मंगळवार, एप्रिल 22, 2025
Home Blog Page 22

‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आणि शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत

मुंबई दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024’ अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास तसेच जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांची मुलाखत मंगळवार 15 एप्रिल 2025 तर जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी घेतली आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024 अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत शासकीय अधिकारी गटातून सर्वोत्कृष्ट उपक्रम या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाशी जोडण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच विभागांशी संबंधित अद्ययावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्याकरिता ‘DDMA चॅटबोर्ड’ प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना याप्रणालीमुळे कशाप्रकारे माहिती व मदत उपलब्ध होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती श्री. नामदास यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. श्रीमती नागलवाडे यांनी जिजामाता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थी पटसंख्याच नव्हे तर विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यास देखील मदत झाली आहे. त्यांनी या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून शिक्षिका श्रीमती नागलवाडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

 

 

८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. १२ मे २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. १३ मे २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १३ मे २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील. तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२५ %  महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत.  लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

0000

 

 

 

कांदिवलीत उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई, दि. ११ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने उद्या १२ एप्रिल, २०२५ रोजी भुरामाई हॉल, शांतीलाल मोदी रोड, ईराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत व प्राथमिक निवड केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या विविध महामंडळामार्फत सवलतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्था हजर राहणार आहेत.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इन्टर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय / विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी या महारोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

०००

गजानन पाटील/ससं/

 

 

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

oplus_0

नवी दिल्ली, ११ : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ तसेच कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितीत कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

0000

 

 

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि. ११ :-  जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा  विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.

जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर  अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने  जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.

जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात.

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ११ : थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणे, अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) च्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएलच्या संयुक्त विकासाला धोरणात्मक पाठबळ मिळणार आहे. भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सर्व काम होणार आहे.

या प्रकल्पासाठी परस्पर समन्वयातून व अभ्यासातून संयुक्त कार्यगट काम करणार आहे. या कामासाठी  सहकार्य पत्रावर स्वाक्षरी झालेल्या संस्थांचे प्रतिनिधी, महाजेनको, रोसातोम एनर्जी प्रोजेक्ट, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स या संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या कराराची अंमलबजावणी करताना अणुऊर्जेचा वापर, विकास याबाबतीत सर्व कायदेशीर तरतुदी व भारत सरकारने ठरवलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक आहे.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रभारी अपर मुख्य सचिव ऊर्जा संजय खंदारे, रशियाचे प्रतिनिधी मुंबईचे रशियन फेडरेशनचे महावाणिज्यदूत इव्हान वाय. फेटिसोव्ह, भारत व रोसातोमचे भारतातील प्रतिनिधी काउन्सेलर रशियन दूतावासचे युरी ए. लायसेन्को, संचालक, प्रकल्प विभाग (दक्षिण आणि दक्षिण-आशिया क्षेत्र) अलेक्झांद्रे वोल्गिन, आरईपीचे प्रकल्प व्यवस्थापक दिमित्री गुमेन्निकोव्ह, संचालक(प्रकल्प) अभय हरणे, मुख्य अभियंता अतुल सोनजे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अमन मित्तल, मित्राचे सहसचिव प्रमोद शिंदे, अणुऊर्जा विभागाचे सहसचिव नितीन जावळे, ग्लोबल टेक्नॉलॉजी अ‍ॅक्शनचे किशोर मुंदर्गी यावेळी उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंपनीने त्यांची उत्पादने भारतात तयार करावीत, जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होऊन प्रकल्प खर्चातही बचत होईल. कमी किंमतीमध्ये एक चांगली शहर वाहतूक व्यवस्था कंपनीने उपलब्ध करून दिल्यास राज्यातील किमान १० शहरांसाठी असे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-ट्रान्सीट बसेसचे उत्पादन देशातच सुरू करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्याविषयी सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या वापरत असलेल्या ई-बस, मेट्रो आणि ई-ट्रान्सीट यांच्या आर्थिक आणि इतर सर्व बाजू एकत्र विचारात घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करावा. एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रो सोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई-ट्रान्सीट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे.

यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यासह हेस-एजी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो, बस रॅपीड ट्रान्सीट (बीआरटी) यांना एकत्र करून एक हाय कपॅसिटी मास ट्रान्सीट रुट (एचसीएमटीआर) अशा वेगवान नागरी वाहतूक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत आज ई-ट्रान्सीट सुविधा या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 11 : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Oplus_131072

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने, कक्ष अधिकारी प्रदीप टिबे, विजय काळे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.११ : महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे आदींसह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई, दि. ११ : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले.

ताज्या बातम्या

डॉ. निधी पाण्डेय यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

0
 वर्ष २०२३-२०२४ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाची कामगिरी अमरावती, दि. २१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये ‘कार्यालयीन...

‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी विभागीय आयुक्तांचा सन्मान

0
नागपूर, दि. २१ :  नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने राबविलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज...

नॉर्दन ब्रांच कालव्यावरील अतिक्रमण काढणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि.२१ - नॉर्दन ब्रांचच्या ४४ किलोमीटरच्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामास आजपासून सुरुवात झाली असून यामाध्यमातून या कालव्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या कालव्यांच्या...

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि.२१ - येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे...

श्रीरामपूर तालुक्यातील कालवा दुरुस्तीच्या कामांना निधी देण्यात येईल- राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि.२१ - श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा...