गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 153

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १७: पैठण शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उर्वरित ४०० घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पैठण शहरातील इतर विकास कामांतर्गत पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे, आपेगाव येथील मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पूर्ण करण्यात यावीत. याचबरोबर पैठण शहरातील विविध विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

मंत्रालयात पैठण नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार विलास गुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी अंभोरे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नगर परिषदेमार्फत स्थानिक निधीतून घनकचरा व्यवस्थापन कामे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यसेवेद्वारे करण्यात यावीत. कचरा संकलन, रस्ते झाडलोट, नालेसफाई, कचरा वाहतूक तसेच मान्सून तयारीच्या अनुषंगाने शहरातील मोठे नाले जेसीबीद्वारे स्वच्छ करण्यात यावेत. घनकचरा व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, जिल्हावार्षिक योजनेंतर्गत दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स व शिवाजी बालउद्यान, ६८ व्यावसायिक गाळ्यांची कामे पूर्ण करावीत.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

पालघर जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १७ : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवावा, याबाबतची कार्यवाही विभागाने जलदगतीने करावी, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.

मंत्रालयात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक काशीद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.वाय.सी.साळे, डॉ.एस.एस.नारखेडे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. सध्या पालघर येथे एकही शासकीय कृषी महाविद्यालय नाही तसेच महाविद्यालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. येथील जनतेची मागणी लक्षात घेता याबाबत कृषी विभागाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, दि. १७: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षापेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा. तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वारी महामार्ग सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले  यांनी दिल्या.

राज्यातील सर्व पूल व साकवांचा आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री भोसले बोलत होते. बैठकीस सचिव (बांधकाम) संजय दशपुते उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अदाज हवामान विभागाने दिला असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, पुल व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर एखादा पूल धोकादायक असेल तर त्या ठिकाणी वाहतूक बंद करुन पर्यायी मार्ग तातडीन उपलब्ध करून द्यावा. तसेच त्या ठिकाणी नवीन पूल, साकव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. धोकादायक पुलाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हवलता न येणारे बॅरिकेट्स लावावेत. स्थानिक पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांना धोकादायक पुलाविषयी माहिती कळवावी. पर्यायी रस्ता सुस्थितीत असेल याची काळजी घ्यावी. धोकादायक पुलावर ठळक अक्षरातील फलक लावण्यात यावेत. महामार्गावरील वापरात नसलेल्या पूलांच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून ते बंद करावेत. सार्वजनिक इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. यापूर्वी पावसाळापूर्व विभागामार्फत करावयाची कामे या बाबात मे महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती या मध्येही सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले की, सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील याची काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः गणपती उत्सव काळात या मार्गावरून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम पूर्ण करावे. विना अडथळा वाहतूक सुरू राहील, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. परशुराम घाटात पर्यायी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. नियमाप्रमाणे सर्व वळण रस्ते तयार करावेत. वळण रस्ते पूर्ण झाल्यानंतरच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी. घाट रस्त्यांवर जाळी बसवणे, ते सुस्थितीत ठेवणे तसेच दरड कोसळल्यास किंवा इतर अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

वारी महामार्गावर वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा उभाराव्यात. या मार्गावरील पुल, साकव यांचे कठडे दुरुस्त करावेत. तसेच या मार्गावरील पुलांचीही तपासणी करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने वारी मार्गाची सर्व कामे करण्यात यावीत. वारीसाठी मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ॲपचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

मुंबई, दि. १७ : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी, खते आणि बियाणे पुरवठा यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टरवर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर  बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे, असे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी धरणात ५१५ मीटरपर्यंत पाणीसाठा करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती कपूर यांनी यावेळी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट

पुणे, दि. १७: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार

या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटनस्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूव्हींग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.

उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.

०००

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी १ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

मुंबई, दि. १७ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले असून आयबीपीएस कडून दिनांक 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत. आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएस कडून पाठविण्यात येणार आहेत.

या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा इतरांकडून तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. राज्यातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

मंत्री  सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महामंडळ अंतर्गत सर्व उपकंपनी यांच्या संचालक मंडळाची बैठक झाली.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए. बी. धुळाज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, महामंडळाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सर्व उपकंपनी यांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्धतेबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच महामंडळाच्या योजनांबाबत दिनदर्शिका तयार करण्यात यावी. महामंडळाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असावे.

या बैठकीत यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात आली. महामंडळाच्या संचालक मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. १७ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. आदिवासी योजनांचे सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आराखडा पुस्तिका उपयुक्त ठरणार असल्याचे मत मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी खासदार हेमंत सावरा, आमदार भीमराव केराम, आमदार संजय पुराम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, या आराखडा पुस्तिकेत टीआरटीआयच्या आगामी वर्षातील संशोधन, प्रशिक्षण, मूल्यांकन व धोरणात्मक उपक्रमांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शक ठरेल. कामाच्या या आराखड्यामुळे कामास गती येऊन सर्व कामे विहित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

०००

शैलजा पाटील/विसंअ

पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १७: लहान मुले तंत्रज्ञानस्नेही असतात तसेच ते नवनवीन भाषा देखील लवकर शिकतात. बृहन्मुंबई महानगर पालिका देशातील आर्थिकदृष्ट्या संपन्न महानगरपालिका असून पालिकेने आपल्या शाळा संपूर्ण देशासाठी पथदर्शक म्हणून विकसित कराव्यात तसेच विद्यार्थ्यांना जर्मन, जपानी यांसारख्या विदेशी भाषा देखील शिकवाव्यात, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या नव्या शैक्षणिक सत्राच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या वरळी मुंबई येथील शैक्षणिक परिसरात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिका ११०० शाळा चालवीत असून ३.५० लाख विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य व भोजन मोफत देत असल्याबद्दल पालिकेचे अभिनंदन करताना शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय कौशल्य विकास व खेळासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईत खेळांची मैदाने कमी असल्यामुळे शाळांना रोटेशन पद्धतीने मैदाने उपलब्ध करून द्यावीत असे राज्यपालांनी सांगितले.

फिनलँड देशाच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक केले जाते असे नमूद करून पालिकेने आपल्या काही शिक्षकांना तेथील शिक्षणपद्धती समजून घेण्यासाठी पाठवावे असे राज्यपालांनी सांगितले. गरिबीतुन लोकांना बाहेर काढण्यासाठी शिक्षण ही एकच किल्ली असल्याचे नमूद करून पालिकेतील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल ९३ टक्के लागल्याबद्दल राज्यपालांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शाळेत पोषण आहार देताना ज्या विद्यार्थ्यांना अंडी खाणे चालत असेल अशा विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्याबाबत देखील पालिकेने प्रायोगिक तत्वावर सुरुवात करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.

यावेळी राज्यपालांनी प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक साहित्य व चॉकोलेट्सचे वाटप केले. राज्यपालांनी वर्गखोल्यांची पाहणी केली तसेच खगोलशास्त्र प्रयोगशाळेला भेट दिली. पालिकेच्या शाळेतून ९७ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनीचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिका कन्नड, तमिळ, मराठी, हिंदी, उर्दू आदी आठ माध्यमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून राज्य परीक्षा मंडळासह, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आदी मंडळांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.  मुंबई महानगरपालिकेचे शैक्षणिक बजेट ४००० कोटी रुपयांचे असून पालिका विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, महानगरपालिका उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

०००

वर्सोवा खाडी येथील मासेमारी बंदराच्या कामाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १७ : वर्सोवा खाडी येथील प्रस्तावित मासेमारी बंदराच्या कामास गती देऊन लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

वर्सोवा व सातपाटी बंदरांसंबंधात व अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले की, वर्सोवा खाडी परिसरातील मच्छीमारांची उपजीविका मोठ्या प्रमाणावर मासेमारीवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्सोवा खाडी येथील प्रस्तावित मासेमारी बंदराच्या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेऊन कामकाजाला सुरुवात करावी.

मंत्री राणे यांनी अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाचा आढावा घेतला. या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन बांधकामाची पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी तालुक्यातील मत्स्य बंदराचा विकास याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

०००

मोहिनी राणे/ससं/

ताज्या बातम्या

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

0
नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध...

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...