हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे

0
8

जागो ग्राहक जागोमोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण

मुंबई, दि. 20 : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी आज व्यक्त केले.

जागो ग्राहक जागोमोहिमेअंतर्गत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयामार्फत अशासकीय सदस्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे, कन्झ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सीताराम दीक्षित, परिमंडळाचे उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे आदी यावेळी उपस्थित होते.

ग्राहक आपल्या हक्कासाठी जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाशी निगडित अनेक प्रश्न आपोआप सुटतात, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, शासनाने ग्राहक हिताचे अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांविषयक तसेच वस्तू किंवा सेवेची खरेदी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फसवणूक टाळता येणे शक्य आहे. यातूनही फसवणूक झाल्यास न्यायालयातून न्याय निश्चितच मिळू शकतो. ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यांनी आपल्या परिमंडळातील किमान 10 शाळांमध्ये जाऊन ग्राहक जागृतीपर व्याख्यान, प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी यावेळी केले.

श्री. पगारे यावेळी म्हणाले, ग्राहक नेहमी चोखंदळ असावा, तो जागृत असावा या दृष्टीकोनातून यावर्षीपासून जागो ग्राहक जागोमोहीम सुरु करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील सहा अधिकारांची माहिती ग्राहकाला असल्यास आपली फसवणूक टाळणे शक्य आहे.

या कार्यक्रमात डॉ. सीताराम दीक्षित यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील विविध तरतुदींची माहिती दिली. ग्राहकाची व्याख्या, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वस्तू व सेवा, ग्राहकांचे सहा अधिकार, वस्तू व सेवांविषयी फसव्या जाहिराती, ग्राहकाच्या फसवणुकीचे प्रकार, भेसळ आदींविषयी माहिती देऊन फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची याबाबत माहिती यावेळी दिली.

प्रशिक्षणास अशासकीय सदस्य तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.20.11.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here