रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 169

पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

मुंबई, दि. ५ : एकल वापरातील प्लास्टिक हा असूर असून त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या काही काळापासून होत असलेले वातावरणातील बदल हे गंभीर व अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले आहे. अशा अभियानात लोकसहभाग असेल तर हे उपक्रम यशस्वी होतात. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. या सर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणे, एकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल.

पुढील पाच वर्षात एकल वापराचे प्लास्टिक पूर्णतः बंद करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अशी उत्पादने तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने एकल प्लास्टिक वापरणे बंद केले तरच अशी उत्पादने तयार करणे आपोआप बंद होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी स्वतः आलेल्या अभ्यागतांना बुके, साडी किंवा शाल ऐवजी अकरा कापडी पिशव्या द्यावेत, असे आवाहन करते. त्यातून जमा होणाऱ्या पिशव्या वापरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

प्लास्टिक मुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्य विभाग सहकार्य करणार – मंत्री ॲड.आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले की, पर्यावरण विभागाने महापर्यावरण हे ॲप्लिकेशन सुरू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसित, संपन्न, समृद्ध व दिशादर्शक कामे करणारे महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा हा देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

पर्यावरण हा विषय उपदेश नसून आत्मचिंतनाचा, आत्मबोधाचा, गुणवत्ता प्रसाराचा विषय आहे. पर्यावरण रक्षणाची भूमिका संत ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा मांडली. ज्ञानेश्वरांनी पर्यावरण पोषणाचा विचार मांडला. हा विचार गावागावत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभागाबरोबर काम करेल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना – जयश्री भोज

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राज्यात वातावरणीय बदलामुळे होणारे विविध परिणाम लक्षात घेता, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच विविध उपाययोजना राबवत आहे. वातावरणीय कृती आराखड्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य वातावरणीय कृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. याशिवाय माझी वसुंधरा अभियान, राज्याचे परिसंस्था आधारित अनुकूलन धोरण, मानवनिर्मित देवराई व घनवने निर्माण करणे, कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष, सर्क्युलर इकॉनॉमी धोरण, विद्युत वाहन धोरण आदीच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत.

मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणार – सिद्धेश कदम

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले की, एकल वापर प्लास्टिक कमी करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या समुद्राचे पाणी काळे होत आहे. हा रंग बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही आम्ही काम करत आहोत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, नागरिकांनीही सहभाग घेणे आवश्यक आहे. विभागाच्या वतीने राज्यात २२ मार्चपासून विविध उपक्रम सुरू असून आतापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम झाले आहेत. पर्यावरण परिषदेतील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वातावरणीय बदल कृती आराखडा व महापर्यावरण ॲपचे अनावरण

यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा, माझी वसुंधरा अभियान ६.० टूल किट चे तसेच सल्फरडाय ऑक्साईड इमिशन ट्रेडिंग स्किमच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. प्रदूषणासंदर्भातील तक्रारीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘महा पर्यावरण’ ॲप्लिकेशनचे अनावरणही मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजित विविध परिसंवादामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

वनमंत्र्यांच्या हस्ते वन नियंत्रण कक्ष व सायबर सेलचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 5 जून : चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रभावीपणे होण्यासाठी तसेच मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर लगेच घटनास्थळी पोहचण्यास लागणारा प्रतिसाद वेळ कमी करण्याच्या उ‌द्देशाने चंद्रपूर येथे सुसज्ज वन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचे  तसेच सायबर सेलचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, श्वेता बोड्डू आदी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, पोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर वन विभागाने वन नियंत्रण कक्ष तयार केला आहे. वनांशी संबंधित जिल्ह्यात घडणा-या घटना, वाघांचे व बिबट्यांचे हल्ले, आगी लागण्याचे प्रमाण आदी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा ॲक्टीव्ह करण्याचे काम येथून केले जाईल. चंद्रपूरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतरही संवेदनशील भागात व प्रत्येक सर्कलमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.

वन नियंत्रण कक्षाची माहिती : सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक (१८००३०३३) हा आहे. या कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील विभागाविषयी माहिती, विभागातील कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून केले जाईल. या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील सर्व वन कर्मचाऱ्यांचे तसेच शासकिय वाहनांचे रिअल टाईम लोकेशन मिळण्यास मदत होते. जेणेकरून कुठे घटना घडल्यास जवळपास असलेल्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन बघून घटनास्थळी लवकर पोहचता येईल.

वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून येथे 24 तास कमर्चारी उपस्थित आहेत. सदर कक्षामार्फत वन कमर्चाऱ्यांकरीता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे ॲन्ड्राईड ॲप तयार करण्यात आले आहे. सदर एप्लीकेशन हाताळण्याबाबत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाला एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर घटनेची माहिती तात्काळ संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे वनरक्षकास तात्काळ घटनास्थळी पोहचून कार्यवाही करण्यात मदत मिळते.

कार्यवाही पूर्ण झाल्यावर ॲपच्या टिकिटमध्ये घटनेविषयी संपूर्ण माहिती भरली जाते. तसेच सदर माहिती कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित भरली किंवा नाही याची खात्री संबंधित वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी करून नंतर टिकिट बंद केल्या जाते. वन नियंत्रण कक्षाद्यारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा कन्सोल स्क्रीन बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या स्क्रीनमध्ये फॉरेस्ट कंट्रोल ॲपचे लॉगिन करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी दौऱ्यावर असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते. तसेच एखाद्या ठिकाणी मोठी घटना घडल्यास सदर घटनास्थळाच्या जवळपास असणाऱ्या वाहनास नियंत्रण कक्षाद्यारे माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळावर पोहचता येईल.

मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम प्रभावशाली करणार – वन मंत्री गणेश नाईक

चंद्रपूर, दि. 5 जून : गत महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक जणांचे जीव गेले आहेत, ही अतिशय दु:खद घटना असून शासनस्तरावरून याची दखल घेण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

वन अकादमी येथे वनक्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद ‘वनशक्ती – 2025’ चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, तेलंगणाच्या वनबल प्रमुख श्रीमती सुवर्णा, भारतीय वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक कंचनदेवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सोबतच वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंपनाचा लाभ देण्यात येईल. वनविभाग हा एक महत्त्वाचा विभाग असून जंगलात मजबूत गाड्यांची आवश्यकता आहे. अशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच वनपाल, वनरक्षक, आरएफओ यांच्या स्तरावरील कर्मचा-यांना स्वरक्षणासाठी हत्यारे देण्यात येतील. वनविभाग हा एक परिवार आहे. या परिवारांमध्ये सर्वांची काळजी घेण्याची वनमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात वनविभाग अग्रेसर राहील. तसेच पुढील वन विभागाच्या भरतीमध्ये 50 टक्के भरती महिलांची करण्यात येईल. सध्या जिल्हास्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे. हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वनविभागात राबविण्यात येणार आहे. वन विभागाने तीन-चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे. चंद्रपूरच्या योगदानातून वनांचे चांगले संरक्षण होत आहे. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा प्रवेश गेट अतिशय चांगले करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास मिळेल

वनविभागात कार्यरत असलेल्या महिलांची राष्ट्रीय परिषद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यासाठी सुमिता विश्वास यांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे. राज्यात पहिल्या प्रमुख तीन पदांवर महिला विराजमान आहेत. यात राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व वनबल प्रमुख यांचा समावेश असून मंत्रालयात मोठ्या प्रमाणात महिला सचिव आहेत. चंद्रपूर येथे होणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होईल.

वनांवर आधारीत उद्योग यावेत : आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर जिल्ह्यात महिलांची राष्ट्रीय परिषद होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. या दोन दिवसात कार्यशाळेत चांगले मंथन होईल. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो ते काम उत्कृष्टच असते. वनांचे संवर्धन व्हायला पाहिजे, मात्र मानव वन्यजीव संघर्ष हा मोठा प्रश्न आहे. पोलीस पाटील पदाच्या धर्तीवर वनपाटील आणि वनपाटलीन अशी नियुक्ती करावी. वनांवर आधारित उद्योग जिल्ह्यात यावे. त्यातून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतपर भाषण वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांनी केले. तर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुवर्णा आणि कांचन देवी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेया खाडीलकर यांनी तर आभार चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मानले.

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. ५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

 

समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटर अंतरावर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारत अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

तत्पूर्वी. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

00000

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिट प्रकल्पाचे निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली, 5 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोपर्निकस मार्कस्थित महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन निवास आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र सदन परिसरातील पालापाचोळा आणि दोन उपाहारगृहामधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करून सेंद्रिय खत तयार करणे असा असल्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांनी यावेळी सांगितले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या मुबलक झाडांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि दोन्ही उपाहारगृहामधून उरलेला भाजीपाला, तसेच इतर सेंद्रिय कचरा जमा होतो. या कचऱ्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करण्यासाठी तीन टन क्षमतेचे दोन कंपोस्ट पिट्स उभारण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सामूहिक चर्चेतून घेतला असल्याचे सांगून निवासी आयुक्त आर  विमला म्हणाल्या, या पिटमधून तयार होणारे सेंद्रिय खत परिसरातील विस्तीर्ण बागा आणि झाडांना पोषक ठरेल, ज्यामुळे हरित क्षेत्र अधिक समृद्ध आणि टिकाऊ होईल.

हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. कंपोस्ट पिटमुळे जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे होईल आणि नैसर्गिक खतामुळे महाराष्ट्र सदनातील बागांचे सौंदर्य तसेच पर्यावरणीय समतोल वाढेल, असेही निवासी आयुक्त आर.विमला यांनी यावेळी सांगितले.

या  भूमिपूजन कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलते, निवासी अभियंता किरण चौधरी, अभियंता जे.पी. गंगवार, कनिष्ठ अभियंता प्रियंका नागे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

0000

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी / वृत्त विशेष  -126

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली : इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची जलद निर्मिती

मुंबई, दि. ५ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक आयोगाने निवडणुका संपल्यानंतर तयार होणाऱ्या इंडेक्स कार्ड आणि विविध आकडेवारी अहवाल तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाधारित यंत्रणा सुरु केली आहे. यामुळे पारंपरिक, वेळखाऊ आणि त्रुटीक्षम पद्धतींची जागा आता जलद, अचूक आणि एकसंध डिजिटल प्रक्रियेने घेतली आहे.

इंडेक्स कार्ड ही निवडणूक आयोगाची स्वतःहून सुरू केलेली एक गैर-वैधानिक आकडेवारी स्वरूपातील प्रणाली आहे. तिचा उपयोग निवडणुकांनंतरच्या टप्प्यात सर्व संबंधित घटक जसे संशोधक, शैक्षणिक क्षेत्र, धोरणकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांना मतदारसंघ स्तरावरची माहिती सहज मिळवता यावी यासाठी होतो.

या कार्डामध्ये उमेदवार, मतदार, मतदानाची टक्केवारी, मतमोजणीचा तपशील, पक्षनिहाय आणि उमेदवारनिहाय मते, लिंगानुसार मतदान पद्धती, प्रादेशिक फरक, राजकीय पक्षांची कामगिरी आदी बाबी समाविष्ट असतात. या माहितीच्या आधारावर लोकसभा निवडणुकीसाठी ३५ आणि विधानसभा निवडणुकीसाठी १४ आकडेवारी अहवाल तयार केले जातात.

या नव्या यंत्रणेमुळे आता निवडणुकांनंतरचे अहवाल जलद आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होतील. यामध्ये समाविष्ट अहवालांमध्ये राज्य/मतदारसंघनिहाय मतदार तपशील, मतदान केंद्रांची संख्या, महिला मतदारांचे सहभाग, राष्ट्रीय/राज्य पक्ष व नोंदणीकृत पण अप्रसिद्ध पक्षांची कामगिरी, विजयी उमेदवारांचे सविस्तर विश्लेषण, मतदारसंघनिहाय निकाल आणि एकत्रित सारांश अहवाल यांचा समावेश होतो.

ही सर्व आकडेवारी इंडेक्स कार्डांवर आधारित असून शैक्षणिक आणि संशोधन उपयोगासाठीच मर्यादित आहे. मूळ व अंतिम आकडेवारी मात्र संबंधित मतमोजणी अधिकारी (Returning Officer) यांच्याकडे असलेल्या वैधानिक फॉर्ममध्येच ग्राह्य धरली जाते.

पूर्वी या माहितीचे संकलन निवडणूक क्षेत्रांमध्ये हाताने विविध वैधानिक फॉर्ममध्ये भरून केले जात असे. त्यानंतर त्या माहितीचे ऑनलाईन प्रणालीत डेटा एंट्री करून अहवाल तयार होत असत. ही प्रक्रिया वेळखाऊ, अनेक स्तरांची आणि विलंब निर्माण करणारी होती. नव्या प्रणालीमुळे ही त्रुटी दूर होणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. ५: आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यात कर्मचारी निवास, पुरुष, महिला, तृतीयपंथी कैदी, न्यायाधीन कैदी यांच्यासाठी  स्वतंत्र कोठडीचा समावेश असावा. बहुमजली, पर्यावरणपूरक, जास्तीत जास्त ग्रीन एनर्जीचा उपयोग असणाऱ्या कारागृह निर्मितीसाठी महापालिकेला वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक बाबत नियमात शिथीलतेचा प्रस्ताव द्यावा. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळाल्यानंतर पुनर्विकासाचा सुधारित आराखडा सादर करावा, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाबाबत बैठकीत राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, सहसचिव श्री. धपाटे, नगरविकास व कारागृह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री कदम म्हणाले, बहुमजली कारागृहाचा प्रस्ताव सादर करताना जगातील अशा पद्धतीने असलेल्या कारागृहांचा अभ्यास करण्यात यावा. सुरक्षेच्यादृष्टीने काटेकोर उपायोजनांचा समावेश आराखड्यात असावा. आर्थर रोड कारागृहाप्रमाणेच भायखळा येथील कारागृहाच्या पुनर्विकास बाबतही आराखडा तयार करावा.

नवीन कारागृह निर्मितीसाठी मानखुर्द येथील २२ एकर जागेची पाहणी करण्यात यावी. भविष्यात नवीन कारागृह निर्मिती करताना अडचण येऊ नये, यासाठी या जागेवर आरक्षण टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री कदम यांनी दिल्या.

०००

निलेश तायडे/विसंअ

एकल प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

मुंबई, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला. मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे असा प्रयत्न आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी मंत्रालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन रामस्वामी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्स्फूर्तपणे तयार केलेली वापरातील एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे यावेळी वाटप करण्यात आले.

पर्यावरणाला हो आणि प्लास्टिकला नो म्हणा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, पर्यावरणाचे संवर्धन हा एक महत्त्वाकांक्षी विषय असून आपण सर्वांनीच  पर्यावरणाच्या संवर्धनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी कार्यालयात सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातो, म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम  मंत्रालयातील कामकाज कागद विरहित करून आपले पहिले पाऊल उचलूया. पर्यावरणाबद्दलची ही जनजागृती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायची आहे. इतरांना जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे.

पेपर व प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो म्हणून आज पासून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्याचे आवाहन मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

एकल वापर प्लास्टिक मुक्तीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नेऊ – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, मंत्रालयात राबविण्यात आलेला पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम फक्त उपक्रम नसून हा एक जनसंदेश आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जागरूकता आपण या उपक्रमामार्फत निर्माण करणार आहोत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबीय, सहकार्य व मित्र-मैत्रिणीना पर्यावरण जोपासण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती द्यायला हवी. कागद व प्लास्टिकच्या वापरास आळा घालून आपण या उपक्रमाची सुरुवात करूया. मंत्रालयात साडेनऊ हजार कर्मचारी कार्यरत असून या सर्वांनी एकल वापर प्लास्टिक मुक्तीचा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नेऊ. माझे कार्यालय माझे घर प्लास्टिक मुक्त, पर्यावरण स्नेही ही फक्त घोषणा नसून त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस पाऊले उचलूया. प्लास्टिक मुक्त मंत्रालय हा संकल्प मनात ठेवून सर्वांनी कागदाचा वापर टाळू व कागद विरहित प्रणाली वापरात आणू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी प्रास्ताविकात विभागाच्या वतीने एकल वापर प्लास्टिक बंदीविरुद्ध करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

000

नंदकुमार वाघमारे/विसंअ

‘झाड’ हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक – केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

नवी दिल्ली, दि. 5 : झाड हे केवळ हिरवळीचे प्रतीक नसून ते, आईच्या ममतेने प्रतीक असल्याची भावना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्र सदन येथे  वृक्षारोपण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला उपस्थित होत्या.

वृक्षारोपणानंतर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहकार मंत्रालयाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत मंत्रालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाप्रती आपली कटिबद्धता दर्शवली. आज लावलेले हे झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नाही, तर ते आईच्या ममतेचे प्रेरित आहे, जिने  जीवन दिले, सांभाळले आणि प्रगतीची प्रेरणा दिली. प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टीने प्रेरित हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नाही, तर आईबद्दलच्या श्रद्धेला निसर्गाशी जोडते.

याच अभियानांतर्गत खासदार रवींद्र वायकर यांनीही महाराष्ट्र सदनात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉक्टर राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे.पी.गंगवार, किरण चौधरी, प्रियंका नागे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील कर्मचारी उपस्थित होते.

0000

अंजू निमसरकर- माहिती अधिकारी/   वृत्त विशेष  -125

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये – ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. 5 : कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नदी – नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटतो. गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्ती अभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री डॉ. योगेश कदम यांनी दिल्या.

कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्ती बाबत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पाणंद रस्त्याप्रमाणे साकव निर्मिती व दुरुस्तीसाठी कोकण विभागाचा आराखडा तयार करून राज्यस्तरीय नवीन लेखाशीर्ष निर्माण करावे. कोकणात आवश्यकतेनुसार नवीन साकव निर्मिती, दुरुस्तीसाठी आराखडा तयार करावा. यासाठी गावनिहाय माहिती घेण्यात यावी.

कोकणात अस्तित्वातील साकवांची उंची वाढवून पुलात रूपांतर करण्यासाठी आराखड्यात समावेश करावा. साकव दुरुस्ती आणि निर्मितीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

0
कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात...

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा...

0
मुंबई, दि १७: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि...

राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट

0
मुंबई, दि. १७: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,...

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सोलापूर दि. १७:  सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून...

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल

0
मुंबई, दि. १७ : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर...