सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1656

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादा १० लाखांवरून वाढवून १५ लाख रुपये – अध्यक्ष नरेंद्र पाटील 

बीड,  दि. ७:- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार असून कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाखावर वाढविण्यात येत आहे. तसेच कर्जासाठी महामंडळामार्फत बँकांना प्रस्ताव दिल्यानंतर संबंधितांचे व्यावसायिक प्रशिक्षण झालेले असल्यास कर्ज मिळणे सोयीस्कर होणार असल्याने विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण देणारी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील बीड जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे झाली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अमित मालेगावकर, तसेच रमेश पोकळे, रवी शिंदे यासह जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,  विविध बँकांचे जिल्हा समन्वयक  पदाधिकारी, मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले मराठा समाजातील व्यक्तींना महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मागील दोन-तीन वर्षात दुर्लक्ष झाल्याने कार्यवाही व्यवस्थित होऊ शकलेली नाही हे बाब ध्यानात घेऊन महामंडळाचे काम केले जाईल असे ते म्हणाले

श्री.पाटील यांनी पुढे सांगितले आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्याकडे लक्ष दिले जात आहे छोट्या व्यावसायिक कर्जाची देखील योजना आणली जात आहे. यामध्ये दोन लाख रुपये कर्ज दिले जाईल जास्तीत जास्त मराठा उद्योजक वाढविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यास कटिबद्ध आहे. बँकांमार्फत कर्ज वितरित व्हावे. यासाठी त्यातील त्रुटी दूर करणे व लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले

यावेळी त्यांनी विविध शासकीय, सहकारी व खाजगी बँकांचे जिल्हा समन्वयक व बँक व्यवस्थापक यांच्याकडून महामंडळाच्या योजनांबाबत आढावा घेतला तसेच महामंडळाने मंजूर केलेले लाभार्थ्यांचे प्रस्तावावर तातडीने बँकांनी कार्यवाही करण्यातील अडचणींबाबत माहिती सादर करण्याची सूचना दिली.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यावेळी म्हणाले, जिल्हास्तरीय बँक समन्वयक यांच्या बैठकीमध्ये नियमितपणे शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांवर कार्यवाही बाबत माहिती घेतली जाते. बँकांकडे कर्ज मिळण्यात दीर्घकाळ लागत असल्याने त्यामध्ये गती देण्यासाठी सर्व लाभार्थ्यांची प्रकरणे व त्याची माहिती ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध केली जावी यामुळे अडचणी दूर करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांकडून बँकनिहाय मंजूर प्रकरणे, वितरित कर्ज स्थिती, नाकारलेल्या प्रकरणातील अडचणी आदीबाबींच्या अनुषंगाने माहिती घेतली. तसेच बँक व्यवस्थापकांच्या अडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी महामंडळाच्या मार्फत प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थ्यांच्या वतीने अडचणी देखील मांडण्यात आल्या. त्याबाबत बँकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यामध्ये दीपक गिराम, बापूसो सोळंके यांच्यासह विविध लाभार्थ्यांनी बँकांमार्फत येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. बैठकीनंतर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

                                                                      ०००००

राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणांना संधी; मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईदि. ७ : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जाधाडसकल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणेनावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मितीनियोजनकार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. २०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करीता अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभवअसे किमान निकष आहेत. ऑनलाइन परीक्षानिबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल. आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.

आयआयटीमुंबई व आयआयएमनागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (ॲकॅडेमिक पार्टनर) आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटीमुंबई व आयआयएमनागपूर यांच्याकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

000

पोंभूर्णा (चंद्रपूर) येथील अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईदि. 7 : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी फेरआढावा घेऊन अतिवृष्टी संदर्भात शासनाकडे नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात 2022 मध्ये जुलैऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री शोभाताई फडणवीसचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह चंद्रपूरचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीचंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत बाधित शेतकऱ्यांना का नुकसान भरपाई दिली नाही, याबाबत चौकशी करुन याबाबतच्या चुका दुरुस्त करुन घ्याव्यात. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे तलाठीग्रामसेवक आणि कृषी सहायक अशा त्रिस्तरीय समितीकडून करण्यात आले होते ते तपासून घ्यावेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी हे नदीच्या काठावरील असलेल्या गावात राहत असून त्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देताना केलेले पंचनामे तपासून घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईबाबतचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

आमदार निलेश लंके यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली03 : पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला आज सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री.लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाद्वारे देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री.लंके यांना यावेळी “लोकराज्य” अंक भेट म्हणून देण्यात आला.

श्री. लंके यांनी कार्यालयाची पाहणी केली.  ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके तसेच दुर्मिळ हस्तलिखीत दिवाळी अंकांची पाहणी केली. या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास मराठी भाषिकांना दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  त्यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक महेंद्र पठारे, सतीश भालेकर, पोटघन मेजर यावेळी उपस्थित होते.

अल्पसंख्याक लाभार्थींना लघु व्यवसायाकरिता मुदत कर्ज योजनेसाठी ४१७ अर्ज प्राप्त

मुंबई, दि.७ : राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत लघु व्यवसायासाठी राबविण्यात येत असलेल्या मुदत कर्ज योजनेकरिता अर्ज करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीदिनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आवाहन केले होते. त्यानुसार  18 जानेवारी २०२३ पर्यंत सर्व जिल्ह्यांमधून ४१७ अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र लाभार्थींना लवकरच कर्ज वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.

महामंडळामार्फत ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे या अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना २ महिन्यात मंजुरीपत्र निर्गमित करण्यात येत आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवंम वित्त निगम यांच्याकडून कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजना व इतर योजनांसाठी अर्ज करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार महामंडळाची जिल्हा कार्यालये तसेच मुख्यालयात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांवर प्रक्रिया करण्यात येत आहे.

व्यक्ती, दलाल यांच्या प्रलोभनास बळी पडू नये

मंजुरी पत्र निर्गमित केलेल्या अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्जाची रक्कम संबंधित अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. तसेच कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. कर्ज मंजुरीसाठी व कर्जाची रक्कम प्राप्त किंवा वितरित करण्यासाठी महामंडळामार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क, फी आकारण्यात येत नाही. लाभार्थींनी कोणत्याही व्यक्ती, दलाल यांच्या प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे.

या योजनेसाठी अजूनही अर्ज स्वीकारण्यात येत असून इच्छुकांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील मुख्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे. महामंडळाच्या कार्यालयांची यादी, पत्ते, संपर्क क्रमांक महामंडळाच्या https://www.mamfdc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

०००

इरशाद बागवान/विसंअ/

 

 

राजपत्रित अधिकारी महासंघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

मुंबईदि. 7 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आज उत्साहात साजरा करण्यात आला.

मंत्रालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथेअध्यक्ष विनोद देसाईसरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह राज्यभरातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी महासंघाच्या वतीने उभारण्यात येणार असलेल्या कल्याण केंद्राच्या कामासाठी उल्लेखनीय निधी संकलन करणाऱ्या अकरा समन्वय समिती सदस्यांचा मुख्य सचिवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले.

मुख्य सल्लागार श्री. कुलथे यांनी कल्याण केंद्राचे स्वप्न सर्वांच्या सक्रियतेने आणि सहकार्याने निश्चितच लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विनोद देसाई यांनी केले. सरचिटणीस समीर भाटकर यांनी महासंघाच्या आगामी योजनांबाबत माहिती दिली. मीनल जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

००००

वंदना थोरात/ससं/

 

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी निधी चौधरी

मुंबई, दि. 7 : लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील कामे. त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारण्याकरीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन  करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी आज दिली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी बोलत होत्या. तहसीलदार सचिन चौधरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी म्हणाल्या की, प्रशासनात  लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात आपले अर्ज सादर करावेत. या कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांचा आढावा आणि कार्यवाही संदर्भात जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आढावा घेण्यात येईल.

नागरिकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा. इतर विभागांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी संदर्भात ही कार्यवाही करण्यात येईल, असे सांगताना जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी म्हणाल्या की, मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारुन (अर्धन्यायिक आणि न्यायिक कामकाजाची प्रकरणे वगळून) ही प्रकरणे जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन तातडीने कार्यवाही  करण्यात येईल. तसेच ज्या प्रकरणी शासन स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित आहे, यामध्ये सर्व वैयक्तिक तसेच धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय यांना सादर करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी सांगितले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

एफसी बायर्नबरोबरच्या करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू करतील उज्ज्वल कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 7 : जर्मनीतील एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबबरोबर राज्याने केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मॅक्समिलन हशके, उप सचिव सुनील हांजे उपस्थित होते.

खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकून राज्याचे नाव उंचावण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत 5 पट  वाढ करण्यात आली आहे. गोविंदा पथकातील गोविंदांना आता दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावणाऱ्या खेळाडूंना शासनात थेट नोकरीत नियुक्ती, क्रीडा विषयक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या पदक तालिकेत मागील वर्षी राज्याच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदा सुरू असलेल्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक कायम ठेवतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. याबद्दल त्यांनी क्रीडा मंत्री श्री. महाजन यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याने फुटबॉलसाठी जर्मनी आणि कुस्तीसाठी जपानबरोबर सामंजस्य करार केले आहेत. या करारामुळे राज्यातील खेळाडूंना तांत्रिक, खेळातील डावपेच अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे.

क्रीडा मंत्री श्री. महाजन म्हणाले, एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेस उद्यापासून सुरवात होत आहे. राज्यातील एक लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातून २० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यांना एफ. सी. बायर्न क्लबच्या माध्यमातून जर्मनीत प्रशिक्षण देण्यात येईल. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिच जगातील नामांकित क्लब सून प्रशिक्षक, खेळाडू, कर्मचाऱ्यांसाठी एक मजबूत व्यासपीठ तयार होवून भारतातील- फुटबॉलच्या वाढीस मदत होणार आहे. राज्यात अधिक अत्याधुनिक क्रीडा परिसंस्था निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळ विकसित करण्यासाठी संसाधने आणि तज्ञांचे कौशल्य विकसित करणे, प्रतिभावान प्रशिक्षकांच्या नवीन पिढीचा विकास आणि सक्षमीकरण करणे, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर फुटबॉल खेळ शिकण्यासाठी गुणवत्ता, विविधता आणि प्रवेश योग्यता प्रदान करणे ही या करारामागील उद्दिष्टे आहेत.

फुटबॉल आणि शिक्षणाद्वारे तरुणांचे जीवन सुधारणे, विविध कोचिंग आणि संशोधन मॉड्यूल्सद्वारे फुटबॉलचे ज्ञान आणि समज वाढविण्यासाठी हा करार करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/विसंअ/

‘आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 7 : ‘आरे’ दुग्धवसाहतीतील पडीक जमिनीचा वापरात आणून शासनाला उत्पन्न मिळण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. तसेच आरे वसाहतीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

गोरेगाव येथील आरे दुग्धवसाहतीसंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री विखे-पाटील बोलत होते. बैठकीला विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त श्रीकांत शिपूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आरे येथील राज्य शासनाच्या विविध विभागांना हस्तांतरीत जमिनी आणि तेथे सुरू असलेले प्रकल्प याबाबत आढावा घेतला. ज्या जमिनी पडीक आहेत, त्या संपादित करून शासनास उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. जे तबेले धारक आहेत, त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी तसेच डागडुजी व स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. पर्यटन स्थळे, नौका विहार, पिकनिक गार्डन, व्यापारी गाळे, पॅराग्रास ठेका, संरक्षण भिंत, रस्ते या ठिकाणांचे संवर्धन व जतन करून ते पुन्हा सुरू करण्यात यावे. आरे वसाहतीतील जमिनींवर जनतेच्या उपयोगी प्रकल्प सुरू करून त्याचा कायापालट करण्यासाठी उपाययोजना आखून अहवाल तयार करावा, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं.

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू; बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 7 : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या  वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील ‘रॉक क्रिक’ चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

थोडक्यात वॉटर टॅक्सी विषयी

• बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
• जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी ८.३७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत ५०:५० या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून ४.३५ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी ७५ चार चाकी आणि ८५ दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
• मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर – गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर-गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यस्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
• १ जानेवारी २०२२ पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील ३ वर्षासाठी म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सूट देण्यात आली आहे.

प्रवीण भुरके/स.सं./

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा यश बेडगेला आधार

0
त्याची आई कर्णबधीर… वडीलही कर्णबधीर… कोशिश चित्रपटासारखी त्यांची कहाणी…  त्यातच साडेतीन वर्षांचा चिमुकला यशही कर्णबधीर असल्याने आई वडिलांसह आजीच्या जीवाला काळजी…. पण, कर्णबधीर म्हणून...

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट

0
मुंबई, दि. १८ :-  राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर...

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...