मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 419

राष्ट्रीय मतदार दिन : राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव

भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मतदान प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली, आणि त्यानिमित्ताने देशभर जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात.

मतदान : लोकशाहीचे प्रतीक आणि राष्ट्रीय कर्तव्य

मतदानाचा हक्क बजावणे हे केवळ आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य नसून, लोकशाही टिकविण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रिया जगभरात आदर्श मानली जाते. ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या माध्यमातून आज आपली मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे.

लोकशाही मजबूत असेल तर देशाचा विकास सुकर होतो. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाने मतदानात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. आपले एक मत देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते.

मतदान नोंदणी : पहिला पाऊल

१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार यादीत नाव नोंदवून मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात मतदार नोंदणी सोपी झाली आहे. www.nvsp.in या वेबसाइटद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येते.

राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की; प्रभातफेरी, निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा,मतदान जागृतीवर व्याख्याने, पोवाडे, पथनाट्याद्वारे जनजागृती विशेषत: तरुण पिढीला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

लोकशाहीचे संरक्षण : आपली जबाबदारी

भारतीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली देशातील निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने होतात. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही सबबी न सांगता, आपला हक्क बजावणे हे आपल्या राष्ट्रप्रेमाचे खरे दर्शन आहे.

“आपले मत महत्त्वाचे आहे! चांगले राज्यकर्ते निवडण्यासाठी आजच आपली मतदार नोंदणी करा.”

मतदान हा आपला अधिकार, हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाहीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. चला, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, आपल्या समाजाला लोकशाहीचे खरे मूल्य समजावून देऊ.

 

आपली मतदार नोंदणी करा, देशाच्या विकासात आपले योगदान द्या!

0000

श्री. हेमकांत सोनार

रायगड-अलिबाग

 

ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुःख

मुंबई दिनांक २५: ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या न्यायमूर्ती चपळगावकर यांनी मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले.

मराठवाड्याच्या या सुपुत्राने सामाजिक, न्याय विषयांवर तसेच व्यक्तिचित्रण, ललित लिखाण देखील केले. आपल्या वैचारिक लिखाणातून समाजाला नेहमी जागृत आणि ज्ञानी करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर, राज्यातील साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

0000

चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी

मुंबई, दि. २५ :- महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे.

न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

 

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- “ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती  नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं ‘गांधी आणि संविधान’ पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

—-००००—-

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई, दि. २४ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री.शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व   नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, केंद्रीय सचिव आशीष बुधानी, पंकज बन्सल, तसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच संपूर्ण देशभरातून सहकार चळवळीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन, नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ दरम्यानच्या उपक्रमाचे वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.

 

केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमित शाह म्हणाले की, अम्ब्रेला संगटनामुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्षेत्राला फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आणि खासगी बँकेमध्ये सेवा मिळतात, अगदी त्याचप्रमाणे सहकारी बँकेद्वारे सेवा मिळतील. यासाठी सहकारी बँकेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. आज एक हजार ४६५ सहकारी अर्बन सहकारी बँका असून त्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. आगामी काळात वित्तीय व्यवहार हा सहकारी बँकामार्फत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन पिढीने त्याबाबतचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात रोजगार निर्माण करावयाचा असेल तर सहकार क्षेत्राला नवीन आयाम देणे आवश्यक आहे. भारत सरकारने साखर उद्योगासाठी १० हजार करोड रूपयांचा इन्कम टॅक्स माफ केला आहे. काही वाद राहू नये यासाठी कायद्यात सुद्धा सुधारण केली असल्याचे त्यांनी सांगितले. दहा लाख टन साखर निर्यातीमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आगामी काळात सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प केला असल्याचेही श्री.शाह यांनी सांगितले.

महाराष्ट्र : सहकार चळवळीची जननी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहकार क्षेत्राची मूळ बिजं रोवली असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी आहे. सहकार हे कोणाची मत्तेदारी नसून सहकार हा देशाचा प्राण आहे. सहकार आणि साखर उद्योगाला केंद्र सरकारच्या धोरणांमुळे चालना मिळाली. देशातील गावात सहकाराची मुळे मजबूत होत असून मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांना इज ऑफ डुईंग बिझिनेसमुळे उपयुक्त असे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमुळे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेता येते. त्याचबरोबर नवीन १० हजार पॅक्समध्ये फिशरिज, डेअरीची सहकारी संस्था सुरू झाल्या. नाबार्डच्या सहाय्याने देखील ग्रामीण मार्ट सुरू झाले. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, जैविक खते, शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे यासाठी राष्ट्रीय पातळीवर बहुउद्देशीय संस्था सुरू झाल्या. किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम ही सहकारातील मोठी क्रांती असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

सहकाराला बळकट करण्यासाठी या सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले असून सहकाराला संजिवनी दिल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले की, राज्यातील ८ हजार पँक्सचे संगणकीकरण पूर्ण केले आहे. १०० वर्षोपेक्षा जास्त गौरवशाली इतिहास असलेला सहकार आता विदर्भ आणि मराठवाडा या भागात रूजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहकाराच्या माध्यमातून सकारात्मक बदल – उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकार चळवळ अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाऊन ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता नांदत आहे, सहकार चळवळीशिवाय विकास अशक्य होता, असे मत व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सहकार क्षेत्राची ताकद ओळखून सहजता, सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणि चळवळीला बळकटी देण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी, कष्टकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यामध्ये तसेच समाजतील उपेक्षित, दुर्बल घटकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाच्या क्रांतीकारी निर्णयांमुळे चांगले परिणाम दिसू लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी चळवळीत कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे. नव्या पिढीला या सहकारामध्ये सामावून घेण्यात येणार असून पुढील दोन तीन वर्षात प्रत्येक गावात सहकारी संस्था स्थापन व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील सहकार चळवळ पूर्ण योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे, असे सांगून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, अनेक माध्यमातून निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही सहकाराशी जोडली आहे. ग्रामीण भागाला मजबूत करण्यासाठी तसेच रोजगार निर्माण करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. पॅक्स मजबूत झाल्यास गावे समृद्ध होण्याबरोबर तेथील गावकरी सुद्धा समृद्ध होणार असल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना पुनर्जीवन देण्यासाठी अनेक पाऊले उचलली गेली असल्याचे सांगून ते म्हणाले की, मागील दोन आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास आठ हजार कोटी रूपयांची मदत मिळाली आहे. साखर कारखान्यांच्या इन्कम टँक्सच्या समस्या सोडविण्यात आल्या. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात एनसीडीसीच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचेही यावेळी सांगितले.

आभार प्रदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री श्री.शाह यांनी सहकार चळवळीला न्याय देण्याचे काम केले आहे. भारताची ओळख ही महाराष्ट्राच्या या सहकार चळवळीमुळे आहे. सर्वसामान्य घटनांना या चळवळीत आणण्यासाठीच्या केंद्रीय सहाकर मंत्री श्री.शाह यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.

००००

महापारेषणमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात

मुंबई, दि. २४ : शासकीय कामकाजाबरोबरच दैनंदिन व्यवहारातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. तसेच मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे येथील ‘प्रकाशगड’ येथील सभागृहात आयोजिलेल्या ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात श्री.सुगत गमरे बोलत होते. यावेळी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती अंजू गुप्ता, मुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघ, श्री. सुनील सूर्यवंशी, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, मुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णी, मराठी भाषा समन्वय अधिकारी श्री. नितीन कांबळे, उपमहाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री.अभय रोही उपस्थित होते.

श्री. सुगत गमरे म्हणाले, ‘मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनातही मराठीचा वापर करावा. मराठी भाषेच्या प्रसारासाठी महापारेषणने म्हणी स्पर्धा, चरित्रवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या, हे कौतुकास्पद असून या सांस्कृतिक कलागुणांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते.

यावेळी नाट्यअभिनेत्री श्रीमती मधुरा वेलणकर-साटम यांचा अस्सल मराठमोळा मधुरव (बोरू ते ब्लॉग) हा दर्जेदार कार्यक्रम घेण्यात झाला.

मराठी भाषा समन्वय अधिकारी तथा उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नितीन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री. रितेश चौधरी व श्रीमती प्राजक्ता मदाने यांनी केले. श्री.महेश आंबेकर यांनी आभार मानले.

महापारेषण मध्ये नावीन्यपूर्ण संकल्पनांवर भर

महापारेषणमध्ये विविध नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यामध्ये संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे नेहमी अग्रेसर असतात. दरवर्षी मराठी भाषा दिनाला विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेषतः महापारेषणच्या वर्धापनदिन अनोख्या पध्दतीने करण्यावर श्री. गमरे यांचा विशेष भर असतो. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली व संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महापारेषण’ने विविध पुरस्कार मिळविले आहेत.

