गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 155

नागरिकांच्या तक्रारीतील तथ्य लक्षात घेऊन मोहपा गावाचे लवकरच पुनर्सर्वेक्षण – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि. १६: मोहपा येथील घरांचा झालेला सर्व्हे याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. मूळ मालकी एकाची तर मालमत्ता पत्रावर नावे दुसऱ्यांची आली आहेत. यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून तेथील गरजू रहिवाशांना वंचित रहावे लागत आहे. सुमारे 1763  मालमत्तांच्या सर्वेक्षणामध्ये बहुसंख्य लोकांनी वेळोवेळी याबाबत सामूहिक तक्रारी केल्या आहेत. यातील तथ्य लक्षात घेऊन मोहपा गावाचे लवकरच पुनर्सर्वेक्षण करण्याची घोषणा महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

नागपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोहपा गावातील 2017 मध्ये भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने झालेल्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी दिसून आल्या. याबाबत सावनेरचे लोकप्रतिनिधी डॉ. आशिष देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी बैठकीतच हा निर्णय जाहीर केला.

ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन कसोसीने प्रयत्न करत आहे. आपल्या जिल्ह्यात श्री क्षेत्र आंभोरा देवस्थान हे तीर्थक्षेत्रासह आता पर्यटन स्थळाच्या दृष्टीने महत्वाचे म्हणून गणले गेले आहे. या प्रकल्पासाठी 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून यातील कायदेशीर तिढा लवकर मार्गी लावू, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

या ठिकाणी हरिनाथ मंदिर, चैतन्येश्वर मंदिर, राम मंदिर, बुद्ध विहार, भक्त निवास, दुकानांचे गाळे, पार्किंग व्यवस्था, गार्डन, ॲडव्हेंचर स्पोर्टस्‌, पॅराग्लायडिंग आदी सुविधा या आंभोरा भागात स्वयंरोजगाराचे नवे मार्ग देतील, असे ते म्हणाले.

नागपूर सुधार प्रन्यासने गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमितीकरण केलेले अभिन्यास नागपूर महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत तीन महिन्यात कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील शासकीय जमीन हस्तांतरणाबाबत एक महिन्याच्या आत शासकीय जमीनीबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नगरपंचायत गोधनी (रे) येथील विविध विकास कामासाठी शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या ठिकाणी म्हाडामार्फत विकसीत केल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी नगरपरिषदेने तत्काळ जागेची उपलब्धता करुन देण्याचे निर्देश त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले. यातील सुविधा या म्हडामार्फत विकसीत केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

०००

विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळा, गावाचे नाव उज्ज्वल करावे – पालकमंत्री अतुल सावे

  • जिल्हा परिषद व सर्व शासकीय शाळांचे बळकटीकरण करणार
  • आता पहिलीपासून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षण

 नांदेड, दि. १६: आज शाळेचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. या दिवशी मुलांचा उत्साह वाढावा, म्हणून राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या तसेच इतर शालेय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले आहे. यावेळी मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पालक, विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा संदेश दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच उत्कृष्ट कार्यातून देशाचे, गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय शाळा बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पालक, शिक्षकांचे आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत केले. पहिल्या दिवशी सर्वजण उत्साहात शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करु या. या वर्षभरात आपण सर्वजण शाळेत उपस्थित राहू या. प्रत्येक नागरिक व विद्यार्थी शिकला पाहिजे असा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण सर्वानी मिळून त्यांचा हा संकल्प पूर्ण करु या, असेही आवाहन त्यांनी केले.

आजपासून सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांमधून सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शिक्षण मिळणार आहे. शासनाच्यावतीने सर्व शाळामध्ये डिजीटलायझेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावले जात आहेत. शिक्षकांनी जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याचे पालकांशी चर्चा करुन शिक्षकांनी संवाद साधला पाहिजे, यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पुढील काळात चांगले काम होईल. आज विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

०००

 

कोल्हापूर शहरासाठीच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहरासाठी असलेल्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.

कोल्हापूर महापालिकेअंतर्गत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या तक्रारीबाबत महापालिका आयुक्त, मुख्या अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्यासमवेत चर्चा झाली. कोल्हापूरवासियांना दोन वेळचे स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने तातडीने अडचणी दूर करून योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. हे काम करणाऱ्या कन्सल्टंट तसेच पुरवठादारानेही याबाबत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून वारंवार येणाऱ्या त्रुटींचा विचार करून एक चांगला पर्याय शोधून योजना अखंडित सुरू राहण्यासाठी काय काय करता येईल याबाबतही नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठा करणे, बी बियाणे यांचा पुरवठा करणे तसेच या अनुषंगिक प्रश्नांबाबतचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समवेत झाला. लिंकिंगचा प्रश्न, खतांचा पुरेसा पुरवठा आणि बी बियाणांचा पुरवठा याबाबत यावेळी चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील विविध पुरवठादारांसह कृषी अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी स्तरावर लावून त्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढावा असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी कागल नगरपरिषदेतील 2003 पासून सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या देय रकमेबाबत कागल नगरपालिका कर्मचारी संघटना यांच्या विनंती अर्ज बाबत बैठक घेण्यात आली. संबंधित नगरपालिका प्रशासनासह यावेळी जिल्हा नगर प्रशासन अधिकारी तसेच संबंधित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या देय रकमांबाबत शासनाकडून संबंधित निधी मिळाल्याशिवाय देता येणार नाही तसेच नगरपालिका फंडात तेवढा निधी नसल्याने एक रकमी सर्व रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना देता येणार नसल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी नगरपालिका फंडातील मर्यादांचा विचार करता याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर पुढील आठवड्यात बैठक लावावी लागेल अशी माहिती दिली.

कागल शहरातील म्हाडा गृहप्रकल्पाबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. याबाबत म्हाडा प्रशासन व संबंधित सदनिका धारक उपस्थित होते. याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी मुंबई येथील वरिष्ठांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत राज्यस्तरावर बैठक लावून येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही त्यांनी सदनिका धारकांना दिली. कागल एमआयडीसी येथील ओसवाल एफएम टेक्स्टाईल एक वर्षापासून बंद असल्याकारणाने तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आयुक्त कामगार पुणे, सहाय्यक आयुक्त कामगार इचलकरंजी यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी तेथील काम करीत असलेल्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या देय रकमा तातडीने मिळाव्यात यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. यानंतर येत्या दोन दिवसात संबंधित बँका, कंपनीचे मालक व कामगार विभागाने एकत्रित बैठक लावून यावर निश्चित असा तोडगा काढावा. त्यानंतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नियमाप्रमाणे देय रकमांचा तपशील एकमेकांना देऊन याबाबत अंतिम निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करावी अशा सूचनाही या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

तसेच गडहिंग्लज मधील नव्याने विकसित होत असलेल्या क्रीडा संकुलच्या अडचणीबाबत जिल्हा परिषद व संबंधित पुरवठादार यांच्यासोबत बैठक झाली. क्रीडा संकुलाच्या कामासाठी आवश्यक जागेतील असणाऱ्या वृक्षांची तोडणी करण्यासाठी परवानगी देणेबाबत चर्चा झाली. नगरपालिकेच्या अधिकारात असणाऱ्या नियमांप्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी तातडीने परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

०००

पूल, साकवांच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

सिंधुदुर्गनगरी दि. १६ (जिमाका): पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुल आणि साकवांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्ह्यातील धोकादायक साकव तसेच पूल नागरिकांच्या वापरासाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साकवांच्या शेजारी साकव नादुरुस्त असल्याचा फलक लावा जेणेकरुन दुर्घटना होणार नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आलेला आहे अशा ठिकाणचे साकव वापरासाठी पुर्णपणे बंद करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रीय महामार्गाबाबत निर्देश देताना ते म्हणाले की, पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ दुरूस्ती करा. रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार झाले पाहिजेत. जेणेकरुन वारंवार ही समस्या निर्माण होणार नाही. हे काम आगामी काळात सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रवासामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता श्री. शेलार, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, श्रीमती पवार, श्री. सावंत आदी उपस्थित होते.

०००

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

मुंबई, दि.१६ : राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत.

विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत, आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

धरती आबा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ६३५ गावांचा समावेश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • राज्यातील ३२ जिल्ह्यांना योजना लागू होणार

पालघर दि. १६ (जिमाका): देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातील मनोर येथे करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, (दूरदृश्यप्रणालीद्वारे) आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष  पाशा पटेल, माजी मंत्री रवींद्र चव्हाण ,खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार सर्वश्री राजेंद्र गावित , स्नेहा दुबे– पंडित, राजन नाईक, हरिश्चंद्र भोये, निरंजन डावखरे, आदिवासी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे उपस्थित होते.

धरती आबा योजनेंतर्गत गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक घरात गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, माता कल्याण, पोषण आहार अशा एकूण 25 योजना धरती आबा योजनेच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहेत. ज्या गावांमध्ये 500 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे तसेच ज्या गावात 50 टक्के पेक्षा जास्त आदिवासी समाज राहतो अशा गावांचा समावेश या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, गडचिरोली यांसह इतर दोन जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये 50 आदिवासी लोकसंख्या असेल तरी ते गाव धरती आबा योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

वैयक्तिक पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीस तर सामूहिक पद्धतीमध्ये आदिवासी समूहाचा या योजनेमध्ये विचार करण्यात येणार असून  17 विभागाच्या 25 विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आदिवासी समाजामध्ये धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार असून आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी आहे.

भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असे म्हटले जात असे. पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रज राजवटीविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी बंड करून आदिवासी समाजाला न्याय दिला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्ह्यामध्ये तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार – पालकमंत्री गणेश नाईक

येत्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या माध्यमातून दहा लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा मूलभूत आराखडा तयार करून तो कृतीमध्ये आणण्यासाठी सर्व विभागांना शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम दिला होता. तो सर्व विभागाने यशस्वीरित्या पूर्ण केला असून येत्या काळात दीडशे दिवसाचा कृती आराखडा देण्यात येणार आहे. या आराखड्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने कामाला लागली असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

वन विभागामार्फत राज्यात 11 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने वन विभागाची गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू आहे. तसेच येत्या साडेचार वर्षांमध्ये आठ 250 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले आहे. पालघर जिल्हा निसर्गरम्य जिल्हा आहे. आता या जिल्ह्याची प्लास्टिक मुक्त पालघर जिल्हा दुर्गंधी मुक्त पालघर जिल्हा या ध्येयाकडे वाटचाल चालू असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यास सकारात्मक – मंत्री मंगल प्रभात लोढा

जिल्ह्यामध्ये 735 शासकीय शाळा असून या शाळांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

वाढवण बंदरामध्ये रोजगार मिळण्यासाठी जो अभ्यासक्रम आवश्यक आहे ते सर्व अभ्यासक्रम विभागामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत मोखाडा येथील शासकीय माध्यमिक शाळा, गुहिर ता. वाडा येथील शासकीय माध्यमिक शाळा या नूतन इमारतीचे आणि रायतळे व आपटाळे ता. जव्हार येथील प्रधानमंत्री जनमन अंतर्गत बहुउद्देशीय केंद्राचे आभासी पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी कौशल्य व रोजगार संबंधी उपक्रम राबविण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि वाढवण पोर्ट प्रा. लि. यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सवलतीच्या व्याजदरात डायमेकर क्लस्टर साठी जे. एन. पी. ए. (JNPA) आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेंतर्गत सवलतीच्या व्याजदरात निधी उपलब्ध करून देणारे निधीपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत कस्टम डॉक्युमेंटेशन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थीना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि कॉनफेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीज यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पालघर जिल्हा अंतर्गत शासकीय आयटीआय मधील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व ब्लू स्टार प्रा. लि. औद्योगिक आस्थापने दरम्यान सामंजस्य करार करण्यात आले तसेच वसई-विरार शहर महापालिकाअंतर्गत सर डी. एम. पेटिट रुग्णालय येथील विस्तारित इमारतीचा आभासी पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले., मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त परिमंडळ 3, विरार कार्यालय, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग कार्यालय, वाहतूक शाखा विरार विभाग कार्यालय, भरोसा सेल वसई-विरार कार्यालय, विशेष शाखा वसई विरार कार्यालय, दळणवळण व तंत्रज्ञान विभाग, वसई विरार कार्यालय यांचे आभासी पद्धतीने मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  करण्यात आले.

बांबू लागवड

वसई तालुक्यातील विरार पूर्व मधील खैरपाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गणेश नाईक तसेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू लागवड अभियानांतर्गत बांबूची लागवड केली.

000

समृद्ध शिक्षणव्यवस्थेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर व शिक्षक-पालक सुसंवाद महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर, दि. १६: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे शाळाभेटी दरम्यान केले.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांचे औपचारिक स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी औषधी वन उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल क्लासरूम, आयसीटी लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, औषधी वन उद्यान, टेरेस गार्डन आदी सुविधांची पाहणी करत त्याबाबत समाधान व्यक्त केले. पीएम श्री योजनेअंतर्गत विकसित झालेली ही शाळा जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.

मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी पालकांनी अभिमानाने सांगितले की, “या शाळेमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, शिक्षकांची मेहनत दिसून येते, विविध उपक्रम राबवले जातात, यासाठी आम्ही मुलांना या शाळेत पाठवतो. तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डावर लिहिण्याचाही सराव दिला जातो. आधुनिक शिक्षण पद्धतीचा लाभ मिळतो.” या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार सर्वश्री विलास तरे, राजन नाईक, राजेंद्र गावित, निरंजन डावखरे, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. एन. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, तसेच विविध विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग, मुख्याध्यापिका, पालक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

राज्य शासनाच्या ‘१०० शाळा भेट’ उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री पालघर दौऱ्यावर असून १६ व १७ जून २०२५ रोजी जिल्ह्यातील १४२ शाळांना मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भेटी देणार आहेत. या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नाते दृढ होत असून, शाळेतील उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

०००

 

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही

मुंबई, दि. १६ : वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात, याकरीता बरेचसे वाहनधारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात. आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात.

मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत, असे असतानादेखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा सायकल कॅरीअरवर कुठलीही कारवाई होणार नाही, परिपत्रकात नमूद केल आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांच्याकडून स्वागत

मुंबई, दि. १६ : विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी वरळी नाका शाळा संकुलमधील विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

वरळी नाका शाळा संकुल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य प्रकल्प संचालक संजय यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, समग्र शिक्षा अभियानाच्या सहायक संचालक सरोज जगताप, जी दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा गांगुर्डे, संकुलातील सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

यावेळी यादव यांनी शिक्षक विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

 

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे  आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मंत्रालयात मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.

यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, कॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.

सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

ताज्या बातम्या

कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा):    कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि...

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे...

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी मुंबई, दि. २१ :  कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना...

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या...

0
सातारा दि.२१ - पावसाचे प्रमाण व धरणातून विसर्ग कमी झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे बाधीत, शेती, पशुधन, घरे, विद्युत यंत्रणा, रस्ते, पुल व अन्य सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ...

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून लोकाभिमुख कामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात वर्धा प्रथम येईल यासाठी प्रयत्न करा वर्धा, दि.२१ (जिमाका) : वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व...