शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1611

अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला तपशीलवार आढावा

राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई, दि. 1 : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.  

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (शनिवारी) बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, यांच्यासह विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विविध विमा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीची स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती.  त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार आणि प्राथमिक माहितीनुसार  राज्यात सुमारे 325 तालुक्यांमधील 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

विभागनिहाय जे नुकसान झाले आहे, ते पुढीलप्रमाणे : कोकण (46 तालुके/97 हजार हेक्टर), नाशिक (52 तालुके/16 लाख हेक्टर), पुणे (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (72 तालुके/22 लाख हेक्टर), अमरावती (56 तालुके/12 लाख हेक्टर), नागपूर (48 तालुके/40 हजार हेक्टर).

साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिके, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.

००००

मुंबईत एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिली राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

मुंबई, दि. 31 : माजी उपप्रधानमंत्री व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट्स) येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा आरंभ करण्यात आला.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्यावतीने’रन फॉर युनिटीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राहुल कुल, मुख्य सचिव अजोय मेहता, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देऊन शुभेच्छा दिल्या.

एकता दौड आरंभानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भारताला एकसंघ ठेवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिनी सर्व भारतीय एकतेची शपथ घेतात. एक भारत श्रेष्ठ भारतहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत.

केंद्र सरकारने370 कलम हटवून जम्मू काश्मिर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश केले, हे भारताचे अविभाज्य अंग आहेत. सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानून सर्वांना एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

एकता दौडमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, जलद कृती दल (क्यूआरटी), कमांडो, पोलीस पथके, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्काऊट गाईडसह क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडचा आनंद घेतला.

तत्पूर्वी महेश नावले कराटे अॅन्ड डान्स असोसिएशन आणि एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. एकता दौडचा समारोप मरीन ड्राईव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला.

000

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली शपथ

मुंबई, दि. 31- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.

मंत्रालयात आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीदिन हा देशभर राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी देशाची एकता टिकवून ठेवण्याची भावना व्यक्त करणारी शपथ उपस्थितांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ राव, गृह विभागाचे सचिव अमिताभ गुप्ता आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

वांद्रे येथे एकात्मतेचा संदेश देत मुंबई उपनगराची एकता दौड संपन्न

शिक्षण व क्रीडामंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने आज शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडला स्थानिकांसह विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरात तसेच जिल्हा प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने  क्रीडा मंत्री ॲङ आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ॲम्फी थिएटर, कार्टर रोड, वांद्रे पश्चिम येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी 8.00 वाजता एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक यांना राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने राष्ट्रीय एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याबाबत शपथ दिली. झेंडा दाखवून एकता दौड या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ही एकता दौड ॲम्फी थिएटर, कार्टर रोडपासून ओटर्स क्लबपर्यंत आणि तेथून परत ॲम्फी थिएटरपर्यंत आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, एन. सी. सी. विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.

या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी सत्यनारायण बजाज, मुंबई उपनगर,  माजी उपमहापौर  अलका केरकर, मा. नगरसेविका सांताक्रूझ हेतल गाला, नगरसेविका बांद्रा पश्चिम-  स्वप्ना म्हात्रे,  सहाय्यक आयुक्त एच पश्चिम देवेंद्र जैन,  वरिष्ठ पोलिस निरिक्षक (खार पो. स्टे.) गजानन काब्दुले, विनोद धोत्रे, तहसिलदार बोरीवली, डॉ. संदिप थोरात, तहसिलदार कुर्ला, वंदना मकु, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,  सचिन भालेराव, तहसिलदार अंधेरी,  अजित मन्याक,  किशोर पुनवत,असिफ भामला तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर तसेच, सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या पालकमंत्री केसरकर यांच्या सूचना

मुंबई, दि. 31 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे व अवेळी पावसामुळे झालेल्या शेती व मच्छिमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. नुकसान झालेल्या शेतीचे तसेच मत्स्य व्यवसायाचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.

श्री. केसरकर यांनी आज सकाळी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा प्रशासनाशी संवाद साधून वादळी वारे व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे व अवेळी पाऊस पडला. त्यामुळे शेती व मत्स्य व्यवसायाचे नुकसान झाले. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे जिल्ह्यात सुमारे 29 हजार 687 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 8 हजार85 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

किनारपट्टीवरील वारा व पावसामुळे अनेक ठिकाणी बोटी, मासेमारीचे जाळे, सुकलेली मच्छी वाहून गेल्या आहेत. यामुळे मालवण तालुक्यात 3.90 कोटी, वेंगुर्लामध्ये 3.50 कोटी व देवगडमध्ये 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर दोन घरांचे पूर्णतः तर 18 घरांचे अंशतः आणि 28 घरांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

श्री. केसरकर यांनी सांगितले की, पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता एसआरए पद्धतीने दुबार पिक घेण्यासाठी मार्गदर्शन करून अर्थसहाय्य करावे. लहान-मध्यम आकाराचे बंधारे बांधण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहून गेलेल्या जेट्टीच्या ठिकाणी नवीन जेट्टी बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करावे. लाटामुळे पाणी गेलेल्या विहिरींमधील गढूळ पाण्याचा उपसा करून ते पिण्यायोग्य करावे. ज्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

साथीच्या रोगावर उपाययोजना राबवाव्यात

पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिले. शुक्रवार दि. 1 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात विशेष आरोग्य पथक दाखल होणार आहे. हे पथक पाहणी करून शासनास अहवाल सादर करणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यात आवश्यक औषधांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेऊन पर्याप्त औषधांचा साठा तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. साथीच्या रोगांवरील उपाययोजना लोकांपर्यंत पोचविण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले की, चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक कार्यवाही करून प्रयोगशाळा उभारणीची तयारी करावी. याबाबत संबंधित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात यावे.

वडाळा पोलिस कोठडीतील तरुणाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकड़ून गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 31 :  वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मृत विजय सिंह यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या प्रकरणात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढे चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कड़क कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्यांनी सिंह कुटुबियांप्रती सांत्वना व्यक्त केली.

यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच सिंह कुटुंबियांसमवेत आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते. 

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकरांनी केली सचिवांशी चर्चा

मुंबई, दि. 31 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या व दुकानाच्या नुकसानीच्या मदतीसंदर्भात आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवांबरोबर चर्चा केली. येत्या चार दिवसात मदत वाटपाचे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे विभागाच्या सचिवांनी यावेळी सांगितले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेतीचे व दुकानांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्यासंदर्भात श्री. केसरकर यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे सचिवांनी यावेळी सांगितले. तसेच आपत्तीमुळे बाधित झालेल्या झोळंबे आणि शिरशिंगी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने मागविण्यात आला असून प्रस्ताव प्राप्त होताच, पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव श्री. निंबाळकर यांनी सांगितले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/31.10.2019

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांना सादर

मुंबई,दि. 30 : विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज मुख्य सचिव अजोय मेहता यांना सादर केली.

या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी यावेळी सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठीची निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहितीही श्री. सिंह यांनी मुख्य सचिवांना दिली.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,वित्त व व्ययचे सचिव राजीव मित्तल,अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अजित सगणे,स्टेट वेअर हाऊसिंग कार्पोरेशनचे सह व्यवस्थापकिय संचालक अजित रेळेकर,सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आदी  उपस्थित होते.

०००००

 नंदकुमार वाघमारे/विसंअ/30.10.2019

भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

मुंबई, दि. 30 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या उच्चाटनाला प्राधान्य द्यावे लागेल, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाविरुध्द लढण्यासाठी “लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही”तसेच सर्व कामे प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस कर्मचारी यांना दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त “सत्यनिष्ठा प्रतिज्ञा”दिली, तसेच राज्यपालांच्या संदेशाचे वाचन केले.

          

दि.२८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरया कालावधीत राज्यात दक्षता, जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून “प्रामाणिकपणा- एक जीवनशैली”असे या  सप्ताहाचे ध्येय वाक्य ठरविण्यात आले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यभर ‘एकता दौड’

मुंबई, दि. 30 :लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुंबईत आयोजित एकता दौडचा आरंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीए, मरीन ड्राईव्ह येथून सकाळी ८.००वाजता होणार आहे.

मुंबईतील एकता दौड ही 31 ऑक्टोबर रोजी सकाळी८.००वाजता एनसीपीए गेट क्र.3, मरीन ड्राईव्ह येथून सुरू होणार असून, त्याचे विसर्जन ग्रँट मेडिकल जिमखाना, मरीन ड्राईव्ह येथे होणार आहे. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त’रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.

नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा आरंभ होणार आहे. 21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल.

धुळे येथे सकाळी8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा आरंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी स. 8.00वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.

विदर्भात नागपूर येथे ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  मैदानावर सकाळी8 वाजता  सुरु होणार आहे. अकोला येथे ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी7 वाजेपर्यंत वसंत देसाई स्टेडियम येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ही दौड सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी 7 वाजेपर्यंत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुलडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. ही दौड31ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हा पोलीस मैदान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनच्यावतीने करण्यात आले आहे.

उस्मानाबाद येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी  7.00 वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय दौडमध्ये युवक-युवती,विद्यार्थी,खेळाडू,योगप्रेमी,स्वयंसेवी संस्था, पोलीस, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात सकाळी 7 वाजता क्रिडा भवन अलिबाग बीच येथून एकता दौडचा प्रारंभ करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडचे आयोजन करण्या आले आहे.

लातूर येथे गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर 2019  रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला टाऊन हॉल येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. ही दौड यशस्वी करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि विविध विभागांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सांगली येथे एकतादौड पुष्कराज चौक येथूनसकाळी 7 वाजतासुरु होणार असून मार्केट यार्ड,विश्रामबाग चौक परत त्याचमार्गाने पुन्हा पुष्कराज चौक येथे आल्यानंतर एकता दौडचा समारोप होईल.अशी माहितीजिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनीदिलीआहे.

बीड येथे सकाळी08.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल पर्यंतएकता दौड” (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.

हिंगोली येथे राष्ट्रीय एकता दौडची सकाळी7.00 वाजता अग्रसेन चौक (नांदेड नाका) येथून सुरुवात होणार आहे. बस स्थानक-इंदिरा गांधी चौक – महेश चौक मार्गे महात्मा गांधी चौक येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे.

कोकण विभागातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने  एकता दौडचेआयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीजिल्ह्यातशिवाजी स्टेडियम, मारुती मंदीर ते जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील 100 फुटी ध्वजस्तंभ पर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडची सुरुवात सकाळी7 वाजता पाच बत्ती ते आर्यन हायस्कूल या मार्गाने होणार आहे. तर समारोप पाचबत्ती येथे होणार असून या राष्ट्रीय दौंडमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती खेळाडू सामाजिक संस्था पोलीस दल सहभागी होणार आहेत.

चंद्रपूर येथे रन फॉर युनिटीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी 6 वाजता केले आहे. राष्ट्रीय एकता दौड ही जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होणार असून जनता महाविद्यालय वरोरा नाका प्रियदर्शनी हॉल ते जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

अकोला येथे एकता दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम  येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार असून वसंत देसाई स्टेडियमच्या बँडमिंटन हॉलकडील प्रवेशद्वार येथे समारोप होईल. या दौडमध्ये सुमारे400 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सकाळी  6.15 वा. राष्ट्रीय  एकता दौड क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंपपर्यंत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 8 वा. शहरातील मम्मादेवी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी पुतळा इथपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

तसेच परभणी येथे सकाळी 7.30 वा. राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रिडा संकुल येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.

याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौडसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...