भारतीय वारसा स्थळे’ हे पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणारे प्रदर्शन येथे भेट देणाऱ्या जिज्ञासुंचे खास आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

विद्यापीठ परिसरात प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागात आणि केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या प्रागैतिहासिक शाखा आणि उत्खनन शाखेच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

वास्तुकला वारसा प्रदर्शनात नागपूरसह विदर्भातील महत्त्वाच्या वास्तूंची माहिती दर्शविण्यात आली आहे. यात काशीबाई का छत (वर्धा), नगर्धान किल्ला, जागृतेश्वर मंदिर (भंडारा),विटांचे मंदिर(वर्धा) यासह नागपुरातील केपी ग्राउंड, जुने उच्च न्यायालय, जुने सचिवालय, विधानभवन, आरबीआय, आयपीओ या इमारतीचे वास्तुकला वारसा प्रदर्शनाच्या दर्शनी भागात ठळकपणे मांडण्यात आला आहे.

गोंड वास्तुकलेचा सुबक वारसा

विदर्भात ठीक -ठिकाणी असलेले गोंड राजावटीतील वास्तुकलेचे सुंदर नमुने या प्रदर्शनात दर्शविण्यात आले आहेत. यात मुख्यत्वे गोंड राजाचे राज्य चिन्ह, गोंड राजाची समाधी(चंद्रपूर),  जाटपुरा द्वार आणि विस्तीर्ण परिसरात स्थित असलेला बल्लारपूर किल्ला दर्शविण्यात आला आहे.

मराठी भाषेतील समृद्ध अशी झाडीबोली या ठिकाणी दर्शविण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे झाडी बोली चा वापर. तसेच या भाषेतील ‘जागली’, ‘पोरका’, ‘वास्तुक विश्वंभर’, ‘लाडाची बाई’ पुस्तके ‘अजनाबाईची कविता’, ‘आडवा कविता’, ‘झाडीची कानात सांग’, ‘घामाचा दाम’, ‘झाडीची माती’ आदी काव्यसंग्रहांची नावे या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्यात आली आहे. आड अर्थात माळी किंवा गच्ची उभार म्हणजेच जास्तीचा कौल म्हणजे कवेलू काऊन अर्थात का म्हणून असे झाले बोलतील शब्दही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. झाडी बोलीतील समृद्ध नाट्यपरंपरा, कळसुत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तन, भारुड, वासुदेव, तमाशा, वग, दंडार, खडीगंमत, दशावतार या कलाप्रकारांचे या ठिकाणी सुबक प्रदर्शन लावण्यात आले आहे.

पुरातत्व उत्खनन

पुरातत्व उत्खननात आढळून आलेल्या वस्तुंचे भारतीय संस्कृतीतील योगदान दर्शविणारे अडम,मनसर आणि पवनी     येथील वैभव दर्शविण्यात आले होते.

अडम (1988-1992)

नागपूर जिल्ह्यात (भंडारा नागपूर सीमेवर) असलेल्या अडम नावाचे ठिकाण डॉ. अमरेंद्र नाथ यांनी उत्खनन केले होते, तेथून प्रथमच ताम्रपाषाण- लोहयुग, निरंतर सातवाहनपूर्व आणि सातवाहन काळातील सांस्कृतिक ठेवी सापडल्या आहेत. तटबंदीच्या सातवाहन शहराच्या अवशेषांव्यतिरिक्त, येथून महत्त्वाच्या पुरातन वास्तू आणि मातीची नाणी सापडली आहेत, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘असीक जनपद’ कोरलेले आहेत.

पवनी (1968-70 आणि 1993-94)

भंडारा जिल्ह्यात स्थित पवनी येथे प्रथमच जे. पी. जोशी आणि एस. बी. देव यांनी उत्खनन केले. उत्खननात मौर्य काळातील प्राचीन स्तूपावर बांधलेल्या शूंग स्तूपाचे पुरावे मिळाले. विदर्भात असलेल्या कोणत्याही उत्खननातून या जागेवरून प्रथमच प्राचीन स्तूपाचा पुरावा मिळाला आहे. सन १९९३-९४ मध्ये डॉ.अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात मौर्यपूर्व व मौर्य कालखंड, शूंग, सातवाहन व वाकाटक यांचे पुरावे मिळाले आहेत.

मनसर (१९९४-९५)

नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे डॉ. अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात आले, तेथून वाकाटक काळातील विटांनी बनवलेल्या मंदिराचे अवशेष मिळाले. संबंधित कलाकृती सापडल्या. पुरातन वास्तूंमध्ये उमा-महेश्वरा, लज्जागौरी, टेराकोटाच्या मूर्ती, लोखंडी चिलखत असलेल्या स्टुकोच्या मूर्ती, क्षत्रप आणि वाकाटक राज्यकर्त्यांची चांदी आणि तांब्याची नाणी आणि टेराकोटा साचे यांचा समावेश होतो. येथून मिळालेल्या मातीच्या भांड्यांच्या अभ्यासाच्या आधारे हे प्राचीन स्थळ इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील आहे. 6 ते 7 वी दरम्यानच्या कालावधीसाठी निर्धारित केले आहे.

-रितेश मो.भुयार

माहिती अधिकारी

आदिवासी विज्ञान काँग्रेसमध्ये जननायकांच्या कर्तृत्वाचे दर्शन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेली 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. आदिवासी समाजाला या विज्ञानाच्या महाकुंभात प्रथमच मिळालेले स्थान हेच ते वैशिष्टय. या समाजाने निसर्ग व जैवविविधता संवर्धन, वनौषधींचा शोध, जपलेले सांस्कृतिक वैभव म्हणजे देशाचा अमूल्य ठेवा आहे. या समाजाने विकसित केलेले तंत्र त्याचा विज्ञानात उपयोग व्हावा या दृष्टीने भारतीय विज्ञान काँग्रेसने आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश केला आहे. नागपूर विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात शहीद बिरसा मुंडा सभागृहाच्या प्रवेश द्वारावरच आदिवासी जननायक हे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

आदिवासी समाजाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान अमूल्य आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्या त्या भागातील आदिवासींचे नेतृत्व करणारे नायक येथे ठळकपणे दर्शविण्यात आले आहेत. देशभरातील एकूण 50 आदिवासी जननायकांची माहिती या ठिकाणी सचित्र प्रदर्शित करण्यात आली आहे. यात आदिवासी समाजातील लढवय्या पाच महिलांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी जननायक

ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यात महाराष्ट्राचा कोकण भाग अग्रणी होता. रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे झालेला लढ्यात आदिवासींचे नेतृत्व करणारा उग्य महादया कातकरी हा जननायक या प्रदर्शनात ठळकपणे दिसून येतो. उरण तालुक्यातील चिरनेर जंगलात ब्रिटिशांना निकराचा लढा देणारे उग्य महादया यांचे बलिदान दिसून येते.

अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांचे शौर्य ही या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ब्रिटिशांना नामोहरम करण्यात मोलाची भूमिका बजावणारे राघोजी. यासह ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजींची कारकीर्द आणि शेवटी पंढरपूर येथे त्यांना झालेली  अटक असा इतिहास येथे मांडण्यात आला आहे.

नाशिक येथील नंदुर शिंगोटे यांचे योगदानही या प्रदर्शनात ठळकपणे दिसून येते. नाशिक-पुणे मार्गावर ब्रिटिशांना रोखून धरत झालेली भीषण लढाई आणि पुढे त्या घाटास देण्यात आलेले ‘भागोजी घाट’ हे नाव त्यांच्या कार्याची चुणूक दर्शविते.

या प्रदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील घोटगाव येथील बाबुराव शेडमाके यांच्या कार्याचा गौरव ही दिसून येतो.त्यांनी आदिवासी तरुणांना इंग्रजांविरुध्द एकजूट करून रोमहर्षक लढा दिला आहे.

आदिवासी राजे राणींचेही कटआऊट

आदिवासी विज्ञान काँग्रेसच्या मुख्यमंचाच्या शेजारी त असलेले आदिवासी राजवटीतील महापुरुषांचे कट आउटही लक्ष वेधून घेतात. येथे राणी दुर्गावती राजमाता राणी हिराई आत्राम आणि नागपूरचे निर्माते भक्त बुलंदशहा यांचे कट आऊट त्यांच्या कार्याचा गौरव दर्शवितात.

-रितेश मो.भुयार

माहिती अधिकारी

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विज्ञान पोहोचविण्याचा निर्धार; सायन्स कम्युनिकेटर काँग्रेसमध्ये नवसंशोधकांनी केले सादरीकरण

नागपूर,दि.6: वनस्पतींपासून वीज निर्मिती, नवजात बालकांच्या आरोग्य चाचण्यांचे महत्त्व, मातीतील किटांणूंमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून बालकांचे संरक्षण, मासेमारी उत्पादनातील वाढ, हवामान शास्त्राचा स्मार्टग्रीडसाठी उपयोग, महाडेक दगडांचे संरक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाचे महत्व विशद करणाऱ्या संशोधनांचे सादरीकरण करत आज भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये वैज्ञानिकांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विज्ञान पोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.  

      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विज्ञापीठात सुरु असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आज सायन्स कम्युनिकेटर काँग्रसचे आयोजन करण्यात आले. यात विविध सत्रांमध्ये संशोधनकार्याचे सादरीकरण झाले.

वनस्पतींपासून वीज निर्मितीच्या संशोधनामुळे देशातील ऊर्जास्त्रोतात भर पडेल

वनस्पतींपासून वीज निर्मितीचे नव संशोधन पटना येथील महिला महाविद्यालयाच्या डॉ.पिंकी प्रसाद यांनी सादर केले. वनस्पतींमधील कॅल्सियम,झिंक,कॉपर,आर्यन आणि मेटल या घटकद्रव्यांचा उपयोग करून वीज निर्मितीचे संशोधन कार्याबाबत त्यांनी माहिती सादर केली. उर्जा संकट टाळण्यासाठी आतापासूनच वनस्पतींपासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सांघिक प्रयत्न व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य चाचण्यांनी नवजात बालकांच्या विकारांवर मात

भारतात थॅलेसेमिया, डाऊनसिंड्रोम आदी आजारानेग्रस्त बालके आणि त्याचा कौटुंबिक व सामाजिक जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी नवजात बालकांच्या जन्मापासून तीन दिवसांच्याआत महत्वाच्या पाच आरोग्य चाचण्या मोफत व्हाव्यात, असे मत पंजाब विद्यापीठाच्या डॉ राजींदर कौर यांनी मांडले. भारत देशात दररोज जन्माला येणाऱ्या बालकांपैकी 1500 नवजात बालकांमध्ये अनुवांशिक विकार आढळतात. या ठराविक बालकांचा विकास पूर्णपणे खुंटतो. अशा बालकांचे संगोपन हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरते व एका सुदृढ समाजासाठीही मारक ठरते असे डॉ. राजींदरकौर म्हणाल्या. नवजात बालकांची चाचणी करून त्यांच्यातील व्यंगत्वदूर करण्यासाठी 1960 पासून जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम सुरु असून भारतातही याबाबत पाऊले पडण्याची गरज असल्याचे त्यांनी मांडले. अनुवांशिक व्यंगत्वाचे निदान करणाऱ्या महत्वाच्या पाच आरोग्य चाचण्या सर्वांना नि:शुल्क उपलब्ध झाल्यास सुदृढ समाज निर्माण होईल, असे मत त्यांनी मांडले.

सुसंवादाने मत्स्य उत्पादनात वाढ

आसाम आणि बिहारमधील गोड्या पाण्यातील मासेमारी पद्धतीचा अभ्यास करून आणि प्रत्यक्ष 8 हजारांवर अधिक मच्छिमारांना प्रशिक्षण देणारे कोलकाता येथील केंद्रीय गोड्यापाण्यातील मासेमारी संशोधन संस्थेचे (आयसीएआर) गणेश चंद्र यांनी मत्स्य उत्पादनात सुसंवादाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन मांडले. गेल्या तीन दशकात देशाच्या मत्स्य उत्पादनात 21 पटीने वाढ झाली आहे. मच्छिमार आणि मत्स्य उत्पादक यांना मिळणाऱ्या माहितीतील अडथळे आणि विसंवाद यामुळे या क्षेत्राचे नुकसान होत आहे. ब‍हुतांश मच्छिमार अशिक्षीत असल्याने मासेमारी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. योग्य माहितीच्या अभावामुळे सहकारक्षेत्राच्या फायद्यापासूनही हे मच्छिमार दुर्लक्षित राहतात. मच्छिमारांना वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र,रेडियो आदी समाजमाध्यमांपासून मिळणारी माहिती ही स्थानिक माहितगारांपासून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या तुलनेत कमी असल्याचे निरीक्षणही त्यांनी मांडले. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक संपर्क माध्यमांचा उपयोगासह सुसंवाद उपयुक्त ठरेल, असा विचार श्री चंद्र यांनी मांडला.

