सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1657

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्ह आणि शुभंकरचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते अनावरण

लातूर, दि. 06 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकरचे ( मस्कॉट) आज क्रीडा मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते  मुंबई येथे अनावरण झाले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी तथा जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव दत्ता सोमवंशी हे लातूर येथून, तर मुंबई येथून महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे. जिल्ह्यातील युवक, शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन लातूर येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेला महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करावे. स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना क्रीडामंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात 2012 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपाची स्पर्धा होत असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख यांनी क्रीडामंत्री तथा पालकमंत्री श्री. महाजन यांचे आभार मानले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा उपसंचालक श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले. मैदान, निवास आणि भोजन व्यवस्था, तसेच या अनुषंगाने विविध समित्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी याविषयी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 6 : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला आमदार योगेश कदमआमदार शेखर निकममाजी आमदार सदानंद चव्हाणअपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितिन करीर, प्रधान सचिव पराग जैन, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आंबा बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे आदी पदाधिकारी, नाम फाऊंडेशनचे मंदार पाटेकरचिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

मंत्री श्री. सामंत म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंबा व काजू बागायतदार नुकसानग्रस्तांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यासंबंधी व कर्जदारांचे कर्ज पुनर्गठीत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित अधिकारी यांची 9 फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांची शेतकऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांना 84 कोटी रुपयांचा पीक विम्याचा मोबदला देण्यात आला आहे. याबाबत खातरजमा करुन उर्वरित वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून प्रश्न सोडवावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळाला त्यांची यादी जाहीर करण्याचे निर्देश श्री. सांमत यांनी दिले.

आंबा बागायतदारांना पेट्रोल, रॉकेल, खते, कीटकनाशके आणि औषधांच्या निर्धारित किमतीसंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. रत्नागिरीत सुसज्ज प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करुन प्रयोगशाळा सुरु करण्यात येईल. फळमाशी व माकड अशा वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीबाबत राज्य शासनाने समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा जिल्हा दौरा होणार असून या समितीने सूचविलेल्या उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येईल. शेतीसाठी वापरात असलेल्या कृषीपंपांना चुकीची वीज बिले आकारली जात असल्याबाबतच्या समस्येची माहिती घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रश्न सोडवावा, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.

कुळवहिवाट प्रकरणांसाठी मोहीम राबवावी

कोकणातील कुळवहिवाटदारांची प्रकरणे व दावे तसेच पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या घरांच्या जमीन मालकी हक्कासंबंधी गावनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन मोहीम राबवावी. रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांना जातीचे दाखले देण्यासंबंधी जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन निर्णय घेतला जाईल. तसेच सारथी मध्ये तिल्लोरी – कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतही विचार केला जाईल.

रत्नागिरीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘लोकनेते शामरावजी पेजे अभियांत्रिकी विद्यालय’ असे नाव देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. तसेच लोकनेते शामरावजी पेजे आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबीबहुल तालुक्यांमध्ये सांस्कृतिक कुणबी भवन उभारण्यासाठी योजना राबविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.    

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू

यावेळी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम तत्काळ सुरू करावे. वाशिष्ठी नदीतील गाळाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पहिल्या टप्प्यातील शिल्लक रक्कमेतून सध्या गाळ काढण्याचे काम करावे तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबईदि. 6 :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री श्री. केसरकर यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला.

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना श्री.केसरकर म्हणाले22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिकमाध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपयेमाध्यमिक वर्गात 18 हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपयेपूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपयेकनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी (केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती) यांना आठ हजार रूपये मानधन मिळेल.

मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार असून मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत. त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृहसुसज्ज ग्रंथालयमुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे श्रेणी देता येईल का याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.केसरकर यावेळी म्हणाले.

माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुंबईत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त चेंबूर येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेच्या वसतिगृहास माता रमाईंचे नाव देण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची तसेच शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

ताडदेवमधील दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबईदि. ६ : ताडदेव येथील रहेजा एक्सलस यांनी रस्ता गेट लावून बंद केलेला आहेतो रस्ता मोकळा  करावा जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मंत्रालय येथील दालनात ताडदेव येथील नागरिकांच्या रस्त्याच्या समस्येसंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त शरद निवृत्ती उघडे, कार्यकारी अभियंता संजय निर्मल, जयंत वालवटकर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणालेआज ताडदेव या ठिकाणी भेट दिली आहे. तातडीने या विषयी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. रहेजा एक्सलस यांनी गेट लावून रस्ता बंद केलेला आहेतो रस्ता मोकळा करावा  जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल. या विषयाच्या अनुषंगाने सर्व शासकीय परवानग्या घेवून योग्य ती कार्यवाही प्रत्येक विभागाने गतीने करावी जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल .मुख्य अभियंता(विकास विभाग) यांनी सुनावणी घेऊन पोटविभागणीबाबत  निर्णय द्यावादादरकर कंपाऊंडला लागून असलेला 22 फुट रस्ता महानगरपालिका अधिनियम अन्वये घोषित करण्याकरिता इस्टेट विभागाने  कार्यवाही करावी. तसेच 09 मीटर रस्ता रुंद करण्याकरिता सर्व्हेक्षण करुन सहाय्यक अभियंता यांनी प्रस्ताव महापालिका आयुक्त यांना प्रस्ताव सादर करावा अशा विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा होऊन यासंदर्भात संबधित यंत्रणांना कार्यवाही करावी, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना

मुंबईदि. 6 : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.

विभाग आणि जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामकाजासंदर्भातील ऑनलाईन आढावा बैठक मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालीत्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरमुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव भूषण गगराणीमुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

नागरिकांना मंत्रालयापर्यंत न येता स्थानिक पातळीवरच  सुलभरित्या आपले म्हणणे, अडचणी  मांडता याव्यात, यासाठी विभागीय आणि जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी गतिमान कार्यपद्धतीचा वापर करुन प्राधान्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य सचिवांनी निर्देशित केले. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कक्षाकडे प्राप्त अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांवर, क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवावे. लोकांचा शासन, प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या व्यापक जाणीवेतून प्राप्त प्रत्येक अर्ज, निवेदन तातडीने निकाली काढण्यात यावे. ई-ऑफीसच्या माध्यमातून हे काम अधिक गतिमानतेने करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सेतू केंद्राच्या माध्यमातून पूरक व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता ठेवावी. प्राप्त अर्जांचे लगेच वर्गीकरण करुन जिल्हास्तरावरील अर्जांवर कार्यवाही सुरु करुन राज्यस्तरावरील अर्ज मंत्रालयात वर्ग करण्यात यावेत. अर्धन्यायिक प्रकरणांशी निगडीत अर्जांबाबत योग्य ती पाहणी करुन अर्जदारास योग्य ते मार्गदर्शन करावे. शासकीय कर्मचा-यांची  सेवा विषयक प्रकरणे या कक्षाच्या अखत्यारित येत नसल्यानेविहीत पद्धतीने संबंधित यंत्रणेकडे अर्ज करण्याबाबत अर्जदाराला अवगत करावे.

मुख्यमंत्री महोदयांना जिल्हा दौ-यात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने तातडीने वर्गीकृत करुन राज्यस्तरावरील विषय मंत्रालयाकडे हस्तांतरित करावेत तसेच जिल्हा, विभागीय विषयावरील अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे.  

स्थानिक पातळीवरच आपल्या समस्या सोडवल्या जातातहा विश्वास नागरिकांना या कक्षामुळे  मिळाल्याने मंत्रालयात मोठ्या संख्येने राज्यभरातून येणाऱ्या अर्जांची संख्या नियंत्रणात राहीलत्याचसोबत अतिमहत्वाच्या विषयांवरील अर्ज तातडीने निकाली काढणे शक्य होईल, या दृष्टीने जिल्ह्यात, विभागात प्राप्त प्रकरणे विनाविलंब निकाली काढल्या जात असल्याची खबरदारी विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. तसेच स्थानिक पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची गुणवत्ता आणि कालमर्यादा याचा संबंधित विभागाच्या सचिवांनी, पालक सचिवांनी वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना श्री. श्रीवास्तव यांनी यावेळी दिल्या.

लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी नियमितपणे अभ्यागतांसाठी ठराविक वेळ ठेवावीत्याबाबत आपल्या दालनाच्या बाहेर वेळ निर्देशित करावी, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांनी देखील आपल्याकडे येणाऱ्या अभ्यागतांना आर्वजून भेटावे. नागरिकांना विनासायास सुलभरित्या सेवा, योजनांचा लाभ उपलब्ध होईल यादृष्टीने ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देत यंत्रणा कार्यान्वित करावीअशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

०००

वंदना थोरात/ससं/  

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची ७ व ८ फेब्रुवारीला मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूजऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार  दि. ८, बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.

वंध्यत्व काय आहे, यावर असणारी प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती डॉ. सावनकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

राजभवनात ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ रेखाचित्र कार्यशाळेचा समारोप

मुंबई, दि. ६ : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाला.

राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पाहिली व  त्यांना कौतुकाची थाप दिली.

विद्यार्थ्यांनी काढलेली छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील, असे राज्यपालांनी सांगितले व विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले.

यावेळी जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, कार्यशाळेचे समन्वयक व अधिव्याख्याता प्रकाश सोनावणे तसेच सहयोगी अधिव्याख्याता शार्दूल कदम उपस्थित होते.

या कार्यशाळेत जे. जे. च्या ४८ पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तसेच २ अधिव्याख्यात्यांनी राजभवनातील विविध वास्तू तसेच शिवकालिन गडकिल्ल्यांची ५० रेखाचित्रे काढली.

000

Two day workshop on ‘Glory of Heritage’ concludes at Raj Bhavan

 

Paintings by students to adorn walls of Raj Bhavan buildings

 

Mumbai, 6th Feb: The 2- day painting workshop organised by Raj Bhavan for the students of Sir J J School of Art concluded at Raj Bhavan on Sunday.

Governor Bhagat Singh Koshyari at whose instance the workshop was organised, visited the display of paintings and patted the students and lecturers for bringing Raj Bhavan heritage on the canvass.

Stating that the paintings of Raj Bhavan heritage buildings and those of the forts of Maharashtra drawn by the students will adorn the walls of various Raj Bhavan buildings, the Governor announced a token reward for all the participants.

Dean of the Sir JJ School of Art Dr Vishwanath Sable, coordinating lecturer Prakash Sonawane, lecturer and artist Shardul Kadam and undergraduate and postgraduate students of the Sir J J School were present.

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ६ (जिमाका) : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एमसीएचआय – क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या (प्रॉपर्टी) प्रदर्शनास आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गरोडिया, राजू व्होरा, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, रेमंडचे संदीप माहेश्वरी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते. प्रदर्शनानिमित्त आयोजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गृहनिर्माण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुण येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याची गरज लागणार असून राज्य शासन या व्यवसायासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल. कोविड काळात या क्षेत्राने राज्य शासनाला खूप सहकार्य केले. ठाणे एमसीएचआयने ग्लोबल कोविड हॉस्पिटल व इतर रुग्णालय उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. ज्या शहरात आपण व्यवसाय करतो, काम करतो त्या शहरासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून एमसीएचआयने काम केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डिसीआर) तयार केली. या नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे. अनेक प्रकल्प सुरु होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या नियमावलीचा लाभ सर्वसामान्यांनाही व्हायला हवा. त्यासोबतच कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला बसलेल्या फटक्यातून हे क्षेत्र सावरण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी आणि प्रीमीयम मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचाही मोठा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर थेट ग्राहकाला मिळाला आहे.

सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र असून या व्यवसायावर अडीचशेहून अधिक व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सर्व सवलती देण्याचे काम राज्य शासनामार्फत केले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला होणार आहे. रस्ते चांगले असतील, तर त्या क्षेत्राचा विकास होतो. त्यामुळे आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने केले.  या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचला असून प्रदूषणही कमी होण्यास मदत होत आहे. या प्रमाणेच मुंबई महानगर परिसरातही वसई विरार मल्टिमॉडल कॉरिडॉर, ठाणे ते बोरिवली टनेल मार्ग, शिवडी न्हावाशेवा एमटीएचएल मार्ग असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या 357 किलोमीटरच्या मेट्रोच्या जाळ्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा महानगर प्रदेशाचा भाग जवळ आला असून प्रवासाचा वेळ वाचला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता तयार करणार आहोत. या कनेक्टिव्हिटीमुळे शहराचा पर्यायाने राज्याचा विकास होण्यास मदत होत आहे. यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी सुमारे 2 लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

एमसीएचआयच्या गृहबांधणी क्षेत्राशी संबंधित प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व बांधकाम व्यावसायिक, वित्त पुरवठा कंपन्या एकाच ठिकाणी आल्यामुळे ग्राहकांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार श्री. सरनाईक, मैत्रीचे उपाध्यक्ष श्री. अशर, क्रेडाईचे अध्यक्ष श्री. मेहता यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

000

पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, 5 : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री. फडणवीस यांनी आज श्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल – रेल्वेमंत्री

पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.

वर्धेच्या ज्ञान यज्ञातील विचाराचे अमृत समाजाला नवी दिशा देण्याचे काम करेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा, दि. ५ – वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत मिळाले आहे. या विचारातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप श्री.गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तर पाहुणे म्हणून आ.पंकज भोयर, माजी खासदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप दाते आदी उपस्थित होते.

साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचे, चांगल्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. जे त्रिकालाबाधित आहे ते जनतेपर्यंत नेण्याचे काम साहित्य करते. साहित्य, संस्कृतिचे समाजात फार मोठे योगदान आहे. साहित्य, काव्य,  नाटक, संगीताचा समाज व्यवहारावर परिणाम होत असतो. समाज जीवन कशा पध्दतीने घडवायचे याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटते. मराठीत पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यासह संत मंडळींनी सामाज जिवनावर परिणाम करणारे साहित्य दिले, असे पुढे बोलतांना श्री.गडकरी यांनी सांगितले.

समाज बदलायचा असेल तर व्यक्तीला बदलले पाहिजे. व्यक्ती बदलासाठी संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार विचारातून येतात आणि सकस विचारासाठी सकस साहित्य महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचनाचा परिणाम विचारांवर होतो. यातूनच नवी ज्ञान पिढी निर्माण होते. समाजाला ताकद देण्याची क्षमता साहित्यात आहे. साहित्याचा परिणाम समाजमनावर होत असतो, असे श्री.गडकरी म्हणाले.

आताच्या पिढीत फार झपाट्याने बदल होत आहे. पिढीतील या बदलाची नोंद आणि अंतर लक्षात घेता साहित्य, काव्य, सादरीकरणात बदल करण्याची गरज आहे. नवनवीन माध्यमे येत असली तरी पुस्तकांचा वाचक वर्ग कायम आहे. मात्र नवीन पिढी पाहिजे तेवढे स्वारस्य वाचनात दाखवत नाही, हे दुर्दैवी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या पिढीला वाचकप्रिय बनविण्यासाठी केला पाहिजे. रामायण, महाभारत, भगवतगिता, कुराण, बायबल यातून समाजकल्याणाचा संदेश देण्यात आला आहे, असे सांगून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता, गजानन महाराज यांची गाथा डिजिटल स्वरूपात करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनाठी प्रशासनाने केलेल्या चांगल्या सहयोगाबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन साहित्य संमेलनात एकत्र येण्याची परंपरा आजवर टिकली आहे. कोणत्याही संमेलनाध्यक्षाला मिळाले नसेल इतके प्रेम मला मिळाले आहे. माणसे जोडली गेली पाहिजे हा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलनात मनातला आवाज उमटला जातो, बुलंद होतो, असे न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले.

महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.दाते यांनी प्रास्ताविकातून संमेलनात तीन दिवस राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणाऱ्या व्यक्तींसह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. काही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभास साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...