शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1682

परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण, राज्य शालेय शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देणार – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ६ : परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण मंडळांचे प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त देशांतर्गत मराठी भाषिकांचे संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी राज्य शासनामार्फत यापुढे १० लाख रूपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा मराठी भाषा तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे आयोजित पहिल्या मराठी विश्व संमेलनाचा आज समारोप झाला, त्या वेळी उपस्थित प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. दि. ४ जानेवारी पासून सुरू झालेल्या विश्व मराठी संमेलनात जगभरातील मराठी प्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी मंचावर शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर पुढे म्हणाले, मराठी भाषा शिकू इच्छिणाऱ्या परदेशस्थ विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने ‘प्रथम’ हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. केंद्रीय मंडळांच्या शाळांसह जगभरातील केंब्रीज, ऑक्सफर्ड, हॉवर्ड यासारख्या शिक्षण मंडळांसोबत चर्चा सुरू असून या मंडळांच्या विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.

हे संमेलनाचे पहिले वर्ष असतांनाही मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करून श्री. केसरकर पुढे म्हणाले, पुढील वर्षी नियोजन करतांना मराठी संवर्धनासाठी योगदान देणारे साहित्यिक आणि  महाराष्ट्रामध्ये मराठीचे संवर्धन करू इच्छिणाऱ्या लोकांच्या संस्था रजिस्टर करून एकत्रित केले जाईल. त्यांच्यासाठी वर्षभर संपर्कात राहण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केला जाईल.

जगभरातील महाराष्ट्रीय उद्योजकांची औद्योगिक परिषद झाली. श्री. केसरकर या परिषदेत उपस्थित झालेल्या ७० उद्योजकांचे विशेष आभार मानले. यांच्या माध्यमातून राज्याला तांत्रिक बाबींच्या माहितीची भर पडली, कृत्रिम बुद्धीमत्ता याचा वापर करून शेतीपासून निर्यात उद्योगांपर्यंत यांचे योगदान कसे घेता येईल यांवर चर्चा झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. केसरकर यांनी मराठी भाषा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तर सांस्कृतिक कार्य, उद्योग, नगरविकास विभागाचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मराठी भाषिक एकत्र येऊन भाषा संस्कृतीचे जतन व संवर्धन होण्याच्या उद्देशाने अशा संमेलनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. असे संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांना राज्यशासनामार्फत विविध साहित्य, ग्रंथसंपदा प्रदान करण्यात येईल. तसेच यापुढे दरवर्षी होणाऱ्या विश्व मराठी संमेलनांची निमंत्रणे संबंधितांना संमेलनापूर्वी किमान ६ महिने अगोदर पाठविण्याच्या सूचना करुन विश्व मराठी संमेलनासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात येईल.

देशातील नोंदणीकृत मराठी मंडळातील सदस्यांच्या पाल्यांना महाराष्ट्रातील साहित्य व संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडावे या उद्देशाने त्यांच्यासाठी महाराष्ट्रात शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

००००

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

मुंबई, दि. ६ : लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी ‘निवडणूक वार्तांकन पुरस्कार’ दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ‘मतदार-मित्र पुरस्कार’ दिला जाणार आहे. १० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील.

पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज करू शकतात. त्याकरता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook2022@gmail.com या ई- मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (मोबाईल क्रमांक ८६६९०५८३२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे उद्या शनिवारी राजभवन येथे लोकार्पण – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई, दि. ६ : राज्यातील विविध पवित्र जैन तिर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे लोकार्पण उद्या शनिवार ७ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राजभवन येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सटाना (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा या पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटमध्ये समावेश आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
०००

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ६ : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री श्री. लोढा यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुशीला कोळी, संघटनेचे सहाय्यक संघटक सुधीर परमेश्वर उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनस्तरावरून कार्यवाही करण्यात येत असून याबाबत शासन सकारात्मक आहे. या मागण्यांबाबत त्या त्या संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

०००

इरशाद बागवान/विसंअ

विज्ञान महाकुंभाचा उद्या होणार समारोप

नागपूर,  दि.  6 – विज्ञानाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय  विज्ञान काँग्रेसचा उद्या (दि.7) समारोप होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या या विज्ञान काँग्रेसचा समारोपीय कार्यक्रम दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मुख्य सभा मंडपात होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञ प्रा. ॲडा योनाथ, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने या विज्ञान काँग्रेसचे यजमान पद भूषविले. विज्ञानप्रेमींचा उत्सफूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. नोबेल पुरस्कारप्राप्त प्रा. ॲडा योनाथ यांची उपस्थिती व व्याख्यान यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या विज्ञान काँग्रेसचे उदघाटन करण्यात आले.

२७ परिसंवादांचे आयोजन

विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत एकूण 27 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले.  यात विज्ञान क्षेत्रातील सर्वच विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.अनेक दिग्गजांनी या परिसंवादाला उपस्थिती  दिली. भारताची 2030 मधील वाटचाल,अंतराळ विज्ञान  आणि  तंत्रज्ञान,  कोविड आजारानंतर दिसून  येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन  करण्यात आले होते.  देश -विदेशातील  अनेक संशोधक,  वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते.                                                                                                                                                                                बाल विज्ञान प्रदर्शन

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत.  देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती लावली .

महिला विज्ञान काँग्रेस

महिला विज्ञान  काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.   पद्मश्री  राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार यारदम्यान व्यक्त केले. असंख्य वाटचालींवर मात  करीत  केलेली वाटचाल त्यांनी यावेळी कथन केली.

प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात  आले होते. शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते  झाले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे महासचिव डॉ.ए. रामकृष्ण, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे,अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे आणि आदिवासी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.श्याम कोरेट्टी मंचावर उपस्थित होते. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा या आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता.

शेतकरी विज्ञान काँग्रेस

देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा या संमेलनातील सूर होता.

‘प्राईड इंडिया एक्सपो’ विशेष आकर्षण

प्राईड इंडिया एक्सपो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. शनिवार, दि.  7 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

सायंकाळी सहा ते आठ या वेळेत  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.  यात गझल संध्या, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य, स्वरानंदन या कार्यक्रमांचा  प्रामुख्याने समावेश आहे. पुरातत्व विभाग संग्रहालय, पॅलेस आन व्हिल्स ही गाडी, ॲालिम्पिकच्या धर्तीवर विज्ञान ज्योत,  बाल वैज्ञनिकांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन  या संमेलनात  पहावयास मिळाले.

00000

‘होम स्टेट’ला विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर, दि. 6 – भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेच्या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय व पायाभूत सुविधा तसेच विज्ञान  व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती मांडणारा ‘होम स्टेट दालन’ नागरिकांसाठी लक्षवेधी ठरले असून होम स्टेट या प्रदर्शन हॅालला विज्ञानप्रेमींचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

भारतीय विज्ञान परिषदेच्या परंपरेनुसार प्रत्येक आयोजनामध्ये स्थानिक राज्य सरकारला महत्त्व दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावरच्या या उपक्रमात राज्याचे एक दालन प्रत्येकवेळी असते. या माध्यमातून देशातील संबंधित राज्याला त्या राज्याच्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती व अन्य पायाभूत सुविधा व संशोधन तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती मांडता यावी, ही यामागील भूमिका असते.

‘होम स्टेट’ या स्टॅालमध्ये राज्याची प्रगती दर्शविणारे अनेक स्टॅाल आहेत.  यात शैक्षणिक,राज्यामार्फत राबविण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती राज्याचा प्रगतीचा आलेख दर्शविणाऱ्या दालनात  देण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रातील भरारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. कृषी मध्ये झालेले वेगवेगळे प्रयोग याठिकाणी बघायला मिळतात. आरोग्य क्षेत्रात राज्याने सुलभ व गतीशील उपचार व्यवस्था विकसित केली आहे. तसेच यासंदर्भातील तंत्रज्ञान विकसित होत आहेत. नागपुरच्या उद्योजकता विकास संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तुदेखील या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. मिहान व अन्य ठिकाणच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळे नागपुरची ओळख पुढे येत आहेत. यासंदर्भातील स्टॅाल याठिकाणी आहेत. वृत्तपत्र प्रकाशनासोबतच प्रिंटिंग टेक्नॅालॅाजीमध्ये झालेले प्रयोग व त्यातील तंत्रज्ञान याठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.

प्रत्येकाने भेट द्यावे असे हे दालन आहे. शनिवार, दि. 7 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हे दालन सर्वसामान्यांसाठी सुरू राहणार आहे.

