मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 963

महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

लंडन, दि. २ : महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र जगाने आज स्वीकारला आहे, असे उद‌्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज लंडन येथे काढले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लंडन येथील अव्हॉस्टिक चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या भूमीत जन्मलेल्या आणि जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेने जगात सर्वत्र साजरी केली जाते; आपण सर्वच महात्मा गांधी यांच्या भूमीतून आलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळी बोलतांना श्री. मुनगंटीवार यांनी भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.लालबहादूर शास्त्री यांनाही जयंतीनिमित्त भावांजली अर्पण केली.

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कॅमेडेन च्या उमहापौर समता खातून, स्थानिक डेप्युटी हाय कमिशनर, ब्रिटीश संसदेतील खासदार वीरेंद्र शर्मा, स्थानिक सुरक्षा व लष्कर सल्लागार, स्थानिक भारतीय नागरिक मंडळाचे पदाधिकारी अल्पेश पटेल, सी. बी. पटेल, प्रसिद्ध लेखक अमीश पटेल, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले की,आज लंडन मध्ये महात्मा गांधींना अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद वाटतो. महात्मा गांधी यांनी स्वाववलंबनाचा मंत्र सर्व जगाला दिला. चरखा हे स्वावलंबनाचे माध्यम म्हणून त्यांनी समाजाला दिले. ज्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून 1930 ते 1948 या काळात वास्तव्यास राहून संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला त्या सेवाग्राम येथे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली व जगातील सर्वात मोठा चरखा उभारण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. अहिंसेचे आयुध म्हणून त्यांनी चरख्याचा उपयोग केला. प्रेमाचा संदेश देत “ज्योत से ज्योत” जलाते रहो या भावनेने त्यांनी “जियो और जिने दो” ही भावना प्रत्येकात रुजविण्याचा जीवनभर प्रयत्न केला. लंडन येथे महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले.

000

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश

मुंबई, दि. २ : – ‘मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगार, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

अलिकडच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊन, येथील अडीअडचणी समजावून घेणारे, मुख्यमंत्री श्री. शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली.

त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पूर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन पाळयांमध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालये, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी, अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.’ आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गिरगाव चौपाटी येथे प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई करण्यात यावीत असे निर्देश दिले होते.

काल देखील त्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली होती. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याच्या सूचना केली होती.

००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दादर परिसरातील स्वच्छता अभियानाची पाहणी; सलग दुसऱ्या दिवशी दौरा

स्वच्छतेसाठी “एक तारीख-एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीला भेट दिली.

त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर हिंदमाता थिएटर येथील स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते.

00000

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साहित्य, भजनातून समाजाला दिशा दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संमेलनातून राष्ट्रसंतांचे साहित्य, भजने लोकांपर्यंत पोहाेचेल; आजनसरातील २५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

वर्धा, दि.2 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा काळ पारतंत्र्य, रुढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धेचा काळ होता. समाजात असमानता तर तरुणाई भरकटलेल्या अवस्थेत होती. अशा स्थितीत राष्ट्रसंतांनी तरुणांना भजनाद्वारे प्रबोधनातून मोहीत केले. संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंगणघाट तालुक्यातील श्रीक्षेत्र आजनसरा येथे श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थान व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमच्यावतीने आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार समीर कुणावार, आमदार डॅा.अशोक उईके, किर्तीकुमार भांगडीया, संजिवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, गुरुवर्य महंत सुरेश शरणजी शास्त्री महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, नितीन मडावी, अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी तथा संमेलनाध्यक्ष लक्ष्मणजी गमे, प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ, श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॅा.विजय पर्बत आदी उपस्थित होते.

विदर्भ ही संतांची मांदियाळी असलेली भूमी आहे. येथील तीन संतांनी फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचे काम केले. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांनी आपल्या दिव्यदृष्टीतून मोठ्या प्रमाणावर प्रबोधनपर साहित्याची निर्मिती केली. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेसोबतच जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतात जागरुकता आणली. संपूर्ण विश्वात त्यांनी मानवतेचा विचार पोहोचविण्याचे काम केले. युवकांना त्यांनी संस्कार दिले. वाईट रुढी, परंपरा तोडल्या पाहिजे, गरिबांची, समाजाची सेवा हाच मोठा धर्म आहे, हे राष्ट्रसंतांनी समाजमनात रुजविले.

तुकडोजी महाराजांनी आपले साहित्य, भजनातून एक मोठी पिढी तयार केली. या पिढीने पुढे सशक्त समाज तयार करण्यात हातभार लावला. आम्ही पारतंत्र्यात रहायला तयार नाही, असे वातावरण त्यांनी आपल्या प्रबोधनातून तयार केले. त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून केलेले काम मोठे आहे. समाजाच्या समस्या व त्यावरील निराकरण त्यांच्या भजनात दिसून येते. भजनातून जनजागृतीसह चांगला विचार त्यांनी समाजाला दिला. राष्ट्रसंतांनी मराठी, हिंदीत 1200 भजने लिहली. ही भजने देशभरात प्रसिद्ध झालीत, असे पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

राष्ट्रपती भवनात देखील तुकडोजी महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद त्यांच्या भजनाने प्रभावित झाले होते. त्यांनीच महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. राष्ट्रपतींद्वारे राष्ट्रसंत ही पदवी दिलेले तुकडोजी महाराज एकमेव संत आहे. जपानच्या परिषदेत तुकडोजी महाराजांनी उपस्थितांना मोहित केले होते. राष्ट्रसंतांचा विचार शाश्वत आहे, वाहत्या नदीसारखा त्यांचा विचार आहे. समाजाला अपेक्षित, आवश्यक आहे, ते देण्याचे काम त्यांच्या विचारातून झाले.

महाराजांनी समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे ‘ग्रामगीता’ होय. प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव ग्रामगीता करुन देते. स्वयंपूर्ण गाव कसे तयार होईल, आपणच आपले शिल्पकार कसे होऊ शकू, हे ग्रामगीता सांगते. महाराजांचे विचार, साहित्य, भजने लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या संमेलनातून होणार आहे.

श्रीसंत भोजाजी महाराज मंदिरात मोठ्या संख्येने भक्त येतात. मंदिरातील प्रसादाची पुरणपोळी समाधान देणारी आहे. आजनसरा परिसराच्या विकासाबाबत आश्वस्त करतो. विकासासाठी आराखडा मंजूर करुन घेऊ. बांधकाम व सर्व कामांचा पाठपुरावा करु. येथे करण्यात आलेल्या विविध मागण्या पुर्ण करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून मी काम करेल, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

आजनसरा परिसरात 25 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सन 2000 मध्ये भुमिपूजन झालेल्या आजनसरा बँरेजचे दोन महिन्यात टेंडर काढू. पाईप डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क पद्धतीने क्षेत्र लवकरच ओलिताखाली येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे पिवळा मोझँकमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना 11 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. यावर्षी देखील नुकसानग्रस्तांना मदतीची भूमिका आहे. मोझरी आश्रम परिसरात राहिलेली कामे पुर्ण करु, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी खा.रामदास तडस यांनी सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक असल्याचे सांगितले. श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानला ‘अ’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आ.समीर कुणावार यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आजनसरा येथे प्रत्येक महिन्याला 12 ते 15 लाख भाविक येतात. या स्थळाच्या विकासासाठी विकास आराखडा केला जावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजे, असे सांगितले.

सुरुवातीस दिपप्रज्वलन करून उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी गुरुवर्य महंत सुरेश शरणजी शास्त्री महाराज, प्रकाश महाराज वाघ, श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॅा.विजय पर्बत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन सचिन घोडे यांनी केले तर आभार अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर विविध परिसंवाद घेण्यात आले.

संस्थानच्या विविध उपक्रमांचे भूमिपूजन

श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-भूमिपूजन झाले. त्यात स्पर्धा परिक्षा अकादमी, मुक्तांगण बाग, कामधेनू गो-शाळा व ग्रामगीता भवनचा समावेश आहे.

श्रीसंत भोजाजी महाराजांचे दर्शन व आरती

            आजनसरा येथे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी भोजाजी महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेतले व आरती केली.

00000000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट व महात्मा गांधींना अभिवादन

वर्धा, दि.2 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली व गांधीजींना अभिवादन केले.

यावेळी खासदार रामदास तडस, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, माजी आमदार आशिष देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते. उपस्थितांनीही महात्मा गांधीच्या स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमातील प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत अभिप्राय देखील नोंदविला.

00000000

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार : धनंजय मुंडे

नागपूर दि.२ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

२३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह‌्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता.

नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव असून त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी व बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कृषीमंत्र्यांनी आज स्वतः शेताच्या बांधावर जात पाहणी केली. त्यांनी अडयाळी, उमरगाव, पाचगाव, विरखंडी या गावांना प्रामुख्याने भेटी दिल्या. तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी त्यांना शेतकरी बांधवांनी विविध मागणीची निवेदने सादर केली. अनेक ठिकाणी त्यांनी ताफा थांबवून पाहणी केली.

जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांनी सोयाबीनवर आलेल्या ‘पिवळ्या मोजाक व्हायरस’ या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.सोयाबीनचे दाणे भरलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांना दाखविले. तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने अक्षरशः उभ्या पीकावर रोटावेटर फिरवल्याची आपबीती शेतकऱ्यांनी सांगितली.

यावेळी कृषी मंत्र्यानी बांधावरच शेतकऱ्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले, यावर्षी राज्यात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा काढला असून आंतरपिकाच्या सुद्धा विमा काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने एक रुपया शेतकऱ्याला भरायला सांगितला होता. उर्वरित विम्याचा प्रीमियम शासनाने भरला आहे. देशात हे पाहिले उदाहरण आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची २५ टक्के रक्कम दिवाळीपूर्वी खात्यामध्ये मिळणार आहे. याशिवाय ६५ मिलीमीटर पेक्षा सतत चार तास पाऊस ज्या ठिकाणी झाला आहे, अशा अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले, असेल तिथे राज्य आपदा मदत निधी ( एसडीआरएफ ) व केंद्रीय आपदा मदत निधीच्या ( एनडीआरएफ ) नियमानुसार शेतकऱ्यांना मदत करता येते. ही मदत देखील आम्ही लवकरच देणार आहे. उद्या मंगळवारी राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय मांडणार असून यावर तत्काळ निर्णय होईल.

नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महसूल विभागाच्या विभागणीतील ८२ मंडळातील पिकांना फटका बसला आहे. त्यातही ६२ मंडळ अधिक बाधित झाली आहे. यासंदर्भातील महसूल व कृषी विभागाचा अद्यावत प्रस्ताव राज्य शासनाने मागितला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी मदत देताना राज्य शासन जून महिन्यात झालेल्या पिकाचे नुकसान, २१ दिवस जिथे पावसाचा खंड पडला आहे. त्या ठिकाणाचे नुकसान, तसेच नागपूर व विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या तीन घटकांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असून त्यांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबद्दल मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री अतिशय गंभीर असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतल्या जाईल,असे शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

कुही तालुक्यातील विरखंडी या गावातील शेतकरी दिनेश पडोळे यांच्या शेतामध्ये त्यांनी बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे पऱ्हाटीवर झालेल्या दुष्परिणामाची प्रत्यक्ष पाहणी केली. नेमके कोणते रासायनिक खत वापरण्यात आले. त्यामुळे नुकसान कशाप्रकारे झाले? याचा तपास घेण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

दौऱ्यामध्ये खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, आमदार राजू पारवे,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आदींसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

’ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्या-वस्त्यांना मिळणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक २ ऑक्टोबर २०२३ (जिमाका वृत्त) ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’ योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्यावस्त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशही शासनाने जारी केला आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नंदुरबार तालुक्यातील १३ गावांमधील विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, संरपंच, अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, या योजनेची व्याप्ती वाढल्याने जिल्ह्यातील ९४३ गाव व वाड्या वस्त्यांतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील ९४३ गाव-पाड्यांपैकी काही मर्यादित गावांनाच ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळत होता. ठक्कर बाप्पा योजनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्तींचा विकास होऊ शकत नसल्याने हा त्यांच्यावर अन्याय असल्याची भावना लाभार्थ्यांची होती. त्यामुळे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करत त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या “अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना, पूर्वीची “दलित वस्ती सुधार योजना” व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना” या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कामांची यादी, योजनेची व्याप्ती व कामांचे लोकसंख्यानिहाय आर्थिक निकष सुधारित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक गाव-वस्तीत कामांची संख्या वाढेल व आदिवासी जनतेला त्याचा लाभ मिळेल व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधींची मागणी व कामाचे स्वरूप आणि प्रचलित कायदे, नियम लक्षात घेऊन या योजनेंतर्गत करावयाच्या कामांना प्रचलित नियमानुसार ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, नगरपंचायत, महापालिकेकडून तांत्रिक मान्यता देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जाईल. वस्तीत पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उभारण्याचे काम शासनाने यापूर्वीच सुरू केले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वस्तीमधील शैक्षणिक आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल. आदिवासी समुदायांना शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी शाळा आणि आरोग्य सेवा केंद्रे स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. योजनेचा तिसऱ्या टप्प्यात आदिवासी समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आदिवासी वस्तीतील जीवनमानाच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी त्यामुळे वस्तीमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायांसाठी निर्माण होणार आहेत.

ठक्कर बाप्पा योजनेतून समाजमंदिर, सामाजिक सभागृह बांधणे, मंगल कार्यालय, स्मशानभूमी, स्मशानभूमी जोड रस्ता, बस थांबा, प्रवासी निवारा, शेड बांधकाम, सार्वजनिक शौचालय, मुतारी बांधकाम, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे,व्यायामशाळा, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका बांधकाम करणे, नदीकाठची संरक्षण भिंत, गावामध्ये सौरऊर्जा, विद्युत उर्जेवर आधारित पोल, डीपी बसविणे, पर्यटन विकासाची कामे, माता बाल संगोपन केंद्र बांधकाम, गावांमध्ये कचरा डेपोसाठी, प्राथमिक प्रगतीसाठी सुविधा निर्माण करणे, गावांतर्गत जोडणारे रस्ते, बंद गटार बांधणे, नाल्यासह मोऱ्या बांधकाम, शासकीय आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळांना मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते तयार करणे, फिल्टर प्लांट, कूपनलिका, हातपंप बसविणे, सबमर्सिबल पंप बसविणे, अशी विविध कामे आता घेता येणार आहेत. योजनेसाठी आदिवासी वस्ती वाडे, पाडे व समूहांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात कामांसाठी वित्तीय मर्यादा विहित केली आहे. यात तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी १ कोटी, १५०० ते ३००० लोकसंख्येसाठी ७५ लाख, १००० ते १४९९ लोकसंख्येपर्यंत ५० लाख, ५०० ते ९९९ लोकसंख्येपर्यंत ४० लाख, १०१ ते ४९९ लोकसंख्येपर्यंत २० लाख, १ ते १०० लोकसंख्येपर्यंत ५ लाख, असा विकास निधी दिला जाणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. तसेच पालकंत्र्यांसोबत स्वच्छतेच्या सामुहिक श्रमदानातही सहभाग नोंदवला.

या गावांना झाले विकास कामांची भूमीपूजन

नंदुरबार तालुक्यातील भालेर,नगाव, शिंदगव्हाण, काकर्दे, जुनमोहिदा, हाटमोहिदा, बोराळा, सुजालपूर, कोरीट, खोंडामळी, वितरण, नाशिंदे या गावांमधील ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
००००००००००

राज्य अधिस्वीकृती समिती सदस्यांकडून पिंपरी चिंचवड विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण

पुणे, दि.२: राज्य अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ ता. मावळ येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने समिती सदस्याकडून पिंपरी चिंचवड विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, किशोर गांगुर्डे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक व समितीचे सदस्य उपस्थित होते.
000

राजधानीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

नवी दिल्ली,2: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

 

0 0 0 0 0

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000

ताज्या बातम्या

मुंबईत होणारी ‘वेव्हज्’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज्) कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

0
मुंबई, दि. 29:- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने...

“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”

0
मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने "TECH वारी - टेक लर्निंग वीक" या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी...

नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

0
मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे....

शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि २९ :-  शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत...