गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा – विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. 20 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट तत्काळ थांबविण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक नागरिक हे आपापल्या गावी जात आहेत. अशा गंभीर प्रसंगी आपल्या कुटुंबियांसोबत असावे असे प्रत्येकालाच वाटते व त्यामुळे ते गावी उपलब्ध वाहतूक साधनाने जात आहेत. राज्य शासनाच्या बसेस सोबत नागरिक खाजगी वाहनेही वापरत आहेत आणि ह्याच गोष्टीचा गैरफायदा खाजगी वाहन व्यावसायिक घेत आहेत.

पुणे-नागपूर अथवा पुणे-लातूर व इतर बसेसचा दर ह्या व्यावसायिकांनी वाढवलेला आहे. दर वाढविल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. याबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी  परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शेखर चन्ने यांनी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना दिल्या आहेत.

०००००