गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 157

जखमी शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१५:अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

आज येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अवकाळी पावसामुळे यांच्या घराचे पत्रे उडून झालेले नुकसानीची पाहणी तसेच यामुळे जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस मंत्री भुजबळ यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाणे व ट्रॅक्टरचे वाटप

राष्ट्रीय गळीत धान्य विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भुईमूग(155 क्विंटल), सोयाबीन (95 क्विंटल) बियाण्यांचे वाटप मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शेतकरी बाळू कदम, सोमठाणा देश, असराबाई खांडेकर, नगरसुल, कानिफनाथ वारे, पाटोदा यांना राज्य कृषी पुरस्कृत यांत्रिक यांत्रिकरण योजनेतून ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.

०००

शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन जबाबदारी पार पाडावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १५: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून ३० जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. माऊलीच्या पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, पालखी मार्गावरील सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण उपविभागाचे उपअभियंता रवीकुमार आंबेकर, लोणंद नगराध्यक्ष मधुमती कालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, लोणंद मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री देसाई आणि मंत्री पाटील यांनी नीरा नदीवरील दत्त घाट तसेच लोणंद येथील पालखी मुक्काम स्थळाची पाहणी करून तयारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेनी उत्तम नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, पालखीतळ स्वच्छता, शौचालये, पाणी, आरोग्य, सुरक्षा, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

लोणंद नगरपंचायतीला पालखी सोहळ्याच्या सुविधांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. पालखी मार्गावरील प्रशासनाने पालखी मार्गावर टँकरद्वारे पालखी तळावर वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा. पालखी मार्गावर स्थिर वैद्यकीय पथके, औषध साठा, रुग्णवाहिका सुविधेसह सर्प व श्वान दंश इंजेक्शन उपलब्ध  ठेवावीत. सर्दी, ताप, खोकला आदी आजार असणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक तपासणीची व औषधे व्यवस्था आरोग्य पथकांकडे उपलब्ध ठेवावीत. महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. विद्युत जनरेटरची व्यवस्था ठेवावी.  जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील हद्दीतील सर्व शौचालये सुस्थितीत व स्वच्छ ठेवावीत. तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता ठेवावी.

पोलीस विभागाने पालखी आगमनावेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करून नियंत्रण ठेवावे. यासाठी अतिरिक बंदोबस्त तैनात करावा.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पालखी प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयातील 10 टक्के बेड राखीव ठेवण्याची व्यवस्था करावी. पालखी मुक्कामी असणाऱ्या तळावर सायंकाळी पुरेसा विद्युत पुरवठा करावा. प्रसंगी जनरेटर ही उपलब्ध ठेवावेत, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी रस्त्यांच्या मार्गांची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्यासह आरोग्य, विद्युत, बांधकाम, रस्ते नगरपालिका अधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने संयुक्तकरित्या पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळणारआहे. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच थेट त्याचे गुगल लोकेशन मॅपही पाहायला मिळणार आहे. हा क्यूआर कोड वारकऱ्यांच्या दर्शनासाठी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी सर्व ठिकाणी प्रसिद्ध करावा, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

०००

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त

मुंबई, दि.१५: पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ जणांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

०००

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात
  • दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार

मुंबई, दि. १५ : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन या संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

०००

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट

मुंबई, दि. १५:   भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात मागील २४ तासामध्ये (१५ जून रोजी सकाळपर्यंत) सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी., रायगड जिल्ह्यात ६५.३ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ५३.८ मिमी, ठाणे २९.६  आणि यवतमाळ जिल्ह्यात १७.५ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती  राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड गौरीकुण्डरिकुण्ड येथे आज दिनांक १५जून, २०२५ पहाटे ०५.४५ वाजता हेलिकॉप्टर अपघात झाल्याने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दापोडा गाव, भिवंडी, ठाणे (प.) या ठिकाणी केमिकल गोडाऊनला लागलेल्या आगीच्या  घटनेत एक व्यक्ती मृत झाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

नागपूर जय कमल कॉम्प्लेक्स येथील आगीच्या घटनेत २ व्यक्ती मृत व १ व्यक्ती जखमी झाली आहे. जगबुडी नदीची खेड येथे ईशारा पातळी ५ मीटर असून सध्या नदीची पाणी पातळी ५.९ मीटर इतकी पाणी पातळी आहे.  जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर आहे.

मुंबई जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १ व्यक्ती जखमी झाली आहे.  वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती जखमी,  धुळे जिल्ह्यात वीज पडून एक मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून चार व्यक्ती व पाच प्राण्यांचा मृत्यू आणि पाच व्यक्ती जखमी, नंदुरबार जिल्ह्यात एक व्यक्ती मृत्यू व एक जखमी आणि अमरावती जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

०००
20250615 daily situation report

 ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १५: शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असत. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून संबंधितांना त्यांचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम १६ जूनपासून राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन पासची आवश्यकता असणाऱ्या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार असल्याचेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

०००

विभागाने घरपोच चिकित्सा सेवा द्यावी -मंत्री पंकजा मुंडे

अमरावती, दि. १५ : शासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा पशू पालनाकडे कल वाढत आहे. पशूसंवर्धन विभागाने या पशूंच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासल्यास विभागाने पशूंच्या चिकित्सेसाठी घरपोच सेवा द्यावी, असे निर्देश पशूसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

आज घेतलेल्या पशूसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पशू संवर्धन विभागाचे डॉ. वाय. एस. वंजारी, डॉ. शशिकांत कानफाडे, डॉ. संदिप इंगळे, डॉ. शिवेंद्र महल्ले, डॉ. सुधीर चौधर, डॉ. राजेंद्र पेठे, डॉ. दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या, पशूंच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी. जिल्ह्यात प्रयोगशाळा आणि चिकित्सागृह असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. प्रामुख्याने तालुकास्तरावर घरपोच सेवा देण्यात यावी. गोशाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा असाव्यात. गोशाळेला तारेचे कुंपण घालण्यात यावे. याठिकाणी दाखल होणाऱ्या पशूंना योग्य उपचार करण्यात यावे.

