रविवार, ऑगस्ट 10, 2025
Home Blog Page 1668

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण २३ जानेवारीला – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि. १८ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवार, दि. २३ जानेवारी २०२३ रोजी विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची ओळख व्हावी त्यानुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तैलचित्राचे अनावरण लवकरात लवकर करावे असे निवेदन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्या निवेदनानुसार अध्यक्षांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दि. 23 जानेवारी रोजी विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनावरण कार्यक्रमाला देशातील आणि राज्यातील मंत्र्यासह खासदार, आमदार आणि  कला, क्रीडा, सिनेसृष्टी अशा  विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी दिली.

००००

पवन राठोड/ससं

विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर

मुंबई, दि. १८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्ज वितरण आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत.

मेट्रो रेल्वे मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते सुमारे 12 हजार 600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण होणार आहे. यातील दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2 अ ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. सन 2015 मध्ये या मार्गिकांची पायाभरणी देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केली होती. यावेळी प्रधानमंत्री मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा प्रारंभ करतील. सुलभ प्रवासासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असून मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल आणि याच्या मदतीने युपीआय (UPI) द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल.

सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी

याच कार्यक्रमात प्रधानमंत्री सुमारे 17 हजार 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे 2 हजार 460 एमएलडी इतकी असेल.

20 नवीन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण

मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री या कार्यक्रमात वीस नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, औषधे, रोगनिदान यासारख्या आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहेत. याशिवाय, 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम  या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील लाखो नागरिकांना यामुळे उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

400 किमी लांबीच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6 हजार 79 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे वाढीव सुरक्षेसह जलद प्रवासाची सुनिश्चिती होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी

प्रधानमंत्री श्री. मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. टर्मिनसच्या दक्षिणेकडील हेरिटेज नोडच्या (वारसा स्थळी) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे, अधिक चांगले मल्टी-मोडल समन्वयन आणि या जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन आणि संवर्धन करणे या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 800 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहेत.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

पालकमंत्र्यांची भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाबाबत पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरेंसोबत सकारात्मक चर्चा

पुणे दि. १८: भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास श्री.पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री श्री. पाटील हे आग्रही आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले होते. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी महाधिवक्त्यांना केली होती.

त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्त्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’अंतर्गत २३ ते २५ जानेवारी दरम्यान ग्रंथप्रदर्शन

मुंबई, दि. 18 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

ग्रंथप्रदर्शनासाठी शासकीय प्रकाशनाबरोबरच खासगी प्रकाशकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

त्यासोबतच ग्रंथप्रदर्शनादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी 11 वाजता मंत्रालयात मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या/ मराठी भाषेत लिखाण करणाऱ्या पाच अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वा. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धक मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना ‘चालता बोलता – प्रश्न सरिता’ या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वा. परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय येथे ‘अभिवाचन स्पर्धा’ होणार असून त्यात मंत्रालयीन अधिकारी –  कर्मचारी सहभागी होतील.

दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वा. ‘हास्यसंजीवनी’ हा कार्यक्रम असणार आहे. अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ व समारोपाचा कार्यक्रम सायं. 5.30 वा. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थित होईल, असे मराठी भाषा विभागाने कळविले आहे.

००००

राज्यपालांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ मराठी आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन

मुंबई, दि. १८ : नॅशनल बुक ट्रस्टतर्फे ”एक्झाम वॉरियर्स’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाची नवीन मराठी आवृत्ती तयार करण्यात आली असून या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता राजभवन येथे होणार आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

0000

राज्यात डिसेंबरमध्ये ४६ हजार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई, दि. १८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४६ हजार १५४ नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

विभागामार्फत राज्यात सध्या ठिकठिकाणी महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नुकतेच 4 महारोजगार मेळावे घेण्यात आले. मेळाव्यांच्या आयोजनासाठी होणाऱ्या खर्चाकरीता निधीमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मेळाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह इच्छूक उमेदवारांचा मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख १ हजार ३३० इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माहे डिसेंबर २०२२ मध्ये विभागाकडे ७० हजार ३४५ इतक्या इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात विभागनिहाय मुंबई १९ हजार ६२५, नाशिक १० हजार ७९६, पुणे १८ हजार ०२५, औरंगाबाद १५ हजार २४२, अमरावती ३ हजार ५७३ तर नागपूर ३ हजार ०८४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ४६ हजार १५४ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक १६ हजार ८५७, नाशिक ५ हजार ४९२, पुणे ११ हजार २००, औरंगाबाद १० हजार ७२७, अमरावती १ हजार ५२४ तर नागपूर ३५४  बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली.

विभागाच्या महारोजगार मेळाव्यासह विविध उपक्रमांमधून राज्यात वर्ष २०२२ मध्ये एकूण २ लाख ४८ हजार ९५० उमेदवारांना विविध कंपन्या, उद्योग यामध्ये रोजगार मिळवून देण्यात आला. इच्छूक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

०००

इरशाद बागवान/विसंअ/

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई दि. १८ : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो.

हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत ५४ हजार २७६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे ४३०० रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी

ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी

माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून ८७०० जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३००० जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये १९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे ६०० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी विश्वास दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण

राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी उद्योजकांसाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नविन धोरणामध्ये एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नविन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दि

सामंजस्य करारांची एकत्रित माहिती

पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – 250 कोटी गुंतवणूक
पुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – 1,650 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – 400 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – 16000 कोटी गुंतवणूक
औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – 12,000 कोटी गुंतवणूक – (6,300 रोजगार)
चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (15,000 रोजगार)
चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – 600 कोटी गुंतवणूक – (1000 रोजगार निर्मिती)
गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – 1,520 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)
महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (30,000 रोजगार)
महाराष्ट्र – बर्कशायर-हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – 16,000 कोटी गुंतवणूक
महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक – (3000 रोजगार)
लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी – 12000 कोटी गुंतवणूक – (1,200 रोजगार)
हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक – (800 रोजगार)
नुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- 20,414 कोटी गुंतवणूक – (1525 रोजगार )

 

नॉलेज पार्टनरशिपसाठी करार

दावोस येथे महाराष्ट्रात नॉलेज पार्टनरशिपसाठी देखील खालील सामंजस्य करार करण्यात आले.
मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले)समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत नागरी परिवर्तनासाठी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी साठी सामंजस्य करार
स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत गुंतवणूक आणि व्यापारविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार

जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास

पुणे दि. १८ : जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.

सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. परिसरातील जुने वडाचे झाड पाहण्यासाठी आवर्जुन काही क्षण त्यांनी त्याठिकाणी घालवले. नोंदवहीमध्ये शनिवार वाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी नोंदविली. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला, तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली.

भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. अजित आपटे आणि संदीप गोडबोले यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर, वारसा स्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

आगाखान पॅलेसला भेट

तसेच जी-२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत माहिती विचारली. नीलम महाजन यांनी त्यांना याबाबत तसेच पॅलेसचे ऐतिहासिक महत्व विषयी माहिती दिली. यावेळी पाहुण्यांनी चरखा बाबतही माहिती जाणून घेतली.

000

पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार

दावोस दि. १७: कन्झर्वेशन, कनेक्टिव्हिटी, क्लीन सिटीज या तत्वांना अनुसरून पर्यावरणपूरक विकास करणे या दृष्टीने आमची वाटचाल राहील असे ठोस प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. ते दावोस येथील काँग्रेस सेंटर येथे बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चेत सहभागी होऊन बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी पवन आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन, वनाच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर आमचा भर आहे.  शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक- खासगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी धारावी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मुंबईत सर्वात मोठे नैसर्गिक जंगल असले तरी जगातील मोठी झोपडपट्टी देखील इथेच आहे. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी सर्वात मोठा सार्वजनिक-खाजगी भागीदारी रिअल इस्टेट कार्यक्रम राबवित आहोत. आम्ही प्रत्येक झोपडपट्टी रहिवाशाला ३०० चौरस फूट मोफत घर देत आहोत. मोकळ्या जागेसाठी क्रॉस सबसिडी दिली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या पुनर्विकास प्रकल्पातील काही जमिनीवर उद्याने आणि वनीकरण केले जात आहे.  झोपडपट्टी पुनर्विकासाद्वारे आम्ही ८०० हेक्टरपेक्षा जास्त खारफुटीचे संरक्षण केले आहे.  ५६ हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा हा सर्वात मोठा कार्यक्रम आम्ही राबवित आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यातून आम्ही प्रदूषण कमी करीत आहोत.

लोकांचा सहभाग कशा पद्धतीने वाढवित आहोत ते सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत दररोज २४०० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. शहरातील सुमारे २५% कचरा झोपडपट्ट्यांमधून येतो आणि या सांडपाणी आणि जल प्रदूषणावर आम्ही ठोस पावले उचलत आहोत. समाजातील ८३४ संस्था पर्यावरण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करीत असून या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये आम्ही जागरूकता आणली आहे. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यातही या संस्था आणि स्थानिक रहिवाशांचा सहभाग असतो असेही ते म्हणाले. आमच्या या प्रयत्नांमुळे १.५ दशलक्ष कुटुंबांचे जीवनमान सुधारत आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेशी सुसंगत असे महाराष्ट्राचे प्रयत्न सुरु आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विकसित देशांनी मदत केली तर एकत्रितपणे हवामान बदलाचा सामना करता येईल. भारताचे जी २० अध्यक्षपद ही महाराष्ट्रासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासंदर्भात पुढील रोडमॅप तयार करण्याची संधी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक

१५ हजार रोजगार निर्मिती होणार

दावोस दि. १७: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचा सामंजस्य करार आज दावोस येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चंद्रपूर येथील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनी करणार आहे. त्यामाध्यमातून १५ हजार रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प करण्यात येणार आहे. ५ एमएमटीपीए (मिलियन मेट्रीक टन्स् पर ॲनम) क्षमतेचा हा कोल गॅसीफिकेशनचा प्रकल्प आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये कोल गॅसीफिकेशन ही काळाची गरज असून कोल गॅसीफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे सिंथेसीस गॅस निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, न्यू एरा क्लिनटेकचे भारतातील कार्कारी संचालक बाळासाहेब दराडे, गोपी लटरटे, निहीत अग्रवाल, अजय अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि.१०: सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी 'सिग्नल यंत्रणा' बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते...

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.10 - कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘दिशा अभियान’ची यशस्वी अंमलबजावणी

0
मुंबई, दि. १० : बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकसमान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारे ‘दिशा अभियान’ महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून...

नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि.10 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील...

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर !

0
मंत्री, खासदार, आमदारांच्या सुचनांनुसार वाळू माफियांना सोडू नका वाळू तस्करीत सामील अधिकाऱ्यांवरही निगराणी ठेवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी वाळू साठे व...