रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 1803

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने बाधित शेतकऱ्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मोबदला द्यावा – नाना पटोले

नागपूर, दि. 20 : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका व बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका येथील ज्या शेतकरी आणि कास्तकारांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६साठी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अधिक मोबदला मिळेल असे पाहावे.यासाठी संबधित जिल्हाधिकारी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा,यासंदर्भात काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा आधार घ्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी,प्रकल्प बाधित शेतकरी आणि कास्तकरी उपस्थित होते.

बैठकीत अध्यक्षांनी  शेतकरी,कास्तकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समन्वयाने यासंदर्भात अधिकची मदत कशी करता येईल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शासकीय; निमशासकीय स्तरावर ओबीसींच्या भरलेल्या जागांचा तपशील सादर करण्याच्या सूचना

नागपूर, दि. 20 :  शासकीय तसेच निमशासकीय स्तरावर गेल्या दहा वर्षात ओबीसींच्या किती जागा भरल्या याची माहिती देण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्या.

ओबीसी विभागासमोरील प्रश्न व त्यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही श्री. पटोले यांनी दिल्या.

ओबीसी विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करणे,ओबीसी आर्थिक विकास महामंडळास निधी वळता करणे,ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष भरून काढणे,महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी विभागाची कार्यालये सुरु करणे, ओबसी विद्यार्थ्यांकरिता असेलेली शिष्यवृत्ती व  उत्पन्नाची अट यामध्ये इतरांना असलेल्या सवलतीप्रमाणे समानता आणणे,महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्‌मय कमी किंमतीत उपलब्ध करून देणे,छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थांद्वारे मराठा,कुणबी,कुणबी-मराठा यांच्यासाठी असलेल्या विविध योजना ओबीसी समाजाकरिता राबविणे,ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक शहरात तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहे,वाचनालयाची सोय उपलब्ध करून देणे. अशा विविध विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. या सर्व विषयांवर मुंबईतील बैठकीत  मुख्यमंत्री  यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली जाईल व ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न गांभीर्याने केला जाईल असेही अध्यक्षांनी सांगितले.  विजाभज,इमाव व विमाप्र  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी६७१अभ्यासक्रमांचा समावेश करून स्कॉलरशिप तथा फ्रीशीप लागू करण्याबाबत विचार करतांना यात अधिक काही अभ्यासक्रमांचा समावेश केला जावा अशा सूचनाही श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

आज विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठक झाली.या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक संपन्न

नागपूर,दि. 20 : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठक झाली.

अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना,ममदापूर लघुसिंचन तलावात शीर्षकामे,नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित योजना व योजनेतील उपांगे तसेच अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे अंदाजित 28 कि. मी. दूरुन पाणी येत असल्याने पाण्यात दुर्गंधीयुक्त सडलेले जीव तसेच पालापाचोळा येत असल्याने आष्टी शहराला दूषित पाणी पुरवठा होत होता. या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आरसीसी पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी जाळी बसून शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करणेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळावी याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये ही योजना त्वरीत पूर्ण करावी,असे निर्देश श्री.पटोले यानी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूरचे मुख्य अभियंता सतिश सुशीर,अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ,वर्धा जिल्ह्याचे पाटबंधारे उपविभागीय अभियंता श.अ.भोगले,आष्टी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

         

पुणे, दि. 20 : ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

अंत्यसंस्कारापूर्वी सकाळी 10 वाजता येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात डॉ.लागू यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉ.लागू यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. दीपा लागू, पुत्र डॉ. आनंद लागू, बंधू विजय लागू यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

वैकुंठ स्मशानभूमीत आल्यावर पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ. लागू यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट,  उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव, मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, सह-पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पुणे शहरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर, नाट्य व  चित्रपटसृष्टीतील डॉ.जब्बार पटेल, अमोल पालेकर, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, विजय केंकरे, राहुल सोलापूरकर, माधव वझे, चंद्रकांत कुलकर्णी, नंदू माधव, सुधीर गाडगीळ, प्रसाद कांबळी, मेघराज भोसले, सुनील महाजन, पर्ण पेठे, ज्योति सुभाष, विवेक लागू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘दिलखुलास’ मध्ये ‘आपला महाराष्ट्र’ विषयावर २१ डिसेंबर रोजी विशेष वार्तापत्र

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

‘आपला महाराष्ट्र’ या वार्तापत्रात दर आठवड्यात राज्यातील विविध भागात घडलेल्या घटना, घडामोडी, शासनाचे महत्त्वाचे निर्णय यांचा विस्तृत आढावा घेतला जातो. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर,यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित केले जाणार आहे.

भेसळयुक्त मद्यविक्रीस बळी पडू नका ; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

मुंबई, दि.20 : नामांकित कंपन्यांचे उच्च प्रतीचे मद्य माफक दरात विक्रीच्या नावाखाली बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्यविक्रीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले असून दोषीवर कठोर कारवाई केली आहे. नाताळ व नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत बऱ्याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच) ‘डयुटी फ्री स्कॉच’ च्या नावाने बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीचे प्रकार झाले आहेत. अशा विक्रीपासून सावध राहण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

अशा गुन्ह्यांमध्ये बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. त्याचबरोबर अशा मद्यसेवनाने आरोग्यावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.

भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18008333333 हा टोल फ्री क्र. आणि 8422001133 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली हैद्राबाद हाऊसमधील वैद्यकीय सहायता निधी कक्षाची पाहणी

नागपूर, दि. 20 : येथील सिव्हील लाईन्स भागात असलेल्या हैद्राबाद हाऊसमध्ये उभारण्यात आलेल्या वैद्यकीय सहायता निधी कक्षाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी येथील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन सर्व आवश्यक सुविधांबाबत विचारपूस केली. तसेच या कक्षासाठी अजून आवश्यक असणाऱ्या बाबींसंदर्भात विचारणा केली. वैद्यकीय सहायता कक्षाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विशेष कार्य अधिकारी सुधीर नाईक उपस्थित होते.

नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ‘मोबाईल गाईड’सोबत अनोखी सफर (विशेष वृत्त)

नागपूर,दि. 20 : नागपूरकरांसाठी अजब बंगला असलेले येथील मध्यवर्ती संग्रहालय प्रेक्षकांना एका अनोख्या दुनियेत घेऊन जाते. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या वस्तू संग्रहालयाने आधुनिकतेशी नाळ जोडून घेतली आहे. संग्रहालयाने मोबाईल ॲप आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून निर्माण केलेला ‘मोबाईल गाईड’ या ऐतिहासिक स्थळासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

ब्रिटीश राजवटीत 1863 मध्ये निर्माण झालेल्या या संग्रहालयाचे प्रशासक वेळोवेळी बदलले गेले आहेत. ब्रिटीश प्रशासनातील पब्लिक इन्स्ट्रक्शन,कृषी,उद्योग आदी विभागाच्या नियंत्रणाखाली असलेले हे संग्रहालय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मध्यप्रांताच्या शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आले.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर वस्तू संग्रहालयाचा कारभार पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडे सोपविण्यात आला आहे.  संग्रहालयाच्या या प्रशासकीय प्रवासाची गोष्ट एका अर्थाने संग्राह्य आणि अभ्यासकांसाठी कुतूहलाची आहे. कला,जीवशास्त्र,पुरातत्व,इतिहास,भूगोल अशा विविध शाखांना स्पर्श करणाऱ्या वस्तू आणि कलांनी संग्रहालय सजले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी उत्खननात सापडलेल्या मूर्ती,मध्ययुगीन युद्ध साहित्य,नकाशे,विविध राजवटींचे दर्शन घडविणाऱ्या वस्तूंचा यात समावेश आहे.

वाकाटक कालखंडातील विष्णूची प्रतिमा,बाराव्या शतकातील ब्रह्मामूर्ती,मुघलकालीन,राजपूतकालीन अशा विविध राजवटीतील वस्तू येथे पाहायला मिळतात. या वस्तूंच्या रचनेवरुन तत्कालीन राज्यकर्ते किती कलासक्त होते याचे दर्शन घडते. आपल्या पूर्वसुरिंनी उपलब्ध साहित्यसामग्रीतून निर्माण केलेल्या या वस्तू त्यांच्या बद्दलचा आदर वाढवितात. याबरोबरच येथील उत्खननात सापडलेले प्राण्यांचे अवशेष या परिसराचे पुरातत्वीय महत्त्व विषद करतात. विविध प्राणी,पक्षी यांना नैसर्गिक अधिवासात दर्शवून त्यांचे जंगलातील महत्त्व अधिक स्पष्ट केले आहे. येथे विविध दालनांत प्रत्येक विषय वेगवेगळा मांडला आहे. त्याचे महत्त्व काय हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक खिडकीवर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. या कोडमुळे या प्राण्यांची,पक्षांची माहिती क्षणात उपलब्ध होते.

0000

नागरिकत्व कायद्याबाबत सिटीझन ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

नागपूर,दि. 20 : सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात नागपूर येथील सिटीझन ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,या सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे समाजात मनभेद निर्माण होतील. संविधानाच्या तत्त्वांची अवहेलना होईल. त्यामुळे हा कायदा लागू करणे उचित ठरणार नाही.

त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिलासा दिला की, कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येईलच. या दरम्यान समाजाने मनात  कुठलीही भीती बाळगू नये.

यावेळी महाराष्ट्र मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती मुजिब अश्रफ,आमदार अमीन पटेल,आमदार अब्दुल सत्तार,आमदार वजाक  मिर्झा,डॉ. मोहम्मद अवेश हसन,आदी उपस्थित होते.

कमी बोलून जास्त काम करण्याचा निर्धार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नागपूर दि.19 :राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका असून कमी बोलून जास्त काम करायचे असे आम्ही ठरविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितोया ओव्यांनी सरकारची पुढची वाटचाल स्पष्ट केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता. यावर51 सदस्यांनी आपली मते मांडली.

राज्यपालांनी मराठीत अभिभाषण केले. त्यांना धन्यवाद देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संत गाडगेबाबांनी साध्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, वस्त्र देणे, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देणे अशा पद्धतीचे काम सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्थगिती नव्हे प्रगती सरकार!

आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून विकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील.

विकासाचा गोवर्धन पेलूयात

देशातील वैभवशाली आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा गोवर्धन पेलण्याकरिता सगळ्यांनीच एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतानाच हे सरकार राज्यातील जनतेला चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नवा महाराष्ट्र घडवतानाच आपले राज्य अधिक महान होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार

गोरगरिबांना बुलेट ट्रेन परवडणारी नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात आम्ही सुधारणा करण्यावर भर देणार आहोत. शेतकरी, महिला यांच्या समस्या आमच्या दृष्टीने प्राधान्याच्या राहतील. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्याची खरी आर्थिक स्थितीदेखील जनतेसमोर आणणार आहोत, असेही ते म्हणाले.

मराठी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही

राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा लौकिक आणखी वाढवूया असेही ते म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यावर आपण भर देणार असून कर्नाटकव्याप्त प्रदेशातील मराठी बांधवांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे.

राज्यात मंदीमध्ये गुंतवणूक वाढीचे आव्हान

महाराष्ट्राचा उद्योगामध्ये देशात चांगला लौकिक आहे, पण सध्या मंदीचे वातावरण असून राज्यात गुंतवणूक वाढीचे मोठे आव्हान आहे. विविध कारणांमुळे ही परिस्थिती असून आमचे सरकार सर्वांच्या सहकार्याने यातून मार्ग काढेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गाडगेबाबांच्या उपदेशाप्रमाणे काम करणार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात संत गाडगेबाबा यांच्या वचनांचा उल्लेख केला. गाडगेबाबांना अभिप्रेत असलेल्या धर्माच्या संकल्पनेनुसार राज्यकारभाराची दिशा ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आपल्या जबाबदारीची जाणीव कायम राहावी म्हणून मंत्रालयातील आपल्या दालनात गाडगेबाबांचे हे विचार प्रदर्शित करण्यात येतील. या विचारांना अनुसरून बेरोजगारांना रोजगार, अंध-अपंगांना औषधोपचार, सामान्य जनांचे शिक्षण आणि जनतेला मूलभूत सुविधा देणारे हे सरकार असेल.  00000

CM’s answer to discussions on governor’s address

Determined to do more work than talking

– Chief Minister Uddhav Thackeray

Nagpur 19.Dec.19: “Address of the Governor is the guide of our government and we have decided to work more than talking. Our government will work on the ethics and policies shown by Rashtrasant Tukdoji Maharaj” said Chief Minister Uddhav Thackeray.

The Chief Minister was responding to a discussion in the Legislative Assembly on the Governor’s address. Member Sunil Prabhu had delivered congratulation proposal of the Governor’s address. Total 51 members expressed their views in this concern. The Governor spoke in Marathi on this occasion.

Chief Minister further stated that Sant Gadgebaba has conveyed the essence of life in simple language. Sant Gadge Baba use to say that feeding the hungry, giving water to the thirsty, giving clothes and shelter, giving courage to the subsidence was the real service of the society and country.  Likewise, the government would follow this way shown by Sant Gadge Baba.

It is not the postponement but the progress

“Our government is not a stagnation government but a progressive government. No work has been postponed but it will be started by eliminating the faults from the orders of the development works” informed Mr. Thackeray

Let’s work to balance the mountain of the development

“Maharashtra is famous for being a rich and prosperous state in the country. This government will make people free from worries. We should come together to give a boost to the development of Maharashtra. Maharashtra is not far behind in any field. Government will take efforts to make our state more great and developed” said Chief Minister.

Will relieve the farmers from worries

Mr. Thackeray further said that the bullet train could not be afforded to the poor. Hence instead of bullet train they would focus on improving health and education system. Solution on Problems of farmers and women would be the top priority. Government would take concrete measures to relieve the farmers from all worries. Likewise, they would bring the true financial condition of the state in front of the people.

Will not allow injustice to Marathi brothers

“We should come together on the issues of the masses and try to make Maharashtra more great. We will emphasize resolving the issues of Maharashtra-Karnataka border and never allow injustice to the Marathi brothers in the Karnataka-dominated region” stated honorable Chief Minister.

Challenges to increase investment during recession in the state

Maharashtra has a good reputation in the country in the industry, but presently there is a recession and there is a big challenge for investment growth in the state.  Various reasons are behind this situation and our government will work its way out with the cooperation of all” said Mr. Thackeray.

Will follow the path shown by Sant Gadgebaba

“We will make sincere efforts to determine the direction of the government in line with the concept of religion that is intended to Gadgebaba. In the ministry, thoughts of Gadgebaba will be displayed in my cabin. So that I can maintain my sense of responsibility. In line with these considerations, it will be the government that provides employment to the unemployed, treatment of the blind and disabled, education of the common people and basic amenities to the masses” specified Chief Minister.

0000

ताज्या बातम्या

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते...

0
सातारा दि.27 (जिमाका) : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला. वर्षभरात पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व...

पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकारिता करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

0
हिंगोली माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न हिंगोली (जिमाका), दि. 27: पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)ने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

0
नाशिक, दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
शिर्डी, दि. २७ जुलै -  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे....

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. २७: - रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट  परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या...