देशी गाय परिपोषण योजनेतून तीन हजारावर गायींना अनुदान देण्यात आले आहे. त्यासोबच मानव विकासमधून दुधाळ जनावरे वाटप आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. या वाटप करण्यात आलेल्या जनावरांची माहिती ठेवावी. तसेच त्यांना आवश्यक असलेली मदत पुरविण्यात यावी. दुधाळ जनावरांना वैरणाची आवश्यकता असल्याने वैरण विकास कार्यक्रमामधून कामे घेऊन चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. महामेष योजनेतून 217 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र प्राधिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.

यानंतर त्यांनी पर्यावरण विभागाचा आढावा घेतला. महानगरपालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेची कार्यक्षमपणे हाताळणी करावी. प्रामुख्याने नागरी क्षेत्रात पाण्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचविण्यात यावे. विभागातील सांडपाणी प्रक्रियेसाठी लागणारे पाणी गोळा करण्यासाठी संबंधित पालिकांना व्यवस्था करण्यास सांगावे. उद्योग क्षेत्रात वायू आणि जलप्रदूषणाच्या तक्रारी येतात. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्यास प्रकल्पांना सांगावे. अमरावतीमध्ये वस्त्रोद्योग आहे. त्याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा तपासण्यात यावी. वीज निर्मिती केंद्रामधून वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे प्रकल्पामधून निघणारी राख आणि सांडपाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.

०००

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. १४ जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. अर्धापूर शिवारात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठया प्रमाणात  नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा अहवाल शासनास त्वरीत सादर केला जाईल. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री अतुल सावे दिली.

आज अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, अर्धापूर शिवार, लहान शिवारात नुकसान झालेल्या केळी व पिकांची पाहणी त्यांनी केली यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदींची उपस्थिती होती.

यापूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यानुसार येत्या मंत्रीमंडळ बैठकीत नुकसानीचा अहवाल सादर करुन नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धापूर तालुक्यातील चिंचबन येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेट्टे, अर्धापूर शिवारातील व्यंकटराव साखरे, लहान शिवारातील गिरीश कल्याणकर व विठ्ठल  इंगळे यांच्या शेतात जाऊन केळी व पपई या पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा  

पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेड शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यात अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या केळी व पपई या फळ पिकांचा तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरीत अहवाल तयार करुन शासनाला सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना दिल्या.

जिल्ह्यातील केळी या पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. यासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.

या बैठकीस खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच विविध विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

000000

 

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील राजुरेश्वर, एकेश्वरी तांबवे पाणीपुरवठा योजना संदर्भात साजुर, तांबवे, किरपे, शेणोली रस्ता क्रॉसिंगबाबत बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराडचे तहसीलदार कल्पना ढवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता नजीर नायकवडी, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, रस्त्याचे काम सुरू करताना स्थानिक नागरिकांच्या व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेण्यात आल्या नाहीत. कामे करताना नळ योजनांच्या पाईपलाईन काढल्यामुळे पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी  साचून राहिले आहे. आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याकडेला बंदिस्त गटारीचा काढण्याचा विचार करण्यात आला नाही. या कामाविषयी लोकांच्या तीव्र भावना आहेत.

जोपर्यंत शेतातील पाणी काढून ओढ्याला जोडले जाणार नाही, नळ योजनांच्या नवीन पाईपलाईन टाकून नळ योजनेचे पाणी चालू करून देणे, गावांच्या बाजूला गटारांची व्यवस्था करणे ही कामे केल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत दिले. मंत्रालयात याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही  त्यांनी सांगितले.

बैठकीस  संबंधित गावचे  नागरिक उपस्थित होते.

000

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाण संदर्भातील बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे,  कराड तहसीलदार कल्पना ढवळे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी सुपने, केसे गावातील संबंधित लोकांच्या गावठाणांचा प्रश्न हा खूप वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत  प्रस्ताव पाठवून शासन स्तरावर सादर केला जाईल. शासन स्तरावर बैठक घेऊन याला शासन मान्यता  घेण्यासाठी प्रयत्न करेन. यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवावा.   गावठाणाचा प्रश्न प्रलंबित असलेल्या नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

यावेळी संबंधित नागरिकांना येणाऱ्या  अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या.

गावठाण नोंदीची अडचण असलेल्या संबंधित लोकांच्या जमिनी कोयना धरणाच्या नदीकाठावरील व भूकंपग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी वसवण्यासाठी ग्राम कमिटीद्वारे खाजगी क्षेत्रातील जमिनी संपादन करून पुनर्वसन केले आहे.  आज घडीला काही जमिनीवर मूळ शेतकऱ्यांची नोंद तर काही जमिनीवर सरकार म्हणून नोंद असल्याबाबत माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

बैठकीस  संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...