शुक्रवार, जुलै 25, 2025
Home Blog Page 73

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २२: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घरे तयार झाली आणि आता नवीन अडीच कोटी घरांचे बांधकाम सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामध्येही ३० लाख घरे उपलब्ध होणार आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वांजरा येथील जागेवर बांधण्यात आलेले 480 सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण आज करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सदनिकांच्या किल्ली सुपूर्द करण्यात आल्या.

नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., नगर विकास विभागाच्या विद्या हम्पय्या, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बांधकाम व्यावसायिक गौरव अग्रवाल, पीएमसीचे दिनेश वराडे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मनपाने अतिशय उत्तम सदनिका तयार केल्याची भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सहाही विधानसभा क्षेत्र निहाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान एक हजार घरांच्या इमारती उभारण्यात याव्या. जेणेकरून नागरिकांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना देखील मालकी हक्काचे पट्टे दिले जात असून, पुढील काळात सर्वाना पक्के घरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर हे हरित शहरांच्या यादीत असून येथील विकासासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक अशा ई बसेस देखील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत.  नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा कमीत कमी उपयोग करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असेही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वप्ननिकेतन या सदनिकेबद्दल माहिती देत राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेबद्दल आभार मानले.

विविध विकास कामांचे लोकार्पण

सर्व सोयी सुविधांची परिपूर्ण असणाऱ्या स्वप्ननिकेतन सदनिकांच्या हस्तांतरणासोबतच मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या पाचपावली अग्निशमन केंद्र, स्वच्छता विभागाच्या नव्या दोन चोकेज रिसायकलर मशीन, ओंकारनगर येथील स्मार्ट टॉयलेट, हॉट मिक्स प्लांट नवीन मशिनरी, कळमना जलतरण तलाव, २७ आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र, ट्री ट्रान्सप्लांटर मशिन, अग्निशमन फायर टेंडर्स, राज्य शासनाच्या निधीतून प्राप्त बसेसचे आणि अंबाझरी दहन घाटाकडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पणासह मेहंदी बाग उड्डाणपुलाखाली, दही बाजार उड्डाणपुलाखाली, सक्करदरा उड्डाणपुलाखाली, दिघोरी उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणाचे काम, जे पी नगर मेट्रो स्टेशनच्या उभ्या भिंतीवर ग्राफिटी वर्क म्हणून ओळखले जाणारे प्रॉव्ह. लँडमार्क आर्ट पेंटिंग, चौकात महिलांच्या जीवनासह सायकलचे भित्तिचित्र, नरेंद्र नगर चौकात उभ्या असलेल्या अंतराळवीराचे भित्तिचित्र आदींचे लोकार्पण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्कृष्ट अमलबजावणी बद्दल मनपाच्या चमूसह, एसडीपीएल व पीएमसी चमूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील एसटीपी प्रकल्प तात्काळ मार्गी लावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, ता. २२ :- नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी नागपूर महानगराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. यासाठी व्हीएनआयटी व डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या (पीकेव्ही) जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) जागेबाबत मुंबईच्या धर्तीवर व्हर्टिकल पद्धतीने विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर महानगरातील   विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. हैदराबाद हाऊस येथे घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीस महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव के. गोविंदराज, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, यांच्यासह महापालिका, एनआयटी, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी शहरात दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यापैकी एक दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील व्हीएनआयटीच्या जागेत तसेच सीताबर्डी भागातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे ठरविण्यात आले आहे.  येथील जागेसंदर्भात दोन्ही संस्थांचे म्हणणे लक्षात घेऊन तत्काळ टीसीएसमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

पाणी पुरवठा सुरळीत करा

शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये प्रेशर नसल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थेने करारात निर्देशित केल्याप्रमाणे पाणीपुरवठ्याच्या टाक्या या वेळेत भरणे आवश्यक आहे. याबाबत कल्पना देऊनही जर ती संस्था ऐकत नसेल तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शहरातील एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ही कामे करण्यासाठी सहा पथके लावण्यात आली असून येत्या दोन महिन्यात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होतील, असे महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.

नागपूर शहराच्या विकासासाठी नवा डीपीआर तयार करण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. हा डीपीआर तयार करताना पोलीस विभागाला सुद्धा सहभागी करून घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.महापालिकेने विकास कामे केल्यानंतर महावितरण तर्फे रस्त्यांचे खोदकाम केले जाते परंतु काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणतर्फे रस्त्यांचे समतलीकरण केले जात नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ही कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

00000

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

मुंबई, दि. २२ : भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर दिनांक २४ जून, २०२५ रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची पत्रकार परिषद होईल.

या राष्ट्रीय परिषदेमध्ये “प्रशासनीक कार्ये सक्षमपणे आणि अल्पव्ययासह होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर विचारमंथन होईल.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसद, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दिनांक २२ : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला.

कुंभमेळाप्रती भाविकांची वाढती आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार स्मिताताई वाघ, आमदार देवयानी फरांदे आमदार मंगेश चव्हाण, सडक परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाशिकला जवळपास महत्त्वाचे आठ मार्ग येतात. यात मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे.  लवकरच त्यासाठी करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कुंभच्याकाळात जी काही प्रचंड मोठी ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रस्त्यांचे जाळे यातून उपलब्ध होणार असल्याने भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्याने द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कळंबोली जंक्शनच्या धरतीवर द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला. यात कुंभपर्यंत होणारे काम व कुंभनंतर हाती घ्यावयाचे काम असे दोन टप्पे ठरविण्यात आले.

या मार्गाचा होणार विकास

१) घोटी – पाहिने – त्रिंबकेश्वर – जव्हार फाटा

२) द्वारका सर्कल – सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार

३) नाशिक ते कसारा

४) सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)

५) नाशिक ते धुळे

६) त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर

७) सावली विहीर – मनमाड – मालेगाव

८) घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी

९) शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)

00000

राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 22 : राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानाने संध्याकाळी 7.00 वाजता आगमन झाले.

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव (२) श्रीमती मेघना तळेकर यांनी श्री सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेस उपसभापती श्री.सिंह उपस्थित राहणार आहेत.

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.२२ जून:- लासलगाव पाटोदा रस्त्यावरील परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लासलगाव पाटोदा रस्त्यावर लासलगाव मुख्यबाजार पेठेत ४.५० कोटी निधीतून पुलाचे काम करण्यात येत आहे. या सुरू असलेल्या कामाची मंत्री श्री. भुजबळ यांनी पाहणी केली. त्यावेळी ते सबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.आर.घोडे, अभियंता संकेत चौधरी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
लासलगाव पाटोदा रस्त्यावरील बाजारपेठेतील पुलाच्या कामाला पुढे साठलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे कामास अडथळा येत आहे. याबाबत तातडीने या बंधाऱ्याचे द्वार उघडून द्यावे, अशी सूचना तहसीलदार विशाल नाईकवाडी व संबंधित अधिकाऱ्यांना केली. तसेच पाटोदा रस्त्यावरील हा पूल अनेक गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन महिन्याच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
शिवनदी संवर्धनाच्या कामाला तातडीने कार्यारंभ आदेश द्यावा
राज्य नदी संवर्धन योजनेच्या माध्यमातून शिवनदी संवर्धनासाठी १२.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र कार्यारंभ आदेश नसल्याने काम अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत पाहणी दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तातडीने या कामाला कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात यावे अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.22 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू झाली आहे. महावितरणच्या माध्यमातून आज कार्यान्वित झालेल्या रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज निफाड तालुक्यातील देवगाव, कानळद, मरळगोई, खडकमाळेगाव  व विंचूर येथे महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकर्पण मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी, महावितरणचे कार्यकारी अभियंता व्हि.के.काळुमाळी उप कार्यकारी अभियंता दत्तात्रय पुंडे, उप कार्यकारी अभियंता सुनील राऊत यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज ही अत्यावश्यक आहे.  ही गरज ओळखून शासकीय योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. येवला व लासलगावसह अतिरिक्त रोहित्र बसविणे व त्यांची क्षमता वाढविणे यासह अनुषंगिक कामे 45 कोटींच्या निधीतून करण्यात येत  आहेत. त्यामुळे या भागातील विजेच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
अतिरिक्त लोड मुळे खराब होणारी रोहित्रांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. शेतकरी व नागरिक विजेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत मंजूर करण्यात आलेली विजेची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना मंत्री. श्री. भुजबळ यांनी दिल्या.
सारोळे खू. येथे ६०० कोटी रुपयांच्या माध्यमातून ४३० केव्ही क्षमतेचे महापारेषणचे उच्च दाब उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा विजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरावे लागते. शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून त्यादृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अधिक स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून सौर ऊर्जा व पवन ऊर्जेतून वीज निर्मिती करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहे. आगामी काळात नैसर्गिक स्तोत्रातूनही मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले
महावितरणच्या आरडीएसएस लॉस रीडक्शन  योजनेअंतर्गत एसीकेबल टाकण्यात येऊन कंडक्टर बदलणे, अपग्रेड करणे ही कामे करण्यात येत आहे. त्यानंतर रोहीत्रांवरील अनधिकृत भार कमी होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए व मरळगोई विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र आज कार्यान्वित करण्यात आले आहे.लवकरच मतदारसंघातील संपूर्ण विद्युत केंद्रांचे बळकटीकरण होऊन ग्राहकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अभियंता काळुमाळी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे झाले भूमीपूजन व लोकार्पण
 देवगाव येथे 5 एम.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्रामध्ये रोहित्राची क्षमता 10 एम.व्ही.ए करणे या कामाचे भुमीपूजन. (र.रु.178.04 लक्ष)
 कानळद येथे 5 एम.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्रामध्ये  रोहित्राची क्षमता 10 एम.व्ही.ए करणे कामाचे भुमीपूजन. (र.रु. 142.57 लक्ष)
 मरळगोई  येथे कृषी आकस्मितता निधीमधुन 5 एम.व्हि.ए. चा अतिरिक्त रोहीत्र बसविणे उद्घाटन. (र.रु. 150.52 लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)
 खडकमाळेगांव येथे कृषी आकस्मितता निधीमधुन 5 एम.व्हि.ए. चा अतिरिक्त रोहीत्र बसविणे उद्घाटन. (र.रु. 139.69 लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)
 विंचूर येथे कृषी आकस्मितता निधीमधुन 5 एम.व्हि.ए. चा अतिरिक्त रोहीत्र बसविणे कामाचे भुमीपूजन. (र.रु. 128.27 लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)
000000

