सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1655

कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. ८ : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कामगारांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, मुंबई शहर तालिम मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, राज्यात राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यांचा वारसा राज्याने जोपासला आहे. कुस्ती क्षेत्रातही नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान आले आहे. मातीवरील कुस्ती आता मॅटवर होत आहे. हा बदल कुस्तीपटूंनी स्वीकारावा. खेळ म्हटला, की यश- अपयश येत राहते. मात्र, खेळाडूंनी अपयशाने खचून न जाता यशासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी.  कामगार कल्याण विभागाचे आयुक्त श्री. इळवे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेची माहिती  दिली. माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

अरू खांडेकर, कालिचरण सोलनकर विजेते

या राज्यस्तरीय कुमार केसरी स्पर्धेत अरू हिंदुराव खांडेकर, तर राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धेत कालिचरण झुंजार सोलनकर यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना अनुक्रमे चांदीची गदा, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५० व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय अभिनंदन बोडके याने द्वितीय, ओंकार शिवाजी मगदूम याने तृतीय, तर विवेक कृष्णाजी धावडे याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. दुसऱ्या गटात  भारत संजय पवार याने द्वितीय, प्रथमेश बाबा गुरव तृतीय, तर तानाजी सोपानराव विटकर याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

00000

राजू धोत्रे/विसंअ/

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी ‘संकल्प महाराष्ट्राचा’ या विशेष कार्यक्रमात श्री.फडणवीस यांनी आपले विचार मांडले.

श्री.फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे.  यासाठी श्री.फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले. अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर – गोवा, विरार-अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले.

आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभूत सोयीसुविधांमध्ये फार पुढे असणार आहे, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे.  वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात यावे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नळगंगा – वैनगंगा प्रकल्पांमुळे खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले.

आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून लवकरच जागतिक बँकेकडून ४ हजार कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर शेतीमालाबरोबर अन्य बाबींचे निर्यात करण्यासाठी वाढवण बंदर नव्याने तयार करण्यात येत आहे. या वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास श्री.फडणवीस यांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केला.

0000

संजय ओरके/विसंअ/

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार

मुंबई ,दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ म्हटले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आज घेण्यात आली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा – गर्जा महाराष्ट्र माझा” हे कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणाचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फूर्तीदायक व प्रेरणा देणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा याचे गीतकार कविवर्य राजा निळकंठ बढे, मूळ संगीतकार श्रीनिवास खळे असून हे मूळ गीत शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायले आहे.

जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीतातील एकूण 2 चरणे वाजविण्यात येणार असून याचा अवधी 1 मिनिट 41 सेकंद असेल. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून वाजविण्यात येणाऱ्या या 2 चरणाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधुत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली माडे यांनी गायले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या दि. १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. हे राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंद गायिले किंवा पोलिस बँडवरती वाजविले जाईल.
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-
1. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.
2. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
3. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.
4. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
5. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था,खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.
6. राज्यगीत सुरु असताना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
7. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना/ गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
8. वाद्य संगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलिस बॅडमार्फत वाजविता येईल.
9. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
10. या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.
11. माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार / प्रसार करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.
12. या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in य संकेत स्थळावर उपलब्ध राहील.

०००

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबईदि. 8 :- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळेसुधाकर अडबालेसत्यजित तांबेज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.

विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारविधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.

या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.

बैठकीत 27 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

000

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई दि 8 : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.

14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि 7:- स्मार्ट सिटींच्या उभारणीद्वारे लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत असून मुंबईतील भेंडीबाजारसारख्या गजबजलेल्या भागात आकारास येत असलेला सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा (SBUT) गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भेंडी बाजार येथे सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या गृहनिर्माण प्रकल्प सेक्टर 4 च्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दाऊदी बोहरा समुदायाचे जागतिक आध्यात्मिक नेते डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन, आमदार अमीन पटेल व मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा हा गृहनिर्माण प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईतील भेंडीबाजार हा भाग अतिशय दाट लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. अशा गजबजलेल्या भागात हा प्रकल्प आकारास येत आहे हे नक्कीच कौतुकास्पद व पथदर्शी आहे. आपण सर्वजण परिवर्तनाबद्दल बोलतो पण हा प्रकल्प खऱ्या अर्थाने बदल घडविणारा ठरतो आहे. अनेक अडथळ्यांवर मात करत हा प्रकल्प उभा राहतो आहे. उत्थान हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे हे महत्वाचे. समाजाची श्रद्धा असेल तर काय घडू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रकल्प असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

‘SBUT’ प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील धारावीसारख्या गजबजलेल्या भागाचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. ‘SBUT’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश लोकांचे जीवनमान उंचावणे हा असून हा प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट ठरेल. नागरी पुनरुत्थान घडवून आणणारा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरेल. शासनाकडून या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण होईल. इथे जर बदल घडू शकत असेल तर संपूर्ण मुंबईत असे प्रकल्प नक्कीच उभे राहतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

दाऊदी बोहरा समाजाचे आध्यात्मिक नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन म्हणाले, सर्व नागरिक या परिसरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील गरजू लोकांना

लाभ होणार आहे. स्मार्ट सिटीच्या उभारणीत हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

स्मार्ट सिटीकडे वाटचालीसाठी प्रकल्प पथदर्शी

सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 18 मे 2016 रोजी झाले. भेंडी बाजारातील सुमारे 250 मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी रुंद रस्ते, आधुनिक पायाभूत सुविधा, अधिक मोकळ्या जागा आणि अतिशय दृश्यमान व्यावसायिक क्षेत्रांसह 17 नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्दिष्ट 3200 कुटुंबे आणि 1250 व्यवसायांचे पुनर्वसन करण्याचे आहे. छोट्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांना 375 ते 400 स्क्वेअर फुटांची सुसज्ज घरे, निरोगी, स्वच्छ सुरक्षित वातावरण, आणि मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे उपलब्ध होत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल हा या प्रकल्पाच्या उभारणीचा महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला असून सर्व सोयी-सुविधांनी युक्त इमारती येथे बांधण्यात येत आहेत.

‘अन-नसर’ नावाच्या सेक्टर 4 मध्ये पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या एकूण 16.5 एकर जमिनीपैकी अंदाजे 1.5 एकर जागा समाविष्ट आहे.  An-Nasr मध्ये जवळपास 1400 निवासी युनिट्स आणि 375 पेक्षा जास्त व्यवसाय असतील.  74 मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे प्रत्येकी 53 आणि 54 मजल्यांचे दोन नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.

या प्रकल्पाद्वारे हाती घेतलेले पुनर्विकास क्षेत्र उत्तम व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेसाठी नऊ उप-समूहांमध्ये (सेक्टर) विभागण्यात आले आहे.  पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सेक्टर 6 अल-एझचाही समावेश आहे, त्यासाठीचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले. 2020 मध्ये, SBUT ने अल-सदाह नावाचा पहिला टप्पा पूर्ण केला ज्यामुळे 610 हून अधिक कुटुंबांचे आणि 128 कुटुंबांचे जीवनमान सुधारले.  ट्रस्टने रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांसाठी नियोजित बांधकामांमध्ये किरकोळ आस्थापने देखील उपलब्ध करून दिली आहेत जेणेकरून त्यांचे जीवनमान चांगले होईल आणि एक सर्वसमावेशक समाज निर्माण होईल.

पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भेंडी बाजार आधुनिक सुविधा, रुंद रस्ते, शाश्वत पद्धती आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

—–000—–

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 7 : कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा नेव्हीगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, विजय शिवतारे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, कोळी बांधव हा दर्याचा राजा आहे. तो प्रेमळ, निडर  आणि संघर्ष करणाराही आहे. मी स्वतः माशांचा व्यवसाय केला असल्याने माझे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मच्छिमारी करताना बोटींना अडचण निर्माण होईल यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दोन खांबांमधील अंतर वाढविण्याची रास्त मागणी त्यांनी केली होती, त्यामुळे शासनाने ती मान्य करून दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून कोळी समाज हा मुंबईचे मजबूत पिलर असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. याबरोबरच सिमांकन करणे, डिझेल परतावा आदी प्रश्न देखील सोडविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

कोळीवाड्यांचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी खाद्य महोत्सव आयोजित करणे, पर्यटनदृष्ट्या विकास करणे आदी निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबई खड्डेमुक्त करणे, आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचे जाळे उभारणे, कोस्टल रोड प्रकल्प आदी कामांना गती देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

कोळीवाड्यांच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार – दीपक केसरकर

मच्छिमार बांधवांचे जीवन सुकर व्हावे आणि कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोळीवाड्यांच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. कोळीवाड्यात फिरता येण्यासाठी पालकमंत्री म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोळीवाड्यात धक्के (जेट्टी), मासे सुकविण्यासाठी जागा, घरांना आकर्षक रंग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथेही कला प्रदर्शन भरविणार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. 7 : राज्यातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळावीहक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आगामी काळात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथेही कला प्रदर्शन भरविले जाणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 131 व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटीलनरेंद्र विचारेविक्रांत मांजरेकर जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा. जी. एस. माजगांवकररामदास फुटाणेचंद्रजित यादव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीएखाद्या कलाकाराला आपली कला जहांगीर आर्ट गॅलरी येथे सादर करण्याची संधी मिळावी, असे नेहमीच वाटतेमात्र, या आर्ट गॅलरीमध्ये कला सादर करताना काही वर्षे थांबावे लागते, अशा वेळी कलाकाराचे मनोबल वाढण्यासाठी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे कलाप्रदर्शन भरल्यानंतर त्याची चाचणी जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात येईल.

महाराष्ट्रातील अनेक कलाकार कलासाहित्यचित्रकलासंस्कृती यामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ सांस्कृतिक कार्य विभाग उपलब्ध करुन देईल जेणेकरुन आपले कलाकार आपली कला सादर करतानासादरीकरण करताना कुठेही कमी पडणार नाही.

सहजताकल्पकता आणि सूचकता या गोष्टी कलाकारांनी अवगत करणे महत्त्वाचे

सत्कार स्वीकारल्यानंतर श्री. माजगावकर म्हणाले कीविद्यार्थ्यांनी आपले चित्र स्वीकारले गेले नाही म्हणून खचून न जाता पुढे जात राहावे. आकारसौंदर्यप्रावीण्य, कलात्मक दृष्टिकोन यामुळेच आपलं कलेमधलं कलामूल्य वाढत असतं. सहजताकल्पकता आणि सूचकता या तीन गोष्टी कलाकारांनी अवगत करणे महत्त्वाचे आहे.

या कार्यक्रमादरम्यान एकूण ४८ पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आजपासून जहांगीर आर्ट गॅलरी येथे 131 वे अखिल भारतीय कला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या चारही दालनांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून भारतभरातून आलेल्या चित्राकृतीशिल्पाकृतीमुद्रा चित्रेछायाचित्रे अशा विविध कलाप्रकारांमधील कलाकृती असणार आहेत.

महाराष्ट्रात 134 वर्षे जुनी बॉम्बे आर्ट सोसायटी असून ही सोसायटी सातत्याने कलाविषयक उपक्रम राबवते. विशेष म्हणजे राज्य शासनाने वांद्रे येथे दिलेल्या जमिनीवर बॉम्बे आर्ट सोसायटीने तयार केलेल्या संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सन 2016 मध्ये केले होते.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना मिळणार हक्काची घरे

मुंबई, दि. ७ : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना “सर्वांसाठी घरे” योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आज आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी हे निर्णय घेतले आहेत.

आज दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूलीविभागाची जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा २०२३-२४ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी या सर्व सूचना तात्काळ स्वीकारल्या.

आजच्या निर्णयांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना “सर्वांसाठी घरे” या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्नही करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशद केली होती. त्यावरही योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधून प्लग अँड प्ले युनिटससाठी आदिवासी विभाग वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्वत:ची घरे नसणाऱ्या आदिवासी बांधवाना ड गटाचा विचार न करता घरे बांधून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या चारही सूचना महत्त्वपूर्ण आणि योग्य आहेत त्यामुळे त्या सर्व स्वीकारण्यात येत आहेत असे बैठकीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी सांगितले. या चार महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत

0
मुंबई, दि. १८: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा आधार ठरत आहे. अमरावती विभागात मागील...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया

0
मुंबई, दि. १८: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात...

राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळेस २२ ऑगस्टपासून सुरुवात

0
मुंबई, दि. १८ : राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्यांसाठी दोन...

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १८: मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे...

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

0
मुंबई, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश...