शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1679

युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर ‘रामबाण’ उपाय शोधावे’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. १० : पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अशा औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर आयुर्वेदातून ‘रामबाण’ उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी येथे केले.

राजभवन येथे ‘आयुर्वेद शिरोमणी’ सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तसेच प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा, अध्यक्ष, नितिमत्ता व नोंदणी समिती, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते. उभय नामवंत आयुर्वेदाचार्यांना आयुर्वेदाच्या उल्लेखनीय सेवेसाठी वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आले.

आज आधुनिक चिकित्सा पद्धतीला  पर्याय नाही. परंतु अनेक ॲलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट देखील असतात. या दृष्टीने भारतातील आयुर्वेदिक ज्ञानाचा वारसा अधिक समृद्ध कसा करता येईल व आयुर्वेदाच्या माध्यमातून जगाला निरामय जीवन जगण्याचा मार्ग कसा दाखवता येईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आज राजस्थान, उत्तराखंड, पंजाब तसेच गुजरात येथे स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात देखील ८० आयुर्वेद महाविद्यालयाने कार्यरत आहेत. राज्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांच्या विकास व नियंत्रणासाठी राज्याने एक स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ तयार करावे, अशी सूचना आयुर्वेदाचार्य वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी यावेळी केली.

राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवन येथे देखील राज्यपालांनी एक आयुर्वेद क्लीनिक सुरु करावे, अशी सूचना त्रिगुणा यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाला वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनचे विश्वस्त वैद्य महेंद्र चतुर्वेदी, महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे संचालक डॉ राजेश्वर रेड्डी, डॉ गोविंद रेड्डी, अनेक वरिष्ठ आयुर्वेद चिकित्सक, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.

००००

 

Maharashtra Governor presents ‘Ayurved Shiromani’  

Awards to Vaidya Devendra Triguna,Vaidya Rakesh Sharma

Mumbai 10: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Ayurved Shiromani’ Samman’ to   Padma Bhushan Vaidya Devendra Triguna, President, Rashtriya Ayurveda Vidyapeeth, New Delhi and Prof Vaidya Rakesh Sharma, President, Ethics & Registration Committee, National Commission for Indian Systems of Medicines, New Delhi at Raj Bhavan Mumbai on Mon (9 Jan).

The awards instituted by the Vaidya Sureshchandra Chaturvedi Health Foundation were presented to the two Ayurvedacharyas in recognition of their exemplary services in the field of Ayurveda.

Speaking on the occasion, Governor Koshyari called upon young Ayurveda Vaidyas to find out sureshot medicines for various ailments through modern research. Vaidya Devendra Triguna urged the Governor to create a separate Ayurveda University in Maharashtra on the lines of similar Universities in Rajasthan, Uttarakhand, Punjab, Gujarat and other states.

Managing Trustee of the Foundation Vaidya Mahendra Chaturvedi, Director, AYUSH, Maharashtra Dr Rajeshwar Reddy, Vaidyas and Professors from Mumbai region and students were present.

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या  स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे.

लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  दिनांक 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय पारितोषिक, बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच, समूहांतर्गत ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच (जालना) यांना प्रथम  शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील, खानदेश लोकरंग फाऊंडेशन, नगरदेवळा (जळगाव) यांना द्वितीय, तर शाहीर विनोद दिगंबर ढगे, दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था (जळगाव) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकल आणि समूह या दोन गटांतर्गत एकूण 68 प्रवेशिका आल्या होत्या. त्यांपैकी एकल गटात 34, तर समूहामध्ये 34 प्रवेशिका आल्या होत्या.

त्याचप्रमाणे, एकल आणि समूह या दोन्ही गटांतर्गंत एकूण 20 उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

. एकल  गट  उत्तेजनार्थ  : 1. श्रीकांत देवगोंडा मेडशिंगे (कोल्हापूर), 2. बालाजी महादेव जाधव (रायगड), 3. विनोद विद्यागर (मुंबई उपनगर), 4. अनंता अर्जुन मिसाळ (बुलढाणा), 5. शंकर नागनाथ कांबळे (सोलापूर), 6. महादेव तुकाराम भालेराव (बीड), 7. शहाजान सरदार मुकेरी (नाशिक), 8. धनश्री दिनेश जोशी (जळगाव), 9. जयश्री उदय पेंडसे (सांगली), 10. शिल्पा निनाद नातू (ठाणे).

. समूह गट  उत्तेजनार्थ :  1. शाहीर बजरंग शंकर आंबी (सांगली), 2. कविता विद्यागर (मुंबई), 3. अविष्कार विकास एडके (उस्मानाबाद), 4.  अनुराधा गोपीनाथ कुलकर्णी, स्वरनिनाद ग्रूप, कोयना वसाहत कराड (सातारा), 5. सुरेश शंकर पाटील, आझाद हिंद शाहिरी पार्टी दिंडनेर्ली (कोल्हापूर), 6. प्रकाश गणपती लोहार, लोककला, कला, क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशिय मंडळ (कोल्हापूर), 7. उषा कमलाकर शेजुळे, शाहीर कमलाकर विठ्ठल शेजुळे आणि पार्टी , नवी मुंबई (ठाणे), 8. गणपत ना. तारवे, क्रांती कला मंच ,हातखांबा (रत्नागिरी), 9. शाहीर सुधाकर आरवेल, लोक कला पार्टी (मुंबई),  10. शंकर महादेव दवले (कोल्हापूर).

एकल गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  7 हजार , 5 हजार  आणि 3 हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त 10 विजेत्यांना प्रत्येकी 500 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

समूह गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  21 हजार रुपये, 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम संगीत विशारद पुंडलिक कोल्हटकर आणि नृत्य कलावंत डॉ.सान्वी जेठवाणी यांनी पाहिले.

000

मुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन

मुंबई, दि. 10 : कला संचालनालयामार्फत 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) 2022-23 आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवार 10 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन 10 ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत होणार आहे. प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रदर्शनाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित राहणार आहेत. सन 2020-21 यावर्षीचा “कै. वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार”  शिल्पकार राम सुतार तसेच ज्येष्ठ कलाकार प्रमोद रामटेके यांचा व 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्या वतीने सत्कार समारंभ होणार आहे.

      पारितोषिक प्राप्त कलाकार  : सुरभी कांचन गुळवेलकर (रेखा व रंगकला), प्रतिक बळीराम राऊत (रेखा व रंगकला), प्रसाद सुनील निकुंभ (रेखा व रंगकला), विवेक वसंत निंबोळकर (रेखा व रंगकला), अभिजित सुनील पाटोळे (रेखा व रंगकला),  वैभव चंद्रकांत नाईक (रेखा व रंगकला), रोहन सुरेश पवार (शिल्पकला), अजित महादेव शिर्के (शिल्पकला) राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला), श्वेता श्याम दोडतले (उपयोजित कला), अनूज संजय बडवे (उपयोजित कला), दीक्षा संदेश कांबळे (उपयोजित कला), विजय रामभाऊ जैन (उपयोजित कला), किन्नरी जितेंद्र तोंडलेकर (मुद्राचित्रण), राकेश रमेश देवरुखकर (दिव्यांग विभाग) या कलाकारांचा पारितोषिक व रक्कम 50 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

मुंबई, दि.9: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने दि. 11 आणि 12 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दोन दिवसीय विभागीय खंडपीठाच्या शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर बैठकीत आयोगाकडे आलेल्या विविध विषयांवरील तक्रारींची सुनावणी होणार आहे. उद्घाटन सत्रात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मार्गदर्शन करणार आहेत.

मानवाधिकारांचे अधिक चांगले संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण व्हावे, या उद्देशाने अशा शिबीर बैठका आणि खुली सुनावणी आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 11 आणि 12 रोजी तक्रारींची सुनावणी होणार असल्याची माहिती गृह विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

0000

दिपक चव्हाण/ वि.स.अ/९.१.२०२३

भारतीय विज्ञान काँग्रेस: विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचा आठवडा

नागपूर शहर. भारतातील संत्रा नगरी. देशाचे टायगर कॅपिटल. कधी काळी गोंड राजांच्या राजधानीचे शहर. विविध सामाजिक चळवळींचे शहर. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक पासून तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीचे शहर. हे शहर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगभर गाजले ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्याने…

भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन ३ ते ७ जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात  करण्यात आले. नागपूर विद्यापीठाचे हे शतकमहोत्सवी वर्ष. या वर्षात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी झाल्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे.यापूर्वी १९७४ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी वर्षात हे आयोजन नागपुरातच व्हावे, यासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रदर्शनातून ‘होस्ट स्टेट’च्या माध्यमातून राज्याची विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे आणली. या तीनही नेत्यांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावून महाराष्ट्रासारख्या विशाल प्रदेशात हा ज्ञान आणि विज्ञानाचा कुंभ होत असल्याचा आनंद व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रेरणादायी होते. शेती, मातीपासून अवकाशापर्यंत विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाचे नेतृत्व भारताला करायचे आहे त्यासाठी या महत्त्वपूर्ण आयोजनातून प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

विज्ञान काँग्रेसमध्ये विविध विज्ञान आधारित कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यात २७ परिसंवाद, बाल, महिला, शेतकरी व आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश होता. यंदा प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या विज्ञान परिषदेला एक लाखावर विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन  करण्यात आले होते.  देश -विदेशातील अनेक संशोधक,  वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते. प्रश्न उत्तरे, जिज्ञासा, आविष्कार, संशोधन अशा उपक्रमाने पाच दिवस हा परिसर भारावला होता.

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’ चे माजी संचालक डॉ. सतीश वाटे यांच्या हस्ते झाले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले. १० ते १७ वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले. देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली. हे प्रदर्शन बघून पुढील शतकात विज्ञान तंत्रज्ञानावर भारताचा प्रभाव असेल याचा विश्वास वाटत होता. किशोरांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिमानांचे सादरीकरण केले. मोठ्या संख्येने शाळकरी मुलांनी या विज्ञानप्रदर्शनाचा लाभ घेतला.

यावर्षीच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे ब्रीदवाक्य होते, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानासह महिलांचे सक्षमीकरण’. त्यामुळे या काँग्रेसवर महिलांचा पहिल्या दिवसापासूनच प्रभाव होता. हे देशव्यापी आयोजन श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पूर्ण झाले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन  महिला काँग्रेसमध्ये करण्यात आले.   बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. असंख्य अडचणींवर मात करीत  केलेली वाटचाल राहीबाईंनी यावेळी कथन केली. या काँग्रेसचा समारोप रसायनशास्त्रांमध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा.ॲडा योनाथ यांनी केला.

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहाचे नाव होते शहीद बिरसा मुंडा सभागृह. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता. आदिवासी बहुल भागामध्ये प्रथमच आदिवासी आणि विज्ञान यांची सांगड घातली जात होती. ही एक स्तुत्य सुरुवात ठरली.

देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा शेतकरी विज्ञान काँग्रेस परिषदेतील सूर होता.

प्राईड इंडिया एक्सपो हे विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. दररोज सायं. सहा ते आठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.

समारोपाला कानपुरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॅा. अरविंद सक्सेना यांना विज्ञानज्योत सोपवून अधिकृत समारोप जाहीर केला. खऱ्या अर्थाने विज्ञानाचा हा महाकुंभ विज्ञानप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरला. या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी व त्यांच्या चमूने केलेल्या मेहनतीचे विजयलक्ष्मी सक्सेना यांनी समारोपीय सोहळ्यात कौतुक केले. नागपूरच्या शिरपेचातील महत्त्वपूर्ण बाब म्हणून या कार्यक्रमाची नोंद असेल.

०००

-अतुल पांडे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर.

पालकमंत्र्यांनी दखल घेतल्याने मिळाली वीजजोडणी

सोलापूर, दि. ९ (जि. मा. का.) : नागुर (ता. अक्कलकोट) येथील नागोरे वस्तीमध्ये गावठाण वीजवाहिनी नसल्याने बसवराज प्रभू नागोरे यांच्या अडीच वर्षांपासून प्रलंबित घरगुती वीजजोडणीच्या मागणीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यामुळे न्याय मिळाला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नुकताच डीपी बसविण्यात आल्याने श्री. नागोरे यांना वीजजोडणी मिळाली.

श्री. नागोरे पूर्वी नागुर गावात राहायचे. साधारणतः अडीच ते तीन वर्षांपूर्वी ते नागोरे वस्तीवर राहायला आले. त्यामुळे घरगुती वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांनी ७ जुलै २०२० रोजी महावितरणकडे अर्ज केला. गेली अडीच वर्षे ते पाठपुरावा करत होते. त्यांचे शेजारी बसवराज दनुरे यांच्यासोबत त्यांनी जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. तसेच, निवेदनाची प्रत पालकमंत्री यांना वैयक्तिकरीत्या पाठवली गेली. खुद्द पालकमंत्री श्री. विखे – पाटील यांनीच दखल घेतल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.

याबाबत श्री. नागोरे यांचे पुत्र पंकजकुमार नागोरे म्हणाले, पूर्वी आम्ही गावात राहायचे. साधारणतः तीन वर्षांपूर्वी नागोरे वस्तीत राहायला आले. तिथे घरगुती वीज नव्हती. विजेविना आमचे खूप हाल व्हायचे. त्यामुळे आम्ही घरगुती वीजजोडणी मिळावी, यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी आमच्या विनंतीची तात्काळ दखल घेत हा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महावितरणला दिले. गेल्याच आठवड्यात आमच्या वस्तीवर डीपी बसविला गेला आणि आम्हाला घरगुती वीजजोडणीही मिळाली. घरात वीज आल्यामुळे आमचे हाल आता संपलेत.

महावितरणचे उपअभियंता संजीवकुमार मेहेत्रे म्हणाले, श्री. नागोरे यांनी घरगुती वीजजोडणी मिळावी, अशा अर्ज केला होता. मात्र, नागोरे वस्तीमध्ये शेतीपंपाची लाईन होती. गावठाण वीजवाहिनी नसल्याने डीपी बसविणे आवश्यक होते. त्यासाठी विशेष घटक योजनेतून ४ लाख ६७ हजार रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले. आता नागोरे वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात १६ केव्हीएचा डीपी बसविला असून श्री. नागोरे यांना घरगुती वीज देण्यात आली आहे. नागोरे वस्तीवरील ग्राहकांना आता मागणीनंतर घरगुती वीज देता येऊ शकेल.

०००

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. ९:  वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या  पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुम महासंचालक राधेशाम मोपलवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. डिग्गीकर यांनी प्रकल्पांच्या कामांबाबत सादरीकरण केले. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथे एकूण १५९ बीडीडी चाळी आहेत. वरळी येथील १२१ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात ३४ चाळी आणि २५२० गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे तर नायगाव येथील ४२ पैकी पहिल्या टप्प्यात २३ चाळी आणि १८२४ गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात १६ चाळी आणि १२८० गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात रहिवाशांना विविध सोयी मिळणार असून त्यामध्ये व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, सिनिअर सिटीजन प्लाझा या सुविधांचा अंतर्भाव नवीन इमारतींमध्ये असणार आहे.

पात्र निवासी झोपडीधारकांना सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २६९ चौरस फूट ऐवजी ३०० चौरस फुट देण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. चाळ परिसरातील पात्र निवासी झोपडीधारकांना संक्रमण शिबिराऐवजी मागणी केल्यास दरमहा भाडे देण्याच्या पर्यायास यावेळी मंजुरी देण्यात आली.

एक सजग अभ्यासू पत्रकार गमावला

मुंबई, दि. 9 : दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक, पुणे तरूण भारतचे माजी संपादक, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन चे संस्थापक, राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य संचालक डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

“डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी प. पू. डॉ. हेडगेवार ते मा. सुदर्शनजी अशा क्रमशः पाच सरसंघचालकांच्या चरित्र आणि कार्यावर ‘पाच सरसंघचालक’ हे पुस्तकही लिहिलं आहे. स्वतंत्र पत्रकाराच्या नजरेतून या पुस्तकात त्यांनी संघकार्याच्या दीर्घकाळाचा रोचक आढावा घेतला आहे. स्व. श्री. मेहेंदळे यांनी लिहिलेली विविध पुस्तके, त्यांनी घेतलेल्या मुलाखती, दूरदर्शनसाठी त्यांनी निर्मिलेले अनेक वृत्तपट यातून त्यांची अभ्यासू वृत्ती उठून दिसली. राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. एक सजग पत्रकार म्हणून राजकीय क्षेत्रासोबतच त्यांचा राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा अभ्यास स्तिमित करणारा होता, त्याचबरोबर ते एक चांगले वक्ताही होते”, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. डॉ. विश्वास मेहेंदळे यांना ईश्वर सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘जी – २०’ निमित्ताने पुण्यासह राज्य, देशाला क्षमता दाखविण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. ९: ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

‘जी -२०’ परिषदेच्या तयारीबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल जे. डब्ल्‌यू मेरियट येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

‘जी -२०’ परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे, अशा शब्दात पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, ३७ देशातील १५० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, पुणे शहराची संस्कृती, येथील विकास दाखवण्याची चांगली संधी पुणे शहराला मिळाली असून शहरातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हावे, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी नियोजित कार्यक्रमांचे संगणकीय सादरीकरण केले.  बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

‘जी -२०’ बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

‘जी -२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर सौंदर्यीकरण कामांची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी

‘जी -२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात करण्यात आलेल्या विविध शहर सौंदर्यीकरण कामांची तसेच विकास कामांची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. विभागीय आयुक्त श्री. राव, मनपा आयुक्त श्री. कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. खेमनार, विकास ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे विमानतळ येथे या पाहणीला प्रारंभ झाला. विमानतळ येथून ‘जी -२०’ परिषदेचे प्रतिनिधी जे. डब्ल्यू मेरियट हॉटेल या बैठक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गाची संपूर्ण पाहणी यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली. पुणे विमानतळ येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरणाची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.

विमानतळापासूनच्या प्रतिनिधींच्या प्रवासमार्गावरील विमानतळ, येरवडा कारागृहाची सीमाभिंत, पुणे रेल्वे स्थानक तसेच अन्य शासकीय संस्था, खासगी इमारतींच्या सीमाभिंतीवर करण्यात आलेली कलात्मक रंगरंगोटी, रंगवण्यात आलेली चित्रे, पुणेरी पाट्या, पुण्याची वैशिष्ट्ये असलेल्या संकल्पनाधिष्ठीत रंगकामाची व सुशोभिकरणाची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. झालेल्या कामांची माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणांचेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

०००

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ९ : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात पार पाडली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु.पां.कुशारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातंतर्गत ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारण योजनांच्या मुख्य कामे, इतर बांधकामांच्या २२५ निविदांना सर्वसाधारण मान्यता देण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रस्तावाचा उच्चस्तरीय समित्ने अभ्यास करुन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामे घ्या- उपमुख्यमंत्री

जलसंधारणाच्या कामांची राज्यात जिथे आवश्यकता आहे, अशा ठिकाणी जलसंधारण महामंडळाने कामे घेण्यावर भर देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

महामंडळाकडे प्राप्त झालेल्या ८५ कंत्राटदारांच्या नोंदणीस मान्यता देतानाच यापुढे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्तरावर निकष तपासून कंत्राटदार नोंदणीला मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...