शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 181

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्‍यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

या बाबत नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन या बाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करावा, याचा निधी प्राप्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बाधितांना तातडीने नुकसान भरपाई व्हावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांना व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यातील 1 हजार 174 बाधित गावामधील 794  हेक्टर केळी, संत्रा, पपई, कांदा आणि गहू शेतीचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे 2 कोटी 83 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मे मध्ये 325  गावामधील 13  हजार 639 हेक्टर मूग, तिळ, केळी, संत्रा, पपई, कांदा, ज्वारी, लिंबू पिकांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मे मध्ये वीज पडून 3 मनुष्य जीवित हानी झाली आहे, तर घरांच्या नुकसानीत एप्रिल मध्ये अंशतः 18 आणि 1 घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. मे मध्ये 741 घरांची पडझड झाली असून 14 घरांचे पूर्णत: पडझड झाली आहे. 12 गोठे आणि झोपडीचे नुकसान झाले आहे. मे मध्ये 29 लहान जनावरे आणि 12 मोठे पशूधन मृत झाले आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान आणि मृत जनावरांच्या मालकांना पशुधन सहाय्य अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन, पंचनामे आणि मदत कार्याला गती दिली असून  बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून निर्देश देण्यात आले आहे .

00000

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित

नवी दिल्ली, दि. ३०  : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र निर्मित ‘खासदार परिचय पुस्तिका’चे प्रकाशन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष भवन, नवी दिल्ली येथे आज पार पडले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, मंत्री महोदयाचे अपर खासगी सचिव राहुल साळुंखे उपस्थित होते.

प्रतापराव जाधव म्हणाले की, महाराष्ट्र परिचय केंद्राने अतिशय उपयुक्त आणि जनसामान्यांसाठी प्रभावी असा उपक्रम हाती घेतला आहे. लोकप्रतिनिधींची माहिती एकाच ठिकाणी मिळणे ही काळाची गरज असून, ही पुस्तिका माहितीच्या पारदर्शकतेस हातभार लावेल. अशा उपक्रमांमुळे जनसंपर्क अधिक प्रभावी होत असून शासनाच्या प्रयत्नांना दिशा मिळते.

या पुस्तिकेत  महाराष्ट्रातील  लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची तपशीलवार माहिती समाविष्ट करण्यात आली असून, त्यामध्ये खासदारांचे नाव, जन्मतारीख, नवी दिल्ली व मतदार संघातील निवासी पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता, स्वीय सहायकांचे संपर्क क्रमांक तसेच सोशल मीडिया हँडल्स यांचा समावेश आहे. ही माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देत जनता आणि लोकप्रतिनिधींसोबत यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा उद्देश या उपक्रमाने साध्य होत आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राने यापूर्वीही अनेक उपयुक्त उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. दिल्ली डिरेक्टरीसह 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली ‘लोकसभा पूर्वपिठीका’ ही पुस्तिका याच केंद्राची कल्पकता आणि गुणवत्ता अधोरेखित करणारी ठरली होती. त्या यशाची परंपरा ‘खासदार परिचय पुस्तिका’ ने ही समर्थपणे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न कार्यालयाकडून  करण्यात येत आहेत.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी उपसंचालकअमरज्योत कौर अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल रामेश्वर बर्डे, सहायक ग्रंथपाल निलेश देशमुख आणि दीपक देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.

ही पुस्तिका शासकीय विभाग, माध्यम प्रतिनिधी, संशोधक आणि जनतेसाठी एक विश्वासार्ह संदर्भस्रोत म्हणून कार्य करणार असून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण ठरेल.

०००

अमरज्योत कौर अरोरा/

राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. ३० : जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात गेली 18 वर्षे अत्यंत निष्ठा, कष्ट व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुजाता बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे, लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, आरोग्य शिबिरे, जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमांमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहे.

कोरोना काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जिल्हास्तरीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’सह विविध पुरस्कारांनी ही सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र आहे.

०००

अमरज्योत कौर अरोरा/

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती

मुंबई, दि. ३०: जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळामार्फत राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करत लोकांना नशा मुक्त जीवन जगण्याचे आवाहन या उपक्रमात करण्यात आले.

याचे उद्घाटन आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मुंबईतील केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांना तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सखोल माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमात तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्सच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, ‘मॅजिक जार’ संकल्पना, तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा यांसारखे उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, तंबाखूमुळे केवळ कर्करोग होण्याची शक्यता वाढत नाही तर मेंदूच्या कार्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यातील निकोटीन हे रसायन शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस इतरांच्या तुलनेत कमी कार्यक्षम असते, तर अल्कोहोलच्या अतिसेवनाने यकृताचे विकार उद्भवू शकतात.

या उपक्रमात व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, सलाम मुंबई फाउंडेशन यांसारख्या अनेक नशामुक्ती संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध सादरीकरणे व खेळांच्या माध्यमातून या संस्थांनी व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तंबाखू विक्रीवरील कायदेशीर मर्यादा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शाळा, महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.

राज्य नशाबंदी मंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम तंबाखूविरोधी लढ्यास नवे बळ देणारा ठरला असून, नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन स्वतःच्या आरोग्यासाठी तंबाखूला नकार द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

पुढील बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न सोडवावेत – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

  • सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करावे

मुंबई, दि. ३०: जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केलेले प्रश्न जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी 100 टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या.

बांद्रा येथील चेतना महाविद्यालयामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी या सूचना दिल्या. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, खासदार रवींद्र वायकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह मुंबई उपनगर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

Oplus_131072

आदिवासी उपयोजनेंतर्गत प्राप्त झालेला 100 टक्के निधी खर्च होईल, याची काळजी घ्यावी, असे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येची गणना करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे हा निधी खर्च करताना अचूक नियोजन करणे शक्य होणार आहे. या निधीमधून आदिवासी पाडे आणि वस्त्यांना सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा करावा. पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी मांडत असलेल्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घ्यावे. हे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाही करावी. जिल्ह्यातील जुन्या मोडकळीस आलेल्या तसेच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणे सोपे व्हावे, या हेतूने शासनाने अशा इमारतीतील रहिवाशांना 20 हजार रुपये भाडे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

Oplus_131072

ज्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे अशा भागात मॅस नेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, नऊ मीटरपेक्षा कमी उंचीची भिंत असणाऱ्या ठिकाणी म्हाडा मॅस नेट बसवणार आहे. तर नऊ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी मॅस नेट बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांबाबत विभागांनी समाधानकारक उत्तरे देऊन हे प्रश्न 100 टक्के मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अनुपालनाचे उत्तरही योग्य आणि वस्तुस्थितीदर्शक द्यावे. अनुपालनाची प्रत सदस्यांना लवकर उपलब्ध करून द्यावी. सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या 1 हजार 88 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.  तसेच कलिना येथील फोर्स वन प्रशिक्षण केंद्रासही मान्यता देण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्र घोषित झाल्यानंतर अतिरिक्त वन क्षेत्र नव्याने घोषित केलेल्या केतकी पाढा आणि परिसरात असलेल्या 80 हजार लोकवस्ती आजही प्राथमिक सेवा सुविधांपासून वंचित असून त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावे, म्हणून हा भाग संरक्षित जंगल मधून वगळण्यात यावा, असा ठराव आमदार प्रविण दरेकर यांनी मांडला. त्याला एकमतांने मंजुरी देण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये सदस्यांनी आमली पदार्थांचा वाढता व्यापार, महिला सुरक्षा, पूल, पदपथ, रस्त्यांची कामे, नाले सफाई, आदिवासी पाडे तसेच वन जमिनीवरील रहिवाशांना सोयी उपलब्ध करणे याविषयावर विविध मुद्दे उपस्थित केले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांचा मंत्री भरत गोगावले यांच्याकडून आढावा

अलिबाग,दि.३०(जिमाका): आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर आज रोजगार हमी योजना, खारभूमी विकास विभाग मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आढावा बैठक  शासकीय विश्रामगृह महाड येथे पार पडली.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल,  मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे,कार्यकारी अभियंता महेश नामदे ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे,  एनडीआरएफ, कोस्ट गार्डचे अधिकारी यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.

नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय साधावा, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, नागरिकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

०००

‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी – मंत्री मंगल प्रभात लोढा

नाशिक, दि. ३०: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी काळानुरुप बदल स्वीकारत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी. त्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीण्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.

संत मीराबाई शासकीय मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज सकाळी मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य दीपक बाविस्कार आदी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात बदल होत आहेत. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी न्यू एजवर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता करावी. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. याबरोबरच अहिल्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ ऑगस्टपासून अभ्यासक्रम सुरू होतील, असे नियोजन करावे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ज्या व्यक्तीचे नाव दिले आहे, अशा व्यक्तीच्या जयंतीसह विशेष दिनी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लोढा यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण, इमारत बांधकाम, जिल्हा वार्षिक योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला. सहसंचालक गावित यांनी विभागाची सविस्तर माहिती दिली.

०००

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ३० : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते.

बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ मध्ये पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची ३ जून रोजी विशेष मुलाखत

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात पिंपरी -चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमातील अंतिम मूल्यमापन आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेली सर्वोत्तम कामगिरी या विषयावर ही मुलाखत मंगळवार, 3 जून 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रशासनात सुलभता, लोकाभिमुखता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कर संकलनात वाढ आणि नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी या बाबींमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी वापर करणे तसेच कर संकलन वाढीसाठी राबविलेल्या नवनवीन उपक्रम राबविणे, ऑनलाईन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग आणि यूपीआयसी आयडी अशा महत्त्वाच्या विषयांवर महापालिकेने भर दिला आहे. या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याविषयी आयुक्त सिंह यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या खालील लिंकवरून ही मुलाखत पाहता येईल.

एक्स (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक: https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब: https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

‘दिलखुलास’मध्ये प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांची ३१ मे, २ व ३ जून रोजी मुलाखत

मुंबई, दि. ३० : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे’ औचित्य साधून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देणारी विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. जी. टी. रुग्णालय, मुंबई येथील दंत वैद्यक विभागाच्या प्रमुख आणि सहायक प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांच्या मार्गदर्शनातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ही विशेष मुलाखत शनिवार, 31 मे 2025 तसेच सोमवार, 2 जून आणि मंगळवार, 3 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. सहायक संचालक जयश्री कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. यामागील उद्देश तंबाखूच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव जनतेला करून देणे हा आहे. तंबाखूचा वापर अनेक घातक आजारांना आमंत्रण देतो. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’अंतर्गत राज्यात सातत्याने विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार, त्यापासून बचावाचे उपाय, आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत दिलखुलास’कार्यक्रमातून डॉ. पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

ताज्या बातम्या

मनपाच्या ‘पीएम श्री’ शाळेला मिळणार १० कोटी रुपये – तिरंगा रॅलीमध्ये पालकमंत्री डॉ. अशोक उईकेंनी...

0
बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत आयोजन चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पीएम श्री सावित्रीबाई...

गणेशोत्सव विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी ७ कोटींची तरतूद; लोंबकळणाऱ्या तारा दुरूस्तीसह तात्काळ भूमिगत करा –...

0
शांतता समितीची बैठक संपन्न नंदुरबार, दिनांक 16 : आगामी गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीची रूपरेषा आखली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...

शासनाच्या योजनांचा लाभ तृतीयपंथीयांपर्यंत; पालकमंत्र्यांनी केले स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन

0
नंदुरबार, दिनांक 16 (जिमाका) : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

0
सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इस्लामपूर येथे तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...