सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 420

नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा, दि. 23 :  जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सर्व सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा,  टाकाऊ साहित्य वेळोवेळी निर्लेखित करा, नेमून दिलेल्या वेळेत वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजेत. रुग्णांना बाहेरिल वैद्यकीय सेवा घेण्यासाठी अनावश्यक संदर्भ टाळा, माता व नवजात शिशुंच्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.   बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक व जयंत शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) निलेश घुगे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत सर्व विभागांसाठी विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी नेमले असल्याचे सांगून विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, येत्या काळात विविध शासकीय कार्यालये, ठिकाणे यांना अचानक भेटी देण्यात येणार आहेत. कोणत्याही स्थितीत गावे, रस्ते स्वच्छ व सुशोभितच दिसली पाहिजेत.  प्लास्टीक कचरा पसरविणाऱ्यांच्या बाबतीत प्लास्टीक बंदी नियमांतर्गत कठोर कारवाई करा.  रस्त्यांवर, रिकाम्या जागांवर प्लास्टीक, घाण, कचरा आढळल्यास सर्वांनीच त्याची छायाचित्रे काढून प्रशासनाच्या निदर्शनास आणावीत.  रस्ते प्राधिकरणाने महामार्गावरील दोन्ही बाजूला दिसणारा कचरा त्वरीत हटवावा.

नागरीकांना वेळेत व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी  व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी कोणत्याही परिस्थीतीत दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही.  प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दीष्ट पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.  मंजूर घरकुले लवकर पूर्ण होण्यासाठी कर्जपूरवठा विना अडथळा होईल, यासाठी बँकाना आवश्यक ते निर्देश द्यावेत.  31 जानेवारीपर्यंत जीपीडीपी अपलोड होणे आवश्यक आहे. अधिकारी लोकांच्या भेटीसाठी वेळेत उपलब्ध असले पाहिजेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

सर्व प्रशासकीय विभागांनी आपआपल्या विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या  मालमत्तेची माहिती घेऊन त्यावर आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री  करुन घ्यावी.  कार्यालयात व परिसरात मोडके तोडके फर्निचर असल्यास निर्लेखित करा.  कार्यालयाचे वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटी नीटनेटकी ठेवा,  पडीक डोंगर हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करा.  पोषण आहार उत्तम दर्जाचा असावा असे सांगून रस्त्यावर विकलांग स्थितीत पडलेले निराश्रित, निराधार यांना योग्य ठिकाणी संदर्भीत करा.  असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी  जिल्हा परिषदचे उपमुख्य  कार्यकारी अधिकारी  (प्रशासन) निलेश घुगे यांनी जिल्हा परिषद विभागामार्फत येत्या शंभर दिवसात प्राधानाने करावयाच्या कामाबाबत सादरीकरण केले.
या बैठकीत विविध विभागांकडील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांचा आढावाही विभागीय आयुक्त् डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला.   यामध्ये सैनिकी स्कूल सातारा नुतनीकरण प्रकल्प, सातारा येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 500 खाटांचे रुग्णालय व अनुषंगिक बांधकाम, श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा, इको टुरीझम आराखडा, सह्याद्री व्याघ्र वनक्षेत्रातील पर्यटन आराखडा, कोयना हेळवाक वनझोन अंतर्गत् कोयना नदी जलपर्यटन विकास आराखडा, शिवसागर जलाशयावरील तापोळा केबल पुल, कोयना जलाशयावर मुनावळे येथील जलपर्यटन, गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजना, जिल्हा विकास आराखडा आदी सर्वांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यंत्रणांनी सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माणसाची समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढा, सर्वसामान्य माणसाचे जीवन सूकर करण्यासाठी संवेदनशिलतेने काम करा, सर्व जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपण सामान्य माणसासाठी काम करत आहोत याची जाणीव ठेवून समन्वयाने काम करावे, आपापसात चांगला समन्वय असल्यास जनतेचे प्रश्न सुलभतेने सुटतील, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.   बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे,  उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. चंद्रकांत पुलकुडंवार म्हणाले, सातारा जिल्हा हा देशात सर्वाधिक सैनिक देणारा जिल्हा म्हणून गौरविला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील सैनिक व त्यांच्या वारसांशी संबंधित असणारी प्रकरणे तातडीने निपटारा करा.  कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या सैनिक व त्यांचे वारस यांच्याशी सौजन्याने वागा, संवेदनशिलतेने त्यांच्या समस्या हाताळा.   महसूल कार्यालयाची वेबसाईट अद्ययावत करा, ही वेबसाईट सर्वसामान्य माणसाला हाताळण्यासाठी सुलभ असावी.  माहिती अधिकारात मागितली जाणारी सर्व माहिती व 1 ते 17 मुद्यांची प्रकाशीत करण्यात येणारी माहिती ही सविस्तर व सखोल असली पाहीजे, अशी माहिती वेबसाईटवरही उपलब्ध करुन द्या.   जिल्ह्याचे संकेतस्थळ जलद प्रतिसादात्मक असावे,  अद्ययावत माहितीने परीपूर्ण असावे तसेच सायबरदृष्ट्या ते सुरक्षित राहीलही याची दक्षता घ्या. प्रशासनाशी संबंधित दैनंदिन माहिती सुलभरित्या समाजमाध्यमातून उपलब्ध असावी.

शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता असावी.  कार्यालयातील अस्ताव्यस्त अभिलेखे, साहित्य यांचे वर्गीकरण, निर्लेखन, याबाबतची कार्यवाही करुन कार्यालयीन परिसर स्वच्छ व प्रसन्न राहील, याकडे लक्ष द्या.  अभ्यांगतांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, बैठक व्यवस्था असावी.  क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी नियमितपणे क्षेत्रीय भेटींच्या डायरीत नोंदी घ्याव्यात.   आपले सरकार, पीजी पोर्टल, लोकशाही दिन, सीमओ पोर्टल अशा विविध व्यासपीठावर मांडण्यात आलेल्या जनतेच्या तक्रारी, गा-हाणी याशी संबंधित अर्जाचा निपटारा तातडीने करावा.  प्रलंबित कामांची संख्या शुन्यावर आणावी,  अधिकारी नागरकिांशी कधी उपलब्ध असतील याबाबतची माहिती फलकावर नमुद करावी, अशा सुचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

नागरीकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर, तालुका अथवा जिल्हास्तरावर सोडवावेत.  कोणत्याही स्थितीत नागरिकांना प्रलंबित कामासाठी मंत्रालयात विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी दक्षता घ्या, असे सांगून ते म्हणाले, निवारा नसलेल्यांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) यासह सर्व आवास योजनांना गती देत आहे.  त्यामुळे या उपक्रमात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी काढून अडथळे निर्माण करु नयेत.  घरकुल उपक्रमांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करावेत.  त्यासाठी खाजगी वाटाघाटीद्वारे  प्रयत्न करा तसेच शासकीय जमिनी उपलब्ध असल्यास त्वरीत हस्तांतरीत करा.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले,  सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 जानेवारीपर्यंत निश्चित करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.  यावर सुप्रीम कोर्टाच्या सूचनानुसार विहीत  मुदतीत कार्यवाही करा.  भविष्यात कोणत्याही प्रकारची तक्रार निर्माण होऊ नये यासाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या मालकीच्या जमीनीबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना त्वरीत द्यावी.

गौण खनिजांच्या अनुषंगाने आढावा घेत असतांना विभागीय आयक्त् म्हणाले, कंत्राटदार गौण खनिजांची खाजगी विक्री करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.  कोणत्याही परिस्थितीत गौणखनिजांच्या अनुषंगाने चुकीच्या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पायाभूत प्रकल्पांमध्ये सरकारची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असते तसेच जनहिताच्या दृष्टीने ते महत्वाचे असतात, त्यामुळे असे प्रकल्प रेंगाळणार नाहीत याची दक्षता घ्या.  ज्या ठिकाणी अडवणूक होत असेल तेथे पोलीस बंदोबस्त घेऊन काम करा.  विविध सेवा केंद्रावर सर्व सामान्यांचे अर्ज आल्यानंतर ते विहीत मुदतीत निकाली काढा, लोकांची कोणत्याही प्रकारे अडवणूक व फसवणूक होणार नाहीत याची काळजी घ्या.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शंभर दिवसात सातारा जिल्ह्यात प्राधान्याने करावयाच्या कामांच्या माहितीचे सादरकरण केले.  वेबसाईटमध्ये सुलभता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयीन सोयी सूविधा, ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूलतेबाबत तपशील तयार करणे, विविध स्तरीवरील विविध् प्रकल्पाची भूसंपादन प्रकरणांबरोबर आदी सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच दाखले देणे, ई-आफीस, ई-दरबार यासारखे उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबिण्यात येणार आहेत, असे सांगून भूसंपादन दाखले नाहरकत प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वाई तालुक्यातील खानापूर गावातील पांडवनगरी भागात असलेल्या मेढंगी तसेच जोशी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळण्यास येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी स्थानिक चौकशी करुन जातीचे दाखले तयार केले. याचे वितरण विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याहस्ते 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी करण्यात आले.  या या समाजातील लोकांना जातीचे दाखले निर्गमित झाल्याने शिक्षण तसेच रोजगारामध्ये त्याचा उपयोग होणार आहे.  विविध योजनांचा लाभ घेण्यासही मदत मिळणार आहे.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते नेताजी डॉ. सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फोटोस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  (७.११ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३८) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २८ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २९ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ८ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जूलै ८  आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

****

 

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  (‘७.११ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३६’) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २८ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २९ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २५ सप्टेंबर २०२४  पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २५ सप्टेंबर २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक मार्च २५ आणि सप्टेंबर २५  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

*****

वंदना थोरात/विसंअ/

भारत रंग महोत्सवात तीन मराठी नाटके

नवी दिल्ली, दि. 23 : रंगमंचाच्या चाहत्यांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) च्यावतीने भारत रंग महोत्सवाचे आयोजन 28 जानेवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये मराठीतील तीन नाटके सादर होणार आहेत.

जगातील सर्वांत मोठा रंगमंच महोत्सव म्हणून ओळखला जाणारा भारत रंग महोत्सव (भारंगम) यंदा २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या २५ व्या आवृत्तीत भारतासह नेपाळ, श्रीलंका आणि देशातील १३ शहरांमध्ये हा रंगोत्सव आयोजित केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व एनएसडीचे माजी विद्यार्थी राजपाल यादव यांची “रंगदूत” (महोत्सव राजदूत) म्हणून निवड करण्यात आली आहे. २० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नऊ देशांतील २००हून अधिक अनोख्या सादरीकरणांचा समावेश असेल.

८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘गोष्ट संयुक्त मानपानाची’  हे नाटक अभिराम भडकमकर लिखित व हृषीकेश जोशी दिग्दर्शित आहे. नाट्य संपदा कलामंच आणि शौर्य प्रोडक्शन्स, मुंबई या समूहांद्वारे या नाटकाची मांडणी केली जाईल.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे “कलगीतुरा”  हे नाटक दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित आहे. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई या समूहाने याची निर्मिती केली आहे.

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘38 कृष्णा व्हिला’  हे नाटक श्वेता पेंडसे लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित आहे. १२० मिनिटांचे हे नाटक रॉयल थिएटर, मुंबई या समूहाद्वारे सादर होईल. तीनही नाटके मंडी हाउस जवळ असणाऱ्या श्रीराम सेंटर सभागृहात सादर केली जाणार आहेत.

0000

अंजु निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.14 /दि. 23.01.2025

शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधा सुधारण्यावर भर – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 23 :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये  सुधारणा  करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मुंबईतील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह वरळी 116, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 116,  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 118 या वसतिगृहांना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहाय्यक आयुक्त मुंबई शहर, उज्ज्वला सपकाळे, सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर प्रसाद खैरनार उपस्थित होते.

वरळी  येथील  शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचा पुर्नविकास करताना विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 200 ते 250 चौ.फूट इतकी जागा प्रत्येक खोलीत उपलब्ध करुन देण्यात येईल, जेणेकरुन विद्यार्थी पुरेशा जागेत राहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या कॉट, गाद्या व कपाटे, अद्ययावत कॉम्प्युटर, स्पर्धा परिक्षेची अद्ययावत पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्‍या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी  सुद्धा सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, असेही श्री. शिरसाट यांनी सांगितले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्री. शिरसाट यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वसतिगृहातील  विद्यार्थ्यांशी संवाद साधून श्री.शिरसाट यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना उज्वल भविष्यासाठी  शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या वसतिगृहातील अचानक भेटीमुळे विद्यार्थ्यांनी  समाधान व्यक्त केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 23 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, दूरदृश्यप्रणालीव्दारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर,अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, कोकण विभागाचे उपसंचालक हणमंत हेडे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने अनेक पर्यटन प्रकल्प सुरू आहेत. पर्यटनाच्या उपलब्ध असलेल्या विविध योजना व सवलती याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करून सर्व पर्यटन योजनांना गती देण्यात येईल. जिल्ह्यात होणाऱ्या ताज प्रकल्पासाठी पर्यावरणासह आवश्यक त्या परवानग्या घेऊन स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करा. चांदा ते बांदा प्रकल्पातील मंजूर कामांसाठी वर्ग करण्यात आलेल्या निधीची कामे गतीने करा. सिंधुरत्न योजना, जिल्ह्यात सुरू होणारी सबमरीन, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील वॉटर स्पोर्टस या कामांना विभागाने गती द्यावी, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी केल्या.

यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

नवी दिल्ली, दि 23 : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळ्यात  महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून  जबाबदारी सांभाळणार आहेत.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक   बेल्टची  सुवर्णपदक विजेती आहे.

0000

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील ‘जैविक इंडियन’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.23 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटात सदस्य असलेल्या भामदेवी ता. कारंजा जि. वाशिम येथे कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या नंदा संतोष मुंदे यांना  सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन आणि लक्षवेधी नफा मिळवल्याबद्दल नुकताच इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर या  (ICCOA) राष्ट्रीय स्तरावरील जैविक इंडियन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये क्रांतिकारक कार्य केल्यामुळे आणि कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये 50 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नंदाताई मुंदे करत असलेली शेती ही सेंद्रिय शेती प्रकल्प  प्रमाणीकरण प्राप्त आहे.

2022 ते 2024-25 या वर्षामध्ये ताईंनी सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांचे दोन एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती केली. एकूण 26 हजार रुपयांच्या भांडवलात ताईंनी ही सेंद्रिय शेती केली त्यातून 22 क्विंटल सोयाबीन, 8 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. या उत्पादनातून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ताईंनी एकूण 1,45,624 रुपये नफा मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि मुख्य संचालन अधिकारी यांनी अभिनंदन केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 23 : राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.  बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,  वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

नीलेश तायडे/विसंअ/

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

दावोस, दि. 23 : – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांच्या निधनाने सामूहिक वनहक्क, पर्यावरण तसेच ग्रामस्वराज क्षेत्रात हिरीरीने काम करणारे एक महनीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. या क्षेत्रात त्यांची पोकळी कायम जाणवेल, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा या राज्यातील पहिल्या ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या कल्पनेला मूर्तरूप देण्याचे काम त्यांनी केले. मोहन हिराबाई हिरालाल यांनी गावकऱ्यांमध्ये जंगलावरील यांच्या कायदेशीर हक्काबद्दल जागृती निर्माण केली. त्यामुळे वन व्यवस्थापन लोकप्रिय करण्यात मदत झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे मेंढा (लेखा) व मर्दा या गावांत त्यांनी मोठी चळवळ उभी केली. गडचिरोली जिल्ह्यात वृक्षमित्र या संस्थेची स्थापना करून वन व पर्यावरण ग्रामस्वराज्य संकल्पनेसाठी त्यांनी निस्वार्थपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जमनालाल बजाज फाऊंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला. महाराष्ट्र ग्रामराज्य अधिनियमाअंतर्गत लेखा-मेंढा हे ग्रामदान गाव म्हणून घोषित झाले. हे देशातील पहिले गाव ठरले. स्वता:च्या नावासामोर आईचे नाव लावून त्यांनी फार पूर्वीच मातृशक्तीचा सन्मान केला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

0
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8...

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी कटिबद्ध : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि.21जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व प्रयोगशीलता...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना

0
गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व...

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...