गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 152

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

पुणे, दि. १८: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार करण्यात आला.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

०००

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

मुंबई, दि. १८ : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्रनिहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवा, असे आवाहन नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगर विकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी केले आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी, सर्व नागरिकांनी सर्वेक्षणामध्ये आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाटासाठी पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. १८ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आणि पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१८ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात २९.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात २१.७ मिमी, पालघर २१.१ मिमी, रत्नागिरी १९.५ मिमी  आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९.१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :

ठाणे  १३.६, रायगड २१.७, रत्नागिरी १९.५,  सिंधुदुर्ग १९.१,  पालघर २१.१, नाशिक ३.१, धुळे ०.३, नंदुरबार ६.५, अहिल्यानगर ०.४, पुणे ६, सोलापूर ०.२,  सातारा ८.१,  सांगली ३.२,  कोल्हापूर १३.९, जालना ०.१, बीड ०.२,  धाराशिव ०.२, नांदेड ०.४,  परभणी ०.२, हिंगोली ०.६, बुलढाणा ०.१, अकोला ०.२, अमरावती ०.५, यवतमाळ ०.२, वर्धा ०.९, नागपूर ०.२, भंडारा १.६, गोंदिया ३.८, चंद्रपूर ०.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भिंत पडून व्यक्ती जखमी झाली. नागपूर जिल्ह्यात औद्योगिक रिऍक्टरचा स्पोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  मुंबई उपनगर जिल्ह्यात आगीच्या घटनेत दोन व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन व्यक्ती जखमी आणि वीज पडून एक प्राण्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी प्रशासनाने दक्ष राहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

Oplus_0

मुंबई, दि. १८: वारकऱ्यांसाठी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याचबरोबर आजपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

निर्मल भवन येथे आषाढी वारीनिमित्त आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस दूरदृष्टी प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी व पुरेसे टँकर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच सर्व पाण्याच्या स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावेत. महिलांसाठी हिरकणी कक्षांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यासंदर्भात सूचना द्याव्यात. तसेच वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही वारी “स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तीमय वारी” बनवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वारी मार्गावर आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात यावे, औषधसाठा मुबलक ठेवावा व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. काही ठिकाणी कोविड रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने सतर्क राहावे, योग्य तपासणी व खबरदारी घ्यावी. ऊर्जा विभागाने वीजवाहित तारांचे व्यवस्थापन योग्यरित्या करावे, अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यावर्षी अधिक पावसाची शक्यता असल्याने जलरोधक मंडप, जर्मन हॅंगरची व्यवस्था केली जावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे. मोबाईल नेटवर्क व्यवस्थित राहावे यासाठी संबंधित कंपन्यांना सूचना पाठविण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले की, “वारकरी ही आपल्या श्रद्धेची शिदोरी घेऊन पंढरपूरकडे चालत येतात. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देऊ नये, हीच आपली जबाबदारी आहे.”

या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रशासनास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम,  पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयंसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे संयोजक व संकल्पक राजेश पांडे यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ नियोजनाबाबत माहिती दिली.

०००

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून या कामांना गती द्यावी असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व विदर्भ विकास महामंडळाकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस आमदार सर्वश्री अनुप अग्रवाल, राम भदाणे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, श्याम खोडे, संजय पुराम, चंद्रकांत रघुवंशी, अमश्या पाडवी, वसंत खंडेलवाल, खासदार शोभा बच्छाव ,माजी मंत्री सुभाष भामरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे तापी  व विदर्भ विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध सिंचन योजनेच्या कामांचा आढावा  घेताना मंत्री महाजन म्हणाले, सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी. धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याकरिता महत्त्वाचे असलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत आवश्यक भूसंपादन करण्याबाबत कार्यवाही करावी. याबाबतचा  प्रस्ताव सादर करावा. गोंदिया जिल्ह्यातील कुवाडास नाला प्रकल्पासाठी  आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्याबाबतची कामे कालबद्ध पद्धतीने करावीत.

मंत्री महाजन यांनी जामनेर येथील भागपूर उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेऊन वाघूर उपसा सिंचन योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून घेण्यात येणाऱ्या शेततळ्यांची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शेळगाव बँरेजवरील यावल उपसा सिंचन योजना कामांना गती देण्याबरोबरच अमोदा सहकारी उपसा सिंचन योजना, बामनोद सहकारी उपसा सिंचन योजना आणि दादासाहेब जि. तु. महाजन सहकारी उपसा सिंचन योजना भालोद कामाचा आढावा घेऊन या योजनेच्या कामाबाबतही सूचना दिल्या.

बैठकीत तापी प्रकाशा बुराई उपसा सिंचन प्रकल्पाचा आढावा, अक्कलपाडा (निम्न पांझरा) धरण पूर्ण क्षमतेने भरण्या संदर्भात अतिरिक्त भूसंपादन करणे तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता बाबत भागपूर उपसा सिंचन योजना, टप्पा-१ व टप्पा २ ता. जामनेर,  वाघुर प्रकल्प शेततळयांच्या व उर्वरित कामांसदंर्भात, ता. जामनेर, यावल उपसा सिंचन योजना (उध्भव शेळगांव बॅरेज) ता. यावल, जि. जळगाव व बामनोद, भालोदा, आमोदा प्रकल्पांची आढावा, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत कुवाडहास नाला प्रकल्प आढावा, इसापूर जलाशय उपसा सिंचन योजना प्रस्तावित करणे, अकोला शहर विकास योजनेसाठी पाटबंधारे विभागाद्वारे विट्टपा व मोर्णा नदीचे निळी व लाल ते रेष आखणी सर्व्हेक्षण नकाशे निरस्त करणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली.

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव श्री. मराळे, दिव्यांग कल्याण विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री कडू म्हणाले की, पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या सर्व मजुरीची कामे मनरेगात समाविष्ट करावीत, फळपिके व दुग्धव्यवसायालाही ‘मनरेगा’शी जोडावे, ‘मनरेगा’मधील मजुरी ३१२ रुपये वरून ५०० रुपये करण्यात यावी, दिव्यांग व विधवांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे या मागण्या बैठकीत करण्यात आल्या.

या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री गोगावले म्हणाले, या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून, योग्य तो अभिप्राय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्य शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन अदा करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

मंत्रालयात नागपूर व रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, रत्नागिरी जिल्हा बैठकीस आमदार शेखर निकम, नागपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाबा आष्टणकर उपस्थित होते. रत्नागिरी बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्ष श्री. कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारशी संबंधित विषयांबाबत विभागाने सर्वंकष माहिती तयार करावी. यासंदर्भात लवकरच दिल्ली येथे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. रेशनकार्ड शोध मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण बंद झाल्यास धान्याचा कोटा वढविणे शक्य होईल. धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल कमिशन वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना ओळखपत्र देण्यात यावे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्राधिकृत करावे. तसेच ऑफलाईन धान्य वितरणाची परवानगी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, शेखर निकम, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भू-संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करुन काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावे. मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रगती पथावरील कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. प्रस्तावित प्रकल्पांचा परिपूर्ण अभ्यास करून नियोजन करावे. पाणी वितरण प्रणालींची तातडीने अंमलबजावणी करावी. प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ संस्था आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना मंत्री राठोड यांनी यावेळी दिल्या.

यावेळी रत्नागिरी व राजापूर मतदार संघांतील मृद व जलसंधारण प्रकल्प व भूसंपादनाची सद्यःस्थिती, कामांची सद्यःस्थिती व नवीन कामांसह तिवरे, (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) धरणाची उंची वाढविण्याविषयी आढावा घेण्यात आला.

०००

राजू धोत्रे/विसंअ

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या कामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

मुंबई दि.१७ : बुलढाणा जिल्ह्यातील मृद व जलसंधारण अंतर्गत नवीन प्रकल्प मापदंडात बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील तसेच विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी हरमोड सिंचन तलावाची उंची वाढवून मोहेगाव नदीवर बांध टाकून पावसाचे पाणी लिफ्ट करून तलावात साठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच, गिरडा (ता. बुलढाणा) येथे साठवण क्षमतेसह नवीन स्टोरेज डॅम, नळगंगा धरण (ता. मोताळा) शेजारील किन्होळा शिवारातील १८५ हेक्टर ई-क्लास जमिनीवर नवीन स्टोरेज डॅम आणि उबाळखेड (ता. मोताळा) येथील मव्हाडी शिवारात नवीन धरणाच्या निर्मितीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागांना लवकरात लवकर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी मंत्री राठोड यांनी दिले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

ताज्या बातम्या

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

0
मुंबई, दि.२१ : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक...

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...