                                              *****

उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होऊन वैज्ञानिकांनी कार्य करावे; नोबेल पुरस्कार विजेत्या ॲडा योनाथ यांचा वैज्ञानिकांशी संवाद

नागपूर,6: “1980मध्ये रायबोजोम संरचनेच्या शोधाला सुरुवात केली तेथून सहा वर्षांनी या संशोधनात पहिले यश हाती आले. हा आनंद अल्पजीवी मानून उच्च ध्येयासक्तीने संशोधनात कार्यरत राहिले म्हणूनच 2009 च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारावर नाव कोरू शकले. वैज्ञानिकांनी उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवून कार्य केल्यास त्यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी एक श्रेष्ठ कार्य ठरेल”, अशा शब्दात नोबेल विजेत्या इस्त्रायली वैज्ञानिक श्रीमती ॲडा योनाथ यांनी आज वैज्ञानिकांशी संवाद साधला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विज्ञापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये मुख्य कार्यक्रमस्थळी ॲडा योनाथ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, ॲडा योनाथ यांची कन्या अदी योना, कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ.संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे, डॉ श्याम कोरट्टी मंचावर उपस्थित होते.

ॲडा योनाथ  यांनी   ‘एव्हरेस्टच्या पलिकडील एव्हरेस्ट’ हा व्याख्यानाचा विषय निवडून सभागृहात उपस्थित देशभरातील वैज्ञानिकांना संबोधित केले. आपल्या व्याख्यानात श्रीमती योनाथ यांनी मानवी शरीरातील रायबोजोमची संरचना शोधण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून दक्षिण व उत्तर ध्रुवावरील प्राण्यांचा अभ्यास  व त्यातील रोमहर्षक किस्से त्यांनी सांगितले. मृत समुद्रावरावर (डेड सी) जीवाणुंचा शोध घेवून त्यांच्यातील रायबोजोमचे केलेले संशोधन आणि एकदा तर उणे 195 अंश सेल्सियस तापमानात प्राप्त डेटा संग्रहीत करण्याचे कार्य केलं, याबाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.

रायबोजोम संरचनेच्या संशोधन कार्यास 1980 मध्ये सुरुवात केली. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन, मेरी क्युरी यांचा आदर्श ठेवून त्यांच्या संशोधनाचा अन्वयार्थ लावत आम्ही पुढे गेलो. या संशोधनाच्या प्रवासात 1986 आम्ही  H5OS चा शोध लावण्यात यश आले. तेव्हा वाटले होते की हेच हिमालयाचे शिखर आहे पण वर बघितले तर लक्षात आले अजूनही हिमालयाचे शिखर गाठणे शिल्लक आहे. पुन्हा संशोधन कार्यास जोमाने सुरुवात केली.  50 हजार पद्धतीच्या प्रोटीनचा तसेच 20 प्रकारच्या अमिनो ॲसिड, पेशी आणि तंतुंचा अभ्यास केला. संशोधन कार्याला गती येत गेली . रायबोजोमच्या जटील संरचनेचा एक एक अर्थ लागत गेला आणि आमचे संशोधन पुर्णत्वास गेले. थोड्या यशात आनंद न मानता उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवूनच जनहिताचे संशोधन होवू शकते,याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक वेंकटरामन रामकृष्णन यांनी केलेल्या मोलाच्या योगदाना बद्दलही योनाथ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ॲडा योनाथ यांना नागपूर विद्यापीठाचे सुवर्णपदक

रसायन शास्त्रातील संशोधनात मोलाचे योगदान देवून समस्त जगासाठी आदर्शवत कार्य करणाऱ्या नोबेल विजेत्या ॲडा योनाथ यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन व  आभार डॉ श्याम कोरोट्टी यांनी मानले.

000000

जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ६ : व्यावसायिक प्रशिक्षण आणि सेवांमध्ये राज्य पुढारलेले असून, उद्योगासाठी पायाभूत सुविधांसह पोषक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना शासन सहकार्य करेल. विश्वभरातून आलेले उद्योजक हे देशाची संपत्ती असून, शासन आणि उद्योजकांनी सहकार्याने काम केल्यास राज्यासह देश अधिक बलवान बनेल असे मत मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. विश्व मराठी संमेलन 2023 अंतर्गत भारतातील व भारताबाहेरील उद्योजकांचा सहभाग असलेली उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते. मंत्री श्री.केसरकर म्हणाले, कौशल्याधारित मनुष्यबळ राज्यात उपलब्ध आहे. शंभर टक्के भांडवली गुंतवणूक परतावा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. नवउद्योग, लघु उद्योग, आणि उद्योगात नविनता आणण्यासाठीचे जाळे ग्रामीण भागात कार्यरत आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी राज्यातील सर्वात मोठे सुविधा देणारे इंडस्ट्रियल पार्क आहे, नव उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.पाणी, वीज, पायाभूत सुविधा, रस्ते, जलवाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक आदी सुविधा राज्यात उपलब्ध असून, नव उद्योजकांचे राज्यात स्वागत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. विश्वभरातून आलेले उद्योजक आणि राज्य शासन यांनी समन्वयाने कार्य केल्यास औद्योगिक विकास साध्य करता येईल. तसेच मराठी भाषाही जगभर पोहोचविण्याचे काम आपण करू शकू अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  भारतीय विदेशसेवा अधिकारी डॉ. सुजय चव्हाण म्हणाले, कौशल्याधारित लघु उद्योगांमुळे अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होते.

राज्यातील उद्योग प्रकल्प आणि पर्यटनाचा आपल्या स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना केले. उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह यांनी राज्याची सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक प्रगती, राज्यातील विकासाची सूची, अग्रगण्य उद्योन्मुख आणि विकासात्मक सेक्टर, विकासात्मक सुविधा, गुंतवणूकीसाठी नेमेलली नोडल एजन्सी, उद्योग विकासासाठी केंद्रीत करण्यात आलेले क्षेत्र यासंदर्भात सादरीकरण केले.

यावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. रंगा नाईक आणि पी. मल्लिकनेर, उद्योग विभागाचे सह सचिव संजय देगावकर यांच्यासह विविध देशातून आलेले उद्योजक उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं

स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ६ : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी आणि उद्योजतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे सांगून या विद्यापींठानी आपली सूची तयार करावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज स्वयंम अर्थसहाय्यीत विद्यापीठांच्या अडचणी संदर्भात मुंबई विद्यापीठात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार सतेज (बंटी) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण आणि कृषिविषयक शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्यातबाबत संबधित विभागाचे मंत्री यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. विद्यापीठाच्या जागेबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. या विद्यापीठांसाठी गठित केलेल्या समितीने पुढील अधिवेशनापूर्वी  अहवाल सादर करावा.तसेच विद्यापीठांच्या कुलगुरू यांची निवड विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे करावी. अशा सूचनाही यावेळी दिल्या.

या बैठकीत स्वयंअर्थसहाय्यित विद्यपीठाबाबतचा कायदा व विद्यापीठाच्या अडचणी, विद्यापीठावरील नियंत्रण, नॅक मूल्यांकन  कालावधी, शुल्क रचना या संदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या अडचणीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड

मुंबई, दि. ६ : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या  शिफारशींनुसार  केंद्र सरकारकडून  जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प (Multidisciplinary Education and Research Improvement in Technical Education) राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केली आहे. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी आभार मानले.

या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाने देशातील एकूण १५ राज्यांची निवड केली आहे.त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे असे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने पत्राद्वारे कळविल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी देशातील साधारणत: १५० ते १७५ पदवी संस्था आणि १०० पदविका संस्थांची निवड प्रकल्पाच्या निकषांच्या आधारे केंद्र व राज्याद्वारे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प एकूण रु. ४ हजार २०० कोटी इतक्या निधीचा असून प्रकल्प कालावधी ५ वर्ष आहे. प्रकल्पात निवड झालेल्या प्रत्येक पदवी संस्थेला १० कोटी तर पदविका संस्थेला प्रत्येकी  ५ कोटी रुपये असे अनुदान प्रकल्प कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहेत.

यामध्ये  संस्थांमधील प्रयोगशाळा, वर्गकक्ष व इतर शैक्षणिक सोयी-सुविधांचे आधुनिकीकरण, अभ्यासक्रमात सुधारणा, डिजीटलायझेशन, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, संशोधनास चालना देणे, नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणे व विद्यमान सेंटर ऑफ एक्सलन्सचे बळकटीकरण, इनोवेशनला आणि पेटंट्सला प्रोत्साहन देणे, संस्थांमध्ये प्रशासकीय सुधारणा म्हणजे व्यवस्थापन मंडळाची स्थापना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, शिक्षक वर्गाचे प्रशिक्षण, बहुशाखीय अभ्यासक्रम सुरु करण्यास अनुदान. यामुळे राज्यातील संस्थांना या अनुदानाचा  उपयोग करून शैक्षणिक दर्जावाढ करण्यास मदत होणार आहे असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...