शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 430

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या १८ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या  (‘ ७.१४ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०४३’) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २१ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ जानेवारी, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ८ जानेवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी, २०४३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१४ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ८ आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

****

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या (‘७.११ % महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३८’) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २१ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ८ जानेवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी, २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ८ आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

****

वंदना थोरात/विसंअ/

शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १६ :- यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार अभिमन्यू पवार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की, शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची  तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर  त्यावर थेट अपील उच्च न्यायालयात केले जाते. थेट अपील होण्यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता यावे यासाठी एक स्टेप मधी असणे आवश्यक असून त्यानुसार नियमात सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १६ :-  वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांना प्रती कुटुंब दीड हजार स्क्वे. फूट जमीन विनामूल्य देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या कब्जा भोग्यातील जमिनीसंदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, मौजे वेंगुर्ला येथील शासकीय जमिनीमध्ये १९०५ पूर्वीपासून गवळ्यांची वसाहत आहे. गवळीवाडा येथील रहिवाशी ब्रिटीशकालापासून या जागेचा वापर करीत आहेत.  जमिनीवर अतिक्रमण केले नसलेबाबत व ब्रिटीशांनी सेवेकरिता वास्तव्यासाठी विनामूल्य जमिनी दिल्या असल्याने, वहिवटीखाली असणारी घरे व इतर जमिनी विनामूल्य मिळण्याची मागणी संबधित रहिवाशांनी केली आहे. त्यानुसार गवळीवाडा येथील रहिवाशांना  प्रती कुटुंब दीड हजार स्क्वेअर फुट जमीन विनामूल्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात  सादर करा. ज्या रहिवाशांच्या ताब्यात  दीड हजार स्क्वे. फुट पेक्षा अधिक जमीन आहे याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी 1980 च्या रेडीरेकनर दरानुसार संबंधितांकडून रक्कम घेण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

नवकल्पना आणि ऊर्जा स्टार्टअप्ससाठी गरजेचे; मान्यवरांचे चर्चासत्रात मार्गदर्शन

मुंबई, दि. 16 :- नवकल्पना आणि ऊर्जा हे स्टार्टअप्ससाठी अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांना होणारा फायदा ही महत्वाची बाब असल्याचे मत राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवसमध्ये ‘स्टार्टअप्स कसे सुरू करावे’ याविषयी मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, स्कॉईडव्हेंचर्सचे संस्थापक ईसप्रीत सिंग गांधी यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या चर्चासत्रात व्यक्त केले.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्लू स्मार्टचे सह संस्थापक पूनित गोयल यांनी याचे सूत्रसंचालन केले.

100 पैकी 99 लोकांनी एआय (AI) सोबत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. कोणताही नवीन स्टार्टअप्स सुरु करताना त्यातून बऱ्यापैकी नफा व्हायला हवा हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. बहुतेक माणसे गुंतवणूक करताना सर्व विचार करूनच योग्य तो निर्णय घेतात. आपल्या देशातील शासकीय यंत्रणा खूप चांगली आहे. गुंतवणुकदारांनी आसपासच्या वातावरणाचा व्यवस्थित अंदाज घ्यावा आणि मगच स्टार्टअप्सला सुरवात करावी. ऑनलाईन शिक्षण सुद्धा सहज उपलब्ध करून दिले जात असून व्यवस्थित प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळतेच हा मंत्र लक्षात ठेवावा.

सुरवातीच्या काळात स्टार्टअप्स कसे असेल हे संपूर्णपणे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही व्यवहार करताना तुम्ही आत्मविश्वास आणि योग्य नियोजनासोबत केलेले काम महत्वाचे ठरते असे मत या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 16 : ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन ‘बीकेसी’तील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आणिबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणिबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन श्री.फडणवीस यावेळी केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

चंद्रपूर दि. १६ : लोकसंख्या वाढत असल्यामुळे गरजासुध्दा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडले असून आपले भविष्य वाचवायचे असले तर पर्यावरण वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी आज आपण पाऊले उचलली तर येणाऱ्या पिढीला आपण चांगले भविष्य देऊ शकतो, असे विचार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे आयोजित तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ चे उद्घाटन करतांना राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, एस.एन.डी.टी. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्रसिध्द जलपुरुष राजेंद्र सिंह, हैद्राबाद येथील युएस काँसलेट जनरल सलील कादर, सीटी युनिर्व्हसिटीचे प्रोफेसर नील फिलीप, आदी उपस्थित होते.

