शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 429

महिला बचत गट उत्पादीत माल विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार – मंत्री जयकुमार गोरे

सातारा, दि. १७: खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तूंची निर्मिती करत असलेल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील. या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हा परिषद मैदानावर ‘मिनी सरस २०२५ मानिनी जत्रे’चे उद्घाटन व ‘महा आवास अभियान २०२४-२५’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद आदी उपस्थित होते.

‘उमेद’ अंतर्गत महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम ठरविला आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 50 लाख महिलांना लखपती दिदी करणार आहे. महिला बचत गट आता खाद्यपदार्थांबरोबर इतर चांगल्या वस्तूंची निर्मिती करीत आहे, त्यांच्या वस्तूंसाठी विविध शहरांमधील मॉलमध्ये एक स्टॉल उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सातारा जिल्ह्यात 20 हजार महिला बचत गट आहेत.  उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवी चळवळ उभी राहत आहे.

बचत गटाच्या महिला घेतलेले कर्ज नियमित फेडत असतात, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाडून जिल्ह्यातील या महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. नायगाव येथे 125 कोटी रुपये खर्च करुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात येत आहे. येथे उमेदचे प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून मॉल उभारण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले की, बचत गटांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळावी, म्हणून केंद्र व राज्य शासन काम करीत आहे. छोट्या छोट्या व्यवसायांना वित्त पुरवठा करुन केंद्र व राज्य शासन या व्यवसायिकांना व्यवसायासाठी बळ देत आहे. बचत गट चांगल्या उत्पादनांची निर्मिती करीत आहेत. या उत्पादकांनी आपला संपर्क क्रमांक सर्वांना द्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादीत मालाची विक्री व्हावी यासाठी महामार्गावर मॉलची निर्मिती करावी. यातून त्यांचा माल चांगल्या दरासह मोठ्या प्रमाणात विकला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रामच्या प्रारंभी मंत्री श्री. गोरे यांनी महिला बचत गटांच्या प्रत्येक स्टॉला भेटी देवून उत्पादीत मालाची माहिती घेतली.

यावेळी लखपती दिदींचा सत्कार, 2024-2025 अंतर्गत आवास योजेंतर्गत पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात घराचा ताबा व उमेद अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

आदिवासी तरुण योहान गावित यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान

नंदुरबार, दि. १७ जानेवारी २०२५ (जिमाका) : नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या शेतकरी योहान अरविंद गावित यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत भारताच्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२५) त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

गावातून दिल्लीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शासनाकडून ६०% अनुदान मिळवले. या योजनेतून त्यांना १८ पिंजरे उभारण्यासाठी सुमारे ३२.४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. योहान गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालन सुरू केले.

मत्स्य व्यवसायातील आधुनिकता आणि सामाजिक दृष्टीकोन

योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवले. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवले. याशिवाय, मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यवसायिक गरजा भागवल्या. आज त्यांच्या या कामामुळे भवरे गाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र शासन स्तरावरही झाली. महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचे यश अधोरेखित केले. यानुसार, केंद्र शासनाने त्यांची निवड करून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित केले आहे. नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीही या  प्रकल्पाला भेट देवून योहान गावित यांचे कौतुक केले होते.

आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण

भारतीय पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमॅन सुनिल गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण योहान गावित यांना सुपुर्द केले. हे आमंत्रण स्वीकारताना योहान गावित आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. “हे आमच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो, हे आम्ही सिद्ध केले,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

तरुणांसाठी प्रेरणा

योहान गावित यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत जलसाठा असलेल्या इतर गावांतील तरुणही मत्स्यपालनाकडे वळत आहेत. भवरे गावातून सुरू झालेली ही प्रेरणा आता जिल्हा, राज्याची सिमा ओलांडून देशातील इतर भागांपर्यंत पोहोचली आहे.

अधुनिक शेतीचा आदर्श नमुना

योहान गावित यांच्या कामगिरीमुळे शेतीसोबत जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करता येतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यांच्या कार्यामुळे भवरे गावाचे नाव देशपातळीवर पोहोचले असून त्यांची ही कामगिरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सन्मान समारंभात नवा इतिहास घडवणाऱ्या योहान गावित यांचे यश ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

००००

विविध योजनांचे सुसूत्रीकरण आणि साधनसंपत्तीच्या स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी समिती

मुंबई, दि. १६ : विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण करणे तसेच साधनसंपत्तीच्या स्रोतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी राज्यमंत्री (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून याचा शासन निर्णय वित्त विभागामार्फत दि.१६ जानेवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी दिनांक २८ जून२०२४ रोजी सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात खर्चाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे घोषित केले होते. तसेचमुख्य सचिव यांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मर्यादीत निधीचा चांगल्या प्रकारे वापर आणि जलद आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी योजनांचे एकत्रिकरण करणेसंस्थांचे एकत्रिकरण करणेअनुत्पादक अनुदान योजना कमी करणे तसेच उत्पादक भांडवली खर्च वाढविणे यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना  प्रधानमंत्री महोदयांनी सर्व राज्यांना दिल्या आहेत. या बाबींच्या अनुषंगाने राज्यातील सुरु असलेल्या योजनांचे मूल्यमापन करुन सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री (वित्त) असून समिती सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीमित्र (महाराष्ट्र इन्स्टीट्यूटशन फॉर ट्रान्स्फॉरमेशन)अपर मुख्य सचिव (वित्त)अपर मुख्य सचिव (नियोजन)प्रधान सचिव (व्यय) हे निमंत्रक असूनसचिव (वित्तीय सुधारणा)संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव हे सदस्य आहेत.

या समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे आहे –  विविध प्रशासकीय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य योजनाचे / जिल्हा योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहचावेत यासाठी अशा सर्व योजनांचे मुल्यमापन करुन त्याचे सुसूत्रीकरण करण्यासाठी संबंधित विभागासमवेत आढावा घेवून शासनास शिफारस करणेविविध योजनांच्या सुसूत्रीकरणासंदर्भात मित्र संस्थेने तयार केलेले प्रस्ताव देखील या समितीस सादर करण्यात यावेतसमितीने संबंधित विभागासमवेत अशा प्रस्तावांबाबत आढावा घेवून शासनास शिफारस करणेकालवाह्य झालेल्या योजनाच्या बाबतीत तसेचज्या ठिकाणी योजनांच्या लाभाची द्विरुक्ती होत असेलयोजनांच्या उदिष्टाच्या अनुषंगाने द्विरुक्ती होत असेलअशा योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी शासनास शिफारस करणेमर्यादीत निधींचा चांगल्या प्रकारे वापर आणि जलद आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी योजनांचे एकत्रिकरण करणेसंस्थांचे एकत्रिकरण करण्यासाठी शासनास शिफारस करणेमहाराष्ट्र शासनाच्या साधनसंपत्तीच्या कर उत्पन्न व करेतर उत्पन्न यांचा स्रोताचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम या समितीद्वारे केले जाईल, असे शासन निर्णयात नमूद आहे.

https://mahasamvad.in/wp-content/uploads/2025/01/gr.pdf

 

0000

वंदना थोरात/विसंअ/

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

मुंबई, दि. 16 : कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी ही  गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे आहेत, असे मत नवीन कल्पना, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक या विषयी द्वितीय चर्चा सत्रात जिओ जेन नेक्स्टचे प्रमुख अमेय माशेलकर, जीतो इनक्युबेशनचे अध्यक्ष जिनेंद्र भंडारी, व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्न, सह-संस्थापक, अपूर्व रंजन शर्मा, सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष अवेंडसचे राणू वोहरा, सह संस्थापक  ई व्हि कॅम्प आशिष वाढवणी यांनी व्यक्त केले.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांनी केले.

या चर्चासत्रात नवीन कल्पना, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक, शैक्षणिक संस्थांची भूमिका, सर्जनशीलता इत्यादींविषयी सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात स्टार्टअप्सना पूरक असे अनेक घटक आहेत. स्टार्टअप्सची सुरुवात करताना तुम्ही निर्भय असणे आवश्यक आहे

उद्योजकतेतील धोरणात्मक परिणाम उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षेवर अवलंबून असते असे मत आशिष यांनी व्यक्त केले. स्टार्टअप्स शैक्षणिक संस्थांची भूमिका देखील तितकीच महत्त्वपूर्ण असते. आज हे तंत्रज्ञानाचे जग असून नाविन्यता ही केंद्रस्थानी आहे.

तृतीय चर्चासत्रात स्टार्टअप्समध्ये महिलांचे सक्षमीकरण’ या चर्चासत्रात ओपन सिक्रेटच्या संस्थापिका अहाना गौतम, सुपर बॉटमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उत्तगी, उद्योजिका श्रेया घोडावत, रिचीवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विभा कागाजी यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. सूत्रसंचालन सर्जन सलोनी पटवर्धन यांनी केले.

आहाना गौतम या स्वतःचा अनुभव सांगताना म्हणाल्या की, ‘लहानपणापासूनच मी माझ्या आईला माझ्यासाठी काम करताना पाहून तिच्यातून प्रेरणा घेतली. त्यामुळेच मला देखील उद्योग क्षेत्रात येण्याची ईच्छा झाली. महिलांना काम करताना नेहमी पुरुषांची साथ असते त्यामुळेच महिला देखील पुढे जाऊ शकतात’ असे मत व्यक्त केले. वैयक्तिक आलेले अनुभव आणि समाजातील अनुभव यातून महिला उद्योजक देखील स्टार्टअप्समध्ये येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महिला ही जबाबदारीने काम करत आहेत. कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करता येऊ शकते  हे महिलांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटून सिद्ध केले आहे, असे मत महिला उद्योजकांनी यावेळी व्यक्त केले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका

मुंबई, दि. १६ : प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल (Zero pendancy and daly caposal) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे  विभागातील प्रलंबित फायली निकाली निघण्याचा धडाका सुरू आहे. या उपक्रमात ४ हजार ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

विभागात प्रलंबित फाईल  राहू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन ३१ जानेवारीपर्यंत उच्च शिक्षण विभागात झिरो पेंडन्सी उपक्रम राबवावा, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी १ फेब्रुवारीपासून अचानक शिक्षण सहसंचालक कार्यालयांना भेट देऊन कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा निर्णयही घेतला आहे. तसेच विद्यापीठ, महाविद्यालयांना भेट देण्याबरोबरच प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांच्याशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

प्रलंबित प्रकरणाबाबत संचालनालयाकडे प्राप्त तपशीलाच्या आधारे संचालनालय व अधिनस्त कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत संचालनालय स्तरावर विचारविनिमय करुन कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

यामध्ये सर्वप्रथम प्रलंबित प्रकरणे,  टपालाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. अनुकंपा, वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे, अर्जित रजा रोखीकरण प्रकरणे, वेतननिश्चिती प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे यांचा यामध्ये प्रकर्षाने समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणांचे वर्गीकरण करुन आवश्यकतेनुसार शासकीय आस्थापनांवरील किंवा विद्यापीठांमधील काही कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात उसनवारी तत्वाने उपलब्ध करुन घेऊन दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्रत्येक दिवशी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील  कार्यालये सुरु ठेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

यामध्ये तंत्र शिक्षण संचालनालयातील १ हजार ४९० पैकी १हजार ३५३ प्रकरणांचा आणि उच्च शिक्षण संचालनालयातील ४ हजार १८३ पैकी ३ हजार ११७ प्रकरणांचा समावेश आहे. अशाप्रकारे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एकूण ४ हजार ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.  उर्वरित प्रकरणे ३१ जानेवारीपर्यत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

‘लाडकी बहीण योजने’चा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 16 : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य  शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना  हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

प्रिन्सटन टाऊनबाबत झेरॉक्सच्या आधारे मुद्रांक शुल्क करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, ता. 16 : पुण्यातील येरवडा परिसरातील कल्याणीनगरमधील प्रिन्सटन टाऊन को-ऑप हौसिंग सोसायटीसंदर्भात सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांच्याकडे  दाखल तक्रारीबाबत सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा (Memorandum of Understanding) दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे प्राप्त न झाल्यास उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकास काही म्हणायचे नाही, असे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्क निश्चिती व आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्याच्या  सूचना  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  दिल्या.

या संदर्भात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली.  बैठकीस आमदार दीपक केसरकर, उपसचिव  सत्यनारायण बजाज उपस्थित होते.

दाखल तक्रारीची  दखल घेऊन समजुतीचा करारनामामधील पक्षकार (सोसायटी व निष्पादक) यांना तक्रारीतील समजुतीचा करारनामाचे निष्पादन व त्यास मुद्रांक शुल्क न भरण्याविषयी खुलासा सादर करण्यास नोटिसीद्वारे कळविण्यात आले होते. परंतु, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने  सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारी, पुणे शहर यांना बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयास समक्ष भेट देऊन मूळ समजुतीचा करारनामा ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे व तो सह जिल्हा निबंधक वर्ग – १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/

अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई

मुंबई, दि. १६ : मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने २८ डिसेंबर २०२४ रोजी मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला.

मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय  विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

28 डिसेंबरला मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला  मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते.स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला होता. त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा धनादेश आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते श्री. टिपरी यांना प्रदान करण्यात आला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 16 : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात. या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. ज्या सेवा सध्या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना सुमारे ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात आपण ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या घटनांबाबत मंत्री परिषदेत चर्चा झाली. केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत. सकृतदर्शनी हे प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाधित नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे केस गळतीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. यावर अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने सतर्क रहावे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच अशाच प्रकारच्या घटना वर्धा येथे आढळून येत आहेत. त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

0000

मंत्री परिषद निर्णय

कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार

कोल्हापूर जिल्ह्यामधील  कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयास मौजे सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथील जमीन निःशुल्क उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित ५० रूग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास ४ ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तथापि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग, नवी दिल्ली यांच्या मानकांनुसार मौजे सांगाव येथे या होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी पुरेशी, सलग व सुयोग्य जागा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पिंपळगाव खुर्द ( ता. कागल) येथील गट क्र.४८७ मधील गायरान जमीनीपैकी ५.७५ एकर  जमीन उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही जमीन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

—–०—–

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यास आज राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

0000

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...