गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 154

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

मुंबई, दि. १७: कोकण विभागात भरती-ओहोटी व चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, विविध योजनांच्या लाभक्षेत्रातील पिकाखालील क्षेत्र नापिक होणे, गोड्या पाण्याचे स्त्रोत भरतीच्या पाण्यामुळे क्षारयुक्त होणे, तसेच लाभक्षेत्रातील गावांना भरती व पुराचा धोका निर्माण होणे आदी समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे बृहत आराखड्यातील नवीन योजनांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

रोजगार हमी योजनेसंदर्भात मंत्री गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीस आमदार किरण सामंत शेखर निकम, वित्त विभागाचे सहसचिव विजय शिंदे, कोकण विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाचे उपसचिव रोशन हटवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गोगावले म्हणाले, सद्यःस्थितीत राज्य निधी अंतर्गत उपलब्ध निधीतून खारभूमी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. तथापि, नुकसानीस तोंड देणाऱ्या आणि भविष्यकालीन धोके लक्षात घेता नव्या खारभूमी योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून साहाय्य मिळणे गरजेचे आहे.

या निधीतून कोकण विभागातील ६६ खारभूमी योजनांची कामे हाती घेता येतील. यासाठी सुमारे ४४२.७९ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, या योजनांमुळे अंदाजे ६,९२० हेक्टर क्षेत्र पुनःप्राप्त होणार आहे. या कामांना अधिक गती देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण    

मुंबई, दि. १७: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि ६ जुलै, २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची तसेच अन्य व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.

०००

येत्या नवरात्रौत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन-मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ : श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १,८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व बाबी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही बाबी समांतर पातळीवर करण्यात याव्यात.  तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, हे दाखवत असताना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्व्हे करा

मुंबई, दि. १७: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या स्थापनेसाठी या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना जागेचा सर्वे करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा- आष्टा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, गौरव नायकवडी आदी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीकरिता जागा अंतिम झाल्यानंतर त्या जागेचा कालमर्यादेत विकास करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, वाळवा तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवे आयाम मिळणार असल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई, दि. १७ : मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत मंत्री श्री. लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

मंत्री श्री.लोढा यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी एक सोहळा होऊन अविस्मरणीय ठरावा, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित पालकांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. पालक संघाची महिन्यातून एकदा शिक्षकांसोबत बैठक आयोजित करावी त्यातून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महा विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुढच्या पिढीला कळावे यासाठीही महिन्यातून एकदा शाळांमध्ये विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.

मंत्री श्री. लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी दिली. यापुढे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास मंत्री प्रयत्नशील राहतील, असा दृढ विश्वासही कंकाळ यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सहायक उपायुक्त मनीष वळंजू, कवळे मठ महापालिका शाळेच्या प्रशासकीय प्रमुख श्रोमती सायली पाटील यांच्यासह पालिकेच्या डी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७,  पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या  महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी,  स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १७ : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या दिशेने आज आणखी एक पाऊल टाकण्यात आले असून सागरी सुरक्षेसाठी नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

भाऊचा धक्का येथे मंत्री श्री. राणे यांनी नव्याने तैनात होत असलेल्या गस्ती नौकेची पहाणी केली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच गस्ती नौका पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात ड्रोन टेहळणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन हाय स्पीड गस्ती नौका तैनात करण्यात येत आहेत. या नौकांमुळे अवैध मासेमारी रोखण्यासह किनारपट्टीवरील सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या नौकांमुळे मच्छिामारांचीही सुरक्षा होणार आहे. अशा प्रकारच्या एकूण १५ बोटी तैनात करण्यात येणार असून आता पाच बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत वॉटर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. वॉटर मेट्रो हा एक उपयुक्त आणि चांगला प्रकल्प असून यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

अत्याधुनिक गस्ती नौकेमध्ये १५ लोकांच्या बसण्याची क्षमता असल्याने त्यामध्ये सागरी पोलीसही असणार आहेत. तसेच या नौकेस सुझुकी कंपनीची २५० एचपीची दोन इंजिन असून याचा वेग ३० नॉटीकल मैल आहे. अधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज या नौकेमध्ये रडार, ट्रान्सपॉन्डर, त्वरित प्रतिक्रिया प्रणाली यांचा समावेश आहे. द्रिष्टी, क्रुझ आणि फेरिस कंपनीची ही नौका संपूर्ण फायबरची आहे. १३ मीटर पेक्षा जास्त लांबी असणाऱ्या या बोटीची इंधन क्षमता ९०० लीटर आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती
  •  जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. ७ शाळेत उत्साह
  •  विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत

सांगली, दि. १६, (जिमाका): शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणवाव्यात. शिस्त, वेळेचे महत्त्व, पुस्तकवाचन, मैदानी खेळ, फटाक्यांना फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरण संवर्धन, तंबाखू व अमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे. उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद शाळा, बामणोली व सांगली मिरज कुपवाड महापालिका शाळा क्रमांक 7 सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, मोफत गणवेश व पुस्तके वितरीत करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा बामणोली येथील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड तर महापालिका शाळा क्रमांक 7 येथील कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ, मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते यांच्यासह महानगरपालिका माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पटावर नोंदले गेलेले प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शाळा बालकांचे भावविश्व घडविते. सामाजिक विकासात व राष्ट्र जडणघडणीत शाळेची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षारंभाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची नियमित हजेरी व वेळेवर उपस्थिती यावर लक्ष देऊन त्यांच्या अंगी शिस्त बाणवावी. शाळेच्या 200 मीटर परिसरात अंमली पदार्थ, तंबाखू विक्री केलेली आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास बडतर्फ केले जाईल. शैक्षणिक वर्षारंभीच शाळेच्या स्वतःचा पॅटर्न तयार करा. यामध्ये दीपप्रज्वलनावेळी मेणबत्तीचा वापर टाळणे, फटाक्यांना फाटा देणे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणे, शाल, श्रीफळाचा खर्च विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वळवणे अशा बाबी आवर्जून कराव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान पालकांच्या कथाकथन स्पर्धा घ्याव्यात. त्यांना रक्कम रूपये पाच हजारांचे बक्षीस देऊ, असे घोषित केले. तसेच, विद्यार्थ्यांना पुस्तके, खेळणी पुरवण्याबाबतही सूचित केले. शाळेचे पटांगणाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ करून शाळांचे सुशोभिकरण करण्यात आले होते. पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख वरिष्ठ अधिकारी, स्थानिक शासकीय अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आदिंच्या सहभागाने पारंपरिक वेशभूषेत आलेल्या प्रातिनिधिक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरीत करण्यात आली. माध्यान्ह भोजन जेवणात गोड पदार्थ देण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल व त्यांच्यामध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल, अशा पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

उन्हाळ्याची सुट्टी संपून शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ अंतर्गत दि. 16 ते 30 जून या कालावधीत राज्यात व जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे. वय वर्षे 4 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत असून, याअंतर्गत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासन निर्णयानुसार नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात “100 शाळांना भेटी देणे” हा उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

०००

पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका): शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते. ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हे स्वागत करण्यासाठी हजर होते दस्तुरखुद्द पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी विविध उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी. जिल्हाभरात आज शाळाप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेत येणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे शाळेत आलेले पहिले पाऊल पुष्प, भेटवस्तू,मिठाई, सवाद्य मिरवणूक अशा उत्साहात साजरे झाले.

जि.प. केंद्र शाळा सातारा येथे पालकमंत्री शिरसाट यांनी केले चिमुकल्यांचे स्वागत

शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा देशपातळीवर नावलौकिक करणारा ठरावा. या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक यांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. सातारा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश उत्सवावेळी पालकमंत्री शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,  शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, मुख्याध्यापक भावले, शाळेत प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न व प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारा उत्कृष्ट नागरिक बनावा यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत, शाळेच्या गुणवत्ता व सेवा सुविधासाठी शासनाचा निधी कमी पडू देणार नाही. राज्यात आज सर्वत्र शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाचा दिवस असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव संस्मरणीय आणि उत्साहपूर्ण व्हावा यासाठी शासन स्तरावर प्रत्येक अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये प्रवेश उत्सव साजरा होत आहे. शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळा मधील शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेत आहे. या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण ,विज्ञान. तंत्रज्ञान ,आरोग्य तपासणी, क्रीडा विकास, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, आहार याबरोबरच सर्वांगीण शिक्षण होण्यासाठी पोषक वातावरण शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिल्या बद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी कौतुक केले. कार्यक्रमात पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

अशोकनगर, ब्रिजवाडीत इमावकल्याण मंत्री सावे यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अशोक नगर आणि ब्रिजवाडी येथील शाळेत इतर मागास वर्ग बहुजन कल्याण, दुग्धविकास तसेच दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले.

मंत्री सावे म्हणाले की, महानगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट झाल्या असून या शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय तसेच खेळाचे मैदान हे सुद्धा उपलब्ध असल्यामुळे मनपा शाळांची पटसंख्या वाढलेली दिसून येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.  या प्रसंगी राजू शिंदे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक संजय मडके व तिलोत्तमा मापारी तसेच शिक्षक विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

सुदामवाडी येथे जिल्हाधिकारी बनले सारथी

जि.प. उच प्राथमिक शाळा सुदामवाडी केंद्र बोरसर येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या विद्यार्थ्यांना सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसवून त्यांना शाळेत आणण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या ट्रॅक्टरचे सारथी बनले.  सरपंच शोभाताई जगधने, उपसरपंच अर्चनाताई शेवाळे, नायब तहसिलदार महाजन, मंडळ अधिकारी फालक, जितेंद्र चापानेरकर, प्राचार्य वैद्य, प्रा. बाबासाहेब सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पवार, पद्माकर शेवाळे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदाट, केंद्रप्रमुख दिलीप ढमाले, संजय शिंदे तसेच सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश, पुस्तके आदी वाटप करण्यात आले. त्यांचे भेटवस्तू आदी देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्याभरात आज सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व अधिकारी उपस्थित होते.

०००

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा

सातारा दि. १६: चालू शैक्षणिक वर्ष  शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, अमर नलवडे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सातारा,  प्रदीप शेंडगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती माण,  चंद्रकांत खाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी, विजयकुमार कोकरे, अधिव्याख्याते -डाएट, लक्ष्मण पिसे, गटशिक्षणाधिकारी,  साधना झणझणे, केंद्रप्रमुख आंधळी उपस्थित होते.

यावेळी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट, मोजे यांचे वाटप करण्यात आले. एक पेड़ माँ के नाम अंतर्गत मान्यवर व विद्यार्थी,पालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...

शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

0
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस...