मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 964

स्वच्छ आणि सुंदर गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, १ – पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या जीवनातील  महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार असून त्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे आहे. स्वच्छता हीच ईश्वरीय सेवा मानून स्वच्छ आणि सुंदर गाव ही ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वग्राम पाळधी येथून झाली. त्यावेळी ते बोलत होते.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमावर आधारित ‘कचरामुक्त भारत’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवड्यानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यांचाच एक भाग म्हणून ”०१ तारिख, १० वाजता, एक तास,”  या राज्यस्तरीय  मोहिमेसाठी आज स्वच्छतेच्या महाश्रमदानाकरिता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गावातील सर्व शाळा, आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये व  विविध भागात स्वच्छता करण्यासाठी श्रमदान करण्यात आले.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नागरी भागात १६ लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई, दि. १ – स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत आज राज्यात ‘एक तारीख, एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी १० ते ११ या कालावधीत राज्यातील  सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १४५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यात मान्यवरांसह १६ लाख ४ हजार ९९५ नागरिकांनी सहभाग घेत सुमारे १९४२ टन कचरा जमा करण्यात आला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या पंधरवड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज एक तास विशेष मोहीम राबविण्यात आली. यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज आदींनी गिरगाव चौपाटी येथे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी शिवडी किल्ला येथे, उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी बारामती येथे त्याचप्रमाणे केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध ठिकाणी या अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छता केली.

या अभियानात मान्यवरांसोबत विविध सामाजिक संस्था, इंडियन मेडीकल असोशिएशन, क्रेडाई, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, आरबीआय, एसबीआय, आयसीआयसीआय, बॅंक ऑफ इंडिया या बॅंका, इंडियन टुरिझम, लायन्स क्लब, रोटरी क्लब, माउली फाउंडेशन, शिवदुर्ग  ट्रेकर्स फाउंडेशन, बचत गटांचे सदस्य आदींनीही उत्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छता केली.

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गत नागरीकांच्या सहभागाने जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, नदीघाट, जलस्त्रोत, झोपडपट्ट्या, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्रहालय, गो-शाळा, डोंगर, समुद्र किनारे, बंदरे, आरोग्य संस्थाचा परिसर, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय परिसर, इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

जनतेच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वच्छता करणे व स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवून सर्व नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली दिली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य (झाडू, कचरा पेट्या, थैल्या इत्यादी) सबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. स्वच्छता उपक्रमादरम्यान गोळा केलेल्या कचऱ्याची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कचरा प्रक्रिया केंद्रावर योग्य ती विल्हेवाट लावण्यात  आली.

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता अधिक वेगाने काम करेल व त्याद्वारे सफाई कामगारांचे हक्क व अधिकार त्यांना मिळतील असे प्रतिप्रादन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई विद्यापीठ व जनआधार सेवा फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शुभसंदेश वाचण्यात आला. शुभसंदेशात श्री.आठवले यांनी, केंद्र शासन सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्याकरिता ‘नमस्ते’ योजनेद्वारे सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही दिली.

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले, राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपा वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित कंपनीच्या योजना, ‘नमस्ते’ मोहीम, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्याचे काम सफाई कर्मचारी आयोगामार्फत होऊ शकते. तसेच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, सफाई कामगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे, सुनियोजित प्रशिक्षण देऊन सर्वतोपरी त्यांच्या आरोग्याचे व जीवनाचे संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, माजी अप्पर मुख्य सचिव ए. के. जैन, अखिल भारतीय वाल्मिकी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रेखा बहनवाल, सफाई मजदूर कॉग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री धनराज बिरदा, सल्लागार ऍड. गीरेंद्रनाथ, जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी गटचर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये प्रशासकीय सत्र, संशोधक विद्यार्थी सत्र व आरोग्यदूत सफाई मित्र सत्र घेण्यात आले. यामध्ये झालेल्या चर्चा व ठरावाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना निवेदन देण्यात आले.

दुपारच्या सत्रात कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सुभाष पारधी, आमदार सुनील कांबळे, बाटू विद्यापीठाचे कुलगुरू   डॉ. के. व्ही. काळे , सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी विचार मांडून मार्गदर्शन केले .

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम म्हणाले, केंद्र शासन सफाई कामगारांच्या उत्थानासाठी कटिबध्द असून कायदा व वित्तीय सहाय्याव्दारे सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, सफाई कामगारांना समाजात सन्मानाने वावरता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेमार्फत आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे व योजनेव्दारे सफाई कामगारांना सहाय्य करण्यात येईल.

यावेळी जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी जनआधार सेवा फाऊंडेशन संस्था अनेक वर्षांपासून सफाई कामगारांचे कल्याण व उत्थानासाठी काम करत असून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अन्य अधिकारी तसेच राज्यातून मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चाबुकस्वार यांनी केले. तर संजय कांबळे यांनी आभार मानले.

गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १: शिवछत्रपती यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त 350 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. यावेळी  ते बोलत होते.

कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता  आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता मंत्री  मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ व स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करीत आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

घरोघरी शौचालय उभारणे, हागणदारीमुक्त भारत या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मल-जल शुद्धीकरण सुरु असून, राज्यात 221 सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्या संदेशानुसार 17 सप्टेंबरपासून सुरू असलेला स्वच्छता पंधरवडा पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे :  विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

भारत हा सर्वात मोठी लोकशाही आणि अर्थव्यवस्था असलेला देश आहे. भविष्यात स्वच्छ देश म्हणून जगात भारताची ओळख निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देखील अशाच प्रकारे स्वच्छ व स्वस्थ भारत ही संकल्पना अभिप्रेत होती. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची स्वच्छता हा नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम  विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेची संकल्पना रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगून, लोकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड् नार्वेकर यांनी यावेळी केले.

कौशल्य विकासासोबत लोकाभिमुख कार्यक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग: मंत्री मंगल प्रभात लोढा

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना या उपक्रमाद्वारे अनोखी मानवंदना देण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या ४०० आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

यावेळी ऑल इंडिया ट्रेड ट्रेनिंग (AITT) सन 2023 च्या परीक्षेत मुंबई शहर आय.टी. आय. च्या  मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स या ट्रेडमध्ये ऋतुजा पवार, मेकॅनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जान्हवी धोडींदे यांनी देशात विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

दुर्ग मित्र संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, मराठा वॉरियर्स, संत निरंकारी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.  संत निरंकारी प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम; एक तारीख एक तास मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १:-  महात्मा गांधी यांच्या जयंतीचे (२ ऑक्टोबर) औचित्याने आज राज्यभर नागरिकांच्या  श्रमदानाने ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आज स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

यात अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग देत श्रमदान केले.  या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील व बाहेरील परिसर, एशियाटिक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी टाऊन हॉल) परिसर,  सेंट्रल लायब्ररी समोरील हर्निमन सर्कल व परिसरात तसेच क्षेत्रीय वन अधिकारी सागर माळी आणि मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने कुलाबा व शिवडी फ्री-वे येथील कांदळवन परिसरातही स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी कृष्णकांत चिकुतें, तहसीलदार अतुल सावे, तहसीलदार प्रियांका ढोले,  तसेच सुमारे 60 अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतला.

 

परळीतील परिपूर्ण क्रीडासंकुल ही महत्त्वाची जबाबदारी – क्रिडामंत्री  संजय बनसोडे

बीड दि. 1 :  परळी येथे मंजूर करण्यात आलेले क्रीडा संकुल परिपूर्ण करणे महत्त्वाची जबाबदारी असून या क्रीडा संकुलासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी परळी येथे केले. परळी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री श्री बनसोडे हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे प्रथमच महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन, बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन व बीड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा (वरिष्ठ गट) दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2023  या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी क्रिडा प्रशिक्षकांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच खेळाडूंनाही गौरविण्यात आले.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, परळीत आयोजित होणाऱ्या धनुर्विद्या स्पर्धा ही राज्यभरातील धनुर्विद्या खेळाडूंसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकार सैदव सर्वच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र आर्चरी (धनुर्विद्या) असोसिएशनच्यावतीने या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार असून परळीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून महाराष्ट्राची नॅशनल आर्चरी टीम निवडली जाणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सहाशे खेळाडू सहभागी झाले आहेत.  फाऊंडेशन स्कूल प्ले ग्राऊंड, परळी वैजनाथ येथे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या स्पर्धा होत आहेत. काल शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

क्रिडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  यावेळी माजी आमदार संजय दौंड, , मुख्याधिकारी परळी नगर पालिका त्रिंबक कांबळे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात परळीत क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दत्ताप्पा ईटके, सुभाष नाणेकर व अमर देशमुख या क्रिडा शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  श्रद्धा रवींद्र गायकवाड, ऋतुजा गर्जे, सानवी सचिन सौंदळे, सूर्या सचिन सौंदळे, शुभम मुंडे, वैष्णवी लक्ष्मण गवारे,चैतन्य चिद्रवार,मनस्वी मुंडे,आभा गणेश मुंडे,राजाराम शेळके,वैष्णवी वैजनाथ जीगे,रेहान बाबू नंबरदार,सचिन शेळके,शिवदास घुले, विशाल मुंडे, राजू घुले, शंकर नागरगोजे, नितीन स्वामी,शंकर वाकडे, नामदेव मुंडे,बालाजी फड,बालाजी मुंडे, गोविंद मुंडे,कपिल बेलापट्टे, सूर्यकांत कोहाळे,ओम मेनकुदळे, रिलस्टार साईराज केंद्रे, पत्रकार शहादत अली या परळी व परिसरातील विविध खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व विविध क्रीडास्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण यश प्राप्त केलं आहे अशा खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

धनंजय मुंडे यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा

या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार होते मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदारसंघात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आल्याने व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुंडे यांना उपस्थित राहावे लागले. यामुळे परळीतील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाप्रती आपल्या सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या. परळी शहरात क्रीडा विषयक राज्यस्तरीय स्पर्धा होत असून ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगून या उपक्रमात पुढाकार घेणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच जीवनगौरव पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांना व सन्मान प्राप्त परळी व परिसरातील सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता हीच सेवा अभियान व्यापक जनचळवळ बनावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि.1 (जि.मा.का.): स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या मोहिमेअंतर्गत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत मिरज वैद्यकीय महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मिरज वैद्यकीय महाविद्यालय परिसराच्या स्वच्छतेसाठी विद्यार्थी, मान्यवर नागरिकांचे अनेक हात राबले.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्या परिसराची स्वच्छता नियमितपणे करावी. अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता हीच सेवा” हे अभियान व्यापक जनचळवळ  बनावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, माजी महापौर संगीता खोत,  डॉ. विनोद परमशेट्टी, सहायक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. ताटे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. 1 ऑक्टोबर रोजी राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचाच एक भाग म्हणून मिरज येथे ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध मान्यवर, शासकीय रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी  श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १: स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची  दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची  स्वच्छता न करता गल्ली बोळातील रस्ते, झोपडपट्टीतील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरू नगर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली. तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल, उपायुक्त हर्षल काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  मुख्यमंत्री यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिका हद्दीतील स्थानिकांना तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता गृहाची पालिकेच्या खर्चाने दुरुस्ती, डागडुजी करावी, दुरूस्ती न होऊ शकणारे शौचालये तोडून नव्याने बांधण्यात यावी. यादरम्यान फिरते शौचालये उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने निधी उपलब्ध करून द्यावा. अस्वच्छता आरोग्यासाठी हानिकारक असून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायचे असेल तर या मोहिमेची सुरुवात झोपडपट्टीपासून करणे आवश्यक आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार

मच्छिमारनगर येथील जेट्टी आणि परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच दुर्घटनाग्रस्त नौकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वच्छता मोहिम स्थानिक पातळीवर राबविणे गरजेचे आहे. मच्छिमारांना स्वच्छ रस्ते, पाणी, जेट्टी आणि परिसरात फूड कोर्ट बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कोळीवाड्याचे सुशोभीकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार असून कोळीवाडा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त चार नौकांची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी या नौकांसाठी नुकसान भरपाई म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगत असलेले भंगार उचलणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिकांनी शासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मार्चअखेर ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे हे बधवार पार्क, मच्छिमार नगर-कफ परेड, बाणगंगा येथे स्वच्छता मोहिमेस उपस्थित राहिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यावेळी त्यांनी मच्छिमार सर्वोदय सोसायटीस भेट देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी त्यांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.

बोधी वृक्षारोपण महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 1 – नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश विदेशातून उपासक येणार असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

आज भुजबळ फार्म येथे झालेल्या बोधी वृक्षारोपण महोत्सव नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत, शहर अभियंता एस. आर. वंजारी, माजी खासदार समीर भुजबळ, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भिक्कू सुगत थेरो, कार्यक्रमाच्या नियोजन समितीचे समन्वयक आनंद सोनवणे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, बोधी वृक्षाच्या फांदी रोपण महोत्सवाचे नाशिक शहरात महिनाभरासाठी आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवासाठी दलाई लामा तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम या देशातील भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी देशविदेशातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने तेथील सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात यावा. तसेच ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण झाल्यावर त्या फांदीच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात यावी. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या जागेचे सपाटीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व महानगरपालिका तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या समन्वयाने कार्यक्रमाची नियोजन समिती तयार करावी. तसेच बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, तेथील मातीचे तज्ज्ञामार्फत परिक्षण करून घेण्यात यावे, असे निर्देश ही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.

साधारण पंचवीसशे वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाल्याने हे बोधीवृक्ष अतिपूजनीय असून या बोधी वृक्षाच्या एका फांदीचे रोपण आपल्या नाशिक शहरात होत असल्याने आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व अजून वाढणार आहे. या अनुषंगाने बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवाचे महत्त्व लक्षात घेवून त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, विविध ठिकाणांहून येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन, सुरक्षा व्यवस्था व इतर अनुषंगिक आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना ही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या.

आशेवाडी गाव स्वच्छतेचा आदर्शवत अग्रदूत; स्वच्छता अभियानात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

नाशिक, दि. स्वच्छता अभियान ही प्रत्येकाची जबाबदारी असून यात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्त्वाचा आहे. ‘आशेवाडी’ हे गाव स्वच्छतेचा आदर्शवत अग्रदूत असून या गावातील स्वच्छतेचे अनुकरण इतर गावांनीही करावे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

आज दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ला, आशेवाडी येथे आयोजित ‘स्वच्छता हिच सेवा’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील, दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार,  गटविकास अधिकारी नम्रता जगताप, बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे, आशेवाडीचे सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच सौ. लताबाई कापसे, माजी जि.प सदस्या मनिषा बोडके, दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाम बोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आशेवाडी प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यावेळी म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज स्वच्छता हिच सेवा अभियान देशभरात राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक तास स्वच्छतेसाठी या जिल्हास्तरीय उपक्रमाची सुरवात आज रामशेज किल्ला आशेवाडी येथून  ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमवेत करण्यात आली. आरोग्यदायी जीवन आणि गावाचा विकास साधायचा असेल तर त्याचे मूळ स्वच्छता आहे. आपल्या घरासोबतच आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राहिल यादृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून इतरांनाही प्रेरणा मिळेल असे काम केले पाहिजे. आपली संस्कृतीही आपल्याला स्वच्छतेची शिकवण देते. आज आशेवाडी गावातील स्वच्छता हि कौतुकास्पद आहे परंतु गावकऱ्यांनी भविष्यातही हे सातत्य सदैव ठेवणे गरजेचे आहे. यासाठी गावातून स्वच्छतेसाठी फेरीचे आयोजन करून जनजागृती झाली पाहिजे. आशेवाडी गावाला रामशेज किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आहे.

हा वारसा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वनविभागाशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न केला जाईल. परंतु यात सर्वांचा सहभाग व प्रयत्न आवश्यक आहे. असेही राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, स्वच्छतेचा अर्थ केवळ परिसर स्वच्छता हा नाही तर यात आपण आपले चांगले विचार, उत्तम आरोग्य, आपली दिनचर्येतील सूसुत्रता आणने हे अभिप्रेत आहे. कार्यालयात काम करतांनाही आपण योग्य नियोजन केले तर कामे अपूर्ण न राहता वेळेत पूर्ण होतील. उत्तम आरोग्य ही दिर्घ आयुष्याची गुरूकिल्ली असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाभ्यास व  व्यायाम यांचा समावेश करणे गरजेचे आहे. असेही राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगून आशेवाडीच्या गावकऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

आशेवाडी मनात रमणार गाव

आशेवाडी गाव निसर्गरम्य असून मनात रमणार गाव आहे. अशा शब्दात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आशेवाडी गावाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, आज स्वच्छता हीच सेवा या अभियानाची सुरवात रामशेज किल्ला आशेवाडी येथून झाली. या गावाला प्रथमच भेट दिली असून येथील ऐतिहासिक वारसा व निसर्गरम्य वातावरण मनाला भावून गेले. प्रत्येक घरात स्वच्छता ठेवली तर निश्चितच गावही स्वच्छ होईल यात शंका नाही परंतु गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही योग्य पद्धतीने लावणे तितकेच गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनस्तवर प्रयत्न केले जातील असे बोलून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गावकऱ्यांना अश्वासित केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडेगाबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आशेवाडी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांनी केले. यावेळी माजी जिप सदस्या मनिषा बोडके, सरपंच साहेबराव माळेकर यांनी गावक-यांच्यावतीने मनोगत व्यक्त केले.

स्वच्छता हिच सेवा अभियानाचा प्रारंभ राजशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत शासकीय अधिकारी, आशेवाडी प्राथमिक विद्यालयातील विद्याथी तसेच गावकरी यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘स्वच्छ भारत निरोगी भारत’, ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’अशा घोषणाही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष पाटील सर यांनी तर उपस्थितांचे आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे यांनी मानले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

0
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १ मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली –...

0
मुंबई, दि.२९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेले...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

0
मुंबई, दि. २९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि...

उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई दि.२९ :- राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा...

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....