मातीजन्य किटाणुंपासून बालकांचे संरक्षणाचा विज्ञानाद्वारे आवाज

‘मातीतील किटाणुंमुळे बालकांना होणारे आजार व ते दुर्लक्षून ओढवणारे आरोग्याचे संकट’, यावर आधारित संशोधन मांडणाऱ्या लखनऊ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या डॉ सुमन मिश्रा यांनी दैनंदिन जीवनातील सामान्य विज्ञानच उपस्थितांसमोर आणले. मातीतील किटाणुंचा पोटात होणार प्रवेश  त्यामुळे बालकांमध्ये होणारी पोटदुखी याकडे पालकांकडून होणारे दुर्लक्ष आणि भविष्यात या आजाराचे दुष्परिणाम अशी श्रृंखलाच डॉ. मिश्रा यांनी मांडली. जागतिक आरोग्य संघटनेनेही पोटदुखीमुळे विद्यार्थ्यांची  शाळेत गळती होत असल्याचे निरीक्षण मांडल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातही याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली. सध्या लखनऊ जिल्ह्यातील 5 गावे आणि 6 शाळांमध्ये या दिशेने कार्य सुरु झाले असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याचप्रमाणे, सीएसआयआर दिल्लीच्या वैज्ञानिक डॉ. अवनी खाटकर यांनी हवामान शास्त्राआधारे देशातील उर्जाक्षेत्रात वापरात असलेल्या ग्रीडमध्ये सुधार होवून स्मार्टग्रीड तयार करण्याचे संशोधन मांडले. शिलाँग येथील इशान्य भारत विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ मेघाली यांनी इशान्य भारतातील महाडेक खडकांच्या संरक्षणाची गरज व्यक्त केली. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या नादौन येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रा.सुनिल कुमार शर्मा यांनी येत्या काळात ऑनलाईन शिक्षणाची तंत्रस्नेही पद्धत मांडली.

अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषध निर्माण विभागाचे प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक आणि प्रियदर्शनी जे.एम.औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिनेश चाफले होते.

पहिल्या सत्रात जेनेक्स्ट जिमोनी संस्थेच्या डॉ.सुप्रिया काशिकर यांनी संस्थेद्वार करण्यात आलेल्या अँटीबॉडी संशोधनाची माहिती दिली. अन्य देशांच्या तुलनेत भौगोलिक परिस्थितीनुसार भारतात आढळणारी वैविद्यपूर्ण अँटीबॉडीज आणि त्याचा टॉप डाऊन व बॉटम पद्धतीने विभागणी करून झालेल्या अभ्यासाबाबत डॉ.काशिकर यांनी मांडणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ विकास खरात आणि गोरखपूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.सुधीर श्रीवास्तव हे अध्यक्षस्थानी होते.

00000

सिंड्रेला नको, सायबरेला हवी – डॉ. शशी बाला सिंग

नागपूर, दि. 6 – तंत्रज्ञान महिला आणि मुलींसाठी गेम चेंजर ठरू शकते. विशेषत: दुर्गम आणि किरकोळ भागात तंत्रज्ञानामुळे महिला सक्षमीकरणात नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे आम्हाला सिंड्रेला नको, तर महिला सबलीकरण आणि विकासासाठी ‘सायबेरेला’ हवी आहे, असे प्रतिपादन डॉ. शशी बाला सिंग, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), हैदराबाद यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी ‘ग्रामीण महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी तांत्रिक सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या विषयावर सविस्तर माहिती देताना डॉ. शशी बाला म्हणाले की, भारत हा 140 कोटी लोकसंख्येचा देश असून त्यापैकी निम्म्या महिला आहेत. राष्ट्राच्या विकासासाठी या मानव संसाधनाचा वापर करणे आवश्यक आहे.

डॉ. वंदना बी. पत्रावळे, फार्मास्युटिकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, यांनी ‘पर्क्यूटेनियस कोरोनरी स्टेंट्स: फ्रॉम बेंच टू बेडसाइड’ या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ.श्रद्धा जोशी यांनी केले.

0000000

शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक – प्रा.अरविंदकुमार सक्सेना

नागपूर, दि. 6 – मृदा संवर्धन आणि प्रदूषण इ. अशा समस्यांवर मात करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता सध्याच्या आणि वाढत्या जागतिक लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.अरविंद कुमार सक्सेना यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे अध्यक्षपदावरुन प्रा. अरविंदकुमार सक्सेना बोलत होते.

या सत्रात डॉ. ए.के. सिंग, नोएडा यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारत ही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जैवतंत्रज्ञान हे आधुनिक, हरित आणि शाश्वत अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे.  बायोइकॉनोमी चे स्वरूप हे कचरा व्यवस्थापन, शेती, ब्लू बायो-इकॉनॉमी, वन जैव अर्थव्यवस्था, ऊर्जा, कृत्रिम अवयव, पर्यावरण,आरोग्य आणि पोषण, जैव सुरक्षा, उच्च-कार्यक्षमता बायोमटेरियल, कापड इत्यादी क्षेत्रात दिसून येते. कोविड लसीचे यश हे भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या ताकदीचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. वाढत्या स्टार्ट-अप्सची संख्या, हे ऑपरेशन सुरू करणारे नवीन उद्योग एक पाऊल आहे, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.

000000

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...