ग्लोबल वॉर्मिंग आज सर्वात मोठी जागतिक समस्या बनली आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, जास्त लोकसंख्येमुळे गरजासुध्दा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत कमी होत आहे. जल, जंगल, जमीन वाचविले तरच पर्यावरण वाचणार आहे. एस.एन.डी.टी विद्यापीठ, सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्युयॉर्क आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने पर्यावरण संरक्षण या अतिशय महत्वाच्या विषयावर चंद्रपूर येथे तीन दिवसीय परिषदेचे आायोजन करण्यात आले आहे. क्लायमेट चेंज या मानवासमोर असलेल्या सर्वांत गंभीर विषयावर या परिषदेतून नक्कीच उपाययोजना सुचविण्यात येतील.

बदललेले हवामान आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा परिषदांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासंदर्भातील चर्चा, त्यावरची अंमलबजावणी होण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील पिढीसाठीसुध्दा चांगल्या उपाययोजना करता येतील. ही एक चांगली सुरवात असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये पर्यावरण या विषयाचा  मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे.

एस.एन.डी.टी. विद्यापीठाबाबत बोलतांना राज्यपाल म्हणाले,  विद्यापीठाने चंद्रपूर सारख्या दुर्गम जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करून येथील महिलांना कौशल्य विकासाचे दालन उघडे करून दिले आहे. जवळपास ५० एकर क्षेत्रात उभे राहणारे हे विद्यापीठ महिलांना ख-या अर्थाने सक्षम करण्याचे काम करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संरक्षण ही लोकचळवळ व्हावी : आमदार सुधीर मुनगंटीवार

आपण वनमंत्री असतांनाच ‘सी फॉर चंद्रपूरमध्येच ‘क्लायमेट चेंज’ या विषयावर परिषद घेण्याचे निश्चित केले होते. पर्यावरण संरक्षणाच्या या युध्दात राज्यपाल महोदय आज चंद्रपुरात आले, मी त्यांचा आभारी आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आयोजित ही तीन दिवसीय परिषद केवळ चर्चेसाठीच नाही तर, अंमलबजावणीची गती वाढविणे ही काळाची गरज आहे. मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडविले आहे. त्यामुळे या परिषदेतून लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी व्हावी. पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, खऱ्या अर्थाने ही लोक चळवळ व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.

जल, जमीन, जंगल हेच आपले दैवत : जलपुरुष राजेंद्र सिंह

‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ या विषयावर अतिशय चांगला उपक्रम आज चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. देशात जलसाक्षरता राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जल, जमीन, जंगल वाचले तरच आपली संस्कृतीही वाचणार आहे. त्यामुळे हेच आपले दैवत आहे. मंत्री असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवून राज्यातील १०८ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. नद्या वाचविणे आावश्यक आहे, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी राज्यपालांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स बुक प्रोसिडींग’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्राध्यापक, सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्युयॉर्कचे विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आदी उपस्थित होते.

००००

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खु. येथे आयोजित ‘कृषिक २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, आयआयटी खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉ. पियुश सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेयरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,  दरवर्षी आयोजित ‘कृषिक’ प्रदर्शनात बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करुन बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जाती, भाजीपाल्यामध्ये संशोधन करुन अधिकची भर पडत आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे एक नवीन आकर्षण आहे. या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देवून नवनवीन गोष्टी आत्मसात करतात, आपल्या शेतात त्याचा वापर करतात. त्यामुळे खऱ्याअर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त झालेली आहे.

जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतो, आता शेतकऱ्यासमोर दुष्काळ, पर्जन्यमानाची अनियमितता, घटते जमिनीचे क्षेत्र अशी विविध प्रकारची आव्हाने उभी असून त्यावर मात करण्याकरीता प्रयत्न करावेत. राज्यात कृषी विषयात विविध संशोधन होत असून यामधून नव्याने उदयास आलेली बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जातींची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्पादनात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी ऊसक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, उसाच्या नवनवीन वाणाची लागवड करावी. शेतमालाची उत्पादकता वाढविण्याकरीता राज्य व केंद्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. कृषी विभागाच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी, साखर कारखान्यातील शेतकी अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा पारदर्शकपद्धतीने लाभ देण्याकरीता तंत्रज्ञानाचा वापर करणार- कृषी मंत्री

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, शेती विषयात होणारे संशोधन, तंत्रज्ञान, नवीन प्रयोगाचा, तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहाेचविणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल. यादृष्टीने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विचार करुन ॲग्रीस्टॉक संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या विक्रीकरीता शहरी भागात तसेच आठवडी बाजारपेठांमध्ये जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करावा लागेल. लोककल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे लाभ देवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल.

बारामती कृषी विज्ञान केंद्राचा दर्जा व गुणवत्तेत सातत्य राहील यादृष्टीने उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडेल असे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करुन समाजाला दिशा देण्याचे केंद्राने काम केले आहे, त्यामुळे ही संस्था देशात क्रमांक एकची संस्था आहे. प्रयोगशाळा स्थापन करुन नवनवीन संशोधनाकरीता कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, याकामी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. कोकोटे यांनी केले.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शेतीत गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आगामी काळात बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरीता सकारात्मक विचार करण्यात येईल. ‘कृषिक’ प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकता आल्या, याचा दुष्काळी भागात निश्चित उपयोग होईल. यापुढे अशाच प्रकारचे प्रदर्शन प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात यावे, असेही श्री. मुंडे म्हणाल्या.

ज्येष्ठ खासदार श्री. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागृती होत असून त्यामुळे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन येत्या काळात होणार आहे. खत, पाणी, पीक, रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाचा अंदाज आणि हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन याकरीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज आहे. याकामी केंद्र सरकार व राज्य शासन मिळून पूर्ण ताकतीने काम करीत आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्रीमती सुळे म्हणाल्या, आगामी काळाची गरज लक्षात घेता बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्याच्यादृष्टीने प्रयोगशील उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यात केंद्र सरकार व राज्य शासनासोबत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठान काम करीत आहे, असेही श्रीमती सुळे म्हणाल्या.

यावेळी श्री. प्रतापराव पवार यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच श्री. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात कृषिक प्रदर्शनाची माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन आणि बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
0000

‘आर्टी’ मध्ये ८५ टक्के सवलतीत विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

मुंबई दि. १६ : महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.

देशातील अनेक महापुरुषांनी पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी बार्टीचे महासंचालक श्री. वारे आणि निबंधक इंदिरा आस्वार यांच्या संकल्पनेतून आर्टी  संस्थेने महापुरुषांच्या पुस्तकांवर ८५ टक्के सवलत देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

भारताचे संविधान, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, अण्णा भाऊ साठे यांचे खंड आणि त्यांच्यावर लिहिलेली मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सामाजिक, राजकीय, खासगी, शासकीय आणि शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येकांनी संग्रहित ठेवावे, असे हे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत.

पुस्तकाची मूळ किंमत व कंसात सवलतीत दर पुढील प्रमाणे

भारताचे संविधान ४५० रुपये (६३), शूद्र पूर्वी कोण होते? ३०० (४५), बुद्ध आणि त्यांचा धम्म ४०० (६०), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र चांगदेव खैरमोडे सेट ४ हजार (६००), समग्र आंबेडकर चरित्र बो. सी. कांबळे सेट २५०० (३७५), फकिरा १६० (२४), फकिरा इंग्रजी अनुवाद २५०० (३७५), अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ४८० (७२), राजर्षी शाहू रयतेच्या राज्याचे चित्रमय चरित्र १५०० (२२५), साहित्यसम्राट १५० (२३), स्वराज्य ते स्वातंत्र्य आणि समता १२० (१८), कर्तृत्व आणि व्यक्ति महत्त्व. ११०० (१६५). एकूण किंमत ११ हजार ५२६ रुपये किमतीची पुस्तके सवलतीच्या दरात १७३० रुपयात उपलब्ध होणार आहेत.

नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात ८० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली असल्याची माहिती श्री. वारे यांनी दिली आहे. आर्टी कार्यालयाचा पत्ता  बी- 201/ 202, 2 रा मजला,  ‘बी’ विंग, अर्जून सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (ईस्ट) येथे पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गोवंडी स्टेशनपासून पूर्वेकडे 5 मिनिटांच्या अंतरावर आर्टी ही संस्था आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

‘आविष्कार संशोधन स्पर्धे’तील विजेत्यांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे १२ ते १५ जानेवारी, २०२५ दरम्यान पार पडलेल्या १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करून १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजेत्यांचे आणि मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. या संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी होण्यासही मदत होईल.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, डॉ. सुनिल पाटील, डॉ. मनीष देशमुख,डॉ. वैशाली निरमळकर, प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

राजभवन येथे आयोजित या संशोधन महोत्सवामध्ये  राज्यातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठतून या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी,  मुलभूत शास्त्रे,  शेती व पशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली आहेत.

या स्पर्धेत प्रथम बंडाबे, झनेटा रेमंड, राधिका भार्गव, श्रेयांस कांबळे, चैताली बने, कृष्णकांत लसुने, फरहीन शेख, विवेक शुक्ला, अंकित गोहिल, श्रावणी वाडेकर, तनिशा कौर, प्रतिक मेहेर, आणि वैष्णवी परब यांनी सुवर्ण पदक पटकाविले. रौप्य पदक अथर्व लखाने, चैत्रा देशपांडे, मंगलम लुनकर, ऋतुजा शिंदे, विरा जैन, आभाश शर्मा आणि मानसी झा यांना प्रदान करण्यात आले. समृद्धी मोटे, तेजश्री जायभाये आणि श्रेया गर्गे यांना कांस्य पदक मिळाले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...