पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
धुळे, दिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या.
येथील शासकीय विश्रामगृह, गुलमोहर येथे शिक्षण विभागातील नाविण्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांसोबत संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. या संवाद बैठकीस आमदार मंजुळाताई गावित, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणमंत्री श्री.भुसे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना आंनददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. यासाठी किमान 25 टक्के पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा जसे. इमारत, हवा खेळती वर्गखोली, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष आदी अद्ययावत ठेवावेत. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (उदा. स्मार्ट बोर्ड, ऑनलाइन शैक्षणिक साहित्य) वापर करावा. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक संघाच्या नियमित बैठका आयोजित कराव्यात. पालकांशी नियमित आणि सकारात्मक संवाद साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शाळेच्या विकासात सहभागी करून घेणे. त्यांच्या अनुभवांचा आणि यशाचा उपयोग नवीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी करावा. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिलीपासून विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यांचे प्रशिक्षण येत्या काळात सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक गावांमध्ये, नागरिकांमध्ये जाऊन पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. शाळेतील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. शाळेत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करावा. जिल्हा वार्षिक योजनेत शालेय शिक्षणासाठी 5 टक्के निधी राखून ठेवण्यात आला असून त्या निधीतून विविध कामे करण्यात यावी. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करावी. धुळे महापालिकेतील शाळेची संख्या तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रगीतासोबत राज्यगीत रोज शाळेत घेण्यात यावे. विद्यार्थ्यांची सहल बॅकेत, दवाखाना, दुकान, शासकीय कार्यालयात काढण्यात याव्यात तसेच इतर माध्यमांच्या शाळेत मराठी सक्तीने शिकवावेत, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री भुसे पुढे म्हणाले की, यंदा शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या काळात शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार आहे. यंदापासून जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन सक्तीने करण्यात येणार आहे. बालक पालक मेळावा बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्व शाळेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धां घेण्याचे नियोजन, विद्यार्थींनीसाठी सायकल वाटप, आठवीच्या पुढील वर्गासाठी पींक रुम, 4 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांशी शैक्षणिक विषयांवर दररोज अर्धातास संवाद उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्ह्यातील शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेल्या शिक्षकांशी मंत्री श्री.भुसे यांनी संवाद साधला. शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शिक्षण पद्धतीत राबविल्याबाबत सर्व शिक्षकांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले तसेच असे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यव्यापी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
गुंतवणूक परिषद म्हणजे जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्ह्यात 1636 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार
जळगाव दि. 11 ( जिमाका वृत्तसेवा ) – उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून जागा उपलब्धते बाबत जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे. “ही गुंतवणूक परिषद केवळ गुंतवणुकीची नाही, तर जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार आहे. उद्योग केवळ नफ्यासाठी नसतात, ते समाज घडवण्यासाठी आणि भविष्य उभारण्यासाठी असतात. शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावने आता औद्योगिक प्रगतीचे पंख लावावे,” असे भावनिक उद्गारही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चाळीस उद्योजकांशी करण्यात आलेल्या रु. 1636 कोटीचे सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
परिषदेला संबोधित करताना पालकमंत्री म्हणाले, “भुसावळसारखं देशातील महत्त्वाचं रेल्वे जंक्शन, नाशिक व संभाजीनगरला जोडणारे महामार्ग, जलसंपन्नता, मेहनती तरुणाई आणि महिलाशक्तीमुळे जळगाव जिल्हा उद्योगविकासासाठी अत्यंत सक्षम आहे.” या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील 40 उद्योगांमार्फत तब्बल 1636 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2848 रोजगारनिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. मागील वर्षी झालेल्या परिषदेत 1126 कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार झाले होते, त्यातील 9 उद्योगांनी प्रत्यक्षात उत्पादन सुरू केले असून, 142 कोटींची गुंतवणूक करत 839 रोजगार निर्माण केले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून मागील वर्षी 663 कर्जप्रकरणांना मंजुरी मिळवून जिल्ह्याने 90% उद्दिष्ट पूर्ण केले असून, पंतप्रधान रोजगार योजनेत 112% यश प्राप्त केले आहे.
शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी उद्योजकांचे योगदान हे महत्त्वाचे असून उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका वृषाली सोने यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिका अपूर्वा वाणी यांनी केले. तर आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी मानले.
या गुंतवणूक परिषदेला चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, लीड बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा, उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे. लघु उद्योग भारतीचे व इतर औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे
अमरावती, दि.11 (जिमाका ): राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.
श्री. भरणे यांनी संकुलातील खेलो इंडिया आर्चरी सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, ज्युदो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन बहुउद्देशीय हॉल, जिम, कार्यालय आणि बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली.यावेळी मंत्री श्री.भरणे यांनी संकुलातील सुविधांवर समाधान व्यक्त केले.
अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करता येतील, अशा प्रकारच्या विविध क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातील. या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावती विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आर. व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आदि उपस्थित होते.
हव्याप्र महाविद्यालयाच्या दीक्षान्त समारोह कार्यक्रमाला उपस्थिती
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत चालविले जाणारे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालयाचा 11 व्या दीक्षान्त समारोह कार्यक्रमाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा क्षेत्रात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य तळमळीने आणि अव्याहतपणे सुरू आहे. हव्याप्रला क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत शासनामार्फत करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी यावेळी संस्थेची कारकीर्द सांगितली. श्री. असनारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आणि शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत
मुंबई दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024’ अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास तसेच जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांची मुलाखत मंगळवार 15 एप्रिल 2025 तर जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी घेतली आहे.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024 अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत शासकीय अधिकारी गटातून सर्वोत्कृष्ट उपक्रम या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाशी जोडण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच विभागांशी संबंधित अद्ययावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्याकरिता ‘DDMA चॅटबोर्ड’ प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना याप्रणालीमुळे कशाप्रकारे माहिती व मदत उपलब्ध होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती श्री. नामदास यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. श्रीमती नागलवाडे यांनी जिजामाता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थी पटसंख्याच नव्हे तर विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यास देखील मदत झाली आहे. त्यांनी या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून शिक्षिका श्रीमती नागलवाडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/ससं/
८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. १२ मे २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १३ मे २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १३ मे २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.
सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील. तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.
भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे. रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
0000
कांदिवलीत उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
मुंबई, दि. ११ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने उद्या १२ एप्रिल, २०२५ रोजी भुरामाई हॉल, शांतीलाल मोदी रोड, ईराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत व प्राथमिक निवड केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या विविध महामंडळामार्फत सवलतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्था हजर राहणार आहेत.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इन्टर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय / विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी या महारोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
०००
गजानन पाटील/ससं/
राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी
नवी दिल्ली, ११ : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ तसेच कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितीत कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
0000
जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई दि. ११ :- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.
जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.
कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.
जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात.
‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/