मुंबई, दि. २२: महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) वर्धापन दिन कार्यक्रम सोमवार दि.24 फेब्रुवारी, 2020 रोजी होणार आहे. यावेळी महिलांसाठी ‘तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस‘ योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील बचत गटांमार्फत उत्पादित केल्या जाणाऱ्या तांदळाचे ‘तेजस्विनी‘ या ब्रॅण्डने विक्री करण्यात येणार असून त्याचा शुभारंभही या कार्यक्रमात होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होईल.
आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त २४ फेब्रुवारी १९७५ रोजी ‘माविम’ची स्थापना करण्यात आली. यंदा ‘माविम’चा ४५ वा वर्धापन दिन साजरा होणार असून त्याचे उद्घाटन महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री श्री. ओमप्रकाश (बच्चू) कडू आणि माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
महिला बचत गटांमार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या तांदळाचे ब्रॅण्डिंग करण्यात येणार असून आता हा तांदूळ तेजस्विनी तांदूळ या नावाने विक्री होणार आहे. या ब्रॅण्ड नेमच्या पॅकेजिंगचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये बचत गटातील महिलांच्या प्रेरणादायी कन्यांचा ‘तेजस्विनी कन्या‘ हा किताब देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कर्तृत्ववान आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. बचत गटांमधील महिलांना बँकामार्फत कर्जवाटप यावेळी करण्यात येणार आहे.
महिलांसाठी ‘तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस‘ योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ६८ कोटी ५३ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नियोजन विभागाची ही योजना माविममार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांनी दिली.
0000
सचिन गाढवे/दि.22.02.2020