शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 174

‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

मुंबई, दि. २ : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री अस्लम शेख, अबू आझमी, अमीन पटेल, रईस शेख, श्रीमती सना मलिक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते. त्याचप्रमाणे आगामी ईदसाठी देखील शासनाने योग्य नियोजन केले असून या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी ईदनिमित्त केलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

किनवट, इस्लापूर भागाकडे अधिक लक्ष देऊ – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

नांदेड दि. 2 जून : महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाची कामे करणे आमची जबाबदारी असून अतिदुर्गम भागातील बंजारा, आदिवासी बहुल भाग असलेला इस्लापूर किनवटकडे अधिक लक्ष देणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. हुडी येथील शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

आज किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा होता. सर्वप्रथम त्यांनी इस्लापूर वनविभागाच्या कार्यालयाला भेट देऊन या ठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर त्यांनी नांदेड जिल्हयातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे मंदिराचे दर्शन घेऊन धबधबा परिसराची पाहणी केली. यावेळी ट्रस्ट व वाळकी ग्रामपंचायतच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इस्लापूर परिसरातील वन्य प्राण्याचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हरण खरबा वरील वन्य प्राण्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर हुडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

00000

सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासूर रोखायलाच हवा अन्यथा परिस्थिती गंभीर – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी वेडिंग मशीनचे उद्घाटन; आनंदधाम येथे वृक्षारोपण तर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे केले आवाहन

परळी वैजनाथ, दि. ०२ – पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच पर्यावरणाला घातक असणाऱ्या एकल प्लास्टिक वापराचा भस्मासूर आपल्याला रोखायलाच हवा, यासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक उपयोग करावा. त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी कचरामुक्त परिसरावरही लक्ष केंद्रित करून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा वृक्षारोपणाकडेही प्रत्येकाने लक्ष द्यावे. एवढेच नाही तर एक झाड आई-वडिलांसाठी तर एक झाड हे आपल्या सृष्टीमातेसाठी लावावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे आज केले.

परळी शहरातील आनंदधाम येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिरात ‘नो प्लास्टिक’ उपक्रमाअंतर्गत कापडी पिशवी मशीनचे उदघाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख, ज्येष्ठ नेते दत्तापा इटके, शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे, उप जिल्हाधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरपरिषद मुख्याधिकारी कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. कुरमूडे आदी उपस्थित होते.

मंदिर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभही पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक वृक्ष माॅ के नाम’ हा उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये एक आपली आई जीने आपल्याला जन्म दिला तिच्यासाठी एक वृक्ष व दुसरी आपली आई म्हणजे ही सृष्टी, तिच्या संवर्धनासाठी एक वृक्ष लावला पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका. फोटो पुरते करू नका. तर ते वृक्ष जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असे आवाहन पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

प्लास्टिकमुक्तीचा दृढ संकल्प करा आणि कचरामुक्तीची कास धरा !

सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीवर भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे. यापुढे एकल प्लास्टिक वापरावर बंधने आणून अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ही जाणीव जागृती निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असून सर्व देवालयांशी व देवस्थानांशी बोलून याबाबत आपण पुढचे पाऊल टाकणार आहोत. नागरिकांनी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा त्यासाठी घरातील पिशवी आणावी किंवा आपण ठिकठिकाणी कापडी पिशव्यांचे मशीन बसवणार आहोत याचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.

लोकसहभाग महत्वाचा

पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र हे केवळ प्रशासकीय पातळीवरच मर्यादित राहू नयेत यासाठी जास्तीत जास्त लोकसहभागातून हे उपक्रम यशस्वी होतील. यासाठी लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची माझ्यापासून सुरुवात करणार असून यापुढे माझ्या परळीतील यश:श्री व मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी जे अभ्यागत मला भेटायला येतील त्यांनी प्लास्टिक पिशव्या मधून आणलेले बुके आणू नयेत. एवढेच नाही तर मला भेटायला येणाऱ्यांनी हातात प्लास्टिक पिशव्या घेऊन बुके, हारतुरे आदी आणले तर त्यांना प्रवेश बंदी केली जाईल. अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीसाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण प्लास्टिक मुक्तीची व स्वच्छतेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहनही मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

मध्यप्रदेशातील स्वच्छतेसारखे आपले राज्यही स्वच्छ करुया

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, मध्य प्रदेशातील स्वच्छता जर बघितली तर ती खरोखरच कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशातील स्वच्छतेचे कौतुकच केले पाहिजे. परंतु महाराष्ट्रात मात्र अशा पद्धतीची स्थिती सध्या तरी नाही हे चिंताजनक आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जबाबदारीपूर्वक काम करावे त्याबरोबरच नागरिकांनीही स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक मुक्त आणि कचरा मुक्त परिसर यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आपल्याकडे याबाबतीत नागरिकांनी जबाबदारीने या गोष्टीचे तंतोतंत पालन केले तर काही दिवसातच आपले महाराष्ट्र राज्य ही स्वच्छ व सुंदर परिसराचे होईल यात काहीही शंका नाही. सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले.

राज्यभरातील मंदिरांशी चर्चा करणार

राज्यभरातील मंदिरांशी चर्चा करुन कापडी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत, या मंदिरांमधून सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी व्हावा त्याऐवजी कापडी पिशव्या वापरल्या जाव्यात याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत अनेक संस्थांशी पत्रव्यवहार देखील केला आहे. त्या दिशेने काम करत असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
••••

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबई, दि. २ :- अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला.  या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प्रवाशांचा पुढील प्रवास  सुरू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद

दिनांक १ जून पासून ते २ जून सकाळपर्यंत राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी,  रत्नागिरी जिल्ह्यात ११.४ मिमी, मुंबई उपनगर ८.० मिमी, कोल्हापूर ७.९ मिमी, रायगड ४.४ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

दिनांक १ जून रोजी सोलापूर व नाशिक जिल्ह्यात विहिरीत पडणे या घटनेमुळे प्रत्येकी एक व्यक्ती मृत झाली असून ठाणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य

मुंबई, दि. २ : विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजिकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपक्रमांतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे. ही मदत बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) युनिट उभारणी आणि गरजू रुग्णांवर उपचार साहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे. या केंद्राचा फायदा विदर्भातील लोकांसोबत विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी होणार आहे.

एम्स नागपूरमध्ये पहिल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या स्थापनेसाठी एनटीपीसी कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले. हे केंद्र मध्य भारतातील संपूर्ण जनतेसाठी, विशेषतः लहान मुले, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी, एक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा ठरेल. मध्य भारतात सिकल सेल आजार आणि इतर अनुवंशिक रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या रोगांचे उच्चाटन करणे हे देशाचे राष्ट्रीय उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. एनटीपीसी कडून या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याने एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असून, या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

साहाय्याचा तपशील :: बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या पायाभूत सुविधांसाठी, रुग्णांच्या उपचार व औषधोपचारासाठी साहाय्य देण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : हे युनिट एम्स नागपूरच्या एमआयएचएएन येथील परिसरात उभारले जाणार आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसह, प्रत्यारोपणासाठी आवश्यक तपासण्या, औषधे, बाह्य तज्ज्ञांच्या सेवा व रुग्णोपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. एनटीपीसीच्या निधीच्या अटींनुसार, युनिटमध्ये एनटीपीसीचा लोगो आणि सीएसआर अंतर्गत साहाय्याचे स्पष्टपणे उल्लेख केले जाणार आहे.

एनटीपीसी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत विविध प्रकल्प राबवत आहे. एम्स नागपूरसारख्या शासकीय वैद्यकीय संस्थेसोबत भागीदारी करून समाजातील गरजू घटकांपर्यंत अत्याधुनिक उपचार सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

एम्स नागपूर हे प्रगत वैद्यकीय सेवा व संशोधनासाठी झपाट्याने नावारूपाला येत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या स्थापनेमुळे ब्लड कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील उपचार नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना मिळणार असून, त्यांना दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

बंदरे विभागाने लोकाभिमुख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंत्री नितेश राणे

Oplus_131072

मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची आधुनिक व्यवस्था विकसित करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावी, हरीत बंदर उभारणीवर भर द्यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

‘वॉटर टॅक्सी’ सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने नियोजन करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Oplus_131072

मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल,  असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.२ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडित विविध आजार आपल्याला होतात. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००००

‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ उपक्रमांतर्गत धोरणासाठी नागरिकांच्या सूचना

नागरिकांना आवाहन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी आखण्यात येणाऱ्या प्रस्तावित धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाने ‘ विकसित महाराष्ट्र – २०४७’ या विशेष उपक्रमांतर्गत लघु, मध्यम आणि दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी आखण्यात येणाऱ्या प्रस्तावित धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.

000

पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा  दि. १: सातारा जिल्हा बहुतांश डोंगरी व दुर्गम आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला वाहनांसह आत्याधुनिक साहित्य देण्यात येत आहे. पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाने वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


पोलीस विभागाकडून चांगल्या कामाची अपेक्षा सर्व जण करतात यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस,दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. दामिनी पथकातील महिला पोलीस शाळा, महाविद्यालय, क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालतील.

पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टी दिल्या जातील. सातारा पोलीस दलाचे काम उठावदार आहे ते आणखीन उठावदार होण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस   दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. पोलीस विभाग सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करीत आहे. सातारा पोलीस विभाग या पुढेही उत्तम पद्धतीने काम करील असे पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून वाहने मार्गस्त केली.
0000

ताज्या बातम्या

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...