‘महास्वच्छता’ अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर/सोलापूर, दिनांक 22 (जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की, या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात या स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील व स्वतःही क्रियाशीलपणे राबवतील असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी भावी यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी करून स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या विषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. तसेच सर्व मानाच्या पालख्या सह अन्य पालख्या, दिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सामाजिक संस्था, नागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.

आमदार सचिन आवताडे यांनी पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या संकल्पनेतून वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ करण्यासाठी राबवलेल्या महा स्वच्छता अभियानाचे कौतुक केले व वारी संपल्यानंतर ही अशी मोहीम राबवण्याची मागणी केली.

प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सफाई मित्रांचा सन्मान

आजच्या महास्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविलेल्या काही सफाई मित्रांचा प्रतिनिधी स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणे, रविकिरण दोडिया, श्रीमती शांता विठ्ठल वाघमारे, अजय शंकर तावरे, ओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळगाव ग्रामपंचायत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर, एव्हर ग्रीन क्लब, क्रीडाई संस्था व लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचाही सत्कार करण्यात आला.

महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ

पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली.

पिंपळस ते येवला पर्यायी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत – मंत्री छगन भुजबळ

नाशिक ,दि.२२ जून :-पिंपळस येवला या रस्त्याचे चौपदरी काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथून वाहनांची येजा करण्यासाठी जो पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात येऊन वाहतूक सुरळीत करावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून ५६० कोटी रुपयांचा निधीतून पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असून मंत्री श्री.भुजबळ यांनी या कामाची आज निफाड परिसरात पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पावसाळ्याची पूर्वतयारी : सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज

मुंबई, दि. 21 : पावसाळ्यात रस्ते व पूल सुस्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यापक उपाययोजना राबविल्या असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांचे व पुलांचे दुरुस्ती व देखभाल काम वेगाने सुरू आहे.

राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग यांची दैनंदिन देखभाल व वेळोवेळी दुरुस्ती करून हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहावेत, यासाठी विभाग सतर्क आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून सावधानतेचे फलक लावण्यात येत असून, दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठीचे पर्यायी मार्ग (diversion) योग्य स्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सध्या एकूण 16,519 लहान-मोठे व ब्रिटीशकालीन पूल आहेत. यापैकी 451 पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. मागील 10 वर्षांत 1,693 पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

धोकादायक स्थितीत असलेल्या किंवा वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचे फलक व बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. अशा रस्ते व पुलांची स्थिती शासन स्तरावरून सातत्याने तपासली जात आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर वेळीच उपाय करता यावा, यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका स्तरापर्यंत नियंत्रण कक्ष (Control Room) कार्यरत असून, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे या कक्षांचे वेळोवेळी निरीक्षण करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या तयारीमुळे पावसाळ्यातील आपत्कालीन स्थितींना सक्षमपणे तोंड देणे शक्य होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

00000

ताज्या बातम्या

अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक

0
सांगली, दि. २४ (जि. मा. का.) - सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला...

..ही तर महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि,२४: भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारचे...

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नवी दिल्ली, दि. २४ : भाषा  हे संवादाचे प्रभावी साधन असून या  माध्यमातून  ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने  आपल्या मातृभाषेचा  अभिमान  बाळगताना इतर  भारतीय...

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई दि. २४ :- महाराष्ट्र आता थांबणार नाही...! महाराष्ट्र सर्वच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसेच वित्तीय संशोधन क्षेत्रातील...

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

0
यवतमाळ, दि.२४ (जिमाका) : आजचे युग हे कौशल्यावर चालते. त्यामुळे युवकांनी रोजगार स्वयंरोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजन आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी...