गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 1665

संविधानातील मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ – पालकमंत्री अब्दुल सत्तार

हिंगोली(जिमाका), दि.26 : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज भारतीय संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले .

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी  आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्र. पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,  अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी  पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला, असे सांगितले.

आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचेही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस विदितच आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वा‍गिंण विकासासाठी काम करत आहोत. राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्ती व कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. तसेच आंतरराष्ट्रीय  पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प करुया – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग, दि. 26, (जि.मा.का.)– पर्यटन आणि सुजलाम-सुफलाम असणारा जिल्हा येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया, अशा शुभेच्छा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणांनी पालकमंत्री आणि विद्यार्थी-बालचमूने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते,जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना, पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देवून, सीमेवर सैन्य दलातील जवान रात्रीचा दिवस करुन देशाची सुरक्षा करीत असल्यानेच आज आपण चांगल्या वातावरणात राष्ट्रीय सोहळा साजरा करतो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म पत्करले त्या सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो.आजच्या सोहळ्याला सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील अधिकारी, विविध भागातील ग्रामस्थ विशेषत: विद्यार्थी या सर्वांचे स्वागत करुन शुभेच्छा देतो.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देश अखंड राहीला पाहिजे. देशाची सार्वभौमता आणि येणाऱ्या काळामध्ये देश महासत्तेकडे कसा जाईल या दृष्टीकोनातून प्रत्येक नागरिकांने आपलं त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी, शासकीय अधिकारी असेल या सर्वांचे काही ना काही योगदान दिले पाहिजे.  तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दूल कलामजी नेहमी सांगायचे तुम्हा-आम्हा सर्वांमध्ये देशामध्ये एवढी शक्ती आहे. त्यावरच देश सहज महासत्तेकडे जावू शकतो. कोरोनाच्या संकटाच्या काळात देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सामना केला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळे एक आहोत, देशावर आलेल्या संकटाचा ज्या पध्दतीने सामना केला, ते अभिमानास्पद आहे. त्याच बरोबर आर्थिक व्यवस्थाही बळकट व्हायला सुरुवात झाली. देशाने महासत्तेकडे पाऊले टाकायला सुरुवात केली. युवकांच्या हातामध्ये शक्ती आहे, म्हणूनच देशाने प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त पदके मिळण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण आणि कशा पध्दतीने देशाच्या भविष्यासाठी मी काय करु शकतो यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टी सांगत आहेत. स्वच्छ भारत मिशन मधून स्वच्छतेचे महत्व सांगत आहेत. अशा क्षेत्रात सर्वांनी योगदान द्यायला पाहिजे. फार आत्मीयतेने देशासाठी समर्पित भावनेतून काम करण्याची मानसिकता प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण करण्याचे काम ते करत आहेत आणि तीच काळाची गरज आहे. 21 जून हा दिवस योगदिन म्हणून साजरा करण्याचे त्यांनी योजले आणि आज संपूर्ण जगाने ते स्वीकरले. हे वर्ष येणाऱ्या काळात भरड धान्यासाठी असणारे वर्ष म्हणून साजरं कराव असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात शेती करण्याबरोबरच भरड धान्य उत्पादनावर भर दिला पाहिजे.

येणाऱ्या काळामध्ये संघटीत आणि जागरुक असायला हवे. गाव तेथे क्रीडांगण, आरोग्याची सुविधा असली पाहिजे. येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल कसा होईल या दिशेने पाऊले उचलायची आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा देखील दरडोई उत्पन्नामध्ये येणाऱ्या काळामध्ये अव्वल कसा येईल यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येणाऱ्या काळात सुजलाम- सुफलाम असणारा आपला जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा येईल यासाठी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तसा आपण संकल्प करुया, असेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी उघड्या जीप मधून परेडचे संचलन केले. उत्कृष्ट लघू उद्योजक संजीव कर्पे यांना प्रथम, संगिता प्रभूशिरोडकर यांनी व्दितीय पुरस्कार, पूर्वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यात गुणवत्ताधारक ठरलेल्या पृथ्वीराज मोघरदरेकर, एस.के.पाटील विद्या मंदिर केळूस, मयंक चव्हाण एस.एम. हायस्कूल कणकवली, कैवल्य मिसाळ ए.एस.डी. टोपीवाला हायस्कूल, ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजना, स्वामित्व योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील मौजे कलंबिस्त व मासुरे, देवगड तालुक्यातील मौजे धालवली, लिंगडाळ व किंजवडे, कुडाळ तालुक्यातील मौजे आणाव व पाट, दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले व वझरे गावातील नागरीकांना जमीनीच्या मालकी हक्काची सनद वाटप. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगअंतर्गत कर्ज उपलब्ध दिल्याबद्दल अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकेश मेश्राम, 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक मिळवणाऱ्या  पो.कॉ. वैभव नार्वेकर, अमित राणे, पोलीस अंमलदार ज्योती कांबळे, संजिवनी चौगुले, रीना अंधारी, इन्फ्रास भुतोलो, नागरिकांप्रती उत्तम कामगिरी करणारे सपोनि ए.सी.व्हटकर, हवालदार दत्तात्रय देसाई, राजेंद्र जामसंडेकर, आशिष गंगावणे, संकेत खाडे, रवी इंगळे, अनिल धुरी यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी शुभेच्छा संदेशाची सुरुवात भारत माता की जय, वंदे मातरम् ने केली. सोहळ्यानंतर याच जोशपूर्ण घोषणांनी विद्यार्थी बालचमूनेही पालकमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधत चॉकलेटचे वाटप करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

आज झालेल्या संचलनात जलद प्रतिसाद पथक, अश्रुधुराचे वज्रवाहन, दंगल नियंत्रण पथम, मोबाईल फॉरेन्सिक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, डॉग स्कॉड, 108 रुग्णवाहिका, पोलीस बॅन्ड पथक,अग्नीशमन दल कणकवली व वेंगुर्ला यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले.

याप्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक,माजी लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतिकारकांचा इतिहास अभूतपूर्व – पालकमंत्री विजयकुमार गावित

नंदुरबार,दि.26 (जिमाका वृत्तसेवा): देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात असून ते भविष्यातही राबविण्याचे नियोजन असल्याची ग्वाही देत जिल्हावासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन निमित्ताने राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी शुभेच्छा दिल्या.

ते आज पोलीस कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी बालत होते. या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, खासदार डॉ. हिनाताई गावित, जि.प उपाध्यक्ष सुहास नाईक,  जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, जात पडताळणी समितीचे सहआयुक्त अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पुलकीत सिंह,अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावीत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा सुर्य पाहु शकलो. स्वतंत्र भारताची धुरा सांभाळण्यासाठी कायदे-नियमांच्या चौकटीचे महत्व लक्षात घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अथक परिश्रमातून आजच्या ७३ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देशात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले. या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाने जागतिक पातळीवर सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करतांना आपण या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. त्याच बरोबर मला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की, २०२३ हे वर्ष आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्यासाठीही मी आपणांस शुभेच्छा देतो वयाने आणि आकाराने लहान असलेल्या आपल्या नंदुरबार जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत निश्चितच गौरवशाली व सदैव स्मरणात राहील असे योगदान दिले आहे. स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात, राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले त्यात आपल्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखालील सर्व विभागांनी उपक्रम राबविले ते भविष्यातही  राबवले जातील.

आपल्या जिल्ह्यात स्वयंस्फूर्तीने १८५७ च्या उठावामध्ये आपला सहभाग नोंदवून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यात क्रांतिकारक सुभात्या नाईक, रामजी नाईक, देवजी नाईक, ख्वाजा नाईक, भीमा नाईक, तंट्या नाईक यांसारख्या अनेक आदिवासी व क्रांतिकारकांनी अगदी प्राणपणाला लावून इंग्रजी सत्तेशी लढा दिला. पुढे १८५७ च्या उठावानंतर पुन्हा  स्वातंत्र्यकार्यात जिल्ह्यातील नागरिकांना आणण्याचे कार्य अनेक बुद्धिजीवी समाजसुधारकांनी केले.

१९३८ च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संत श्री गुलाम महाराजांची आरती समाज / आपकी जय हो नावाची आगळी वेगळी चळवळ उभी राहिली. आदिवासी समाज हा प्रामाणिक, मेहनती असूनही केवळ अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनतेमुळे त्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेची त्यांना जाणीव झाली. या सर्वातून ‘आप की जय हो’ ही स्वउद्धाराची चळवळ त्यांनी सुरू केली. दुर्गम भागातील लाखो आदिवासी बांधव या चळवळीच्या  अहिंसा व सदाचरणाशी जोडले गेले. ही चळवळ तत्कालीन कोणत्याही प्रस्थापित नेत्याशिवाय असलेली व सामान्य जनतेमध्ये मान्यता पावलेली एकमेव अशी सुधारणावादी चळवळ होती.

गुलाम महाराजांच्या मृत्युनंतर त्यांचे धाकटे बंधू रामदास महाराजांनी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली. या दरम्यान देशातील स्वातंत्र्य लढयांचा संघर्षही अधिक जोर धरू लागला. येथील समाजजीवनात होणाऱ्या जागृतीवर व एकीवर ब्रिटीश सरकारचे बारकाईने लक्ष होते. त्यातूनच पुढे ‘आप’च्या एकत्र येणाऱ्या समुदायावर, आरती समारंभावर बंदी आणून सरकारने रामदास महाराजांवर हद्दपारीची कारवाई केली. त्यानंतर रामदास महाराज खेतिया मार्गाने मध्य प्रदेशात गेले. या वेळी ‘आप’ समाजाचा मोठा लोकसमूह त्यांच्या सोबत होता. ब्रिटिश सरकारने यातील सहभागी लोकांच्या जमिनी काढून दुसऱ्यांच्या नावावर केल्या. रामदास महाराज ‘आप’च्या ताफ्यासह बडवाणी, कुक्षी, विंध्यपर्वतातून नर्मदा नदी उतरून सातपुड्यात आले. अक्राणी महाल किल्ल्यातून तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या परिसरातील ‘रावला पाणी’ दरीत मुक्काम केला. तेव्हा ब्रिटिशांनी फलटणी पाठवून.  ०२ मार्च, १९४३ दिवशी या ठिकाणाला वेढा घातला.

आदिवासी बांधवांच्या समूहावर ब्रिटीश सरकारने निर्दयीपणे गोळीबार केला. या गोळीबारात अनेक लोक शहीद झाले. देशकार्यासाठी मार्गक्रमण करणाऱ्या अनेक देशभक्तांचे ब्रिटीश सरकारने या वेळी प्राण घेतले. स्वातंत्र्यलढ्यातील या घटनेत केवळ गोळीबार झाला नाही, तर स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय असलेल्या व रामदास महाराजांना हद्दपारीच्या शिक्षेला विरोध करणाऱ्या ३४ आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रत्येकी १६ एकर जमिनी ब्रिटीश सरकारने जप्त केल्या. रामदास महाराजांना अटक करून तुरुंगात टाकले. अशा प्रकारे सरकारने ‘आप की जय हो’ ही स्वांतत्र्य लढ्यांतील चळवळ शक्तीच्या बळावर दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.

छोडो भारत आंदोलनामध्ये नंदूरबारमधील शाळकरी मुले आघाडीवर होती. हुतात्मा शिरिषकुमार मेहता, श्रीकृष्णभाई सोनी, मनसुबभाई, पी.के. पाटील, के.एल. शहा, लालदास शहा या बालवीरांचा त्यात समावेश होता. ९ सप्टेंबर १९४२ रोजी या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले. या आंदोलनाची परिस्थिती आपल्या हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच ब्रिटीश पोलीसांनी निःशस्त्र तरुणांवर गोळीबार करून क्रौर्याची सिमा गाठली. या गोळीबारात शहिद शिरिषकुमार, शहिद घनश्याम व शहिद लालदास हे हुतात्मा झाले. पोलीसांच्या गोळीबाराने भारतीयांसाठी पवित्र असलेल्या गोमातेसह क्रांतीकारक, बालके गोळी लागून कायमचे अपंग झाले.

स्वातंत्र्य लढ्यात तळोद्याच्या बारगळ गढीचे मोठे योगदान लाभले आहे. स्वातंत्र्य लढ्यसाठी अनेक क्रांतीकारकांनी आणि नेत्यांनी या गढीस पदस्पर्शाने पावन केले आहे, त्यात राजर्षी शाहु महाराज, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य बाळगंगाधर टीळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, गोंदवलेकर गुरूजी यांचा समावेश आहे.

१३ ऑगस्ट १९३० रोजी शहादा तालुक्यातील जयनगरच्या तसेच  १३ ऑक्टोबर, १९३० रोजी फत्तेपूर आमोदे येथील दहा गावकऱ्यांनी याच दिवशी नांदरखेडे (नंदुरबार) येथील गावकरी, कुकावल तऱ्हाडी येथील दहा गावकऱ्यांनी आपआपल्या भागात सत्याग्रह केला. यावरून नंदुरबारच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वातंत्र्यचळवळीची ऊर्जा व जागृती मोठ्या प्रमाणात पोहचल्याचे दिसून येते. सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचे पडसाद हे नंदुरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी उमटले. त्यामुळे अनेक देशभक्तांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यामध्ये नंदुरबार- ४०, नवापूर -१०, तळोदा-०७ आणि शहादा- १७५ क्रांतीकारकांना तुरुंगवास भोगावा लागला.

मुंबईमधील वारंवार होणाऱ्या बॉम्ब स्फोट घटनांपासून क्रांतिकारकांनी प्रेरणा घेऊन टोकरखेडा येथील क्रांतीकारक बारकू हिराजी पाटील, क्रांतीकारक विष्णू सीताराम पाटील यांच्यासोबत मुंबई येथील क्रांतीकारक अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्याकडे दादरला गेले आणि त्यांच्याकडून क्रांतीकारक बारकू हिराजी पाटील यांनी बॉम्ब आणून नंदुरबारमध्ये २३ जानेवारी, १९४३ रोजी पहिला स्फोट नंदुरबारच्या पोलिस चौकीजवळ , २५ जानेवारी, १९४३ रोजी दुसरा स्फोट म्युनिसिपल शाळेच्या कंपाऊंडमध्ये करण्यात आला, तर शेवटचा तिसरा स्फोट १३ फेब्रुवारी, १९४३ रोजी रिपन ग्रंथालयाजवळ करण्यात आला. नंदुरबारमधील हे तिन्ही स्फोट यशस्वी झाले. त्यात कोणतीही मनुष्य वा जीवितहानी झाली नाही. त्यामुळे क्रांतिकारकांचा हेतू हा विध्वंस घडवून आणण्याचा नव्हता तर सामान्य जनतेचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहचविण्याचा होता व त्यासाठी जनता प्रत्यक्ष संघर्षालाही सज्ज झाली होती.

स्वातंत्र्य लढा दडपून टाकण्यासाठी ब्रिटीश सरकारने कधी अश्रुधूर, कधी लाठीमार तर कधी गोळीबार अशा दमननीतीचा वापर करून चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर सरकारने केलेला भयंकर गोळीबार जनता विसरू शकली नव्हती. गोळीबाराच्या या दोन्ही घटना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. पहिल्या गोळीबारात ५ लहान शाळकरी मुले हुतात्मे झाले होते तर दुसऱ्या गोळीबारात १५ आदिवासी बांधव मृत्यूमुखी पावले आणि २८ लोक गंभीररीत्या जखमी झाले. अशा प्रकारे, तळोदा तालुक्यातील पोलिसांचा गोळीबार हा जालीयनवाला बागेच्या क्रूर घटनेची आठवण करून देणारा होता, असे इतिहासकार सांगतात.

नवापूर येथे १६ ऑगस्ट १९४२ रोजी सत्याग्रही आंदोलकांनी सरकारी बंधने धुडवून मिरवणुक काढली. या मिरवणुकीत क्रांतीकारक कन्हैयालाल शाह, कटालाल शाह, गमनलाल शाह, जयंतीलाल शाह, चंदुलाल शाह, नटवरला पुराणिक यांना सहा महिने सक्त मजुरीची व दंडाची शिक्षा आणि सुनावण्यात आली. छोडो भारत आंदोलनात सत्याग्रह केला. या आंदोलनात क्रांतीकारक धनसुखलाल दलाल, शांतीलाल शाह, नवनीतलाल कापडिया, हसमुखलाल शाह, राजेंद्र मोकाशी, धनसुखलाल शाह, गजेंद्र पाटील यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना नऊ महिने सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड करण्यात आला.

शहाद्यात देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवून आपले जीवन पणाला लावले शहादा नगरपालिकेजवळील त्यांच्या सन्मानार्थ उभारलेला स्मृतीस्तंभ आजही आपल्याला प्रेरणा देतो. १८ सप्टेंबर १९४२ रोजी शहाद्यातील २९ पोलीस पाटीलांनी ब्रिटीश सरकारच्या जुलमी सत्तेचा निषेध म्हणून राजीनामा दिल्याचाही इतिहास आहे.

पारतंत्र्याच्या काळात या सर्व देशभक्तांनी परकीय सत्तेशी प्रखर संघर्ष केल्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्याची पहाट पाहायला मिळाली. देशकार्यासाठी व मातृभूमीसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची फलनिष्पत्ती म्हणजेच आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आहे. त्यांच्या कार्याची व बलिदानाची आपण परतफेड करू शकत नाही, मात्र स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून  त्यांच्या आठवणी व कार्य आपण सतत स्मरणात ठेवू शकतो.

पालकमंत्र्याच्या हस्ते यांचा झाला सन्मान…

 नंदुरबार जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन-2021 निधी संकलनासाठी दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक निधी संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते  स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात निवड, इंडियन नॅशनल सायन्स कॉग्रेस,नागपूर व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद मध्ये सहभाग घेतलेल्या वनवासी विद्यालय,चिंचपाडा येथील सोहम वसावे,  राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या अनुदानित आश्रम शाळा पांघरण येथील समिर गावित, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतिय क्रमांक मिळविल्या बद्दल मनस्वी चव्हाण, एकलव्य विद्यालय,नंदुरबार तर राष्ट्रीय प्रदर्शनात निवड झालेल्या शेख वसिफोद्दिन, ॲग्लो उर्दु हायस्कुल,नंदुरबार यांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

प्रजासत्ताक दिना निमित्त एस.ए.मिशन हायस्कुल व ज्यूनियर कॉलेज, नंदुरबार यांनी समूह नृत्य, एस.एस.मिशन इंग्लिश स्कुल, नंदुरबार यांनी समूह नृत्य, डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार यांनी योगासने प्रात्यक्षिक नृत्य, एकलव्य विद्यालय,नंदुरबार यांनी स्वराज्याची शपथ, ॲग्लो उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार यांचे कोरोना योध्यांना मानवंदन तसेच डी.आर.हायस्कुल, नंदुरबार यांनी  देशभक्तीपर समृह नृत्य सादर केले.

यावेळी  पोलीस विभागातील उत्कृष्ठ क्रिकेटर, तसेच धावपटू खेळाडू, पोलीस विभाग,  रिझर्व प्लॉटून, दंगल नियत्रण पथक, खेळाडू पथक,गृहरक्षक दल, अग्नीशमक दल, के.डी.गावीत सैनिक स्कुल, पथराई, शासकीय आदिवासी इंग्रजी स्कुल, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार स्काऊट गाईड व श्रॉफ हायस्कुल विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना मानवंदना देऊन परेडचे संचलन केले.

यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, उप विभागीय पोलस अधिकारी सचिन हिरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपत लोकशाहीला बळकट करुया – पालकमंत्री संदिपान भुमरे

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये लक्षात ठेऊन लोकशाही बळकट करत तिला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने करण्याचे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक  दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झाले.  हा समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयाच्या  ‘देवगिरी’ मैदानावर संपन्न झाला.

यावेळी खासदार इम्तीयाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर,पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, विक्रीकर सहआयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, आपला भारत हे एक मोठे लोकशाही राष्ट्र आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासून आपल्या देशात प्रजेची सत्ता सुरु झाली.

भारतात जनहितकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था राबविली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.   या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन आवाहन आहे की, जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे. तुम्ही-आम्ही आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो. याची मला खात्री आहे. असे पालकमंत्री भुमरे यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले.

या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी यांना पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्रीमती महक स्वामी सहायक पोलीस अधीक्षक वैजापूर ग्रामीण यांना परेड संचालनालात कमांडर म्हणून गौरविण्यात आले. तसेच शिलवंत रघुनाथ नांदेडकर पोलीस उपायुक्त शहर परिमंडळ यांना विशेष सेवा पदक, जयदत्त बबन भवर औरंगाबाद ग्रामीण यांना गडचिरोली जिल्ह्यात विशेष कामगिरी बद्दल सेवा पदक, पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले व गणेश माने यांना विशेष सेवा पदक तसेच रमेश काथार, बिनतारी संदेश विभाग यांना उत्कृष्ट सेवा प्रेसिडेंट पोलीस पथक, श्रीमती प्रविणा ताराचंद्र यादव, पोलीस स्टेशन सायबर औरंगाबाद शहर, प्रभारी अधिकारी पोलीस प्रशिक्षण केंद्र आंतरवर्ग उप-प्राचार्य प्रशासन म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना युनिट होम मिनिस्टर मेडल, गोकुळ पुंजाजी वाघ सहायक फौजदार आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर उत्कृष्ट सेवा प्रेसिडेंट पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात पोलीस दल, अग्नीशमन दल, श्वान पथक, वरुन वाहन अतिशिघ्र प्रतिसाद पथक दंगा विरोधी पथक यांच्यासह विविध पोलीस पथकांनी मान्यवरांना मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक यांची भेट घेत नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

*****

प्रजासत्ताक दिनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि.  26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी राजीव निवतकर  यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी मुंबई शहराचे अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कल्याण पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना तसेच आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामहात्मा जोतिराव फुले जन आरोग्य या योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. निवतकर  सर्वांना शुभेच्छा दिल्या.

0000

पवन राठोड/26.1.2023

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, ऋतुराज कुडतडकर, राजेश तारवी, अवर सचिव सुनिल झोरे, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

000

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई, दि. २६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार

             नवी दिल्ली २५: देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तसेच  महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते व गजानन माने, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया, साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या वर्षी देशातील एकूण १०६ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह  १९ महिला तर २ हे परदेशी नागरिक आहेत. ७ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

०००

प्राचीन मंदिरे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जालोर, दि. २५ :- राजस्थानमधील जालोर-भीनमाल येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार तथा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त राव मुफतसिंह ओबावत, मंदिर समितीचे पदाधिकारी आदी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवादही साधला. हे प्राचीन मंदिर आपल्या सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. अशा श्रद्धास्थानांचे जतन, संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. तरच पुढच्या पिढीला आपली प्राचीन संस्कृती आणि तिचा वारसा समजून घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

जालोर – भीनमाल येथील हे निलकंठ महादेव मंदिर पंधराशे वर्षे जुने आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्रांगणाचा कायापालट करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मंदिर समितीने विशेष निमंत्रण दिले होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया!

मुंबई, दि. २५ :- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या परिवारांप्रति कृतज्ज्ञता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘आज भारत जगातील एक सशक्त आणि सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे राष्ट्र आहे. विविधतेने नटलेला खंडप्राय भारत जगासाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील आघाडीचे राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राविषयीही जगभरात मोठी उत्सुकता आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत आपल्या महाराष्ट्रानेही मोठे योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीच्या आलेखात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिनही म्हटलं जाते. भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्रच अग्रभागी आहे, याचाही आनंद आहे. यापुढेही सर्वच आघाड्यांवर भारताची प्रगती व्हावी यासाठी एकजूट करावी लागेल. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांचे घटक असणारे कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यांच्याबरोबर देशातील समृद्ध साधनसामुग्रीचे, निसर्गसंपदेचेही जतन आणि संवर्धन करण्यासाठी सजग-संवेदनशील राहावे लागेल. सार्वजनिक शिस्त, सामाजिक सलोखा, आर्थिक-सामाजिक दायित्त्व याचे भान बाळगावे लागेल. तरच येणाऱ्या पिढ्यांतही बांधिलकी निर्माण होईल. अशा पिढीकडे हे प्रजासत्ताकाचे संचित सुपूर्द करणे हीच आपली जबाबदारी आहे, हेच आपले राष्ट्र कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्व कटीबद्ध राहूया.

भारतीय प्रजासत्ताक चिरायू व्हावे यासाठी समता-बंधुता आणि एकात्मता या भावना वाढीस लावूया. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! या मनोकामनेसह पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

000

ताज्या बातम्या

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

0
हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील...

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक...

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी...

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

0
पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा...

शंकरबाबाची मानसकन्या माला होणार जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली...