गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 156

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध – मंत्री प्रा.डॉ. अशोक वुईके     

नाशिक, दि. १३ (जिमाका): राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. तेथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी आदिवासी विभाग सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. आज इगतपुरी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगांव येथे विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवासह आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास आयुक्त तथा ,शबरी वित्त व आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त (मुख्यालय) दिनकर पावरा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नाशिक अर्पित चौहान, तहसीलदार अभिजीत बारवकर, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी विभाग) नाशिकचे कार्यकारी अभियंता निरज चोरे,   सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग प्रदिप दळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, पेसा क्षेत्रातील पदभरतीला सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून  शैक्षणिक वर्ष २०२५–२६  वर्षाच्या अखेरपर्यंत, बाह्यस्रोतामार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेला अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी विद्यार्थी-केंद्रीत दृष्टिकोनास प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक साधनसामग्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवासाच्या सुविधा, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर विशेष भर देत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेंतर्गत आदिवासी महिला व मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात यावी. या क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध दिला जाईल. आदिवासी विकासाच्या अन्य योजना पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील असे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आज गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबाबत त्यांचा गौरव करतांना मनस्वी आनंद होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच इतर मुलांना प्रोत्साहन मिळणार आहे. आदिवासी जाती-जमाती आयोगास संविधानात्मक दर्जा प्राप्त झाल्यामुळे शासनाचा आभार व्यक्त करीत मंत्री झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 15 जून  ते 30 जून 2025 पर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियान राबविण्यात येत आहे. या अतंर्गत सर्व अनुसूचित जमातीना शासकीय कामकाजासाठी  लागणारे आवश्यक दस्तावेज आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, रहिवास दाखले, रेशन कार्ड, बँक खाते, किसान क्रेडीट, ईपीक कार्ड, सिकल सेल तपासणी, पी.एम.आवास योजना, उज्वला गॅस योजना, वीज जोडणी, जॉब कार्ड यांचा समावेश आहे. यासह 5 मेडीकल मोबाईल रूग्णवाहिकांद्वारे आदिवासी वाडी-वस्तीवर जावून रूग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त श्रीमती बनसोड यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.

मंत्री डॉ. वुईके यांनी शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवविद्यार्थ्यांचे स्वागत

मंत्री डॉ. वुईके व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवोगत विद्यार्थ्यांचे फुल देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

डिजीटल एनवायरमेंट क्लासरूमचे उद्घाटन व ऑनलाईन संवाद

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प नाशिक व सार्वजनिक बांधकाम ( आदिवासी) विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंडेगाव ता.इगतपुरी या आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतर करणे व डिजीटल क्लासरूम व टॅब लॅबचे उद्घाटन मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका येथील धरती आबा जनजातीय ग्रामउत्कर्ष अभियान योजनेच्या राज्यस्तरीय प्रचार व प्रसिद्धी शुभारंभ कार्यक्रमात मंत्री डॉ. वुईके यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग नोंदवित ऑनलाईन संवाद साधला.

राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

यावेळी आश्रमशाळांमधील इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी कला व विज्ञान परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रूपये दहा हजार, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रूपये सात हजार व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रूपये पाच हजार रकमेच्या धनादेश व सन्मान पत्राचे प्रदान मंत्री डॉ. वुईके आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ए.एन.एम नर्स यांना किट वाटप

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी नियुक्त परिचारिका यांना आरोग्य किट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शबरी वित्त व विकास महामंडळाचे वाहन वाटप व लाभार्थींना धनादेश वाटप

शबरी वित व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला बचत गट यांना धनादेशाचे प्रदान तसेच व्यवसायासाठी वाहनाच्या चावीचे प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

इगतपुरी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगांव येथील विद्यार्थ्यांसोबत आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

मंत्री डॉ. वुईके यांच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्य बँड पथक संचलनाने झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 15 जून  ते 30 जून 2025 पर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रचार रथाला मंत्री डॉ. वुईके यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान कक्षाला भेट दिली. तसेच यावेळी आयोजित शिबिरात आदिवासी लाभार्थ्यांना ई-रेशन कार्ड, जिवंत 7/12, मनरेगा जॉब कार्ड, जातीचे दाखले, महिलांना बेबी केअर किट अशा विविध लाभांचे प्रदान करण्यात आले.

०००

“मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”– पालकमंत्री गुलाबराव पाटील

▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्या व दप्तरांचे वाटप

▪️इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय

जळगाव दि. १६ (जिमाका): “माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती संस्कारांची पाठशाळाही आहे. शिक्षक, पालक आणि अधिकारी यांनी समन्वयाने मुलांमध्ये विश्वास व स्वाभिमान रुजवायला हवा. मी बैलगाडीतून आलो कारण शिक्षणाच्या प्रवासाला मातीचा गंध असतो… आणि त्या गंधातच खरी समृद्धी असते,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाळधी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी उपस्थितीने एक वेगळीच शैक्षणिक आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कोरली.

इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुद्द पालकमंत्र्यांनी बैलगाडी चालवत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत मिरवणूक काढली. त्यांनी जुन्या शाळेतील आठवणींना स्नेहपूर्वक उजाळा दिला. पुष्पवृष्टीत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात हात घालून शाळेत प्रवेश केला. शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केले, हे विशेष!

या शाळा प्रवेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्ये

▪️बैलगाडीतून आगमन – शिक्षणाच्या प्रवासाला ग्रामीण मातीचा गंध देणारा अनोखा उपक्रम

▪️पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, दप्तर, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत

▪️पालकमंत्री तब्बल दोन तास विद्यार्थ्यांमध्ये रमले – जीवनदृष्टीचे बळ दिले

▪️पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नव्या पर्वाला सुरुवात

▪️पालकमंत्र्यांतर्फे दीड लाख वह्यांच्या वितरणाचा – औपचारिक शुभारंभ

गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित होत असलेले बदल व त्या अनुषंगाने असलेली जबाबदारी यांची जाणीव करून दिली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नवीन सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झालेला असून, ही शाळा एक मॉडेल शाळा आहे.

उपशिक्षक झाकीर सर आणि उपशिक्षिका ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच विजय पाटील आणि मुख्याध्यापक एन. के. देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती

माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, प्रकल्प अधिकारी सुरेखा तायडे, उपसरपंच वंदना साळुंखे, मच्छिंद्र कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, माजी सरपंच आलिम देशमुख, माजी जि.प. सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, निसार देशमुख, यासीन हाजी, जमील बेग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय महाजन, सुनील झंवर, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्राम विकास अधिकारी शरद धनगर, सुलतान पठाण, तसेच तीनही शाळांचे मुख्याध्यापक – एन. के. देशमुख, अकिल सर, श्रीमती पटेल जहाआरा, मधु साळुंखे, अकबर शेख, यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

२२ जुलै ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार

मुंबई, दि. १६: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे.

यापूर्वीच देशी गायीस ‘राज्यमाता–गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजननक्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे. यासोबतच देशी गायींच्या दुध, शेण, गोमुत्राचे उत्पादन व विपणन यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

२२ जुलैला विविध उपक्रमांचे आयोजन

‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ साजरा करताना चर्चासत्रे, शिबिरे, प्रदर्शने व विविध स्पर्धा यांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. राज्य शासनाच्या आयुक्त, पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने या दिवसाचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी लागणारा खर्च गोसेवा आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे.

राज्यातील देशी गोवंशाच्या जतनासाठी व लोकजागृतीसाठी शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह ठरत असून, स्थानिक देशी गायांच्या संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

202506131640357401…

रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट

मुंबई, दि. १६: भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर १००.४ मिमी, मुंबई उपनगर ८६ मिमी, रायगड ७२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १६ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ३५.६, रायगड ७२.१, रत्नागिरी ११२.७,  सिंधुदुर्ग ११०.७,  पालघर ३३.८, नाशिक ५.३, धुळे ६.९, नंदुरबार २.४, जळगाव ५.९, अहिल्यानगर १.५, पुणे २२.१, सोलापूर ०.८,  सातारा १७.१,  सांगली १६.६,  कोल्हापूर ५१.४, छत्रपती संभाजीनगर ११, जालना ३.५, बीड ०.७, लातूर ०.७,  धाराशिव १, नांदेड ०.२,  परभणी ०.३, बुलढाणा ५.१, अकोला ७.४, अमरावती ७.४, यवतमाळ ०.१, वर्धा ०.५, नागपूर ०.४, गोंदिया ४.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नदी पात्रातील नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन व्यक्तींचा मृत्यू तर सात व्यक्ती जखमी झाल्या असून नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून दोन तर जालना जिल्ह्यात तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वीज पडून तीन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे तर भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू, मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी, बुलढाणा जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू आणि चार व्यक्ती जखमी तर धुळे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती जखमी झाला आहे. पुणे येथील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शेजारी कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल दुर्घटनेत चार व्यक्तींचा मृत्यू आणि ५१ व्यक्ती जखमी झाल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

 

विद्यार्थ्यांनो देश व राज्याचा नावलौकीक वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. १६:  शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ च्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रांतर्गत उभारण्यातत आलेल्या शाळेचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. या प्रसंगी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. या शाळांमधील विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत. माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जी. अब्दुल कलाम, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यानींही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे.

शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमूलाग्र बदल केले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा’ असे सांगतले होते. त्यांच्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवानही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद

कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा, असे आवाहन करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आतापासून तयारी करा, असे त्यांनी सांगितले.

‘माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम’ उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. परंतु, शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कारही घडवावे, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थी आज उच्च पदावर काम करीत आहेत. शिक्षकांनी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांर्गत शाळांना भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिक्षकांनी शिक्षणाची पायाभरणी भक्कम करावी म्हणजे शैक्षणिक इमारत भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद विविध शाळंमध्ये विविध उपक्रम राबविण्यात राज्यात अग्रेसर आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असून यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी सांगितले.

या कार्यक्रमास शिक्षक, पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

मुंबई, दि.१६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे डॉ. फिरोदिया यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.

कुमारगुरू इन्स्टिट्यूशन्स, कोईम्बतूर यांनी संस्थापक तथा उद्योगपती डॉ. एन. महालिंगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण, उद्योग, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सन २०१४ साली या पुरस्काराची स्थापना केली होती.

यावेळी कुमारगुरु इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष बी. के. कृष्णराज वानवरायार, उपाध्यक्ष एम. मणिकम, कार्याध्यक्ष शंकर वानवरायार, एम.बालसुब्रमण्यम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते.

०००

 

माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि.१६ : माजी सैनिकांच्या विविध मागण्या लक्षात घेता सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पावनगड निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे, उपसंचालक पुनर्वसन ले.कमांडर ओंकार कापले, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदचे कोकण  प्रांतचे अध्यक्ष मेजर विनय देगांवकर, राज्य सचिव वीरेंद्र महाजनी, एअर मार्शन प्रदीप बापट, ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव उपस्थित होते.

माजी सैनिकांची जिल्हा कल्याण समिती स्थापन करून या समित्यांमध्ये आखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेच्या सदस्यांना घेणे, माजी सैनिकांना विविध शासकीय सर्वेक्षण, मतदार नोंदणी, तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणे, निवृत्त अग्निवीर सैनिकांसाठी शासकीय व निमशासकीय खात्यामध्ये १० टक्के नोकरीमध्ये आरक्षण जाहीर करणे, शांतीकाळात दहशतवादी निरसन कार्यात शहिद सैनिकांच्या विधवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत अनुकंपा योजनेनुसार रूजू करून घेण्याबाबत सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.

सैनिक सेवेदरम्यान बहाल झालेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची शासकीय सेवेकरिता वैधता देणे या सर्व मागण्यांचा शासन सकारात्मकतेने विचार करून सविस्तर प्रस्ताव तयार करून याला मान्यता घेण्याचे आश्वासन मंत्री देसाई यांनी अ. भा. पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या सदस्यांना दिले.

०००

संध्या गरवारे/विसअ/

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे, दि.१६ : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे आदी उपस्थित होते.

आज शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला असे सांगून श्री. पवार म्हणाले, भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अडीअडचणी येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

शिक्षकानेही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्यादृष्टीने अध्यापन केले केले पाहिजे.

राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा  प्रयत्न आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी आलेगावचे पुनवर्सनचे सरपंच नवनाथ झुंबर कदम, मुख्याध्यापिका अनिता खताळ, ग्रामसेवक अर्चना भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कुतवळ आदी उपस्थित होते.

0000

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलिस निरीक्षक मंडलिक यांच्यासह महावितरण आदी  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, यासाठी जलद गतीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर करावे. वीज पडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवित हानी व वित्त हानी झालेली असेल त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यात शासनाकडून २५० क्विंटल मोफत बियाणाचे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाणाचे लाभार्थ्यांना योग्य रित्या वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्री भुजबळ म्हणाले की, तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई असून या भागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. या परिसरात १ जुलैनंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा. येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुणेगाव – दरसवाडी – डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाचा आढावा

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेतला. अस्तरीकरणाचे  काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. आवश्यक तेथे पोलीस सुरक्षा पोलीस विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अस्तिरीकरणाचे राहिलेले टप्पा १ मधील काम जूनअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

येवला शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

येवला शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन सुरक्षेबाबत पोलिसांनी पेट्रोलिंग करून बंदोबस्त ठेऊन नियोजन करावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी. येवला शहरात निर्माण करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात यावी. येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.

०००

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनआढावा

सातारा दि. १५ (जिमाका): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, नगर रचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी हनुमंत हेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 1,153 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात  नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

यामध्ये महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा या चार तालुक्यातील 265 गावांचा समावेश आहे. या क्षेत्रात पर्यटन वाढीच्या अनुषंगाने अनेक योजना प्रस्तावित आहेत.

पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विकास केंद्र संकल्पना राबविण्यात येणार असून पर्यटकांच्या सुविधांसाठी हे हब राहील याद्वारे सभोवतालच्या स्पॉक्स मधील पर्यटन नंदनवनाशी जोडले जातील. या अंतर्गत बामनोली जलपर्यटन विकास केंद्र विकसित करण्यात येणार असून यामध्ये कॅम्पेनिंग साईट, साहसी उपक्रम,  नौकाविहार, रोपवे अशा ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. यामध्ये होम स्टे, ऍग्रो टुरिझम या योजना 20 गावांमध्ये राबविण्यात येणार आहेत.

१४ उद्योग समृद्धी केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे. कृषी उत्पादन प्रक्रिया, तयार उत्पादने, बांबू आधारित उत्पादने, औषध आधारित उत्पादने यांचा समावेश राहील. 44 ग्राम समूह विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये दळणवळण, आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांचाही समावेश आहे.महाबळेश्वर विभागामध्ये 30 जावळीत 33 सातारा 27 आणि पाटणमध्ये 57 असे पर्यटक नंदनवन एकूण 147 प्रस्तावित आहेत. यामध्ये नियोजनबद्धरीतीने वृक्षारोपण करण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्या अखंड प्रवासापासून आरामदायी निवास आणि जेवणाचे पर्याय आणि प्रसन्न अनुभव या पर्यटक नंदनवन मधून पर्यटकांना मिळेल. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होईल असा विश्वास आहे.

या प्रकल्पाच्या विकासासाठी अल्पकालीन, मध्यम कालीन व दीर्घकालीन अशा योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. पाच एकरावर न्युरोपॅथी सेंटर, शंभर एकरामध्ये आयुष मंत्रालयामार्फत बोटॅनिकल गार्डन प्रस्तावित आहे.

०००

ताज्या बातम्या

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

0
आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण मुंबई, दि. २१ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध...

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक...

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच...

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली...

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत...

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD)...

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...