महाडीबीटी पोर्टलचा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून आढावा

0
1

मुंबई, दि. 18 : शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी‘महाडीबीटी’पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलविषयी आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. विभागाचे सचिव एकनाथ डवले,माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले,शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता‘महाडीबीटी’पोर्टल विकसित करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने यावेळी कृषीमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले.

‘महाडीबीटी’पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा,अशी सूचना श्री.भुसे यांनी केली.

शेतकऱ्यांकरिता असलेली पिक विमा योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,दुष्काळी मदत,या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टलमध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी,असे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी दिले.

या पोर्टलमध्ये सध्या 13 योजनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने यावेळी कृषीमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले.

००००

अजय जाधव/विसंअ/18.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here