शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1669

दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, दि. १७ : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात दिल्लीतील विविध मराठी संस्थांशी सोमवारी संवाद साधताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्यासह विविध मराठी संस्थेचे पदाधिकारी, केंद्र सरकारच्या विविध विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले मराठी अधिकारी, यासह सदनाचे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या ऐतिहासिक खाणाखुणा आजही महाराष्ट्राबाहेर दिसतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, लोककलेची समृद्ध अशी परंपरा आहे. दिल्लीतील मराठी अधिकारी, येथे वास्तव्यास असलेले मराठी नागरिक हे समृद्ध परंपरा वाढवित आहेत. त्यांचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. राजधानी दिल्लीत असणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.

राजधानीत केंद्र सरकारच्या विविध आयोगात, विभागात महाराष्ट्र केडरचे तसेच इतर केडरचे मूळ महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आहेत. यासह मूळ महाराष्ट्रातील मात्र, व्यवसाय-खासगी नोकरीनिमित्त आलेले मराठी लोक दिल्लीतील विविध भागात अनेक वर्षांपासून राहतात. त्यांनी येथे  विविध  संस्था उभारून  महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जोपासली आहे. यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या तरूण मुला-मुलींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या संस्था मदत करतात.

या संस्थांना  येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यातील काही महत्वाच्या सूचना ज्या आपल्या विभागाशी संबंधित असतील त्यांची त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, तर उर्वरित सूचनांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

000

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र.7 /दि.17.01.2023

वस्तू व सेवाकर चोरी प्रकरणी एकाला अटक

मुंबई, दि. १७ :- बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, तसेच रू. ८ कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या १८ कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती, अन्वेषण विभागाचे राज्यकर सह-आयुक्त यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रकरणात मे. हीर ट्रेडर्सचे व्यापारी विजय अनिल मोतीरमानी याने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली आहे. तसेच त्याला या प्रकरणात १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खोटी देयके देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करून करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्याच्या सदर मोहिमे अंतर्गत सन २०२२- २३ मधील आतापर्यंतची ही ५९ वी अटक आहे.

सदर प्रकरणात सहाय्यक राज्यकर आयुक्त, मुंबई अन्वेषण ड ०४४, प्रशांत खराडे यांनी ही धडक कारवाई केली व या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यासाठी त्यांना सहाय्यक राज्यकर आयुक्त, श्रीकांत पवार, विद्याधर जगताप, सुमेधकुमार गायकवाड आणि राज्यकर निरिक्षक व कर सहायक यांनी मदत केली. सदर मोहिम, राज्यकर सह-आयुक्त, अन्वेषण-क विभाग, मुंबई अनिल भंडारी (भा.प्र.से.) व राज्यकर उपायुक्त, अन्वेषण- क विभाग, मुंबई मोहन प्र. चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

One person arrested by Maharashtra GST Department

in more than Rs.18 crores racket scam

Mumbai, 17th Jan : Investigation was conducted in case of M/s. Heer Traders as a part of a special operation launched by the Maharashtra Goods & Service Tax Department against Tax Payer involved in fake invoices.

Maharashtra Goods & Service Tax Department has arrested Mr. Vijay Anil Motiramani, age-31 years, who had obtained GST registration as a proprietor, of the firm M/s. Heer Traders, on 27/01/2020 under the special investigation operation carried out against tax evading firm.

Investigation visit was conducted at the place of business. During investigation, it was found that Mr Vijay Anil Motiramani has availed fake Input Tax Credit (ITC) of Rs. 10  crores from suspected non-existing Tax Payers by means of returns only and without any movement of goods and services worth Rs. 40 crores and passed on credit of Rs. 8 crores without actual supply of goods or services worth Rs.35 crores.

Hon’ble Additional Chief Metropolitan Magistrate at Esplanade Mumbai has remanded Mr. Vijay Anil Motiramani for 12 days judicial custody. The operation was conducted by the Assistant Commissioners of State Tax Shri. Prashant Kharade, Shri. Shrikant Pawar, Shri. Vidhyadhar Jagtap and Shri.Sumedhkumar Gaikwad along with State Tax Inspectors /  Tax Assistants, under the guidance of Shri. Anil Bhandari (IAS), Joint Commissioner of State Tax, Investigation-C, Mumbai and Shri. Mohan P. Chikhale, Deputy Commissioner of State Tax.

With this 59th arrest in year 2022-23, Maharashtra Goods &  Service  Tax Department has once again issued stern warning to the tax  evaders  and  persons engaged in declaring bogus turnover in returns without movement of goods or services and issuing fake invoices and claiming and passing fake input tax credit.

000

 

 

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा

दावोस, दि. १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प ( रोजगार १५ हजार) , ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ( रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा

जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.

 

000

पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक; मत कसे नोंदवाल? -निवडणूक आयोगाच्या सूचना

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

अमरावती, दि. 17 :  पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान पद्धतीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे कार्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

मतदान करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये. आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.

आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.

पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत

पसंतीक्रम हे केवळ 1,2,3  इत्यादी अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवू नयेत. पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे १, २, ३ इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1,2,3  या स्वरूपात नोंदवावे.

मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना टिकमार्क ‘√’ किंवा क्रॉसमार्क ‘×’ अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी यासाठी आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. या सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

00000

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी  आपली जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडावी

अमरावती, दि. 17 : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक 2023 कार्यप्रणालीबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांनाचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण प्रशिक्षक सहायक आयुक्त (भूसुधार) शामकांत म्हस्के तसेच उपायुक्त (पुर्नवसन) गजेंद्र बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, नोडल अधिकारी मनिष गायकवाड, रणजीत भोसले, राम लंके, धारणीचे उपजिल्हाधिकारी सावंत कुमार, तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पावरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे सादर करण्यात आले. यामध्ये मतदान पध्दतीबाबत सूचना, मतदान प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेव्दारे माहिती देण्यात आली.

मतदान दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणूकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षेत सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशीलावर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अनुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले.

000000

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला दिली भेट

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.

पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत  संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्त्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.

परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या उत्पादनात रुची

बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. भरडधान्याच्या पदार्थांची चव आवडल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषत: हिमरू शाली, पैठणी, हाताने तयार केलेल्या कागदपासून तयार केलेल्या भेटवस्तू आदींमध्ये प्रतिनिधींनी विशेष रुची दाखवली. शहरातील प्रकल्प आणि  महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहितीदेखील यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित हात कागद संस्था पुणे यांनी हातकागदापासून बनवलेल्या दैनंदिनी, संस्मरणीय भेटवस्तू, आकर्षक कागदी दिवे, घरच्या घरी हात कागद बनवण्यासाठी नव्यानेच सादर केलेले नावीन्यपूर्ण किट, ज्यूटचे फाईल फोल्डर, ड्रॉइंग ब्लॉक्स आदी विविध वस्तू प्रदर्शित केल्या. त्यात विदेशी पाहुण्यांनी विशेष रस दाखवला.

वन विभागामार्फत बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पर्यावरणीय सभ्यता विकास संस्थेने बांबूनिर्मित हाताने बनवलेल्या वस्तू, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, पारंपरिक गरजेच्या वस्तू, कार्यालयात ठेवण्याच्या वस्तू, फर्निचर आदी सुरेख वस्तू  पाहताना त्यातील कलाकुसरीबद्दल त्यांनी कौतुकद्गार काढले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन स्थळांची आणि पर्यटन सुविधा विशेषतः पुणे, कोकण, रत्नागिरी, रायगडमधील पर्यटन स्थळांची माहिती आणि महाराष्ट्र टुरिझम मॅपचे माहितीपत्रक देण्यात येत होते.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा स्टॉल येथे महामंडळाने उद्योग विकासासाठी निर्माण केलेल्या सुविधांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जात होते.

भारतीय आदिवासी सहकारी विपणन संस्थेच्या दालनामध्ये आदिवासी करागिरांमार्फत निर्मित हिमाचल प्रदेशातील पश्मीना शॉल, याकुल शॉल, आसामचे मुगा सिल्क, लाकूड व नैसर्गिक उत्पादनापासून निर्मित सौंदर्य आभूषणे, वारली पेंटिंग, गोंड पेंटिंग, टसर रेशीमपासून बनवलेल्या साड्या, वूलन जॅकेट, खादी, लिनेन कुर्ता, धातूवरील नक्षिकाम, ज्युटच्या वस्तू, बांबू उत्पादने तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत युनिव्हर्सल ट्राईब संस्थेने वारली पेंटिंग, वारली कलाकुसर यातून होणारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन पाहुण्यांना भावले.

महिला बचतगटांची विविध उत्पादने, हस्त निर्मित साबण, बांबूच्या ज्वेलरी याशिवाय ज्वारी, बाजरी, नाचणी निर्मित खाद्य पदार्थांनी परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. हे पदार्थ आरोग्यास पोषक असल्यामुळे त्यांना जगभरात मागणी वाढत असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

अनुभवले भविष्यातील सुंदर नदीकिनारे

पुणे महानगरपालिकेने मुळा, मुठा नदी सुधार प्रकल्प, जायका अर्थसहाय्यित प्रकल्पाची व्हर्चुअल रियालिटी हेडसेटच्या माध्यमातून आभासी सादरीकरण केले. हा हेडसेट परिधान करून प्रत्यक्ष भविष्यातील सुशोभित नदीकिनाऱ्यावर संचार करण्याचा अनुभव घेता येत होता. ही माहितीही प्रतिनिधींनी जाणून घेतली.

0000

 

 

 

२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

मुंबई, दि.१७ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २६ वी आणि महिलांची २१ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. २४ ते २७ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होत असून इच्छुकांनी २० जानेवारी पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून कामगार कबड्डी स्पर्धा होऊ शकली नव्हती. आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदित असलेल्या आस्थापनांच्या संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे. दरवर्षी राज्यभरातून १०० पेक्षा अधिक कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होतात. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला अशा तीन गटांत साखळी सामने खेळवण्यात येतील.

पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला तीनही गटातील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी रु. ५० हजार, उपविजेत्या संघांना रु.३५ हजार आणि तीनही गटातील प्रत्येकी २ उपांत्य उपविजेत्या संघांना २० हजार तसेच सांघिक चषक, खेळाडूंना वैयक्तिक पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण (पकड) आणि प्रत्येक दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आदी वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना दिली जातील.

मुंबई व ठाणे व्यतिरिक्त बाहेरुन येणाऱ्या सर्व संघांना प्रती दिन रु.४०००/- प्रवास व निवास भत्ता दिला जाणार आहे. मुंबई व ठाण्यातील महिला संघांना प्रती दिन रु.१०००/- भत्ता दिला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या महाकल्याण या यू-ट्यूब चॅनलवर तसेच sportvot.com या क्रीडा संकेतस्थळावर केले जाईल. तरी इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी https://public.mlwb.in/public या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास भेट द्यावी, असे आवाहनही श्री. इळवे यांनी केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

मुंबई क्षेत्रात ड्रोनसारख्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारीपर्यंत बंदी

मुंबईदि. १७ :- दहशतवादी राष्ट्रविरोधी घटक ड्रोनरिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्टपॅराग्लायडरच्या विघातक वापराने सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी ११ फेब्रुवारी पर्यंत ड्रोन आणि तत्सम वस्तूंच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर यांनी दिले आहेत.

अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षासार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा आणि सार्वजनिक जीवनाच्या सुरक्षिततेसाठी मुंबई क्षेत्रात ड्रोनरिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअर क्राफ्टपॅराग्लायडरपॅरा मोटर्सहॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादींच्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारी पर्यंत बंदी आहे. मुंबई पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप-आयुक्त यांच्या लेखी परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. या आदेशाचे पालन न केल्यास कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दावोसदि. १७ :- जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले.  दरम्यानमुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे.

दावोस येथे पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्यामुळेमहाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथे सांगितले.

आतापर्यंत झालेल्या विविध प्रकल्पांसमवेतच्या सामंजस्य करारांची अधिकची माहिती

  • पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फूडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
  • औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यामुळे नागरी विकासाला चालना मिळणार आहे.
  • पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल.
  • मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या सामंजस्य करार प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंतमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीउद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदींची उपस्थिती होती.

 

०००

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्र्यांची ‘दि डेली मेल’ला माहिती

दावोस दि. १७ : महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या दि डेली मेलशी बोलताना सांगितले.  या प्रसंगी त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या पायाभूत विकासाच्या कामांविषयी विस्तृत माहिती दिली. 

मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या विषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती देऊन पुढील 2 वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या  विकास आराखड्याची माहिती दिली. 

सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री श्रीमती जोस्‍फाईन ( Josphine TEO) या देखील मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.

ताज्या बातम्या

प्रशासकीय अधिकारी आणि पत्नींच्या संस्थेमार्फत शिलाई मशीन्सचे वितरण

0
मुंबई, दि. ९ - प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वावर सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी

0
नवी दिल्ली, ९ - शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची...

 उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश...

0
मुंबई, दि. ९ : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले...

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट

0
मुंबई दि. ९:- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १७२ पर्यटक या परिसरात अडकले होते. त्यापैकी...

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...