पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे महिलादिनी विशेष कलाविष्कार
मुंबई, दि. 7 : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या रविवार दि. 8 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे महिला कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 मार्च ते 12 मार्चदरम्यान (दि. 9 व 10 मार्च वगळून) प्रभादेवी येथे महिलांच्या दृष्टीकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी 7.30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव संजय मुखर्जी आदी उपस्थित राहणार आहेत.
दिनांक12 मार्च रोजी रात्री 8.00 वाजता‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल. महिलांसाठी स्वसंरक्षण-प्रात्यक्षिके, सायबर गुन्हे व महिलांची सुरक्षा, त्याचप्रमाणे शास्त्रीय नृत्य/गायन/वादन, महिलांसाठी लावणी कार्यक्रम तसेच कविता, अभिवाचन, बॅले, अभंगवाणी, लोककला, वाद्यवृंद असे अनेक विविधरंगी कार्यक्रम कला महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत.‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’‘नली’या महिलांच्या भावविश्वाशी निगडीत नाटकांचेही आयोजन विशेषत्वाने केले आहे. त्याशिवाय‘हास्यवती’या महिलांच्या प्रश्नांशी निगडीत व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून या महोत्सवास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.