गुरूवार, जुलै 24, 2025
Home Blog Page 413

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्य दूतावासातील मो.स्यारकावी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

मंत्री श्री.रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.युसूफ यांना माहिती दिली. नाशिकचा कांदा आणि द्राक्षे, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, ताजी फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्यावतीने त्यांचे स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा विस्तार होतो. मलेशियाच्या पर्यटकांनी राज्यात पर्यटनासाठी यावे, असे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी केले. महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी मलेशियाच्या कृषी आणि पर्यटन विषयक सदस्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले.

मलेशियाच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी मलेशिया करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

  • साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित
  • तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

मुंबई दि. २७ : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे ;

  • सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

  • उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

  • उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

  • उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

  • उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

  • उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

  • उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

  • उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)

  • उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)

  • उत्कृष्ट अभिनेता :

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

  • उत्कष्ट अभिनेत्री :

१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

  • उत्कृष्ट विनोदी अभिनेता :

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

  • सहाय्यक अभिनेता :

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

  • सहाय्यक अभिनेत्री :

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

  • प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

  • प्रथम पदार्पण दिग्दर्शन :

१. 4 ब्लाइंड मेन

२. गाभ

३. अनन्या

0000

संजय ओरके/विसंअ/

भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 28 : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री श्री.पालव अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवत असून अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री.पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

0000

संजय ओरके/विसंअ/

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा

मुंबई, दि. 28 : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात  विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,  सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी.या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी.

हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न, मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. पुण्यात ३१ तारखेला क्रिकेट सामना आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केली.

पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य  नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. याबाबत पुण्यात आढावा घेतला आहे. उपचार आणि तपासणी बाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

पुण्यात सध्या 111 रुग्ण आहेत, 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप GBS मुळेच झाला याची अजून पुष्टी नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकाराची समस्या नियंत्रणात आली आहे. यात आता नव्याने रुग्ण वाढ झालेली नाही. याबाबत ‘आयसीएमआर’ कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

000

मंत्रिमंडळ निर्णय

अटल सेतूवर सध्याच्याच सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

—–०—–

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २८ : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुषचे संचालक डॉ.रमण घुंगराळेकर आदी प्रत्यक्ष तर सर्व शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या विषाणूबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी जनजागृती करण्यात यावी. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणांनी देखील आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घ्यावी, असेही यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :

अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा

अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी

जास्त दिवसांचा डायरिया

अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात

जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :

पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.

ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.

वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

0000

भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनांमधील अडचणी तातडीने मार्गी लावा- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २८ :- ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअतंर्गत होत असलेल्या कामांमधील अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. यासाठी संबधित यंत्रणांनी त्यांच्याशी निगडीत असलेली कामे, परवानग्या विनाविलंब देण्याची कार्यवाही करावी. या कामास प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयातील परिषद सभागृहात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत योजनांमधील विविध अडचणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार शांताराम मोरे, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहसचिव बी.जी पवार, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते, कोण गावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि उपसरपंच रेखा निलेश मुकादम यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू करण्यासाठी महसूल, जलसंपदा, वन विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभागाकडून आवश्यक परवानगी मिळण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जल जीवन मिशन योजनेची कामे जलद गतीने पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संबधित विभाग व यंत्रणांनी त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत असलेले विषय, आवश्यक परवानगी तातडीने द्यावी, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी बैठकीत शहापूर तालुक्यातील ९७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, कोनगाव, पडघा,  आसनगाव, कळंभे, अंबाडी, कारीवली, बोरीवली तर्फ राहुर या पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

०००००

‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाची पाहणी करून आराखड्यासह अंदाजपत्रक तयार करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील तीस वर्षांचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करावीत

मुंबई, दि. २८:- कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोरेगाव (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ग्रामविकास (रस्ते) विभागाचे सचिव सतीश चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे, ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ही कामे करताना पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा. हे रस्ते दर्जेदार व मजबूत करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर एकसळ ते कुमठे रस्त्याचे कामही मार्गी लावावे.

कोरेगाव तालुक्यातील वाहतुकीचा ताण असलेला वर्धनगड घाट व त्रिपुटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून खिंड फोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधणे, कोरेगाव येथे उड्डाणपूल बांधणे, वडूथ व वाढे पूलाची पुनर्बांधणी करणे, माहुली (ता. सातारा) येथे नवीन पूल बांधणे, ल्हासुर्णे पुलाची उंची वाढविणे, तळगंगा नदीवर पूलाचे काम मार्गी लावणे, कोरेगाव शहराजवळील रेल्वे स्टेशनजवळील पूलाची उंची वाढविणे, कोरेगाव शहरात ड्रेनेजसह विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे या विषयांचा आढावा घेण्यात आला.

0000

सिकलसेल आजाराचे निर्मूलन आपले उद्दीष्ट – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दि. २८ (जिमाका) : सिकलसेल आजार निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी तपासणी मोहीम नंदुरबार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव काकाटे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. सिकलसेल आजाराचे निर्मूलन आपले उद्दीष्ट असल्याचे पालकमंत्री श्री. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. पुढील दोन वर्षांत 0 ते 40 वयोगटातील 8 लाखांहून अधिक नागरिकांची याअंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः सिकलसेल आजाराची तपासणी करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार अमशा पाडवी, आमदार शिरीष नाईक, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे तसेच विशेष निमंत्रित सदस्य डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखिलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके आणि ॲड. राम रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. माणिकराव काकाटे म्हणाले की, या तपासणी मोहीमेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे. “सिकलसेल आजाराचे निर्मूलन हे आपले उद्दिष्ट आहे. नागरिकांनी तपासणी करून सहकार्य करावे आणि जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे निर्मूलन करण्यास हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या संधीचा लाभ घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे, हीच या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै 2023 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशनच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल तपासणी मोहीमेची अंमलबजावणी होत आहे. सिकलसेल आजार हा जिल्ह्यातील गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक असल्याने यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 90 हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित नागरिकांची तपासणी करून या आजाराचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत.

तपासणीत आढळलेल्या सिकलसेल रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचार केले जातील. रुग्णांसाठी समुपदेशन व आवश्यक ते उपचार दिले जातील. तसेच सिकलसेल वाहकांमध्ये जनजागृती अभियान राबवून पुढील पिढ्यांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. आजपर्यंत जिल्ह्यात 100 रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लवकरच सर्व सिकलसेल रुग्णांना प्रमाणपत्र मिळणार असून, मोफत रक्तपुरवठा कार्ड देण्याचीही योजना आहे.

०००

‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’ प्रशासन व समाजातील दरी कमी करेल – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दि. २८ (जिमाका): जिल्हा प्रशासनाने राजभाषा मराठीसह स्थानिक बोली भाषांना प्रोत्साहन देत प्रशासन आणि लोकांमधील संवाद अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’ तयार केली असून या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. या पुस्तिकेमुळे प्रशासन व समाजातील दरी कमी होईल असा विश्वास मंत्री श्री. कोकाटे यांनी व्यक्त केला.

नियोजन भवन येथील प्रकाशन सोहळ्यास खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी, अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागातील स्थानिक बोली भाषांतील जाणकार शिक्षकांच्या सहकार्याने तयार झालेल्या या पुस्तकात इंग्रजी, मराठी, पावरा, भिली आणि वसावे या पाच भाषांचा समावेश आहे. प्रशासन व स्थानिक समुदाय यांच्यातील संवाद अधिक सुगम करण्यासाठी हे पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पुस्तिकेत सामान्य, सुविधांची सुलभता, अंगणवाडी, शाळा, कृषी, स्वयं-सहाय्यता गट (SHG) आणि वनहक्क कायदा (FRA) यांसारख्या सात महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाशी संबंधित माहितीचा समावेश आहे. यामध्ये एकूण १४२ प्रश्न असून जे प्रश्न स्थानिक भाषेत प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारले जाऊ शकतात. यामुळे प्रशासनाला तळागाळातील समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यास मदत होईल.

पालकमंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’ हा एक अभूतपूर्व उपक्रम आहे. हा उपक्रम केवळ संवाद वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर प्रशासन आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले की, “भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. या पुस्तिकेमुळे तळागाळातील व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर कार्यवाही करणे सोपे होईल.”

हा उपक्रम अधिक स्थानिक आदिवासी बोली भाषांमध्ये संसाधन विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’मुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन अधिक सुसंवादी व प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून जिल्ह्यातील सर्व संबंधित याला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या पुस्तिका निर्मितीत उपअधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण, रणधीर भामरे, दिलीप पावरा, ईश्वर गावित, अमरदास नाईक तसेच आकांक्षित जिल्हा फेलो कु. अस्मिता गुडधे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

०००

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision -...

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

0
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  ‘विद्यार्थी सहाय्यता...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा –...

0
सातारा दि.२३  : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा...

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात...

0
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही...