बुधवार, ऑगस्ट 13, 2025
Home Blog Page 1667

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण

मुंबई, दि.२३ : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे  संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव,  मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.

कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे  कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत  देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण

कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे  ही  सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

कोकणातील  पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या  पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी निलेश मदाने यांचे उद्या काव्य सादरीकरण

मुंबई, दि. २३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी व विधिमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांचे काव्य सादरीकरण प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ज्येष्ठ कवी श्री. मदाने यांनी दिलखुलास कार्यक्रमातून कवितांचे सादरीकरण केले आहे.

०००

ग्रामीण भागातील तरूणांना मिळणार रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण

मुंबई, दि. २३ : राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रूची माथूर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारानुसार कौशल्य, रोजगार, उद्योगजकता आणि नाविन्यता विभाग आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील मागास जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात रोजगारासह कुशल मनुष्यबळाचा विस्तार करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ‘लाईटहाऊस : कौशल्य आणि उपजीविका केंद्र’ (Lighthouse: Center for Skilling and Livelihoods) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्यक्रमाद्वारे कमी उत्पन्न असलेल्या समुदायांसोबत काम करणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना सशक्त करणे आणि त्यांच्यात क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या सहभागातून, लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन संपूर्ण राज्यामध्ये लाईटहाऊस केंद्रांद्वारे कौशल्य आणि उपजीविका कार्यक्रम राबवेल, ज्यामध्ये भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र आधारित मॉडेल करिअर सेंटर्स (MCC) आणि 18-35 वयोगटातील ग्रामीण तरुण वर्गाचा समावेश असलेल्या आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य देईल. हा सहा महिन्यांचा कार्यक्रम असेल. ज्याची सुरुवात मूलभूत अभ्यासक्रम, करिअर समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षणापासून ते कार्यक्रम पूर्ण झाल्यावर उद्योग भागीदारांसह रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत होईल.

000

पवन राठोड/ससं

लोकाभिमुख प्रशासनाच्या यशस्वीतेसाठी ई – गव्हर्नन्स उपयुक्त

मुंबई, दि. २३ : शासनाच्या  लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि गतिमानतेने जनसेवा उपलब्ध करून देण्यात ई गव्हर्नन्स संकल्पना सर्वार्थाने उपयुक्त असल्याचे मत ई गव्हर्नन्स परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी)आणि  राज्य शासनाच्या सहकार्याने, आयोजित करण्यात आलेल्या “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत पहिल्या दिवशी विविध विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली.

“सुशासन आणि स्टार्टअप परिसंवाद” या विषयावरील पहिल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी, कर्नाटक सरकारच्या, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे मुख्य सचिव डॉ. श्रीवत्स कृष्णा होते. या  सत्रात  सहभागी विविध स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शासनाने प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची आणि त्यात प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण सुविधांसाठी लक्ष देणे गरजेचे आहे. वैद्यकीय उपचारांना पूरक ठरणारे स्टार्टअप वाढवणे नागरीकांना पूरक आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहायक ठरतील. तसेच रोजगार आणि सोयी सुविधांची उपलब्धता वृद्धिंगत करण्यासाठी नवीन उद्योजकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, शासनाने स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत या चर्चासत्रात सहभागी झालेले श्रीकांत वेलामकाणी, अश्विन डमेरा, आकात वैश्य , सिद्धार्थ शहा  यांनी व्यक्त केले.

भारतीय लोक प्रशासन संस्था, आयआयपीएचे  महासंचालक डॉ. एस.एन. त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली  “ई-प्रशासन  पुरस्कार उपक्रम” या विषयावरील दुसरे  सत्र झाले. यामध्ये जिल्हा प्रशासन ते  पंचायत स्तरावर ई गव्हर्नन्स उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.   पंचायत स्तरावरील कार्यालये आणि कार्य प्रणालीत करण्यात येत असलेल्या  बदलांबाबतची  माहिती केंद्रीय सहसचिव आलोक नागर यांनी दिली. त्रिनेत्रा संकल्पनेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशा प्रकारे यंत्रणा गतीने आणि पारदर्शकपणे कार्यान्वित होते,  याबाबत नरसिंह कोमर, आयपीएस चेअरमन ‘टास्क फोर्स ऑन विश्वास’ आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी सादरीकरण केले. माईनमित्रा , मिनरल मार्ट या प्रणालीचा वापर करून पारदर्शकपणे जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने उत्खनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत लोकाभिमुखपणे काम करत आहे , याबद्दल उत्तर प्रदेशचे विशेष सचिव विपीन कुमार यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव, अमर नाथ, यांच्या अध्यक्षतेखाली  ‘ई-प्रशासन  पुरस्कार उपक्रम’ या विषयावर  सादरीकरण करण्यात आले. यामध्ये पीएम स्वनिधी तसेच स्वनिधी से समृद्धी यासह इतर विविध  योजनेच्या माध्यमातून महिला, नागरिकांना अधिक व्यापक प्रमाणात सुलभतेने अर्थसहाय्य करणे हे केवळ तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून शक्य झाल्याचे  निती आयोगाचे महासंचालक  संजय कुमार यांनी सांगितले. तर लोकांच्या तक्रारींचा निपटारा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशा प्रकारे तत्परतेने करता येतो , याबद्दल प्रा.निशिथ श्रीवास्तव, आयआयटी कानपूर यांनी सांगितले.  तर राजस्थानमधील हनुमानगरच्या जिल्हा दंडाधिकारी रुक्मिणी सिहाग यांनी गंगा कालवा नियंत्रण यंत्रणेच्या संगणकीकरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना पाणी वाटपाबाबत देण्यात येणाऱ्या संदेश उपक्रमाची माहिती सादर केली. तर तक्रार निवारण ऑनलाईन सुविधा,एक खिडकी योजना यामाध्यमातून केरळ राज्यात राबविण्यात येत असलेल्या इ गर्व्हनन्सच्या उपक्रमांची माहिती डॉ.आशा थॉमस, अपर मुख्य सचिव,केरळ यांनी दिली.

०००

राजू धोत्रे, विसंअ / वंदना थोरात, स.सं

ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील महाराष्ट्राच्या बेस्ट प्रॅक्टिसेस सर्वोत्तम

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र स्थलांतर प्रणाली, रस्ता गुणवत्तेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, वेध अप, ई रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी आज झालेल्या विभागीय ई गव्हर्नस परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम होते.

महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नन्सवर विशेष भर दिला आहे. शासनाशी संबंधित कामासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागू नये. घरबसल्या त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात तसेच ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सर्व शासकीय सेवा-सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन विविध प्रणाली विकसित करीत आहे. शासनाच्या योजनाचा लाभ, तसेच एकूण सर्व सेवा सुविधा याबरोबरच माहिती संकलित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम (महा एमटीएस)

महाराष्ट्रात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे.  हे स्थलांतर स्थलांतरित कुटुंबातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर आणि स्तनदा महिलांच्या आरोग्य व पोषण स्थिती व सुरक्षिततेवर सर्वाधिक परिणाम करते. या स्थलांतराच्या कालावधीदरम्यान सार्वत्रिक आरोग्य आणि पोषण लाभ / योजनांची परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम (महा एमटीएस) ची निर्मिती करण्यात आली आहे.याविषयी वनामतीच्या संचालक मिताली सेठी यांनी माहिती दिली.

या प्रणालीमुळे स्थलांतरित लाभार्थींसाठी शासकीय सेवा वितरण अखंडितपणे सुरु राहील. यामध्ये लसीकरण, आरोग्य तपासणी, एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) आणि एकात्मिक बाल संरक्षण सेवा (ICPS) इ. सेवा अंतर्भूत आहेत. सन 2021-22 मध्ये महा एमटीएस प्रणाली अंमलबजावणीकरिता अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, नंदुरबार आणि पालघर या ६ स्त्रोत जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. या पथदर्शी प्रकल्पाचे अभ्यासावरून पुढील टप्प्यात महा एमटीएस प्रणालीचे राज्यव्यापी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. महा एमटीएस प्रणाली तांत्रिक उपयोजनांसोबत प्रशासकीय यंत्रणा, टोल-फ्री हेल्पलाईन आणि इतर नाविन्यपूर्ण मार्गांसह काम करत आहे; ज्यामुळे अंगणवाडी सेविका (AWW), आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मजबूत संपर्कजाळ्याद्वारे अधिकाधिक स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचता येईल असेही श्रीमती सेठी यांनी सांगितले.

शासकीय जमा लेखांकन पध्दती

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाकडे जमा होणारा महसूल व महसूलंतर जमा रकमा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने शासनाच्या तिजोरीत जमा कराव्यात, याकरिता “शासकीय जमा लेखांकन पद्धती” (Government Receipt Accounting System-GRAS) या प्रणालीची निर्मिती करण्यात आलेली आहे. याकरिता बँकिग क्षेत्रात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सुविधांचा वापर करून जनतेला विनासायास महाराष्ट्र शासनाचा कर व अन्य भरणा करता यावा या उद्देशाने ही निर्मिती करण्यात आल्याची माहिती राधिका रस्तोगी यांनी दिली.

इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर व बँकांच्या ई-पेमेंट गेटवे पद्धतीचा उपयोग या प्रणालीत करण्यात आला आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात मुद्रांक विक्रीबाबत मुद्रांक विक्रेत्याकडून (Stamp vendors) रोख रक्कम / धनाकर्ष न स्विकारता यापुढे “ग्रास” प्रणालीमार्फतच ई-पेमेंटद्वारे स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे.  जिल्हा कोषागारातर्फे मुद्रांक विक्रीबाबत मुद्रांक विक्रेत्यांकडून ( Stamp vendors) रोख रक्कम / धनाकर्ष न स्विकारता “ग्रास” प्रणाली मार्फतच इलेक्ट्रॉनिक पध्दतीनेच स्विकारण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचेही श्रीमती रस्तोगी यांनी सांगितले.

संख्यानिहाय मूलभूत साक्षरता’, या संकल्पनेवर आधारित वेध ॲप

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हे वेध ॲप विकसित केले आहे. विद्यार्थी-शिक्षक आणि शाळा यांचा इत्यंभूत तपशिल ठेवणारे अद्ययावत ॲप राज्यभरातील शिक्षण व्यवस्थेत अमलात येणार आहे. त्या अगोदर नाशिकमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’व्दारे हे ॲप अमलात आणले. पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती मित्तल यापूर्वी कार्यरत होत्या. तेथील आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पटावरील उपस्थिती बघून त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे ‘फाऊंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी’ तथा ‘एफएलएन-वेध’ या नावाने ॲप विकसित केले होते. या ॲपव्दारे कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचा इत्यंभूत तपशिल प्रोफाइलला अपलोड केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्यविषयक सूक्ष्म तपशीलदेखील त्यावर अपलोड करण्यात आला आहे. या ॲपच्या ट्रॅकिंगव्दारे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तपशील विषयनिहाय अद्ययावत ठेवला जाणार आहे. आधारकार्ड ज्याप्रमाणे नागरिकांचा इत्थंभूत तपशील दर्शविते त्याप्रमाणे हे ॲप विद्यार्थ्याचा सर्व पट निरीक्षकांसमोर मांडू शकेल. याव्दारे शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती श्रीमती मित्तल यांनी दिली.

ॲपमध्ये चार लॉग इन देण्यात आलेले आहे. शिक्षक, शाळा, डॉक्टर आणि ॲडमीन. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा डेटा वेळोवेळी अपलोड करतील, त्यानुसार त्यांना विद्यार्थ्याची प्रगती समजेल. यातील माहिती तुलनात्मक असल्याने विद्यार्थी कुठे कमी पडतोय का ते लक्षात येईल. त्यामुळे महत्त्वाच्या बाबींवर लक्ष्य केंद्रित करता येईल. ॲडमीन म्हणून लॉग इन असलेले अधिकारी सर्व माहिती घेवून शाळांना योग्य सूचना करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रस्ते गुणवत्ता तपासणी कृत्रिम बुद्धिमत्ता दृष्टिकोन

महाराष्ट्रातील रस्ते अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी  सगळ्या रस्त्यांच्या गुणवत्तेचे आणि इतर माहितीचे विश्लेषण करून या निर्मितीमध्ये असलेल्या त्रुटी शोधली जातील. काही ठिकाणे म्हणजे जिथे सहसा लक्ष दिले जात नाही  ती  बाब तपासली जाईल.

रस्त्याची निर्मिती करतांना त्यामध्ये अनेक सुधारणा करणे यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता दृष्टिकोन  असलेला प्रकल्प रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते असे सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या प्रणाली विषयी माहिती देतांना सांगितले.

ई-रजिस्ट्रेशन प्रणाली

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत नागरिकांसाठी सुरू केलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या ‘ई-रजिस्ट्रेशन’ प्रणालीची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक ‘ई-रजिस्ट्रेशन’ ही प्रणाली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन भाडेकरार घरबसल्या, तर सदनिकांचा प्रथम विक्री करारनामा (फर्स्ट सेल) बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातूनच नोंदविता येतो. त्यामुळे या कामांसाठी नागरिकांना दस्त नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. ही प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात येत असून नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे, असेही श्री हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २३ : पायाभूत सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ देऊन राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, आरोग्य आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आजच्या दिनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा सत्कार करताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या राज्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला रुग्णवाहिका, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ देऊन बळकटीकरण केले जाणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात येत आहे. मुंबईत २५० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. घराशेजारी आरोग्य व्यवस्था पुरविण्यासाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. मातामृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचार कोटी महिलांची तपासणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर बाल सुरक्षा अभियानात १८ वर्षांखालील मुलामुलींची तपासणी केली जाणार आहे.

प्रास्ताविक आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी, तर आभार उपसंचालक कैलास बाविस्कर यांनी मानले.

कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर, उस्मानाबाद.

उत्कृष्ट डॉक्टर डॉ. प्रमोद पोतदार, शरीर विकृती शास्त्र, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती.

डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर, डॉ. सदानंद राऊत, पुणे

पत्रकाराचा – संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे

उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार – धर्मा विश्वासराव वानखेडे, आरोग्य सहाय्यक, अमरावती. मिलिंद मनोहर लोणारी, स्वच्छता निरीक्षक, जळगाव. प्रशांत संभाप्पा तुपकरी, आरोग्य कर्मचारी, हिंगोली. किशोर वैद्य, आरोग्य कर्मचारी, नागपूर. दिलीप बाबूराव कचेरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे यांना प्रदान करण्यात आले.

प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

०००

रवींद्र राऊत/विसंअ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीची अधिसूचना आज राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २३ : यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त श्री. देशपांडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रालय पत्रकार कक्ष येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव मनोहर पारकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, श्री. साखरे उपस्थित होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. ही लोकशाही दिंडी राष्ट्रीय मतदार दिनी सकाळी ९ वा. एनसीपीए येथून पाटकर सभागृहापर्यंत निघणार आहे. तसेच भारतीय निवडणूकांच्या इतिहासावर आधारित चित्रमय प्रदर्शन, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाची निर्मिती असलेल्या ‘मै भारत हूँ’  या निवडणुकांवर आधारित गाण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या गाण्याचे दिग्दर्शन व लेखन सुभाष घई यांनी केले असल्याची माहितीही श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय रांगोळी आणि भित्तिपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असेही श्री. देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

००००

निलेश तायडे/स.सं.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम

मुंबई, दि.२३ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दि. २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत “चालता बोलता” या प्रश्नसरितेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, दि. २३ ते २५ जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २४ रोजी परिषद सभागृह, मंत्रालय येथे दुपारी २ वा. मंत्रालयातील आणि विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ रोजी सायं. ४ ते ५:१५ वाजेपर्यंत “हास्यसंजीवनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर, सायं. ५:३० ते ६ या कालावधीत अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

०००

अर्चना शंभरकर/विसंअ

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी – एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या मदतीने रोजगार निर्माण करावेत. सकल देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांनी उद्योजक होऊन योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, राज्याच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नॅशनल एससी – एसटी हब संमेलनात केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते.

मंत्री श्री. राणे यांनी सांगितले की, देशात रोजगार निर्माण करताना उद्योजकही तयार करायचे आहेत. उद्योजक बनविण्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे योगदान आहे. सध्या देशात ६ कोटी ४० लाख उद्योजक असून ११ कोटी कामगारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे. भारताचा जीडीपी ३.५ टक्के असून तो पाचवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या भारत पाचव्या क्रमांकावर असून २०३० मध्ये अमेरिका, चीननंतर तिसऱ्या स्थानी नेण्याचे स्वप्न प्रधानमंत्र्यांनी पाहिले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवउद्योजकांनी उद्योग उभे करून योगदान द्यावे.  नवउद्योजकांना केंद्र सरकारच्या योजनांतर्गत कर्ज उपलब्ध होते. यावर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून २५ ते ३५ टक्के सबसीडी देण्यात येत आहे. नोकरी आणि उद्योगामध्ये फरक असून उद्योगांमध्ये फार मोठ्या संधी आहेत. यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून कष्ट घेण्याची तयारी नवउद्योजकांनी ठेवावी. समाजहित, देश आणि कुटुंबासाठी औद्योगिक प्रगती महत्वाची आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेवून उद्योजक व्हा. समाजाचे दु:ख पुसण्यासाठी स्वत: आर्थिक सक्षम व्हा, असे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी केले.

यावेळी मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शून्यातून उद्योजक बनलेल्या नितीन बनसोड, दिनेश खराडिया, सुनील चव्हाण आणि अप्पा वाघ या चार उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे एससी-एसटी समाज घटकातील उद्योजकांना मदत करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात श्रीमती इपाओ यांनी सांगून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बी.बी.स्वेन, योगेश भांबरे, प्रांजळ साळवे, सुनील शिंदे, इशिता गांगुली-त्रिपाठी, मनोजकुमार सिंग, राजेंद्र निंबाळकर, प्रशांत नारनवरे, सुनील झोडे, रवीकुमार यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमस्थळी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय सचिव बी.बी. स्वेन, सहसचिव श्रीमती मर्सी इपाओ, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड अॅफरमेटिव्ह अॅक्शनचे चेअरमन सुनील झोडे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुनील शिंदे, डॉ. विजय कलंत्री, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, उद्योग विभागाच्या अतिरिक्त आयुक्त इशिता गांगुली-त्रिपाठी, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार सिंग आदी उपस्थित होते.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार  ठाणे,दि.१२...

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

0
मुंबई, दि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या...

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १२ : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन...

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी- मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२: विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत...