Tuesday, December 24, 2024
Home Blog Page 1362

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई, दि. 23 : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, नोकरी कशी मिळेल यापेक्षा आपण अनेकांना नोकरी देऊ शकतो याचाही विचार केला पाहिजे, आपले ध्येय मोठे असले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

लोअर परेल येथील आयएसडीआय टॉवर येथे इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.  या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशनचे अध्यक्ष  विजया शहानी, सिध्दार्थ शहानी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले, भारत हा तरूणांचा देश आहे. देशाचा सन्मान वाढेल असे कार्य आज तरूणांनी  केले पाहिजे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहावे. यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन  यशस्वी झाले आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी  कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची जिद्द मनात ठेवून सतत सकारात्मक विचारातून आपले ध्येय गाठावे. आपल्यातील आत्मविश्वास हाच यशाकडे घेऊन जाऊ शकतो. विद्यार्थी ज्या संस्थेत शिक्षण घेत आहेत, त्या संस्थेचे नाव विद्यार्थ्यांनी मोठे करावे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट देऊन पाहणी केली.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची मुलाखत

‘दिलखुलास’कार्यक्रमात याच मुलाखतीचे बुधवारी आणि गुरुवारी प्रसारण

मुंबई, दि.२३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी  दिलीप शिंदे यांची विधानसभा निवडणूक कार्यक्रम – २०१९या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर  २०१९ रोजी  संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. तसेच  राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. २५ आणि गुरुवार दि. २६  सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    

विधानसभा निवडणुक कार्यक्रम-2019, या अनुषंगाने विभागाने केलेली तयारी,  मतदानामधील युवक व महिलांचा सहभाग वाढावा म्हणून राबविण्यात येणारा स्वीप (SVEEP) कार्यक्रम, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबद्दल लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी विभागाकडून सुरु असलेले प्रयत्न, प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी होत असलेले प्रयत्न, दिव्यांग व महिला मतदारांकरिता असलेल्या विशेष सोयी, निवडणुकीच्या कार्यान्वयनामध्ये गती व सुसूत्रता येण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेले नवीन ॲप, आदी विषयांची माहिती श्री. शिंदे  यांनी  जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

०००००

पुरुष, महिला मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर; तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल

मुंबई, दि. 23 : राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण 40 लाख 19 हजार 664 पुरुष मतदार तर 36 लाख 66 हजार 744 महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 39 लाख 29 हजार 232 पुरुष मतदार तर 32 लाख 97 हजार 067 महिला मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 34 लाख 47 हजार 148 पुरुष मतदार आणि 28 लाख 81 हजार 777 महिला मतदार आहेत.

तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 527 तृतीयपंथी मतदार,  ठाणे जिल्ह्यात 460 आणि पुणे जिल्ह्यात 228 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

चिंचवड मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या निवडणूक वर्षात होते सर्वाधिक मतदार!

मुंबई, दि. 22 : 2009 आणि 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी 288 मतदारसंघांपैकी चिंचवड मतदारसंघात अनुक्रमे 3 लाख 91 हजार 857 आणि 4 लाख 84 हजार 362 मतदारांची नोंदणी झाली होती.

2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड नंतर दुसऱ्या क्रंमाकावर चांदिवली मतदारसंघात 3 लाख 68 हजार 233 मतदारांची नोंद होती. तर वडगाव (शेरी) या मतदारसंघात एकूण 3 लाख 65 हजार 861 मतदारांची नोंद करण्यात आली. हडपसर या मतदारसंघात 3 लाख 63 हजार 007 मतदार तर खडकवासला या मतदारसंघात 3 लाख 56 हजार 137 मतदारांची नोंद होती.

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडनंतर खडकवासला मतदारसंघात 4 लाख 28 हजार 239 मतदारांची नोंद होती. तर पनवेल या मतदारसंघात एकूण 4 लाख 23 हजार 716 मतदारांची नोंद करण्यात आली. चांदिवली या मतदारसंघात 4 लाख 17 हजार 700 मतदार तर हडपसर या मतदारसंघात 4 लाख 16 हजार 800 मतदारांची नोंद होती.

विशेष म्हणजे चिंचवड,खडकवासला,चांदिवली आणि हडपसर या चार मतदारसंघात 2009 आणि 2014 साली अधिक मतदार संख्या असल्याची नोंद आहे.

तिरोडा आणि वडाळ्यामध्ये सर्वांत कमी मतदार

2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत तिरोडा मतदारसंघात 1 लाख 91 हजार 149 मतदारांची नोंद होती. तर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 951 मतदारांची नोंद होती.

भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘विश्वमैत्री दिवस’ क्षमापन समारोहास राज्यपाल उपस्थित 

मुंबई दि. 22 :बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

 ‘विश्व मैत्री दिवस : क्षमापन समारोह’कार्यक्रमाचे आयोजन भारत जैन महामंडळाच्या वतीने बिर्ला मातोश्री सभागृह, न्यु मरिन लाईन्स येथे करण्यात आले होते.यावेळी आरबीआयचे डेप्युटी गर्व्हनर एम.के.जैन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के.तातेडजी, बँक ऑफ बडोदा बँकेचे कार्यकारी संचालक एस. एल.जैन, 108 मुनिश्री प्रमुख सागरजी, महासती कंचनकंवरजी, साध्वी कैलाशवतीजी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म, जाती, पंथ आहेत पण भारतीय म्हणून विचार केल्यास कुठलीही जात, धर्म, पंथ न मानता सर्व समाज हा भारतीय होऊन जातो.

अनेक ऋषी, मुनी, महात्मे यांच्या कठोर तपस्येमुळे देशाची निरंतरपणे प्रगती होत आहे. देशातील आर्य कालापासून ज्ञानाची प्रथा चालत आलेली आहे. समाजातील अनेक धर्माचे लोक विविध देशातून शिक्षण घेत असून या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत आहेत. हे ज्ञान आता पूर्ण विश्वात पसरत आहे.

सूर्य जसा जाती-पाती, धर्म, वंश न मानता सर्वांना समान प्रकाश देतो त्याचप्रकारे देशात जाती-पाती उच्च निच्च न मानता सर्व समान आहेत. क्षमा हे वीर माणसाचे भूषण असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने वीर बना असेही त्यांनी यावेळी सांगितले.ऋषी, मुनीचा आशीर्वाद आणि उच्च आदर्शामुळे देश सशक्त व समर्थ बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रिटीश पार्लमेंटच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भारत गौरव पुरस्काराने मोतीलाल ओसवाल व देवेंद्र भाई यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पर्युषणपर्वानिमित्त जैन संघ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

मुंबई, दि 22 : पर्युषण पर्वानिमित्त दक्षिण मुंबई येथे आयोजित जैन संघ रथयात्रेचा आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला.

मुंबई जैन संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 200 जैन संघांचे साधू – साध्वी तसेच हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. जैन समाजाच्या वतीने मुंबई मध्ये पहिल्यांदाच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जैन समाजातील सर्व समुहाचे गुरु एकत्र येऊन समाजाला एकतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

पर्युषणपर्वानिमित्त शुभेच्छा देताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, केवळ रुपवान,धनवान,बलवान असणे पुरेसे नाही. तर मनुष्याने क्षमावान असणे महत्त्वाचे आहे. रथयात्रेला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले,या रथयात्रेच्या माध्यमातून मुंबईतील जैन बांधवांचा मोठा महासागर पहावयास मिळाला आहे.

0 0 0

Maha Governor  flags off Jain Sangh Rath Yatra

Mumbai, 22nd Sept 2019 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today (22nd Sep) flagged off a largely attended Jain Sangh Rath Yatra in Mumbai. The Rath Yatra was organized to commemorate the holy Paryushan Parva. More than 200 Jain Sanghas, Sadhus, Sadhvis and thousands of citizens participated in the Yatra. Speaking on the occasion the Governor said it is not enough to become rich, handsome and physically strong. He said it is important for human beings to bear the virtue of Kshamapana (forgiveness).

 

स्व. नंदकिशोर नौटीयाल पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व – राज्यपाल

स्व.नंदकिशोर नौटीयाल यांची प्रार्थनासभा

मुंबई,दि. 22 : स्व.नंदकिशोर नौटीयाल यांचा केदारनाथ ते मुंबई पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे संघर्षातून उभे राहिले आहे. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील ते एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे,असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते दादर येथील स्वामी नारायण मंदीरातील योगी हॉल येथे स्व.नंदकिशोर नौटीयाल यांच्या प्रार्थना सभेत बोलत होते.

कार्यक्रमाला पद्मश्री तथा प्रसिद्ध गायक अनूप जलोटा,संपादक विश्वनाथ सचदेव,राजीव नौटीयाल आदींची उपस्थिती होती. राज्यपाल म्हणाले,साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांना नंदकिशोर नौटीयाल यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाली. एक माणूस म्हणून त्यांनी समाजात अनेकांना मदत केली. त्यांच्यातील मानवतेचा भाव गंगा आणि यमूना या नद्यांसारखा पवित्र आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात या वर्षापासून पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या पुरस्काराने पद्मश्री अनूप जलोटा यांना सन्मानित करण्यात आले. अनेक साहित्यिकांनी यावेळी विचार व्यक्त केले. यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. त्यांनी विविध देवतांचे दर्शन घेतले.

0 0 0

Maharashtra Governor visits Swami Narayana Mandir

Mumbai, 22ne Spet. 2019 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari visited the famous Swaminarayana Mandir at Dadar, Mumbai on Sunday (22 Sep). The Governor performed the Puja and Abhishek at the temple.

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; राज्यात २१ आक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी

नवी दिल्ली,दि.21 :  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे.राज्यात21ऑक्टोबर2019  रोजी मतदान पार पडणार असून24ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. 

येथील‘निर्वाचन सदन’या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते.निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे.   

…असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण288जागांसाठी21ऑक्टोबर2019ला मतदान घेण्यात येणार आहे. 27सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख4ऑक्टोबर असून5ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 7ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21ऑक्टोबरला मतदान तर24ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 27ऑक्टोबरला  राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.महाराष्ट्र विधानसभेची मुदत9नोव्हेंबरला संपत आहे.  

राज्यात8कोटी95लाख मतदार

केंद्रीय  निवडणूक आयोगाच्या वतीने  जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार31ऑगस्ट2019पर्यंत राज्यात मतदारांची  एकूण संख्या 8कोटी95लाख62हजार706एवढी आहे. 2014च्या तुलनेत राज्यातील  मतदान केंद्रांमध्ये5.61टक्क्यांनी वाढ झाली असून यावर्षीच्या विधानसभेसाठी  एकूण95हजार473मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा28लाख रूपये ठेवण्यात आली आहे. 

मतदार व उमेदवारांसाठीहेल्पलाइनॲपची सुविधा

मतदारांच्या मदतीसाठी आयोगाने‘व्होटर हेल्पलाईन-1950’सुरु केली आहे. 1950या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येणार आहे.मतदारांसाठी‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ही सुरु करण्यात आले आहे.उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जाची स्थिती व प्रचारविषयक परवानगीसह अन्य महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी‘सुविधा ॲप’सुरु करण्यात आले आहे.उमेदवार,राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वतीने प्रतिनिधी  थेट  https://suvidha.eci.gov.inया संकेतस्थळावर अर्ज करू शकतो व  उमेदवारांना ॲपवर परवानगीबाबतची  स्थिती कळू शकणार आहे.   

आचारसंहिता काळात असे असणार नियम

निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनिक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरणपूरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओग्राफी, सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.   प्रसार माध्यमांमधून आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी  जिल्हा स्तरावर माध्यम नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे.

सोशल मीडियाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठित करण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्रा’चे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मीडियावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.  

०००००

रितेश भुयार/वृत विशेष क्र.219 /दि.21.09.2019

राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदानाचा हक्क बजावण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन

मुंबई, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर श्री. सिंह यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत राज्यातील तयारीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.        

श्री. बलदेव सिंह म्हणाले, राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

8 कोटी 94 लाख मतदार

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.

मतदान केंद्रांत वाढ

श्री. सिंह म्हणाले, सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण 96 हजार 654 मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाच हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी pwd app ची सुविधा देण्यात आली आहे.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही श्री. सिंह यांनी सांगितले.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशीनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी 6.30 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल,सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास नागरिकांना सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/21.9.2019

दिलीप शिंदे लिखित ‘निवडणूक कायदेविषयक’ पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 19 : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रियाया पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, उमेश सिन्हा, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला श्री. अरोरा यांची प्रस्तावना असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे पुस्तक ग्रंथालीप्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच राजकीय कार्यकर्ते ते सर्वसामान्य मतदार अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात निवडणूक आयोगाची माहिती, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि ओळखपत्रे, उमेदवारांची पात्रता, शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरणास बंदी, आचारसंहिता, निवडणूक विषय गुन्हे, राजकारणातील गुन्हेगारीस प्रतिबंध, प्रशासकीय यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम), टपाली मतदान, कायद्यातील नव्या सुधारणा, पेड न्यूज, उमेदवारांसाठी एक खिडकी योजना आणि मतदान जागृती कार्यक्रम याबाबत सविस्तर आणि सचित्र माहिती समाविष्ट आहे.

000

ताज्या बातम्या

जलसंपदा विभागाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा ठेवा -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प तसेच या विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन करुन यासाठी...

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने सामाजिक मुद्द्यांवर प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपटसृष्टीने...

0
मुंबई,दि.२३: सामान्यांचा संघर्ष, त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारे दिग्गज दिग्दर्शक पद्मभूषण श्माम बेनेगल यांच्या निधनामुळे सामाजिक बांधिलकी जपत चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची...

वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह 

0
मुंबई, दि. २३ :  भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे, पितामह म्हणून प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील, अशा भावना व्यक्त...

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
️सर्वसामान्यांनी दिलेल्या विश्वासाशी अधिक कटिबध्दता ️कोणत्याही परिस्थितीत नियमाच्या बाहेर बदल्या होणार नाहीत ️सर्वसामान्यांना परवडेल असे रेतीचे राहतील दर  नागपूर, दि. 23 : सर्वसामान्य जनतेने मोठ्या...

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून पणन व्यवस्था बळकट करणार

0
मुंबई –दि.२३: शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचाशी समन्वय साधून शेतक-यांचे हित कसे जोपासता येईल यावर...