रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 408

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

मुंबई, दि. ०१ : देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा, सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ करणारा ठरेल. अर्थव्यवस्थेला आणखी सदृढ करणारा, मध्यमवर्गीय, पगारदार, युवा आणि शेतकरी, कष्टकरी या सगळ्यांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या अनेक महत्वाकांक्षी धोरणांना बळ मिळेल. विशेषत: महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळे मागणी वाढेल. करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ वरून १२ लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही मर्यादा अडीच लाखांवरून सात लाख करण्यात आली होती. ती आता १२ लाख करण्यात आली. हा प्रवास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परिणामकारक आहे. यातून मध्यमवर्गीय, पगारदार, युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे. ज्यामुळे बाजारपेठांत चैतन्य निर्माण होईल. खरेदी वाढेल, मागणी वाढेल, उत्पादन वाढेल, रोजगार वाढतील विशेषत: एमएसएमई क्षेत्राला चालना मिळेल. यातून अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठींही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. देशातील 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकर्‍यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. मच्छिमारांना आता 5 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. यातून त्यांना व्यवसायवाढीसाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, अशा निर्णंयामुळे शेती आणि शेतकर्‍यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

युवा उद्योजकांसाठी एमएसएमई क्षेत्र महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याच्या निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी आहे.  स्टार्टअपसाठी 20 कोटी रूपयांची कर्ज मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे स्टार्टअपची इकोसिस्टिम मजबूत होणार आहे. वेगवेगळे स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधी यामुळे आपल्या राज्याची या क्षेत्रातील वाटचाल आणखी दमदार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

पायाभूत प्रकल्पांच्या विकासाकरिता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर धोरण तयार करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राज्यांना 50 वर्षे बिनव्याजी कर्ज योजनेचाही राज्याला सर्वाधिक फायदा झाला आहे आणि या अर्थसंकल्पातही त्या बाबतीत राज्य पुढे असेल. पीपीपी प्रकल्पांमुळे खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीत प्रोत्साहन वाढेल, यातून मोठी रोजगार निर्मिती होईल. एकंदर हा अर्थसंकल्प देशाला पुढे घेऊन जाणारा, देश प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे दर्शविणारा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय?

या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय, असा प्रश्न माध्यमांनी विचारला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आली, त्यानुसार, महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हीटी इम्प्रुव्हमेंट प्रकल्पासाठी 683 कोटी, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी, उपसा सिंचन योजनांसाठी 186 कोटी अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थात आणखी तपशीलवार माहिती यथावकाश दिली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

पारदर्शी, गतिमान प्रशासनाचा संकल्प करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचा संकल्प आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. यासाठी सर्वांनी गतिमान, पारदर्शी प्रशासनाचा संकल्प करावा. असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  या़त जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत विविध विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, तसेच नाविण्यपूर्ण प्रकल्पांवरही चर्चा झाली. तसेच जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

खासदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतर्गत सन 2024-25 मधील जानेवारीअखेर झालेल्या 330.72 कोटी रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 56.55 कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 40.99 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव तरतुद करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 21.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून 83 कामे पूर्ण होणार असून 40.31 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. इतर जिल्हा मार्गांसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामुळे 28 किलोमीटर रस्त्यांची सुधारणा होईल. जिल्ह्यातील 14 नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी 11.83 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्युत विकासासाठी 30 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित होईल. प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

महानगरपालिका स्थानिक स्वराज्य केंद्र व राज्य शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सर्वत्र लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येतील. चिखलदरा स्कायवॉकच्या काम गतीने पूर्ण करण्यात येईल. मंजूर कामांवरील निधी 31 मार्च 2025 च्या आत खर्च करावा. जिल्हा शल्य चिकित्सा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अचलपूर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी अहवाल सादर करावा. मेळघाटातील दुर्गम 22 गावांमध्ये वीज प्रश्न असल्याने याठिकाणी वीज पुरवठा सुरूळीत सुरू रहावा, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मनपा आयुक्त यांनी इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक करण्यावर भर द्यावा. मनपा शाळा डिजिटल तसेच आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त व्हाव्यात यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अला. शाळा, तसेच आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्ह्यातील नदी, उपनद्या, नाले खोलीकरण करून पाणी जिरवण्यावर भर द्यावा. उपसा करताना निघालेली वाळू शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरावी. गाव तेथे स्मशानभूमी ही योजना प्रत्येक गावात असणे आवश्यक आहे. तसेच मोर्शी मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे आज सकाळी दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. वैद्य यांनी श्री. बावनकुळे यांचा हनुमानाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. श्री बावनकुळे यांनी क्रीडापटूंची माहिती घेऊन कौतुक केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ हिरुळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी महात्मा गांधी आणि स्व. एकनाथ हिरुळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कंवर नगर येथील महानुभव आश्रमाला भेट दिली. आश्रमाच्या वतीने त्यांचा  यावेळी सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आज सकाळी भेट दिली. समाधीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समाधीस्थळाचा विकास ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनीसांगितले. यावेळी आश्रमाच्यावतीने श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

आदिवासींचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यास नवी दिशा मिळेल – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नागपूर, दि.31 : दुर्गम आणि वंचित आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा व त्यावर प्रभावी उपाययोजनेसाठी तज्ञांचे विचारमंथन नेहमीच दिशादर्शक ठरते. या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने व्यापक विचारमंथनासाठी जागतिक स्तरावरील फिस्ट २०२५ या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. आदिवासी समाजातील आरोग्य व जीवनमान उंचावण्यास या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून नवी दिशा मिळेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.

आदिवासींच्या आरोग्य विषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासााठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी  ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  ‘एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दुर्गम भागातील आदिवासींना  कुपोषण, संसर्गजन्य रोग आणि सिकलसेल यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. या आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन दिवस विविध विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा निश्चितच फायदा येत्या काळात होणारा असल्याचे ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात आदिवासी समाजातील व्यक्तींसाठी विविध योजना व उपक्रमाच्या माध्यमातून सशक्तिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळातही या योजना व उपक्रमाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदिवासी समाज बांधवांची सर्वंकष उन्नती व्हावी याकडे विशेष लक्ष आहे. त्या अनुषंगाने विविध योजना व उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

राज्यातील 13 जिल्हे हे पेसा कायद्याअंतर्गत येतात. यात 59 तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील 41 जिल्ह्यातील मतदारसंघात आदिवासीबहुल लोकसंख्या आहेत. पालघर ते भामरागड असा हा समाज विस्तारित आहे. या परिषदेच्या माध्यमातून पुढे आलेल्या विविध बाबींच्या अनुषंगाने पुढील महिन्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि एम्स यांच्यासोबत आदिवासी विकास विभागाची एक बैठक घेण्यात येणार असल्याचे व त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रा. उईके यावेळी म्हणाले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा व्हिडिओ संदेश

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा व्हिडिओ संदेश यावेळी दाखविण्यात आला. यात त्यांनी या परिषदेला शुभेच्छा देत या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. आदिवासींचे प्रश्न व समस्या सोडविण्यास या परिषदेच्या माध्यमातून मदत होणार असल्याचे ते या संदेशात म्हणाले.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील रमाई आवास योजना समितीची ५ हजार ७०० घरकुलांना मंजुरी

लातूर, दि. ३१ (जिमाका) : जिल्ह्यात रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन ५ हजार ७६२ घरकुलांना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबातील व्यक्तींचे स्वतःच्या हक्काचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय रमाई आवास योजना समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

रमाई आवास योजनेसह इतर आवास योजनांमधून जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या घरकुलांच्या कामांना गती द्यावी. घरकुलांचे प्रस्ताव स्वीकारताना प्रत्येक गरजू आणि पात्र लाभार्थ्याला घरकुल मिळेल, याची दक्षता घावी. गतवर्षी मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाच्या कामांपैकी अंतिम टप्प्यातील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. गतवर्षीचे आणि यावर्षीचेही घरकुल बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. भोसले यांनी दिल्या.

सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत ७ हजार २८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी २ हजार २६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५ हजार २ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून यातील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी यावेळी सांगितले. तसेच सन २०२४-२५ अंतर्गत प्राप्त प्रस्तावांची माहिती त्यांनी सादर केली.

शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा, दि. 31  शहीद वीर जवान चंद्रकांत काळे  यांच्या पार्थिवावर आज खटाव तालुक्यातील वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, प्रांताधिकारी उज्वला गाडे, प्रभाकर देशमुख ,,तहसीलदार बाई माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
पोलीस व  सैन्य दलाच्या  जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी मनीषा, आई किशाबाई, वडील महादेव, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती, भाऊ हिराचंद  यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन  घेतल्यानंतर मुलगा श्रेयस यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी  लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि  ग्रामस्थ उपस्थित होते.

सोयाबीन खरेदीला सहा दिवसांची मुदतवाढ-  पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि. ३१ : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मंत्री श्री.रावल म्हणाले की, राज्यात 31 जानेवारीपर्यंत देण्यात आलेली सोयाबीन खरेदीची मुदत आज संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी, अशी राज्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती, ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता. आज ती मुदतवाढ मिळाली. यामुळे राज्याला दिलेले 14 लाख 13 हजार 269 मेट्रिक टन पीपीएस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 562 खरेदी

खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4 लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे तर काही जिल्ह्यांना उद्दिष्ट वाढवून दिले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मंत्री श्री.रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

०००

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणे, दि. ३१: मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, सिद्धार्थ शिरोळे थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे तसेच थिएटर अकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या इमारतीच्या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, सरावासाठी सभागृह, बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था १०० वर्षांपासून तर थिएटर अकॅडमी ५० वर्षापासून कार्यरत आहे.

मुकुंदनगर येथील थिएटर अकॅडमी ही संस्था बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभलेली संस्था आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या मुलांकरीता मोलाचे कार्य करत आहे. या संस्थांच्या कार्यासाठी शासन पाठीशी आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी थिएटर अकॅडमीची पाहणी केली.

०००

सात कलमी कृती कार्यक्रमाने नागरिकांचे जीवन सुलभ आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल – पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी

नंदुरबारदिनांक 31 जानेवारी, 2025 (जिमाका) : शासनाच्या 100 दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचे  दैनंदिन जीवन अधिक सुकर तसेच सुलभ होईल आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल, असा विश्वास राज्याचे उच्च  आणि तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी आज व्यक्त केला.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे,  सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा (नंदुरबार), अनय नावंदर (तळोदा),  कृष्णकांत कनवारीया (शहादा) तहसिलदार डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक कपील सिंघल यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, नागरिकांच्या तक्रारी, कार्यालयीन स्वच्छता, उद्योजकांसाठी सुलभ प्रक्रिया आणि शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष भर देताना  पालक सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी सर्व शासकीय कार्यालयांना आपली संकेतस्थळे अद्ययावत आणि सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कार्यालयाने सेवा हमी कायद्यात अधिकाधिक सेवा वेळेत देण्याबरोबरच  माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नागरिकांना मिळणारी सर्व आवश्यक माहिती आधीच उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांना माहिती मागण्यासाठी कार्यालयात यावे लागू नये. यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होईल आणि नागरिकांना वेगवान सेवा मिळेल. शासकीय कार्यालयांमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवून अनावश्यक कागदपत्रे हटवावीत आणि वापरात नसलेली, निकामी वाहने निर्लेखित करण्याची प्रक्रिया त्वरीत राबवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयीन वातावरण अधिक सुटसुटीत आणि कार्यक्षम करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, बैठकीच्या सोयी, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि आवश्यक सुविधांची उपलब्धता याची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम

नागरिकांचे जीवन अधिक सोपे करण्यासाठी किमान सुधारणा किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक कार्यालयाने हाती घ्यावेत, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. हे उपक्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद सेवा पुरवण्यावर आधारित असावेत. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची वेळ निश्चित करावी आणि तसा फलक स्पष्टपणे प्रदर्शित करावा, जेणेकरून नागरिकांना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत अधिकाऱ्यांची भेट घेता येईल, हे माहीत राहील. प्रलंबित अर्जांची संख्या शून्यावर आणण्यासाठी साप्ताहिक आढावा बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढण्यावर भर द्यावा, लोकशाही दिनी येणाऱ्या तक्रारींची  तत्काळ जागेवरच सोडवणूक करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे नागरिकांच्या तक्रारी तालुका आणि जिल्हा स्तरावरच निकाली निघतील आणि मंत्रालयात अनावश्यक गर्दी होणार नाही.

उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सुलभ प्रक्रिया उपलब्ध करणे

नंदुरबार सारख्या  आकांक्षित  जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीस चालना देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या जागेवर सोडवता कशा येतील, याची खात्री करण्यास प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग, पर्यटन, लघु व मध्यम उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख

शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी द्याव्यात आणि त्याची प्रगती तपासावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. यामध्ये शाळा, अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, जलसंधारण प्रकल्प, रस्ते, कृषी केंद्रे आणि अन्य विकासकामे यांचा समावेश आहे. तालुका आणि गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजनांचा कार्यानुभव प्रत्यक्ष पाहून गरज असल्यास सुधारणा कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाने ठराविक वेळापत्रक तयार करून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह ठिकठिकाणी भेटी द्याव्यात, यावर भर देण्यात आला.

उत्तम सोयी-सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे

शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी  दिले. कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी, बैठकीच्या सोयी, प्रसाधनगृहांची स्वच्छता, विश्रांतीसाठी जागा आणि आवश्यक सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, तसेच लोकांना आपुलकीने वागणूक देण्यावर  त्यांनी भर दिला. तसेच, गरजेनुसार विशेष मदत केंद्रे किंवा माहिती कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या अर्ज, योजनांची माहिती सहज मिळेल. बैठकीत पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. प्रत्येक विभागाने १०० दिवसांत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व विभागांचे समन्वयाने काम सुरू : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जिल्ह्यातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने गंभीरपणे कार्यवाही हाती घेतली असून, यामुळे प्रशासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणि गती येणार आहे. या कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याचे यावेळी सादरीकरण करताना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.

सर्वप्रथम महाज्योती संस्थेमार्फत जेईई/नीट/एमएचटी-सीईटी  ऑनलाईन परिक्षा पर्व प्रशिक्षणासाठी इतर मागावर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 14 पात्र विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात टॅब चे वितरण पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत तयार केलेली जिल्हा आर्थिक समालोचन अहवाल पुस्तिका 2024 याचे विमोचन करण्यात आले.

या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले..

अदित्य राजळे, अदित्य चौधरी, अंजली कोळी, अनुष्का धनगर, अर्पिता पटेल, आर्यन वाडीले, आसावरी पाटील, अश्विन धनगर, अथर्व शिनकर, अवधूत बिरारी, भुमिका गवळी, भुमिका चौधरी, मोहित लामगे, तन्मय लामगे.

नगर विकास विभाग महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ३१: शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास करण्याचे काम नगर विकास विभागाच्यावतीने करण्यात येते; विभागाचे अधिकारी- कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागातील नगररचनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, त्यामुळे नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नगरविकास, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव इंजि. असीम गुप्ता, नगर रचना संचालक अविनाश पाटील, डॉ. प्रतिभा भदाणे, सुलेखा वैजारपूरकर, सुनील मरळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरिकरण असलेले राज्य आहे, शहरी भागातील वाढती लोकसंख्या, पर्यावरणाची हानी, वाढते प्रदूषण, पिण्याचे पाणी आदी आव्हाने स्वीकारुन नगर रचना विभागाने पायाभूत सुविधा निर्मितीबाबतचे नियोजन करावे. शहराचा गतिमान विकास करताना तो सर्वसमोवशक, सुनियोजित आणि शाश्वत असला पाहिजे. तापमान वाढ, हवामान बदलांचा विचार करुन शहरी व ग्रामीण भागाचा पर्यावरणपूरक विकास करावा लागेल. मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेले पाणी बागबगीचा, औद्यागिक क्षेत्र तसेच बांधकामाकरिता वापर करणे बंधनकारक करण्यातबाबतचा निर्णय घ्यावा लागेल.

प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण मार्गी लावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता

विकासाची विषयपत्रिका घेऊन प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर राज्यशासनाचा भर आहे, त्यामुळे शहराचा विकास कालबद्ध पद्धतीने विकास करणे आपली जबाबदारी आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रलंबित नगर रचना आराखड्याची कामे वेळेत मार्गी लावावेत. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता कठोर पावले उचलावीत. विकास आराखडा तयार करताना सार्वजनिक हीत विचारात घेऊन नागरिकांना अधिकाधिक सोई-सुविधा मिळाल्या पाहिजे, येत्या काळात शहरांची अनियंत्रित वाढ होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

महानगरपालिका व नगरपालिकांनी ‘शहर आराखडा शाखा’ निर्माण करा

शहरातील वाढते नागरिकरण, त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरीता महानगरपालिका व नगरपालिकेने ‘शहर आराखडा शाखा’ निर्माण करावी. यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी. मुंबई व ठाण्याच्या धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास ‘समूह विकास’ (क्लस्टर डेव्हलपमेंट) पद्धतीने केला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होईल.

कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर द्यावा

विभागाने कामकाजात भौगोलिक माहिती यंत्रणा अर्थात ‘जीआयएस’ आधारित नगर नियोजन, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. विभागाने नगररचनाकार, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्थाना सोबत घेऊन नागरिकांना सुविधा देण्याची कामे करावीत. शहरात सुशोभीकरणाच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. शहरातील संकल्पनेत नाविन्य असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण (ऑयकॉनिक) इमारती बांधण्यावर करण्याकरिता विकसकांना प्रोत्साहित केले पाहिजे. नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

नगर विकास विभागाने सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास करावा- अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 2054 साली अधिक होण्याचा आणि दोन्ही शहराची मिळून ती सुमारे 2 कोटी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाने हा महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील नगरविकास आराखडे आणि नगरविकास इतक्यापुरताच मर्यादित विचार न करता या क्षेत्रांचा सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास साधावा.

ते पुढे म्हणाले की, शहरातील वाढती लोकसंख्या, नदी प्रदूषण, पाणी, कचरा, अरुंद रस्ते, जमीन, वाहतूक समस्या, हवामानातील बदल, वाढते तापमान आदी आव्हानांचा सामना करुन पुढे जाण्याची गरज आहे. शहराच्यातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता योग्य पद्धतीने नियोजन करुन वाहतुकीचे प्रश्न मार्गी लावण्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे नगर रचना विकास आराखडे वेळेत मंजूर करुन कामे मार्गी लावावीत. हा विभाग शहरीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा घटक झाला आहे. या अनुषंगाने विभागाने विविध बाबींचा विचार करुन आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घ्याव्यात.

पारदर्शक व सुनियोजित पद्धतीने शहर व ग्रामीण नियोजनाची कामे करुन विकासाची दिशा ठरविण्यादृष्टीने कामे करावीत. महानगरपालिकेने ठराविक क्षेत्र आरक्षित करुन केवळ वृक्ष लागवडच केली पाहिजे. हरित व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन नियोजन करणे गरजेचे आहे. शहरालगत असलेल्या गावांतील नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावा तसेच सर्वसमावेशक विकास कामे होतील, याबाबत दक्षता घ्यावी.

चांगल्या काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे, निष्ठेचे आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव होतो. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुप्त गुण असतात, त्यांच्या अंगी असलेल्या विविध कल्पना, सूचनांचा विभागाला लाभ झाला पाहिजे. हा त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा सोहळा आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. गुप्ता म्हणाले, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता काम करण्यासोबत याकरीता आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर राहणार आहे. विभागांर्तगत देण्यात येणाऱ्या परवानग्या आनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. पाटील यांनी विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामाबाबत माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदूलकर’ पुरस्काराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले.  यावेळी नगर विकास विभाग आणि सीईपीटी अहमदाबाद, गोखले इन्स्टिट्यूट, पुणे, आयआयटी रुरकी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनास भेट देऊन विभागाशी संबंधित विविध बाबींची माहिती घेतली.

यावेळी सुधारित ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’चे आणि ‘नियोजन विचार’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

०००

प्रवेशासाठी डिजिटल पडताळणी पद्धतीचा अवलंब; ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)-विभागीय क्रीडा संकुलात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजिटल पद्धतीने चेहरा ओळखीची पद्धत अवलंबावी. तसेच ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तिंना विभागीय क्रीडा संकुलात चालण्याच्या व्यायामासाठी वार्षिक १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारावे. जे केवळ त्यांच्या नोंदणीसाठीच्या प्रक्रियेकरिता वापरले जावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक आज विभागीय क्रीडा संकुलात पार पडली. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच विभागीय क्रीडासंकूल समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर व  विविध क्रीडा प्रकारांच्या विशेष मैदानावर सराव करण्यासाठी व नियमित व्यायामासाठी येणाऱ्या खेळाडू व नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा. अन्य अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजीटल पद्धतीने चेहरा ओळख ही पद्धती अवलंबावी. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात खेलो मोअरही पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धती वापरावी. प्रत्येक क्रीडा प्रकार, इनडोअर आऊटडोअर या सेवांसाठी वेगळे दर निर्धारित केले जावे. तसेच ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे असे केवळ प्रकृतीस्वास्थ्यासाठी सकाळी वा सायंकाळी चालण्यासाठी मैदानात येतात अशा नागरिकांना नाममात्र रजिस्ट्रेशन करीता शुल्क आकारावे. वय वर्षे १८ ते ६० या व्यक्तिंकरीताच शुल्क आकारावे. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुल्क आकारु नये,असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले. प्रत्येक व्यक्ती खेळाडुची डिजीटल नोंदणी करावी. त्यांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करुन ओळख पटविण्याची यंत्रणा बसवावी. अंधारलेल्या भागात उजेडाची व्यवस्था करावी. सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांची नेमणूक करावी. अवैध व्यक्तिंचा प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना करावी. प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या व्यक्ति म्हणून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडुंनाच मान्यता द्यावी. तसेच सिंथेटीक धावनपथ तयार करण्याचे कामाबाबत कायदेशीरबाबी तपासून त्वरीत निर्णय घ्यावा. दोन लक्ष लिटरची भुमिगत पाण्याची टाकी बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.

ताज्या बातम्या

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

0
अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  'स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना...

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून...

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना...

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ - पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी...

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य...

0
सातारा दि.२६ - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे...