सोमवार, एप्रिल 21, 2025
Home Blog Page 16

उमरेड एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी

 नागपूर,दि. १२ : उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी भिषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारास ३० लाख रुपयांची मदत केली जात असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या दुर्देवी अपघातात मृत व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणाने उभे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यावर शासनातर्फे मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमरेड येथील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भिषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले. तर आठ कामगार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील २ कामगारांचा उपचार सुरु असतांना मृत्यु झाला.

घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देवून जखमींवर उपचारांबाबत व आवश्यक ती मदत देण्यास सांगितले होते.

आज दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने उमरेड येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कामगारांच्या जिवावर बेतणारे अपघात यापुढे होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षिततेच्यादृष्टीने जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. घटनास्थळाची पाहणी करताना त्यांच्या समवेत खासदार श्याम बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, राजेंद्र मुळक, कंपनीचे प्रमुख अरुण भंडारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे ५५ लाख तर शासनातर्फे ५ लाख अशी आर्थिक मदत दिली जाईल. याचबरोबर जखमी कामगारांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये आर्थिक मदत व शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येत आहेत. याच बरोबर मृत्यू व जखमी झालेल्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी दिली जाणार आहे.

अपघातात मृत पावलेले कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पियुष दुर्गे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे – रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ – रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे – रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर

अपघातात जखमीमध्ये मनीष वाघ – रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे – रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे – रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे – रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर.

                                             ******

धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डॉ. बाबासाहेब

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे शहरास भेट दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार ललित चव्हाण यांनी या आठवणींना दिलेला हा उजाळा…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. साहजिकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जिल्ह्यात किंवा शहरात आले होते. त्यावेळी काय घडले, वातावरण कसे होते, या गोष्टींना उजाळा दिला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळ्यात दोन वेळा आले होते.

डॉ. आंबेडकर त्यांच्या ६५ वर्षांच्या आयुष्यात धुळ्यात दोन वेळा आले होते. पहिल्यांदा डॉ. आंबेडकर २९ ते ३१ जुलै १९३७ ला धुळ्यात आले होते. त्यानंतर १७ जून १९३८ ला धुळ्यात आले होते. त्याबाबतच्या ठळक नोंदी आहेत. पहिल्यावेळी बाबासाहेब न्यायालयीन कामकाजासाठी आले होते.

शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील हुलेसिंग मोतीराम जहागीरदार-पाटील आणि मगन मथुरादास वाणी आणि इतर 16 जण यांच्यात बैल पोळयाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. यात जहागीरदार यांनी  पोळ्याच्या मिरवणुकीत आपले बैल पुढे ठेवण्यासाठीचा अर्ज केला होता. तत्कालिन प्रांताधिकार्‍यांनी जहागीरदार यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यावर जहागीरदार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या सुनावणीसाठी जहागीरदार यांचे वकील प्रेमसिंह तंवर आणि सी. एम. मुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धुळे येथे न्यायालयीन कामकाजासाठी आमंत्रित केले होते.

बाबासाहेबांच्या युक्तीवादामुळे निकाल जहागिरदार यांना अनुकुल असा लागला. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्त सर्वप्रथम 29 जुलै 1937 ला बाबासाहेबांचे धुळ्यात पहिल्यांदा आगमन झाले. त्यावेळी समतावादी दलित मंडळ, प्राणयज्ञ दलाच्या कार्यकत्यांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. त्यात पुनाजीराव लळींगकर, कॅप्टन भिमराव साळुंखे, सखाराम केदार, सुखदेव केदार, देवराम अहिरे, ए.आर.सावंत यांनी बाबासाहेबांच्या स्वागताची तयारी केली होती. बाबासाहेब धुळयात येणार असल्याची बातमी सर्वदूर पोहचल्याने खानदेशातल्या गावागावातून पहाटे चारपासून शेकडो नागरिकांचे जत्थे धुळ्यातील रेल्वेस्थानकाजवळ जमा होऊ लागले होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास बाबासाहेबांचे रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळ्यात त्यावेळी बाबासाहेबांचा दोन दिवसांचा मुक्काम होता. लळींग कुरणातील लांडोर बंगल्यात बाबासाहेब मुक्कामी होते.

न्यायालयीन कामकाजाशिवाय बाबासाहेबांनी त्यावेळी धुळ्यात काही उपक्रम राबवित सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. धुळे शहरातील विजयांनद चित्रमंदिर म्हणजे आजचे स्वस्तिक चित्रमंदिर मध्ये झालेल्या कार्यक्रमातून बाबासाहेबांनी दलित जनतेला मार्गदर्शन केले. लांडोर बंगल्यावर मुक्कामी असताना पुनाजी लळींगकर बाबासाहेबांना भेटायला गेले. लळींगकरांच्या घरी भोजन घेतल्यानंतर बाबासाहेबांनी लांडोर बंगल्याच्या आवारात अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. धुळे शहरातील गरूड वाचनालय, इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला बाबासाहेबांनी भेटी दिल्या. त्याठिकाणी त्यांनी अभिप्राय देखील नोंदविले. आण्णासाहेब लळीगकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्व-रचित अहिराणी गीतांचे गायन करीत आणि धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील शाहीर रतन जाधव यांनी बाबासाहेबांचे मनोरंजन केल्याचे सांगितले जाते. बाबासाहेब 31 जुलैस मुंबईला निघाले तेव्हा त्यांनी आण्णासाहेब लळींगकरांना नंदुरबार येथे जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करण्यास सांगितले. लळींगकरांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कॅप्टन कुर्‍हे यांच्याकडून नंदुरबार येथे साक्रीनाका परिसरात नदी किनारी जागा मिळवली. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर छात्रालयाची स्थापना केली. अनेक विद्यार्थी या छत्रालयात राहिले आणि शिकलेत. याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळ्यातील नेहरू चौकात हरीजन सेवक संघाच्या राजेंद्र छात्रालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. छात्रालयाच्या पुस्तिकेत बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय आहे. बाबासाहेब ज्या लांडोर बंगल्यावर थांबले होते, त्या घटनेला उजाळा देण्यासाठी दरवर्षी 31 जुलैस त्यांचे हजारो अनुयायी लांडोर बंगल्यावर एकत्र येतात.

ललित चव्हाण

ज्येष्ठ पत्रकार, धुळे.

00000

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची उपस्थिती

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती

कोल्हापूर, दि.१२ : राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी राज्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाने नाहून निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे, धैर्यशील तिवले उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक संपन्न झाला. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी जि. सातारा या सासनकाठीचा असतो. त्यानंतर मौजे विहे ता. पाटण, नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज ता. मिरज, कसबा सांगाव ता. कागल, किवळ जि. सातारा, कवठेएकंद जि. सांगली यांच्यासह मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या. यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे २५ हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच डोंगरावर ३० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले. अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी, पार्किंगची 34 ठिकाणी व्यवस्था, विविध ठिकाणी अन्नछत्र, दर्शन रांग व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी सनियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती

जोतिबाच्या नावानं चांगभलं…. म्हणत देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो. ज्योतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या तसेच बैलगाडी, खासगी वाहनातून, चालत भाविक डोंगरावर दाखल झाले. जोतिबा मंदिरात पहाटे धार्मिक विधीनंतर सोहळ्यास प्रारंभ झाला.
000000

डॉ. आंबेडकर कृषिक्रांतीचे जनक

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे प्रश्नच सोडविले असे नाही, तर त्यांनी या देशाच्या विविध प्रश्नांचा मूलगामी विचार केला. त्यांची मूलभूत मांडणी केली. दिशादर्शन केले. त्यांची उकल कशी होईल याचा अंदाज मांडला. त्यासाठी ते अहर्निश कार्यरत राहिले. चळवळी केल्या. ग्रंथ लिहिले. भाषणे दिली. भाषावार प्रांतरचना, पाकिस्तानचा प्रश्न, काश्मिरचा प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, पर्यावरणाच्या समस्या, जागतिक शांतता, दिवसेंदिवस ढासळत चाललेली नैतिक मूल्ये, पाणीवाटपाचे, धरणांचे, सार्वजनिक आरोग्याचे, लोकसंख्या वाढ आदी किती किती राष्ट्रीय प्रश्नांवर बाबासाहेबांनी आपल्या केवळ ६५ वर्षांच्या (१८९१-१९५६) आयुष्यात जीव ओतून नि जीव झोकून काम केले याला गणतीच नाही.

डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचा अजून सखोल अभ्यास व्हावयाचा आहे. जगभर या महापुरुषावर अध्ययन चालू आहे. त्यांचे कार्य हिमखंडासारखे आहे. डॉ. बाबासाहेब म्हणजे महासागर नि महासंगर. जगभरच्या या अध्ययनातून आता असे सिद्ध होत आहे, की बाबासाहेब बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी, समग्र उद्धारासाठी ज्या क्षेत्रांत नवीन परीवर्तनवादी विचारांची गरज होती त्या क्षेत्रासाठी त्यांनी आपल्या अनुभवातून, निरीक्षणातून नि व्यासंगातून आगळ्यावेगळ्या विचारांची मौलिक भेट दिली आहे. त्यांचे हे योगदान फार मोठे आहे.

कृषिक्षेत्राच्या संबंधात बाबासाहेबांनी जे अलौकिक कार्य केले त्याची अद्यापही अनेकांना ओळख नाही. बाबासाहेबांच्या कृषिविषयक चिंतनात कृषिक्रांतीची बीजे दडलेली आहेत असे मला नम्रपणे वाटते. भारतातल्या शेतकऱ्यांसाठी भरघोस कामगिरी करावी अशी बाबासाहेबांना अंतःकरणपूर्वक आस होती. शेतकरीवर्गाबद्दल आपले गुरु महात्मा जोतिराव फुले यांच्याप्रमाणेच त्यांना अपार आस्था होती, प्रेम होते, कळवळा होता. भारतीय संविधानाच्या काही अनुच्छेदांत शेतकरी कल्याणाचे दर्शन घडते. बाबासाहेबांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचे हे फलित आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणत, शारीरिक कष्टांची कामे करणारा सारा वर्ग एक आहे. त्यांची दुःखे, वेदना समान आहेत. आर्थिक दडपणाखाली दडपल्या गेलेल्या वर्गाने तरी जातिभेद नि धर्मभेद यांना आपल्या जीवनात बिलकुल थारा देऊ नये. डॉ. आंबेडकरांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला. सामान्य शेतकरी आणि भूमिहीन यांची हलाखी पाहिली. त्यासाठीच त्यांनी १९३६ साली ‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना केली होती. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्यांसाठी त्यांनी लढे पुकारले.

जमीनदारांनी चालवलेल्या कुळांच्या छळाविरुद्ध, पिळवणुकीविरुद्ध आवाज उठवला. महारांच्या गुलामीचे मूळ असलेली महार वतने बिल बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने मांडले. एवढेच नव्हे तर सरकारने या वतनी जमिनीवर जादा महसूल आकार वाढवला तेव्हा हरेगाव, तालुका श्रीरामपूर, नगर येथे राज्यातील महारांची जुडीपट्टी विरोधी परिषद बाबासाहेबांनी आयोजित केली. कोकणातील खोतांच्या कचाट्यातूनही त्यांनी शेतकऱ्यांना मुक्त केले. बाबासाहेबांच्या या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताची अनेक धोरणे होती. भूतारण बँका, शेतकऱ्यांच्या सहकारी पतसंस्था व खरेदी विक्री संघ यांची स्थापना व शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे कायदे यांचा समावेश होता. दि. १० जानेवारी १९३८ रोजी मुंबईत स्वतंत्र मजूर पक्षाने वीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधान-सभेवर नेला होता. मोर्चाच्यावतीने डॉ. आंबेडकरांनी काँग्रेस मंत्रिमंडळाला शेतकऱ्यांच्या ४ मूलभूत मागण्या व १३ तातडीच्या मागण्या सादर केल्या होत्या.

भारतीय शेती शेतकऱ्याला पुरेसे अन्न देऊ शकत नाही, त्याच्या गरजा भागवीत नाही याची बाबासाहेबांना पुरेपूर कल्पना होती. म्हणून शेतीकडे उत्पादनाच्यादृष्टीने पाहिले पाहिजे असे ते म्हणत.

शेती करणारांनी शेतीतील गुंतवणुकीचा बारकाईने शोध घ्यावा, असे त्यांचे सांगणे असे. आपली जमीन किती, भांडवल किती लागेल याचा शेतकऱ्यांनी अंदाज घेणे गरजेचे आहे. भारतातील शेती कशा प्रकारची आहे, त्या शेतीतून कोणत्या प्रकारचे पीक घेतले जावे याविषयी शास्त्रीय आधारावर चिकित्सा होणे महत्त्वाचे आहे. कोणते पीक घ्यावे? ते किती घ्यावे? जमीनधारणा कशी असावी? भाडेपट्टधारकाने घेतलेल्या जमिनीचा काळ किती असावा? उत्पादन घटकांचे एकमेकांशी प्रमाण कसे असावे? इत्यादी प्रश्नांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अल्पभूधारणा, मोठ्या प्रमाणावरील जमिनीचे लहान-लहान तुकडे हीच शेती व्यवसायाची व शेतकऱ्यांपुढची समस्या आहे, असे सार त्यांनी काढले होते. जमिनीच्या एकत्रीकरणाचा विचार करत असतानाच कोणाचेही नुकसान होणार नाही याचा शास्त्रोक्त पद्धतीने विचार करून मार्ग काढावा, असे ते सांगत. कुटुंबातील किती व्यक्ती शेतीकरिता उपयोगी आहेत याचाही विचार व्हावा, असे ते म्हणत.

भारतासारख्या शेतीप्रधान देशात जमीन हे केवळ उत्पादनाचे साधन नसून मालकी हक्कामुळे सामाजिक दर्जा, प्रतिष्ठा प्राप्त होत असते म्हणून प्रथमतः अस्पृश्यांना जमिनी मालकीने देण्यात याव्यात अशी त्यांनी सूचना केली. सामुदायिक शेती, राष्ट्रीयीकरण, शासनामार्फत खर्चाची तरतूद या मुद्यांनाही त्यांनी आपल्या राज्य समाजवादाच्या संकल्पनेत वाव दिला होता. कालानुक्रमे शेतीविषयक त्यांच्या विचारात क्रांतिगर्भ विकास आहे. देशातील जमीनसुधारणा कायदे, कुळकायदे, भूदान चळवळ, सहकारी शेती यांसारख्या विवध मार्गांनी परंपरागत स्वरूपाची भारतीय अर्थरचना कितपत बदलेल याविषयी त्यांनी एकदा शंका व्यक्त केली होती. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी शेतीवर आधारित उद्योगधंदे झपाट्याने वाढवावेत असा सल्ला त्यांनी ८४ वर्षांपूर्वी दिला होता. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांची दखल बाबासाहेबांनी घेतली. दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे भारतात लहान शेतीवर मोठ्या प्रमाणावर लोक अवलंबून आहेत. मग शेतकऱ्यांचे राहणीमान कसे सुधारेल? या चिंतेने ते व्यथित होत.

डॉ. पंजाबराव देशमुख (१८९८-१९६५) हे शेतकऱ्यांचे मोठे कैवारी होते. त्यांच्या नावाने अकोला येथे मोठे कृषिविद्यापीठही स्थापन झाले आहे. भारताच्या घटना समितीवरही ते होते. घटना निर्मितीच्या वेळी शेती विषयावर व शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना मांडल्या जात. पंजाबरावांनी विनंती करताच त्यांनी मांडलेल्या कल्याणप्रद कायद्याच्या प्रस्तावास बाबासाहेबांनी कायदेमंत्री या नात्याने त्वरित मंजुरी दिली होती. भारताचे कृषिमंत्री झालेल्या पंजाबरावांना बाबासाहेबांविषयी कमालीचा आदर होता. बाबासाहेबांनी विनंती करावी व पंजाबरावांनी लागलीच ती मान्य करावी असेच घडत गेले.

डॉ. बाबासाहेबांनी दिल्लीमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानावर शोभेची हिरवळ काढून तेथे गव्हाचे पीक घेतले होते. अनेक भाज्या नि पालेभाज्याही आवडीने घेतल्या होत्या. त्याचा संपूर्ण हिशोब त्यांनी लिहून ठेवला होता. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात त्यांचा मुक्काम असला, की अनेक मंडळी त्यांना भेटावयास येत. एकदा त्यांनी अट घातली, ज्यांना मला भेटावयाचे आहे, त्यांनी किमान एक झाड विद्यालयाच्या परिसरात लावावे. ‘नागसेनवन’ असे नंतर परिपूर्ण साकारले. जेथे शास्त्रीय पद्धतीने पिके घेतली जात त्या स्थळांना ते आनंदाने भेट देत. भारतीय कृषी अनुसंधान संस्था, पुसा इन्स्टिट्यूट यांच्याबद्दल त्यांना अपार आपुलकी वाटे. ‘अधिक धान्य पिकवा’ ही बाबासाहेबांचीच मोहीम होती. मोर्चाच्या वेळी शेतजमिनीची काळजी घेण्यास ते सांगत.

खोती पद्धत आणि महार वतने यांच्या निर्मूलनात त्यांनी बजावलेली भूमिका त्यांना एक नामांकित कृषित’ रचते हे डॉ. नरेंद्र जाधव यांचे मत रास्तच आहे.

शेती आणि शेतकऱ्याच्या संरक्षणाचा ज्या कायद्यांचा बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्वी आग्रह धरला त्यातील बरेच कायदे स्वातंत्र्यानंतर अंमलात आले. शेतमजुरीचे दर तुकडेबंदी, खरेदी-विक्री, शेतीकामासाठी आधुनिक अवजारे व साधने याबाबत बाबासाहेबांचे द्रष्टेपण पुढे दिसून येते.

शेती व्यवसायाचे महत्त्व वाढावे, सर्व शेतकरी वर्ग: पर्यायाने भारत सुखी व्हावा म्हणून डॉ. आंबेडकर केवळ ‘प्रार्थना’ करीत नव्हते. भारतीयांच्या सुखासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रत्यक्ष कार्य केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे, ‘शेतीवर डॉ. आंबेडकरांनी केलेल्या मूलभूत भाष्यानंतरच्या काळात शेतीक्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुणात्मक बदल झाले आहेत. उदा. हरितक्रांती, जमीन सुधारणाविषयक कायदे वगैरे. परंतु बाबासाहेबांनी ‘स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अॅड देअर रिमिडीज’ (१९१८) या आपल्या प्रदीर्घ निबंधात शेतीविषयक उपस्थित केलेले काही मूलभूत प्रश्न तसेच आहेत असे नसून तीव्रतर झाले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या लेखनातील ताजेपणा आणि विश्लेषणाची व्याप्ती व खोली लक्षात घेता ते ८४ वर्षांपूर्वी जेवढे मार्गदर्शक होते, तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आज मार्गदर्शक आहेत, असे म्हणणे रास्त ठरावे.’

जागतिक कीर्तीच्या संशोधक डॉ. गेल ऑमव्हेट यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ घटना लिहिणारे घटनातज्ज्ञ होते असे म्हणणे किंवा ते केवळ दलितांचे नेते व कैवारी होते असे म्हणणे म्हणजे त्यांचे अवमूल्यन करण्यासारखे आहे. ते ठामपणे सर्व जातीजमातीच्या कामगार आणि शेतकऱ्यांचे नेते होते. ‘ असे १९८८ मध्येच अभ्यासपूर्वकरित्या नोंदवले आहे.

सर्व थरातील सोशिक, उपेक्षित जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिकाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र जीवनाचे तत्त्वज्ञान होते. भारतीय शेतीचे त्यांनी याच दृष्टिकोनातून चिंतन केले असे म्हटल्यास ते अप्रस्तुत ठरू नये.

लेखक – सतीश कुलकर्णी, वाई
000

जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार – उद्योग मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सहकारी बँकांमधूनही होणार कर्जपुरवठा;

येत्या पंधरा दिवसांत शासन निर्णय काढण्याची उद्योग मंत्र्यांची ग्वाही

सीएमईजीपी मध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे केले कौतुक

आयटी पार्क साठी उद्योग मंत्र्यांनी सहकार्य करण्याचे तसेच जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी उद्योजकांनी योगदान देण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. १२ (जिमाका): कोल्हापुरातील आयटी पार्क साठी ज्या दिवशी जागा निश्चिती होईल, त्याच दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांबरोबरच यापुढे सहकारी बँकांमधूनही कर्जपुरवठा ग्राह्य धरण्यात येण्याबाबतचा शासन निर्णय येत्या पंधरा दिवसात काढण्यात येईल. त्याचबरोबर भविष्यात अधिकाधिक दर्जेदार उद्योग प्रकल्प कोल्हापुरात उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद-2025 हॉटेल दि फर्न येथे उद्योग मंत्री श्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष तथा नंबर वन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योग आणि कृषी चे अध्यक्ष ललित गांधी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उद्योग परिषदेला माजी आमदार सुजित मिणचेकर, पुणे विभागाचे सह संचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील,  जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामंजस्य कराराचे आदान प्रदान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ती व  उल्लेखनीय काम केलेल्या विविध बँकर्सना मंत्री श्री सामंत व पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आजच्या गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योग क्षेत्रावर 80 ते 85 टक्के गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. उद्योग क्षेत्रात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून ४ हजार कोटींचे करार करण्यात यशस्वी झाले आहे. राज्यात मेगा व अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणले आहेत. मागील वर्षा पेक्षा तिप्पट गुंतवणूक उद्‌योगक्षेत्रात वाढत आहे. यावरूनच उद्योजकांचा उद्योग क्षेत्रावर असणारा विश्वास लक्षात येतो.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पहिल्या वर्षी १२ हजार दुसऱ्या वर्षी १२ हजार तर तिसऱ्या वर्षी २३ हजार उद्योजक म्हणजे जवळपास ४० हजार उद्योजक या कार्यक्रमातून तयार झाले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक उद्योजक तयार करण्यात शासनाला यश आले आहे. या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने उद्योग निर्मितीसाठी युवक युवतींना कर्ज पुरवठा करुन या योजनेची उद्दिष्टपूर्ती केल्यास राज्यात लाखो उद्योजक तयार होतील. यासाठी दर्जेदार कार्यशाळांचे आयोजन करावे, असे सांगून कोणताही उद्योग उभारताना उद्योजकांनी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोणतीही योजना यशस्वी होण्यात त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असते. कोल्हापूर जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाल्याबद्दल मंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे कौतुक केले.

खादी ग्रामोद्योग विभागामार्गत शुद्ध मध निर्मितीला चालना दिली जात असून या माध्यमातून मध उत्पादक शेतकऱ्यांना दरमहा किमान 15 हजार रुपये उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी उद्योजकांनी योगदान द्यावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या उद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये सध्या केवळ राष्ट्रीयकृत बँकांमधूनच कर्ज पुरवठा केला जातो. बेरोजगार युवक युवतींना अधिकाधिक रोजगार निर्मिती होण्यासाठी सहकारी बँकांमधूनही कर्ज पुरवठा होण्याबाबत शासन निर्णय काढण्याचे आवाहन त्यांनी केले. यावर येत्या पंधरा दिवसात हा शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री श्री. सामंत यांनी कार्यक्रमात दिले.

उद्योग क्षेत्राला पोषक वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शहरात आयटी पार्क उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील असून आयटी पार्कचा शासननिर्णय काढून या कामाला गती देण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी सहकार्य करावे. तसेच जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यकम ही महत्वाकांक्षी योजना सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतीना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑगस्ट 2019 पासून उद्योग संचालनालयाने सुरु केली आहे.

मागील वर्षी (सन २०२३-२४) योजनेअंतर्गत १२०० लाभार्थीचे उद्दिष्ट शासनाने जिल्ह्याला दिले होते. त्यानुसार १२२२  नव उद्योजकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला असून राज्यात उच्चांकी उद्दिष्ट पूर्ती साध्य झाली आहे. १२२२ एवढ्या लाभार्थ्यांना ७० कोटी ४७ लाख रक्कमेचे अनुदान मंजूर करण्यात आले असून ३५ कोटी २२ लाख रक्कमेचे अनुदान लाभार्थीना प्रत्यक्षात कर्ज रक्कमेसह वितरित करण्यात आले  आहे. शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत योजना सुरुवातीपासून ३५५३ लाभार्थीना कर्ज मंजूर केले असून त्याअंतर्गत १९९ कोटी ४१ लाख रक्कमेचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्याबरोबरच या योजनेतून सुरुवातीपासून १८७० लाभार्थीना ११४ कोटी ३६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. हे प्रमाण सुध्दा जिल्ह्याचे उच्चांकी आहे.

गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६०कोटी रुपयांचे सामंजस्य करार

आजच्या गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे एकूण ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये एकूण ८ हजार ५५०  रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात प्रामुख्याने मे.एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड इंजीनियरिंग १२५ कोटी मे.अरविंद पाटील इंडिया लिमिटेड टेक्सटाईल १२५ कोटी मे.तेजस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड फाउंड्री उद्योग ११५ कोटी मे.नेक्स्ट लाइव प्रायव्हेट लिमिटेड इंजिनिअरिंग १०५ कोटी व मे आरिहंत टेक्समो स्पिन टेक्सटाईल १०५ कोटी अशा उद्योग घटकांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून युवक-युवतींना उद्योजक बनविण्यासाठी सक्षम करणाऱ्या आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग, सेवा प्रवर्गात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी व नवउद्योजकांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रात भविष्यात होणाऱ्या गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करुन त्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक, शैक्षणिक, वित्तीय संस्था, पायाभूत सुविधा, कृषी, पर्यटन, आरोग्य, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, मैत्री, मित्रा, शिवाजी विद्यापीठ, भारतीय पोस्ट, तंत्रनिकेतन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच बँक, सिडबी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स, कौशल्य व रोजगार विभाग, शासकीय इत्यादी संस्थांनी सहभाग दिला.

*****

राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे नातं…..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले.  ब्रिटिश सरकारच्या  म्हणजे प्रांतीय मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री होते त्यामुळे दिल्लीत त्यांचे वास्तव्य असायचे. या काळात ते देशभर फिरत होते. जनतेच्या समस्या जाणून घेत होते आणि मंत्री म्हणून त्यावर निर्णय घेत होते. 

दिल्लीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले. याच काळात,  म्हणजे दिल्लीत असताना त्यांनी देशावर दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेतले.  मग ते कामगार कायदे असोत की महिलांच्या अधिकाराचे निर्णय असोत. याच काळात बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून  राज्यघटनेचा मसुदा तयार केला तसेच त्यानंतर हिंदू कोड बिल तयार केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दिल्लीत आलेत तेव्हा ते एकटे राहत असत. माता रमाईचे निधन झाल्यानंतर तसे बाबासाहेब खूप दुखावले होते. पण आपल्या प्रकृतीच्या तपासणीसाठी त्यांचे मुंबईला नियमितपणे वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जावे लागत असे. तिथेच डॉक्टर मालवणकर यांच्याकडे डॉ सविता कबीर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली आणि त्यांचे कोर्ट मॅरेज झाले.  याच काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनेक ग्रंथाचे लिखाण केले.  देशाच्या फाळणीवरील त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी दिल्लीतच पूर्ण केला.  त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा जगप्रसिद्ध असलेला ग्रंथ  “बुद्ध आणि त्यांचा धम्म ” दिल्लीतच लिहीला. या काळात दिल्लीतील लोकांशी त्यांचे संबंध आले. हे नाते दृढ होत गेले.

उत्तर भारतीयांचा गोतावळा त्यांच्या भोवती असायचा. त्यांना बघायलाऐकायलाभेटायला लोक सतत येत असत. सुरूवातीला बाबासाहेब यांचे निवास 1 हाार्डिंग एवेन्यु (गुबंद कोठी)  येथे होते. सध्या याला टिळक मार्ग म्हणतात. त्यांचे शेवटचे दिवस सीव्हील लाईन्स येथील  26 अलीपुर रोड येथील कोठीत गेले. भारत सरकारने बाबासाहेब यांच्या स्मरणार्थ या ठीकाणी मोठे स्मारक बांधले आहे.

दिल्लीत असताना बरेच लोकांचा त्यांच्या परीच‍य झाला. हा ऋणाणुबंध वाढला. बाबासाहेबांना बरेच लोक आपले सुख दु:ख सांगत असत. बाबासाहेब यांच्या आऊट कार्टरमध्ये  त्यांचे निकटवर्ती सोहनलाल शास्त्रीजे विधी विभागात अधिकारी होतेते राहत असत. त्यांचा बाबासाहेबांशी जवळीकतेचा स्नेह होता. त्यांच्या जवळचे असलेले चौधरी देवीदास जी यांचे ही बाबासाहेब यांच्या दिल्लीतील घरी येणे जाणे होत असे.  चौधरी देवीदास यांचा मुलगा लाला हरीचंद आणि सुन भुरिया देवी यांना 2 ऑक्टोबर 1949 रोजी पुत्र रत्न झाले आणि या बालकाचे नाव गुलाब सिंग असे ठेवण्यात आले. ही आनंदाची बातमी बाबासाहेबांना दयायची होती. त्या दिवशी बाबासाहेब दिल्लीत नव्हते. ते दोन दिवसांसाठी काश्मीर दौऱ्यावर होते. बाबासाहेब काश्मीरहून परत आल्यावर कळाल्यावर चौधरी देवीदास  यांनी लाडुचा डबा घेऊन बाबासाहेबांचे घर गाठले. तेव्हा बाबासाहेब त्यांच्या मित्र  आणि आप्तांसोबत चर्चेत दंग होते. बाबासाहेबांनी चौधरी देवीदास यांना गेटमधून येताना बघ‍ून देवीदास यांचे अभिवादन स्वीकारले. देवीदास हे अंत्यत हर्षामध्ये बाबासाहेबांना सांगू लागले की त्यांना नातु झालेला आहे.  मिठाई त्याच्या आनंदात आणली आहे. बाबासाहेबांना मधुमेह असल्यामुळे त्यांनी ती खाल्ली नाही मात्रसोबत असणाऱ्यांमध्ये वाटून द‍िली. नातवाचे नाव गुलाब सिंग ठेवण्यात आले असल्याचे चौधरी नी बाबासाहेबांना सांगितले. त्यावर बाबासाहेब यांनी शुभेच्छा देत विचारलेआई आणि बाळ दोघेही बरे आहेत ना. यावर चौधरी  यांनी होकारार्थी उत्तर दिले.

बाबासाहेब म्हणालेगुलाब सिंग हे नाव काही बरे वाटत नाही. त्यांनी बाजुला ठेवलेले वर्तमान पत्र उचललेत्यात शांतीस्वरूप हे नाव वाचले आणि चौधरी यांना सांगितले की आता तुझ्या नातवाचे नाव गुलाब सिंग हे न ठेवता तु शांतीस्वरूप असे ठेव. त्याप्रमाणे चौधरी देवीदास यांनी कागदोपत्री नाव बदलून शांतीस्वरूप हे नाव ठेवले.

पुढे शांतीस्वरूप यांनी भारत सरकारच्या गृह खात्यात नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी  ‘सम्यक’ या नावाने प्रकाशन संस्था सुरू केली. उत्तर भारतातील नवोद‍ित लेखकांना त्यांनी संधी दिली. वर्ष 2020 मध्ये त्यांचे निधन दिल्ली येथे झाले. आताही त्यांची प्रकाशन संस्था आहे.  हयात असेपर्यंत ते सर्वाना मोठया अभिमानाने सांगतमाझे शांतीस्वरूप हे नाव  बाबासाहेबांनी ठेवले आहे. अशा अनेक आठवणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील आहेत.

 प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वच स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. आजही राजधानीत त्यांच्या आठवणी संसदेपासून ते दिल्लीतील लोकांमध्ये  जाग्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !

अंजु निमसरकर-कांबळे माहिती अधिकारी

0000000

अंजु निमसरकर/ विशेष लेख /दि.11.04.2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि.१२: राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधूनत्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबईनाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असूनया सहली नागरिक,पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीराजगृहप्रिटींग प्रेसपरळ येथील बि.आय.टी चाळवडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयफोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमीत्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दिक्षाभूमीडॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयकामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. सदर टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व नागरिक/ पर्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेले टूर सर्किट हे सामाजिक समता आणि ज्ञानप्रसाराचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. या टूर सर्किटद्वारे त्यांच्या जीवनाशी  निगडीत स्थळांना भेट देऊन पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील चैत्यभूमीदीक्षाभूमीमुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश या उपक्रमात आहेज्यामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल. हा उपक्रम बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या संदेशाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे. पर्यटन विभागाचा हा प्रयत्न स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देईल आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. या टूर सर्किटला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेलअसा विश्वास आहे. पर्यटन क्षेत्रातून सामाजिक जागरूकता वाढवण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी होईल.

 

समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी अभिनव उपक्रम : प्रधान सचिव अतुल पाटणे

प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित टूर सर्किट हा एक अभिनव उपक्रम आहे. बाबासाहेबांचे विचारत्यांचे सामाजिक योगदान आणि भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे कर्तृत्व यांचा गौरव करणे हा या सर्किटचा उद्देश आहे. या टूर सर्किटद्वारे पर्यटकांना बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा अनुभव घेता येईलज्यामुळे त्यांचा इतिहास आणि तत्त्वज्ञान समजण्यास मदत होईल. चैत्यभूमीदीक्षाभूमी यांसारखी स्थळे केवळ धार्मिक नव्हेतर सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थाने आहेत. हा उपक्रम पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. डॉ. बाबासाहेबांचा समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरेल. पर्यटन संचालनालयाने यासाठी सखोल नियोजन केले असूनपर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

टूर सर्किटची वैशिष्ट्ये

आयोजनाची ठिकाणे : मुंबईनाशिक आणि नागपूर

कालावधी : दि. १४ व १५ एप्रिल२०२५

 सुविधा: प्रत्येक शहरात दररोज दोन बसेसद्वारे सहलटूर गाइडअल्पोपहारप्रथमोपचारपिण्याचे पाणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे वितरण.

सहलीसाठी संपर्क :
मुंबई ९९६९९७६९६६
नाशिक ९६०७५२७७६३/ ९६५७०२१४५६
नागपूर ९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५

000

जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :-  जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये. जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च व्हावा याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांग‍ितले.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे. हा निधी कुठे , किती आणि कशा प्रकारे खर्च केला जाईल यावर लक्ष असणार आहे. कामांच्या बाबतीत कोणाचीही तक्रार येता कामा नये. आपला जिल्ह्याचा दरडोई उत्पन्नात पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावर्षी निधीचे योग्य नियेाजन करण्यात येईल. जलजीवनची निकृष्ट कामे केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.  हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी माजिक संस्थांची मदत घेण्यात येईल. आजारी प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी वनतारा सारख्या संस्थेची मदत घेऊन काम करणार आहोत. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोबत बैठक झाली असून गुजरात वनविभाला पत्रव्यवहार केला जात आहे.  लवकरच हत्तीं आणि इतर वन्यप्राण्यांचा त्रास संपेल अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

पालकमंत्री म्हणाले, प्रशासनाच्या कामात आता कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजेच Artificial intelligence चा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्थेशी बोलणी सुरू असून जिल्ह्याच्या विकासात तंत्रज्ञानाची महत्वाची मदत होणार आहे असेही ते म्हणाले.

खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाय, म्हैस तसेच शेळी अशा दुभत्या जनावरांचे वाटप करा जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय महामार्ग ते समुद्र किनारा यादरम्यानच्या रस्त्यांची रुंदी वाढवावी, यामध्ये विशेष करुन मालवण, वेंगुर्ला, देवगड तसेच आंबोली या रस्त्यांचा समावेश करावा. तसेच जिल्ह्यात लोकमान्य टिळकांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारावा, जागतिक दर्जाचे उद्यान उभारावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली.

आमदार निलेश राणे यांनी आपला जिल्हा ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने आणखी प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या. ग्रामीण पाणी पुरवठा वर निधी खर्च होत नाही आणि त्याची तरतूद शून्य टक्के कशी  असा प्रश्न उपस्थित केला. आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा निधी अपुऱ्या प्रमाणात असून तो वाढविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

झोपडपट्टीधारक, रस्ता रुंदीकरण बाधितांच्या तक्रारींवर कार्यवाही करावी; पाणीटंचाईची समस्या दूर करा – वनमंत्री गणेश नाईक यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, दि. 11 (जिमाका): वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्यांवर आधारित 345 हून अधिक निवेदने सादर केली.
वनमंत्री नाईक यांनी शक्य असलेल्या निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष सूचना देऊन दिले. उर्वरित निवेदनांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल आणि त्याबाबत पुढील जनता दरबारात अर्जदारांना माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या जनता दरबाराला माजी खासदार डॉ. संजीव नाईक, संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे, मनोहर डुंबरे, नारायण पवार यांच्यासह विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजच्या जनता दरबारात नागरिकांनी विशेषतः पाणीटंचाई, रस्ता रुंदीकरणामुळे झालेले अन्याय आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील गैरव्यवहार यांसारख्या समस्यांवर भर दिला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मूळ झोपडीधारकांच्या नावाऐवजी इतरांची नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारी झोपडीधारकांनी मांडल्या.
रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या अनेक नागरिकांना अद्याप घरे व दुकाने न मिळाल्याने त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. विविध भागांतील पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांनी सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निवेदने सादर केली. या पार्श्वभूमीवर, वनमंत्री नाईक यांनी रस्ता रुंदीकरण बाधितांना लवकरात लवकर न्याय देण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. ज्या प्रवृत्तींनी सर्वसामान्यांच्या जीवनात दुःख निर्माण केले आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी, असा स्पष्ट सल्लाही ना. नाईक यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “लोकांच्या समस्या अनेकदा स्थानिक पातळीवर सुटत नाहीत. अशा वेळी त्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांची निराशा दूर व्हावी, हाच जनता दरबार घेण्यामागचा उद्देश आहे. येथे आलेल्या प्रत्येक प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आमचे निश्चित प्रयत्न राहतील. आतापर्यंत झालेल्या जनता दरबारातील तक्रारींपैकी जवळपास 60 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आम्हाला यश आले आहे. नागरिक आनंदाने पुष्पगुच्छ किंवा शाल घेऊन येतात, पण मी इथे केवळ लोकसेवेच्या भावनेतून आलो आहे.”
ते पुढे म्हणाले, “निश्चितच, लोकांना दिलासा देण्यासाठी जनता दरबार हे एक उत्तम माध्यम आहे. महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि कंत्राटी सेवांसारखी अनेक आव्हाने आहेत. घनकचरा व्यवस्थापनात आयुक्तांना काही अडचण असल्यास निश्चितपणे मदत केली जाईल, कारण ठाणेकर जनता आपलीच आहे. एकेकाळी मी 15 वर्षे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि आता संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणतीही जनता असो, ती आपलीच आहे. जनतेच्या समस्या व व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
कांदळवनाबाबत बोलताना वनमंत्री नाईक म्हणाले, “सागरी किनाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने कांदळवन तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. जर कोणी कांदळवनात अतिक्रमण केले, तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास अनधिकृत बांधकामे पाडली जातील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही बख्शले जाणार नाही. गरीब नागरिकांनी बांधलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी केले जाईल. उदाहरणार्थ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 1.5 लाखांची वस्ती आहे, ज्यात मूळच्या 42 आदिवासी वाड्या-पाड्यांमधील लोक राहतात. त्यांचे पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर उत्तन आणि ठाणे येथे केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन होईल, असे कोणतेही काम केले जाणार नाही. सध्या वर्सोवा ते नालासोपारा येथे पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत.”
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम तयार केला आहे, असे सांगून ना. नाईक म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, जसे की जल जीवन मिशन, शुद्ध पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन या सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच देशाची प्रगती होत आहे. जनसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. विशेषतः वनविभागाच्या अनेक अडचणी होत्या, परंतु दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत वनविभागाच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा केली आहे.”
जनता दरबार कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी कोर्ट नाका येथील महात्मा ज्योतिबा फुले विचार कट्टा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

ठाणे, दि.11(जिमाका):- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:
* टिटवाळा स्टेशन: 25 कोटी रुपये
* शहाड स्टेशन: 8.4 कोटी रुपये
* दिवा स्टेशन: 45 कोटी रुपये
* बेलापूर स्टेशन: 32 कोटी रुपये

याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे.

या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण...

धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियाजित वेळेत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज...

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

0
अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार ! मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४...

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!

0
आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा मुंबई, दि. २० : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते...