बुधवार, ऑगस्ट 13, 2025
Home Blog Page 1666

महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ

मुंबई, दि. २४ :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्या ॲड.गौरी छाब्रिया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाऊल उचलणारी हेरवाड ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन, हे कार्यक्रम यावेळी होणार आहेत.

000

संध्या गरवारे/विसंअ

‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.24 : ‘सुशासन’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले असून जिल्हास्तरापर्यंत सुशासन इंडेक्स असणार आहे. तत्पर, पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे सुशासन अमंलबजावणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) आणि  महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यावेळी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. व्यासपीठावर सुशासन समितीचे अध्यक्ष सुरेश कुमार, समिती सदस्य  स्वाधीन क्षत्रिय, डीएआरपीजीचे केंद्रीय अतिरिक्त सचिव अमर नाथ, सचिव व्ही. श्रीनिवास, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात ई गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन- प्रशासन नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करत आहे. त्या दृष्टीने ही परिषद निश्चित उपयुक्त आणि दिशादर्शक ठरेल.

जनतेला सुशासन देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा भर असून त्याचा मुख्य गाभा ई- गव्हर्नन्स आहे. कारण तंत्रज्ञान सर्वांना एक समान सेवा प्रदान करते. गतिमानता, पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना हे सुशासन प्रणालीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. ई-गव्हर्नन्स संकल्पना या सर्व उद्देशांनी परिपूर्ण असून ई-गव्हर्नन्सद्वारे लोकांना सेवा आणि योजनांचा तत्पर लाभ मिळत आहे. शासनाचे धोरण प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स उपयुक्त ठरते आहे. त्यामुळे जेव्हा प्रधानमंत्री डिजिटल माध्यमातून योजनांची माहिती देशातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवतात, तेव्हा या ई संवादाने तीन ते चार कोटी लोकांपर्यंत ती योजना पोहोचते, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले की देशात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या प्रशासकीय  कार्यप्रणालीत कालानुरूप बदल करणे आवश्यक असून ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे परिवर्तन देशभरात होते आहे.

त्याचप्रमाणे ई कार्य पद्धतीमुळे जनतेला आपल्या अर्जावर, निवेदनाबाबत काय कार्यवाही होत आहे याची माहिती मिळते. ‘आपलं सरकार’ द्वारे जन तक्रार दाखल करणे, त्यावर तत्काळ कारवाई या बाबी गतिमान झाल्या आहेत. तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊन नुकसान भरपाई देणे शक्य होत आहे. त्यासोबतच भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धतीसाठी एक खिडकी योजना यांसारखे लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ई गव्हर्नन्स पूरक  आहे.

प्रशासनासोबतच विद्यार्थी, शेतकरी, सर्व नागरिकांसाठी ही प्रणाली सोयीची ठरते आहे. सर्व यंत्रणा ई गव्हर्नन्स मध्ये परावर्तित होत असल्याने वेळ, पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शकपणे कार्यान्वित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, ई गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे महाराष्ट्र राज्यात आयोजन ही स्वागतार्ह बाब आहे. ई गव्हर्नन्स आणि त्या माध्यमातून सुशासन ही लोकोपोयुक्त संकल्पना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली ‘अधिकतम शासन, न्यूनतम सरकार’,  ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सहायक ठरणारी ही परिषद आहे.

ई प्रणालीमुळे गतीने जनसेवा उपलब्ध करून देणे शक्य होत आहे. पेन्शन वितरण सुलभ झाले. कोविडसारख्या संकट काळातदेखील शासकीय काम, लाभार्थींच्या सहकार्यासाठी अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू होती. कारण त्याआधी पासून देशात ऑनलाईन कार्यपद्धती प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाली होती.

ई गव्हर्नन्स हे वेळ, पैसा, श्रमाचा अपव्यय टाळून सुलभ आणि तत्पर सेवा देण्यासाठी सहायक ठरणारे आहे. त्यासोबतच माहिती संकलनाचा अधिकृत स्त्रोत म्हणून ही प्रणाली उपयुक्त आहे. देशभरात तिचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी परिषद निश्चित उपयुक्त भूमिका पार पाडेल, असे श्री. सिंग यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ई ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीबाबतची चित्रफित दाखविण्यात आली. तसेच २.० विशेष मोहिमेवरील एमजीएमजी ई जर्नलचे तसेच जीजीडब्लू २०२२ कॉफी टेबल बुक चे यावेळी  प्रकाशन करण्यात आले.

००००

वंदना थोरात/ससं

मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित

पुणे, दि. 24 : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनील सिरसाट आदी उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, मराठी विश्वकोश ज्ञानाचे साधन असल्याने निर्मिती प्रक्रियेमध्ये अचूकता आणि गुणवत्तेला महत्व देण्यात येत आहे. लोकशिक्षणाच्या अध्यापनशास्त्रात विश्वकोश हे मोलाचे साधन आहे. विश्वकोश भाषावृद्धी व समृद्धीला हातभार लावतो. परिभाषा व प्रमाणभाषा घडवण्यासाठी मंडळ जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ग्रामीण भाग, आदिवासी पाडे, लहान बालकांपर्यत विश्वकोश पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रित आणि संगणकीय माध्यमांचा मेळ घालून ही वाटचाल चालू राहणार आहे.

मराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठीचे काम सुरू झाले आहे. नोंदींमध्ये अचूकता व अद्ययावतता आणणे आणि वादग्रस्तता येऊ नये याची काळजी घेणे अशी त्रिसूत्री वापरून, मूळ छापील नोंदी आणि संकेतस्थळावरील नव्या नोंदी एकत्र करून दुसरी विस्तारित आवृत्ती तयार करण्यात येईल. कुमार कोशाचे दोन नवे खंड सुमारे सहा महिन्यांत, तर नवे माहितीपुस्तक येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे.  येत्या काळात बालकोश आणि ऑलिंम्पिक कोशाची निर्मितीही प्रस्तावित आहे.

विश्वकोशाचे कार्य उत्तम रितीने चालावे यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री  दीपक केसरकर यांनी वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाला भेट देऊन नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याची घोषणा केली आहे. शासनाच्या पाठिंब्यामुळे अधिक जोमाने कार्य करीत पुढील उपक्रम राबवण्याचा निर्धार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.

माहिती व तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वकोश वाचकांपर्यत पोहचविण्यात येत आहे. मराठी विश्वकोश 2007 या वर्षी सीडीमध्ये, 2011 मध्ये संकेतस्थळावर, 2017 मध्ये पेनड्राईव्ह आणि 2018 मध्ये भ्रमणध्वनी उपयोजकावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन्ही  संकेतस्थळांना मिळून सुमारे तीन कोटी वाचकांनी भेट दिली आहे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.

डॉ. पाटोदकर म्हणाले, माहिती व जनसपंर्क महासंचालनालयाच्या वतीने शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची, ध्येयधोरणांची, उपक्रमांची माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविण्यात येते. नागरिकांपर्यंत अचूक व वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यासाठी विभाग नेहमीच प्रयत्न करीत आहे. हे काम करीत असताना मराठी भाषेचे अचूक ज्ञान असणे फार गरजेचे असून यासाठी मराठी विश्वकोशाचा माहिती व जनसंपर्क विभागाला संदर्भ म्हणून नेहमीच उपयोग होत असतो, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरविण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा – सहकारमंत्री अतुल सावे

मुंबई दि. 24 – कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले.

पणन महासंघ अधिमंडळाची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. त्यावेळी सहकार मंत्री श्री. सावे बोलत होते.

सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले, राज्य शासन शेतकरी हितासाठी कार्य करत आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत सुमारे 7.19 लाख कर्ज खात्यात 2638.18 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंत ही रक्कम मिळणार आहे.

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून वेतनाच्या अडचणी होत्या यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. नाफेडकडे प्रलंबित विषयाबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगून श्री. सावे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळाला पाहिजे यासाठी पणन महासंघाने पुढाकार घ्यावा. असेही सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

यावेळी सन 2021-22 या कालावधीतील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहकारी संस्था आणि पणन महासंघातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी- कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री सतिश पाटील, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, आबासाहेब काळे, पणन विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, माजी संचालक मोहनराव अंधारे, भागवत राव धस सहकारी संस्थेचे पदाधिकारी, पणन महासंघातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0000

श्रीमती काशीबाई थोरात/

सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घराला लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २४ – सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी योजनांचे मंत्रालयातून ई-भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमावेळी पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. या मिशनच्या माध्यमातून शासन घरोघरी नळ पाणी जोडणी देत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक घरात नळ पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. नळ जोडणी कामे लवकर व्हावीत म्हणून याबाबतचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व योजनांना मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही कामे जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांचा दर महिन्यात आढावा घ्यावा व त्याची प्रगती एका नोंद वहीत ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करुन या मिशन अंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पुनर्जोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के अशी निधीची उपलब्धता असल्याची माहिती मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिली.

जल जीवनच्या १४० कामांना मंजुरी – मंत्री शंभूराज देसाई

‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे. पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा आज शुभारंभ झाला असून, या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार असून ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामांबरोबरच जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ही शासनाने निधी आणला.

पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी ४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. एकूण ३६ हजार ९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील ३४० गावांमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक ऋषिकेश यशोद (दूरदृश्य प्रणालीद्वारे) मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील,जल जीवन मिशनचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, गट विकास अधिकारी गोरख शेलार उपस्थित होते.

००००

श्रीमती शैलजा देशमुख/विसंअ

पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

एबीपी माझाच्या बीकेसी येथे आयोजित ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी उद्याच्या महाराष्ट्राचे त्यांचे व्हिजन मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. देशात आणि जगात महाराष्ट्राप्रती एक विश्वास आहे. दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे  सामंजस्य करार करण्यात आले, त्यामुळे प्रधानमंत्री यांच्या 5 ट्रिलियन उद्दिष्टपू्र्तीमध्ये महाराष्ट्राची 1 ट्रिलियन उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र हे देशातील मोठे औद्योगिक शहर असून येथे मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. निर्यातीत राज्याचा वाटा जास्त असून विकासासाठी नवनवीन चांगले उपक्रम हाती घेण्यात आले आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्यात रस्त्यांची जोडणी वाढली असून यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक कॉरिडॉर करत असून यात पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्यात नवीन वसाहती उभारणे, झोपडपट्टी निर्मूलन, फ्लेमिंगो करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सौर ऊर्जेद्वारे 400 मे.वॅ. वीजनिर्मिती करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी 18 नवीन प्रकल्प तयार करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे यावर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आगामी वर्षात आम्ही रोजगार, स्वयंरोजगार यावर भर देणार असून मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महिला, तरुणी आणि बालकाची मोठ्या प्रमाणात तपासणी करतोय. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्यावर भर  देण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रावर भर देण्यात येईल. पोलीस वसाहती, महिला सन्मान, विजेवरील वाहने यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

0000

श्री. संजय ओरके/विसंअ

जिल्ह्यातील १०० टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील*

सातारा, दि. 24 – सातारा जिल्ह्यातील सर्व गावंमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील १४० गावातील नळ पाणी योजनांचे ई भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील बोलत होते.

यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल,जल जीवन मिशन प्रकल्प संचालक ऋषिकेश यशोद (दूरदृश्य प्रणालीव्दारे )मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील,जल जीवन मिशनचे कार्यकारी अभियांता सुनील शिंदे, गट विकास अधिकारी गोरख शेलार उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. या मिशनच्या माध्यमातून शासन घरोघरी नळ पाणी जोडणी देत असल्याचे सांगितले.  राज्यातील प्रत्येक घरात नळ पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. नळ जोडणी कामे लवकर व्हावीत म्हणून या बाबतचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही कामे जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांचा दर महा आढावा घ्यावा व त्याची प्रगती  एका नोंद वहीत ठेवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन या मिशन अंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पूर्नजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबध्द आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के  अशी निधीची उपलब्धता असल्याची माहिती मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिली.

जल जीवनच्या १४० कामांना मंजुरी, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळणार – मंत्री शंभूराज देसाई

जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा आज शुभारंभ झाला असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे.या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे . अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी निधी शासनाने दिला. जलजीवन मिशन माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ही निधी आणला.

पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी ४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. एकूण ३६ हजार ९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील ३४० गावांमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

000

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. 24- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज झाली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या रंगीत तालमीत भारतीय नौदल, तेलंगना पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक, गृहरक्षक दल पुरूष व महिला,  बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल यांच्यासह विविध पथ दल, विभाग, शाळा, पथक यांनी सहभाग घेतला.

तसेच, राज्य शासनाच्या 16 विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह तालमीत सहभाग घेतला.

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 1 मे 2022 रोजी झालेल्या महाराष्ट्र दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंग यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकास प्रथम, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलास द्वितीय तर राज्य राखीव पोलीस बलास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

00000

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.२३ : स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची शिकवण, विचार आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा घेऊन पुढे जात आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार गजानन किर्तीकर, माजी मंत्री रामदास कदम यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांवर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या  प्रत्येकासाठी हा दिवस महत्वाचा आहे. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात त्यांच्यामुळे पोहोचू शकले. मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावले जातेय हा महत्वाचा क्षण आहे. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी राज्य चालवले. सर्वसामान्यांपर्यंत  सत्ता पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांचे सोने झाले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  त्यांचे विचार ऐकताना ऊर्जा येते आणि प्रेरणा मिळते. अन्याय विरूध्द लढण्याचे बळ मिळते. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. ते गुरुस्थानी होते.

            शत्रू राष्ट्रालाही त्यांची जरब वाटायची. ते उत्तुंग आणि हिमालयाएवढं व्यक्तिमत्त्व होते. मात्र, तितकेच ते कोमल हृदयाचे होते. लोकांच्या अडचणी बाबत ते कायम जागरूक असायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, धाडस आणि आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला. त्यांच्या विचारात ओतप्रोत राष्ट्रभक्ती भरलेली होती.  विचारांशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी रिमोट कंट्रोलचे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

            बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विचारधारांचा मिलाफ आढळून यायचा. विभिन्न क्षेत्रातील अनेकांवर संकटे आली तेव्हा त्यांच्या पाठीमागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी नेहमी केले, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम स्व. बाळासाहेबांनी केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील जसा विशाल महासागर आहे तसे आणि आवश्यक तेव्हा तुफानापेक्षा अधिक संघर्ष करणारे बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्र आणि देशाच्या नेत्यांच्या मांदियाळीतले वेगळेपण दाखवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

            बाळासाहेब यांच्यामध्ये एक ऊर्जा होती. ती कायम कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचा मनाचा मोठेपणा हा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अनुभवल्याची आठवण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितली.

            ते म्हणाले की, स्पष्टवक्तेपणा हा बाळासाहेबांचा गुण होता. एकदा बोललेले वक्तव्य परत घेण्याची वेळ त्यांनी येऊ दिली नाही. तत्वासाठी कायम राजकारण केले. त्यांनी कधी जातपात पहिली नाही. अनेकांना त्यांनी निवडून आणून दाखवले. जातिव्यवस्थेचा  पगडा कमी करण्याचे काम त्यांनी केल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            बाळासाहेबांच्या तैलचित्रातून प्रत्येक जण प्रेरणा घेईल. विचारांची प्रतिबद्धता त्यांनी  शिकवली. त्या विचारांसोबत असणे हीच त्यांना श्रद्धांजली होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

            विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समाजकारणाची संधी मिळाली. त्यांनी सामान्यांतील सामान्य माणसावर विश्वास दाखविला. त्यांच्या विचारानुसार महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.

            केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले की,  स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी संघटना स्थापन केली. त्यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

            विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जातीपातीच्या पलिकडे जाऊन बाळासाहेबांनी काम केले.

            श्री. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी बाळासाहेब हे देशाला दिशा देणारे नेतृत्व होते, असे सांगितले

            विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. पवार म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांचे राष्ट्रहिताचे विचार  नेहमीच मार्गदर्शक ठरतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला. त्यांच्यामुळेच मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे होऊ शकला.

            मंत्री श्री. केसरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार, संपादक आणि सामाजिक सुधारणांचे अग्रणी होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले.

यावेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या संकल्पनेवर आधारित आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप चवरे लिखित ‘झंझावात’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. चित्रकार किशोर नांदिवडेकर यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विधानभवन परिसरात बाळासाहेबांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

            अभिनेते प्रसाद ओक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी मानले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्य दूत, नागरिक उपस्थित होते.

०००००

 

 

 

बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, २३ :बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल त्याला ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी,  केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, सचिव इंदिवर पांडे मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी देशभरातील 11 बालकांना सहा विविध श्रेणींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेख‍नीय कामगिरीसाठी ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. राज्यामधून बीड जिल्ह्यातील रोहन बहीर या बालकाला त्याने केलेल्या शौर्यासाठी गौरविण्यात आले.  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे स्वरूप पदक, 1 लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

रोहन याने असे वाचविले प्राण

बीड जिल्ह्यातील राजुरी नवगण येथील रोहन बहीर याने गावातील डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने वाचविले. रोहनच्या  समय सूचकतेमुळे महिलेचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्यासाठी आज त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम (Innovation), शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात  ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांना मान्यता मिळाली, अशा 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची निवड करण्यात आली होती.

यावर्षी देशभरातून निवडलेल्या 11 मुला-मुलींना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात (4), शौर्य (1), नवोपक्रम (2), समाजसेवा (2) अशा  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

०००

ताज्या बातम्या

अवयवदान : एक सामाजिक कार्य

0
  अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी कार्य केले जाते. सध्या राज्यभरात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवड्याचे आयोजन...

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार  ठाणे,दि.१२...

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

0
मुंबई, दि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या...

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १२ : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन...