शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1671

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पाहावे -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सातारा दि. १६ – केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचा चांगला परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ म्हणून न पाहता करियर म्हणून पाहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय क्रीडांगण, कराड येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाची सहसंचालक दत्तात्रेय जाधव यांच्यासह शासकीय तंत्र महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

खेळामुळे मानसिक, बौद्धिक, शारीरिक वाढ होण्यास मदत होते, असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोविड मुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज तंत्रशिक्षण विभागाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. देशातील तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्य शिक्षण देत आहे. यातून नवनवीन संशोधक निर्माण होत आहेत. याचा लाभ देशाच्या आर्थिक सुधारणेला होत आहे.

खेळाडू सतत सराव करीत असतात, त्यामुळे त्यांना १० वी व १२ वी मध्ये ग्रेस गुण दिली जातात. कुस्तीचा सराव करणारे मल्ल व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ही देण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण विभाग चांगले संशोधक निर्माण करत आहे. या विभागातील अडचणींबाबत लवकरच चर्चा करून त्या सोडवल्या जातील. तंत्रशिक्षण विभागाच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पाडा, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांनी शेवटी सांगितले.
000000

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सातारा, दि.15 : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्रबिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये या विषयावर फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात परिसवंदाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. या यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकार निता शिंदे-सावंत, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील पल्लवी जाधव, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. दीपक पवार, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संपादक दिनकर गांगल,  दै. लोकमत उपसंपादक प्रगती पाटील, पत्रकार स्वप्नील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित गुरव, ॲङ सुस्मिता धुमाळ आदी उपस्थित होते.

मतदार यादी तयार करणे हे तांत्रिक काम असल्याचे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूक होते म्हणून लोकशाहीचा ढाचा आजही अबाधित आहे. निवडणूक आयोगाचे काम निवडणुका घेण्यापुरते  मर्यादित न ठेवता त्यापुढे जाऊन लोकशाहीची मुल्ये तरुणांमध्ये रुजविण्याचेही काम करीत आहे. लोकशाही गप्पा हे एक व्यासपीठ आहे. यामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून चर्चा केली जात आहे.

लोकशाहीसाठी लोकसंख्येमधील  पात्र नागरिकांचे मतदार यादीत नाव येणे गरजेचे आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे. युवकांचा सहभाग असल्याशिवाय लोकशाहीचा टप्पा पूर्ण होणार नाही. आज जे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे ते तरुण पिढीसाठी आहे. तरी युवक-युवतींनी जास्तीत-जास्त मतदार यादीत नाव नोंदणी करुन लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असेही आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.

‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्त्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

000

जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे आज पुणे येथे आगमन

पुणे दि.१५- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले.

आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

आगमनप्रसंगी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तुतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहेत.

‘नमस्ते इंडिया’
जी-२० परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू राजशिष्टाचार अधिकारी यांनी विषद केला असता स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला.

विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

मुंबई, दि. 15 : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण 88 हजार 136 स्टार्टअपपैकी सर्वाधिक 16 हजार 250 स्टार्टअप (18 टक्के) महाराष्ट्रातील आहेत.  त्याचप्रमाणे आज देशातील 108 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न्स (23 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच 8 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबईमधे सुमारे 5 हजार 900, पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 342, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.

स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल ठरत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

स्टार्टअपना प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय दिवस

नवउद्योजक आणि स्टार्टअपने नाविन्यतेचा घेतलेला ध्यास, त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन रोजगाराच्या संधी व यामुळे देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला. नवउद्योजक, स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती व एक मजबूत परिसंस्था तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) हा नोडल विभाग आहे. सद्यस्थितीत भारतात सुमारे 2 लाख 44 हजार स्टार्टअपची नोंद झालेली आहे व यातील 88 हजार 136 स्टार्टअप उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) मान्यताप्राप्त आहेत.

स्टार्टअपसाठी राज्यात विविध धोरणे, योजना

स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनेक धोरणे, योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे आणि औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,  स्टार्टअपना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताह, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर व सीड फंड यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सन 2018 पासून कार्यरत आहे.

स्टार्टअप दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून सोमवारी 16 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमिताने नवउद्योजकांसाठी विशेष योजना, दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शक सत्र व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी 9420608942 यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईट आणि सोशल माध्यमांवर संपर्क साधता येईल.

स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना!

आज काल स्टार्टअप, इनोव्हेशन, युनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमके काय, त्याचे वाढते आकर्षण का आहे, त्याला आज इतके महत्त्व का दिले जात आहे, चला तर याबद्दल थोडे जाणून घेऊयात..!

स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचे नाविन्यपूर्ण (Innovative) स्वरूप. स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचा असा प्रकार असतो, ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्यातरी महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले जाते, त्यासाठी नाविन्यपूर्ण विचारसरणीची मदत घेतली जाते. आता ही नाविन्यपूर्ण विचारसरणी म्हणजे नेमके काय?

नाविन्यपूर्ण  म्हणजे एखाद्या समस्येवर नवविचाराने, धोपट मार्ग न अवलंबता, (Out of Box thinking) उपाय शोधणे. नाविन्यपूर्ण उपाय – उत्पादने, प्रक्रिया, सेवा, तंत्रज्ञान किंवा कलाकृतीही असू शकतात.  नाविन्यपूर्ण उपाय तंत्रज्ञानावरच आधारित असते असे नाही. दैनंदिन जीवनात आपण ज्याला जुगाड म्हणतो तेही एक नाविन्यपूर्ण  संकल्पना/इनोव्हेशन असू शकते. म्हणून स्टार्टअप म्हणजे एखादे अॅप बनविणे किंवा इंटरनेटवर काही चालू करणे असे नसून यात तंत्रज्ञानविरहित व्यवसायही असू शकतात.

तंत्रज्ञानविरहित स्टार्टअप म्हणजे जसे की नारळाच्या झाडावर चढण्यासाठी पाईपने बनवलेले चपलेसारखे उपकरण ज्यामुळे झाडावर चढण्याचे कसरतीचे काम सोपे झाले आहे. तसेच तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप म्हणजे जसे की  Ola, Uber यांनी दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बनविलेले अॅप, ज्यामुळे  ग्राहकांना घरबसल्या सुविधा, टॅक्सी व रिक्षाचालकांना सोप्या रितीने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नाविन्यपूर्ण उपाय प्राप्त झाला आहे.

बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. परंतु, कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचे हेसुद्‌धा समजणे आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते,  फरक इतकाच की त्या केंद्राला आपण स्टार्टअप म्हणत नाही.

राज्य शासनाच्या नियमानुसार असा उद्योग जो पुढील बाबींची पूर्तता करतो त्याला स्टार्टअप म्हटले जाते,

  • कंपनीचा प्रकार (खासगी मर्यादित, नोंदणीकृत भागीदारी किंवा मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी) व
  • वार्षिक उलाढाल (स्थापनेपासून कोणत्याही आर्थिक वर्षी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावी) व
  • कंपनीचे वय (10 वर्षापेक्षा जास्त नसावे) व
  • नाविन्यपूर्ण (Innovative) विचारसरणी अशा उद्योगांस भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअप म्हणून मान्यता प्राप्त होते.

 

स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांना व  शहरातील सुरू झालेल्या उद्योगानांच स्टार्टअप म्हणायचे का? याचे उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण नाविन्यतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. स्थानिक समस्या व त्याला सोडवण्याचा उपाय स्थानिक नागरिकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांतून मिळू शकतो. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. नाविन्यपूर्ण संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरे की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी जास्तीत जास्त उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत.

स्टार्टअपना यशस्वी होण्यासाठी बऱ्याच घटकांची / बाबींची भूमिका महत्त्वाची ठरते. या परिसंस्थेतील विविध घटक/ बाबी म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन, ग्रँट, इन्क्युबेशन, सीड फंडिंग, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल, क्राउड फंडिंग, अॅक्सेलेरेशन, युनिकॉर्न, इत्यादी

स्टार्टअपबाबत महत्वाची बाब म्हणजे आजकाल स्टार्टअपची क्रेझ असली तरी प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नसते. स्टार्टअप म्हणजे नियमित व्यवसाय पद्धती नसून नवनवीन प्रयोग असतात. स्टार्टअप भविष्यात मोठा होईल याचा विश्वास असतो पण कोणतीही शाश्वती नसते. सर्व बाबी या प्रायोगिक तत्वावर सुरू होत असतात. नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरली तर नवउद्योजक स्टार्टअपच्या मदतीने कोट्यवधी कमवितो अन्यथा, पुन्हा नवकल्पनेला न्याय देण्यास प्रयत्नशील असतो.

भारत हा जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. लोकसंख्या लाभांश आपल्याकडे सर्वाधिक आहे. आजवर विविध आविष्कारांमुळे आपला देश जगात अग्रेसर ठरत आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्‌ट असो किंवा पहिले शल्यचिकित्सक म्हणून ओळखले जाणारे महर्षी सुश्रुत असोत ! भारतीय आविष्कारांचा एक समृद्ध वारसा आहे. पारंपारिक व्यवसाय ते नाविन्यपूर्ण उद्योग उभारून जगभरात ठसा उमटवणारे अनेक उद्योगपती देखील या भूमीला लाभले आहेत.

येणार काळ हा स्टार्टअप व नाविन्यतेचा असणार आणि काळाची हीच गरज ओळखून तरूणांना संधी देत, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण आविष्कारांची परंपरा अखंड राहावी यासाठी शासनाच्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. स्टार्टअपना व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन देऊन देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या स्तरावर स्टार्टअप इंडिया, नीती आयोग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अग्नी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इ. विभागामार्फत विशेष योजना व उपक्रम राबवले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे तसेच सर्वार्थाने देशास आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची सातत्यपूर्ण चाचणी करीत देशाला दिशा देणारे अग्रणी राज्य आहे. औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (Maharashtra State Innovation Society) कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,  स्टार्टअपना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.

नाविन्यता सोसायटी मार्फत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण व प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर, हिरकणी महाराष्ट्राची यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रम व यशस्वीतेमुळे देशातील एकूण ८८ हजार १३६ मान्यताप्राप्त स्टार्टअप पैकी सर्वाधिक १६,२५० स्टार्टअप (१८%) महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. तसेच मुंबई मधे सुमारे ५ हजार ९००  पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 3४२, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.

अभिमानाची बाब म्हणजे देशातील १०८ युनिकॉर्न स्टार्टअपपैकी २५ युनिकॉर्नस् (23%) महाराष्ट्रातील आहेत

(युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच रुपये 8000 कोटी पेक्षा जास्त आहे)

स्टार्टअप म्हणजे काय? इथपासून जरी आपल्यातील बऱ्याच नागरिकांची सुरूवात असली तरी केवळ आपल्याला स्टार्टअप या संकल्पनेबद्दल काही माहिती नाही यास्तव आपल्या प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला कोणीही डावलू शकत नाही. कारण, समकालीन काळामध्ये आपल्या संकल्पनेला सिद्ध करण्याची संधी ही मिळतेच! केवळ आपण आपल्या प्रतिभेला सातत्यपूर्ण दर्जात्मकतेच्या मार्गावरून मार्गक्रमित केले पाहिजे.

नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. स्टार्टअप व नवउद्योजकांसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती, आवश्यक पाठबळ व सर्व बाबी आज रोजी उपलब्ध आहेत. युवकांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य शासन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अथक परिश्रमामुळे स्टार्टअपच्या क्षितिजावर महाराष्ट्राचे नाव अभिमानाने कोरले जाईल, असा विश्वास वाटतो. सळसळत्या उत्साहाने भरलेल्या उद्यमी युवाशक्तीच्या जोरावर स्टार्टअप नेशन ही ओळख मिळाल्यापासून जगात आपले मानांकन उंचावण्यासाठी आणि युवा वर्गातील उद्योजकतेला तळागाळापर्यंत नेण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया आणि भारताला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देऊया.

0 0 0

अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक),

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी

9420608942

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३’ ला सुरुवात

मुंबई दि 15 : ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ मधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे 55 हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. इलाईट गटातील स्पर्धांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ड्रीम रन’ ला सुरुवात झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईकरांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.

स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार झिशान सिद्धीकी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा कन्सल्टन्सीचे उज्वल माथुर, अनिल सिंह, विवेक सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या मॅरेथॉन मध्ये इलाईट मेन ॲथलिट इंटरनॅशनल मेन, इलाईट मेन ॲथलिट इंटरनॅशनल वुमन, इलाईट ॲथलिट इंडियन मेन, इलाईट ॲथलिट इंडियन वुमन यासह पूर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. ड्रीम रन, सिनियर सिटीझन रन, चॅम्पियन विथ डिसॲबिलिटी रन या प्रकारांचा समावेश करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी

स्टुटगार्टः दि. १४ : राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी सष्ट करण्यात आले.

जर्मनी दौऱ्यात श्री. सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी श्री. सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरीकरण केले. वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशीन्ससाठी ट्रम्प कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. यासाठी श्री. सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळ पाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी सुमारे तीनशे कोटी रुपये गुंतवणूक करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लॅप केबल्स समूहाला भेट

       उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरिकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.

याचदरम्यान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अँड्रियास लॅप (बार्डन वुर्टेमबर्गचे भारताचे वाणिज्यदूत), थॉमस फुरमन ( स्टुटगार्ट शहराचे उपमहापौर), जोहान्स जंग (आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे विभाग प्रमुख), सिमोन गोहरिंग( सल्लागार. बार्डन वुर्टेमबर्ग राज्य मंत्रालय), थॉमस मॅथ्यू (मर्सिडीज बेंझ), बर्नहार्ड ग्रीब (स्टुटगार्ट शहराच्या आर्थिक विकासाचे प्रमुख), खैलाश भट्ट (जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूत), ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर, गेरहार्ड कुबलर( फ्रिट्झ कुब्लरच्या व्यवस्थापकीय संचालक) बार्बरा एफेनबर्गर (स्टटगार्टच्या कॉमर्स आणि इंडस्ट्री चेंबर) आणि जोएल मिटनाच्ट( भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रमुख) आदी उपस्थित होते.

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.

पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. श्री.फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.

मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात येईल
कै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर महाराष्ट्र पदक मिळविणाऱ्या मल्लांना तयार करण्यात मागे राहिला. ही उणिव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराव पदक जिंकणारा किमान एकतरी मल्ल महाराष्ट्राचा असेल अशी मोहिम सुरू करण्यात येईल. महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेतल्यास शासन त्यालाही सहकार्य करेल.

कै.मामासाहेब मोहोळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांना मामासाहेबांचे सुपूत्र माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्याकडून मानाची गदा दिली जाते. हा मान मिळविण्याकरिता लाल मातीचे आणि मॅटवरील पैलवान मोठ्या प्रमाणात कुस्ती खेळतात, संघर्ष करतात आणि त्याचा आनंद सगळ्यांना अनुभवायला मिळतो. अत्यंत रंजक महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपल्याला पहायला मिळाल्या असे सांगून त्यांनी यशस्वी पैलवान, कुस्तीप्रेमी नागरिकांचे अभिनंदन केले. मुरलीधर मोहोळ यांनी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान-क्रीडामंत्री
डोळ्याचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री श्री.महाजन म्हणाले, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धीचातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत १० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

पालकमंत्री श्री.पाटील यशस्वी स्पर्धेच्या आयोजनाबबात मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले. त्यांच्या प्रयत्नाने एक चांगली स्पर्धा कुस्ती प्रेमींना पहायला मिळाली असे त्यांनी सांगितले.

खासदार तडस आणि ब्रिजभुषण सिंह यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. महिलाही या क्षेत्रात ताकदीने पुढे येत असल्याने भविष्यात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात श्री.मोहोळ यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. कुस्तीसाठी राजाश्रय महत्वाचा आहे. शासनाने कुस्तीपटूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. राज्यातला प्रत्येक कुस्तीप्रेमी महाराष्ट्र केसरीची आतुरतेने वाट पहात असतो. स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीच्या प्रती असलेली आत्मियता समोर आली असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव केला. गादी गटात पुण्याचा शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पराभव करून केला. दोन्ही गटातील विजेते महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. यामध्ये निकाली कुस्ती करत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना गदा प्रदान करण्यात आली.

श्री.फडणवीस यांच्या हस्ते कुस्तीपटू तयार करणाऱ्या पैलवान उत्तमराव पाटील यांना मानपत्रप्रदान करण्यात आले. या स्पर्धेनिमित्त ‘वेध महाराष्ट्राचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या संघास उपराष्ट्रपतींच्या हस्ते चषक प्रदान

मुंबई, १४: आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या डायनॅमिक संघाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मैदान येथे आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कपचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, श्रीमती सुदेश धनखड, श्रीमती राजश्री बिर्ला, कुमार मंगलम बिर्ला आदी उपस्थित होते. या सामन्याचा प्रारंभ उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी चेंडू फेकून केला.

अंतिम सामना मॅडॉन पोलो आणि डायनॅमिक्स अचिव्हर्स संघामध्ये रंगला. यामध्ये डायनॅमिक्स अचिव्हर्स संघ विजेता ठरला. यावेळी प्रत्येक खेळाडूचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी आदित्य बिर्ला यांच्या कार्याचा गौरव केला, तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजळा दिला. या सामन्यावेळी बिर्ला समूहाचे आणि इंडियन पोलो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...