 

स्पर्धांचे निकाल :

मराठी म्हणी स्पर्धा : अनिक मांढरे (प्रथम), पराग पाटील (व्दितीय)

चरित्र वाचन स्पर्धा : सीमा डुबेवार (प्रथम), रितेश चौधरी (व्दितीय)

वादविवाद स्पर्धा : माहिती व तंत्रज्ञान विभाग (प्रथम), तांत्रिक विभाग-२ (व्दितीय)

000

संजय ओरके/विसंअ

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

मुंबई, दि. २४ : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल, अशी माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे.

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या  तरतूदीनुसार शासनाने राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांची २७६ वी बैठक  अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी झाली. सदर बैठकिस राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत  महामंडळाच्या पर्यावरणपूरक नवीन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी  पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरी प्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे  रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास  नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी कळविले आहे.

अशी आहे भाडेवाढ

सेवेचा प्रकार :  साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर(वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुतीकरिता राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाला बक्षीस; दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर

मुंबई, दि. २४ : उत्तर प्रदेश राज्याचे तसेच दमण, दीव, दादरा – नगर हवेली केंद्र शासित प्रदेश येथील लोकजीवन व संस्कृतीचे राग, ताल व नृत्याच्या माध्यमातून जिवंत दर्शन घडविल्याबद्दल राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाला २५००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. यावेळी सांस्कृतिक सादरीकरणात सहभागी तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय व वाडा येथील डॉ. शांतीलाल धनजी देवशी महाविद्यालय यांना देखील राज्यपालांनी प्रत्येकी २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

­‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजभवन येथे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २४) उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी बक्षीस जाहीर केले.

उत्तर प्रदेश भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. उत्तर प्रदेश ही अयोध्येमुळे प्रभू श्री.रामाची, मथुरेमुळे भगवान श्री.कृष्णाची तर काशीमुळे भगवान शिवाची भूमी असल्याचे सांगून गंगेच्या किनारी वेदांचा उगम झाला असल्याची मान्यता असल्यामुळे उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय आहे, असे राज्यपालांनी सांगितले. उत्तर प्रदेशाचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजकीय विकासात अविस्मरणीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश तसेच दमण-दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अनेक लोक आज महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व औद्योगिक विकासात योगदान देत असल्याबद्दल राज्यपालांनी प्रशंसोद्गार काढले.

देश प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरे करीत असताना उत्तर प्रदेश आपला ७५ वा राज्य स्थापना दिवस साजरा करीत आहे तसेच ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत होण्याला देखील ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला उत्कृष्ट राज्यघटना लाभली. विविध कारणांमुळे इतर देशांचे विभाजन झाले तरीही भारत मात्र एकसंध आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे लोकांचा इतर राज्यांप्रती व तेथील सांस्कृतिक मूल्यांप्रती आदर वाढत आहे. संबंधित राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केंद्र शासित प्रदेशांचे तारपा नृत्य, उत्तर प्रदेशचे राज्यगीत, चारकुला नृत्य, भक्तीगीत व कव्वाली सादर केले. तेजल चौधरी या विद्यार्थिनीने कथक व ठुमरी सादर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन केल्याबद्दल राज्यपालांनी ऋषभ उपाध्याय विद्यार्थ्याला कौतुकाची थाप दिली तसेच रांगोळी कलाकार विलास राहाटे याला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन मानले.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे  प्रकुलगुरु अजय भामरे,  विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुनील पाटील, संस्कृत संयोजक निलेश सावे, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

सारे जहाँ से अच्छा.. प्रजासत्ताक..!

प्रजासत्ताक दिन विशेष लेख 

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जगातील कोणतीही आर्थिक ओळख नाही अशा स्थितीत असणारा आपला देश आता जगातली पाचवी अर्थसत्ता बनला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण 26 जानेवारीला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत या निमित्ताने देशाच्या विकासाची वाटचाल आणि त्याला असलेले संविधानाचे अधिष्ठान अधिक प्रभावीपणे कार्यरत असल्याचे जाणवते.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर राज्यघटना अर्थात संविधान लिहिण्याचे काम सुरू झाले. या संविधानास स्वीकार करून आपण संघराज्य हे देखील सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित केले तो दिवस अर्थात 26 जानेवारी 1950 होय. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे नेमके प्रयोजन देखील हेच आहे. आपण स्वीकार केलेल्या संविधानाच्या स्मरणाचा हा दिवस.

संविधान हा प्रत्येक भारतीय व्यक्तीचे हक्क, कर्तव्य यांचा अमूल्य असा  दस्तऐवज आहे आणि याद्वारेच लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची प्रतिष्ठापना झालेली आहे.

आपले संविधान डोळ्यासमोर येते ते भारतीय लोकांच्या आकांक्षा आणि स्वप्ने यांना आधार देणारे अधिष्ठान म्हणून याचे असलेले महत्त्व अधोरेखित होते.

आपल्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा उभारण्यात आला होता आणि यात अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे. या सर्व स्वातंत्र्यसैनिक हुतात्म्यांसह या स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचे स्मरण करण्याचा हा दिवस त्यानंतर आधुनिक भारताच्या उभारणीत सीमेवर युद्ध लढून देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेला जवानांचेही स्मरण करण्याचा हा दिवस आहे.

संविधानात प्रतिष्ठापित मूल्ये आणि तत्वे यांचे पालन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ती मान्य करून प्रगत आणि समृद्ध भारताची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध होण्याचा हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे.

गेल्या 76 वर्षात सर्व क्षेत्रात आपला देश अग्रेसर राहिलेला आहे. मंगळ आणि चंद्रावरच्या मोहिमेत यश मिळवताना दुसरीकडे अन्न धान्य उत्पादनात आलेली आत्मनिर्भरता औद्योगिक क्रांतीतून साधलेली प्रगती हे सारं आपण या दिवशी आठवलं पाहिजे.

जागतिक क्षेत्रात  गुंतवणूकदार उत्तम संधीचा देश म्हणून आपल्याकडे बघतात त्यामुळे आपल्या देशावर 150 वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून पहिल्या पाच आर्थिक सत्तांमध्ये आपण प्रवेश केला आहे.

दळणवळण क्रांतीत आपण 5 G चा टप्पा ओलांडून 6 G तंत्राच्या उंबरठ्यावर आहोत आणि सोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मध्येही आपण वाटचाल सुरू केली आहे. आगामी काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आहे याच जाणिवेतून आपण पावलं उचलायला हवी. चांद्रयान प्रक्षेपण बघण्यासाठी बैलगाडीतून जाणारा हा आपला भारत देश आजही जमिनीवर आहे आणि अवकाशालाही गवसणी घालतोय  म्हणून आपला हा देश खऱ्या अर्थाने सारे जहाँ से अच्छा… ठरतो.

जयहिंद.

प्रशांत विजया अनंत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, बीड

जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प गतीने पूर्ण करावेत – मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक

१०० दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न

ठाणे,दि.24 (जिमाका):- आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम  झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, आणि जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सौनिक यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज राज्याच्या मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनिषा आवळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी झो.पु.प्रा. ठाणे पराग सोमण, सिडको 1 चे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, आदिवासी विकास ठाणे अपर आयुक्त दीपक कुमार मीना, सिडको 2 चे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले, कल्याण स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त संजय यनपुरे, मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांड्ये, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, डीसीएफ शहापूर दीपेश मल्होत्रा, कांदळवन डीसीएफ शैलेशकुमार जाधव, वनसंरक्षक अनिता पाटील, ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे प्रवर्ग डाकघर अधिकारी समीर महाजन,अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे हे उपस्थित होते.

या बैठकीत मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सौनिक यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी 100 दिवसांमध्ये 7 कलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, माहितीचा अधिकारी 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, CPGRAM प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदी विषयांचा आढावा घेतला.

मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव श्रीमती सौनिक पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याची गुड गव्हर्नन्ससाठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प हे वेळेत व अधिक गतीने पूर्ण होतील, असे पाहावे. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्येक प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.

बैठकीच्या सुरुवातीला कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक यांचे स्वागत केले.

तसेच श्री.शिनगारे यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी 100 दिवसांमध्ये 7 कलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, माहितीचा अधिकारी 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, CPGRAM प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदी विषयांची संगणकीय सादरीकरणाद्वारे मुख्य सचिव तथा पालक सचिव महोदयांना माहिती दिली.

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...