सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 168

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा

रायगड, दि. ६ (जिमाका): युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजी राजे  आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी पार पडला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभागचे संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सोहळ्यानिमित्त विविध शासकीय विभाग व जिल्हा प्रशासनाने अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सावलीसाठी मंडप, मोफत बससेवा आदी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या.

हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते.

०००

युवा भारताच्या सक्षमीसाठी ‘पंच-परिवर्तन’

विकसित भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी ‘पंच-परिवर्तन’ हा एक महत्वाकांक्षी आणि व्यापक उपक्रम म्हणून पुढे येत आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजातील मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना करणे, संस्कृतीचे संवर्धन करणे आणि नव्या पिढीला जबाबदार नागरिक म्हणून घडवणे हा आहे. हा उपक्रम केवळ काही कार्यक्रमांसाठी मर्यादित नसून, भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे एक व्यापक आंदोलन देखील आहे. हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) ‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेवर आधारित विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांमध्ये राष्ट्राभिमान, सामाजिक भान, पर्यावरण विषयक सजगता आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे होय.

‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेचे पाच आधारस्तंभ म्हणजे: नागरिक कर्तव्य व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार व संकल्पना, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण. हे सर्व स्तंभ एकमेकांशी पूरक असून एकत्रितपणे ते समाजात सशक्त बदल घडवण्याचे सामर्थ्य बाळगतात

पंच-परिवर्तन संकल्पनेचा मूळ गाभा पाच महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे. सामाजिक समरसता समाज एकसंघ करेल, कुटुंब प्रबोधन कौटुंबिक जागृतीचे कार्य करेल, पर्यावरण संरक्षण देखील महत्त्वाचे आहे, स्वाधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध आपल्याला कर्तव्यांची जाणीव करून देते, यातील प्रत्येक घटक हा स्वतंत्र असूनही परस्परपूरक आहे आणि यांचा एकत्रित परिणाम म्हणजे राष्ट्रासाठी एक सशक्त सामाजिक अधिष्ठान तयार करणे हा आहे.

भारतीय लोकशाहीचा खरा गाभा फक्त अधिकारांमध्ये नाही, तर जबाबदाऱ्यांच्या जाणिवेत आहे. मतदान करणे, कर भरणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, कायद्याचे पालन करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे या गोष्टींमध्ये नागरिकांनी सक्रीय भूमिका निभावली पाहिजे. या माध्यमातून जबाबदार नागरिक घडतील आणि शासन यंत्रणेशी सुसंवाद साधला जाईल. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत कुटुंब ही एक मूलभूत संस्था आहे. परंतु बदलत्या जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि पश्चिमीकरणाच्या प्रभावामुळे कुटुंबातील संबंध कमकुवत होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून भारतीय मूल्ये, पारंपरिक संस्कार, आदर्श जीवनशैली यांचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे. पालकत्वाचे भान, वृद्धांचा सन्मान, मुलांमध्ये संस्काराचे बीज आणि कुटुंबातील संवाद वाढवणे हे या प्रबोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

‘स्वदेशी’ अभियान केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता, जीवनशैलीचा एक भाग व्हावे. स्थानिक संसाधनांचा वापर, पारंपरिक कौशल्यांचे पुनरुज्जीवन, लघु उद्योगांना प्रोत्साहन आणि आत्मनिर्भरतेचा आग्रह यामार्फत भारतीय अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक ओळख यांना बळकटी दिली जाते. ही संकल्पना ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या केंद्र सरकारच्या धोरणांशी सुसंगत आहे.

सामाजिक समरसता हा पंच-परिवर्तनातील अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जाती, धर्म, भाषा, लिंग आणि वंश यांवर आधारित भेदभाव काही ठिकाणी जाणवतो. परंतु, समाजात बंधुता, स्नेह, समजूतदारपणा आणि सहकार्य यांची भावना रुजवून, समरसतेच्या आधारे एक संमिश्र पण सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करता येऊ शकते. सामाजिक समरसता केवळ ऐक्याची भावना निर्माण करत नाही, तर ती देशाच्या सामाजिक आरोग्याचे व सांस्कृतिक प्रगतीचे मूलभूत अधिष्ठान आहे.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, हवामान बदल, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि प्रदूषण यामुळे संपूर्ण मानव जातीसमोर एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. पंच-परिवर्तन योजनेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण, जलसंवर्धन, कचरामुक्त मोहिम, प्लास्टिक मुक्त जीवनशैली यासारख्या विविध जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक सहभाग, विद्यार्थ्यांचे योगदान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण विषयक जनजागृती केली जाते.

पंच-परिवर्तन संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी विविध स्तरांवर उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्यावतीने आयोजित केलेली व्याख्यानमाला आहे. राज्यातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण सजगता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पंच-परिवर्तन संकल्पनेवर आधारित पाचही विषयांवर एकाचवेळी व्याख्याने दिली जाणार आहेत.

या संपूर्ण उपक्रमामध्ये एकात्मता, पारंपरिकतेचा सन्मान आणि आधुनिकतेचा विवेकी स्वीकार यांचा सुरेख संगम पहायला मिळतो. पंच-परिवर्तन ही संकल्पना फक्त वाजवी उपक्रम न राहता, सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रेरणादायी चळवळ ठरणार आहे. भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दृष्टीने हा निश्चितच एक निर्णायक उपक्रम ठरणार आहे.

भारत आज एका नव्या जागृतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे सामाजिक समरसतेतून ऐक्य, कुटुंब प्रबोधनातून मूल्यसंस्कार, पर्यावरण संरक्षणातून जागरूकता, स्वाधारित जीवनशैलीतून आत्मनिर्भरता आणि नागरिक कर्तव्यबोधातून जबाबदारीची भावना हीच नवभारताची ओळख ठरणार आहे. युवक हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यात राष्ट्रभक्ती, सजग नागरिकत्व आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजवणे हेच या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी प्रेरणा घेऊन, पंच-परिवर्तनाची ही वाटचाल, नवभारताच्या उभारणीसाठी एक तेजस्वी दीपस्तंभ ठरेल. या पंच-परिवर्तनांच्या प्रकाशात चालत, एक सशक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी भारतीय युवा पिढी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया!

छत्रपती शिवाजी महाराज की जय!

  • मंत्री मंगल प्रभात लोढा

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नंदुरबार, दि. ६ (जिमाका): शिवस्वराज्य निमित्त कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

जिल्हा परिषदेत पार पडलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्राला सेठी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) पांडूरंग कोल्हे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, माध्यमिकचे प्रवीण अहिरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, अभिजित मोरे, रविंद्र पावर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ढोलताशांच्या गजरात अत्यंत उत्साही वातावरणात शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येऊन  दीपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी श्रॉफ हायस्कूल (नंदुरबार) च्या संगीत पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. तसेच डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या लेकी या उपक्रमांतर्गत योगासनाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महारांजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करून उपस्थितांची मने जिंकली.

सुत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कलाशिक्षक चंद्रशेखर चौधरी, हेमंत पाटील, समग्र शिक्षा अभियानाच्या मनीषा पवार, विद्या थोरात, रत्ना विसपुते, शितल भदाणे दिनेश कढरे, संजय पाटील, ज्ञानेश्वर बोरसे, महेंद्र अहिरे, प्रवीण पवार, इस्राईल सैय्यद, डॉ. गिरीश पवार, योगेश रघुवंशी, मयुर वाणी, स्वप्नील पाटील यांनी सहभाग घेतला.

छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे अभिवादन

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमानंतर कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शिवस्वराज्य दिना निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या परिसरातील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

०००

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामांचा आढावा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला.

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, बौद्ध धर्मगुरू, बुधिष्ठ सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, प्रदीप कांबळे, शशी प्रभू, तसेच सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची भव्य वास्तू उभी राहत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने हा मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरणविषयक मान्यता, तसेच हा मार्ग रुंद बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित विभागांकडून नियोजन करण्यात यावे.

या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वयाने यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

000000

किरण वाघ/विसंअ

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  • पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस प्रारंभ

कोल्हापूर, दि. ०५ :  महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन तर कार्यक्रमस्थळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, आमदार अशोकराव माने यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेन, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.कदम, प्रांताधिकारी समीर शिंगटे व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ ‘दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपल्या सर्व देव-देवता निसर्गाशी साधर्म्य राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या आहेत.

आमदार डॉ. विनय कोरे यांनी चांगल्या प्रकारे मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला असून २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे. आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा अशी मागणी आहे. ती येत्या काळात पूर्ण करू. विकास आराखड्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फतच होण्यासाठी लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ.

श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर अनेक भाविक येतात, त्यांची चांगली सोय व्हावी तसेच येथील वातावरणही उल्हसित रहावे या दृष्टीनेच विकास आराखड्याची चांगली अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. पन्हाळगडावरील झालेल्या चांगल्या कामाप्रमाणेच याही विकास आराखड्यातून चांगली कामे होतील.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा देऊन समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी इथिक्स, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी आणि एन्व्हायर्मेंट या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०७० पर्यंत भारत कार्बन न्यूट्रल देश करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पर्यावरणपूरक कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरण विषयक महत्त्व पटवून दिले. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या.

आमदार डॉ. विनय कोरे यांनी अनेक वर्षांपासूनचे जोतिबा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगत या ठिकाणी विभागाच्या जमिनीवर शास्त्रीय पद्धतीने, अभ्यास करून वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा या ठिकाणी उभे करू. हे करीत असताना तसेच मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांशिवाय कुठल्याही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार नाही.  स्थापन करण्यात येत असलेल्या प्राधिकरणात ग्रामस्थांचा सहभाग असेल व त्यांचे मत विचारात घेतले जाईल असेही कोरे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दख्खन केदारण्य प्रकल्पास शुभेच्छा देऊन या पद्धतीने जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकास आराखडा शास्त्रीय दृष्टिकोनातून, पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल असे सांगितले. आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर सांगितले.

०००००

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, शांताराम भोईर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीची संक्षिप्त माहिती:-

ठाणे खाडीवर आधीपासून मानखुर्द-वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत. या नवीन पुलामुळे इतर दोन पुलांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुलाची निर्मिती होणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

00000

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि.5 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए)चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

मेट्रो मार्गाचा विस्तार

मेट्रो मार्गाचा विस्तार पिंपरी चिंचवड ते निगडी येथेपर्यंत केला जाणार असून या जवळपास साडेचार किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 910 कोटी रुपये आहे या मार्गावर तीन स्थानक प्रस्तावित आहेत. तसेच भक्ती शक्ती ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मोरवाडी मेट्रोस्थानकाच्या जवळ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची अडचण दूर करण्यात यावी व यासाठी पार्किंगसाठी देण्यात आलेल्या जागेचा विकास केला जावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केल्या.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगर विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूक, जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुविधा यांचा समावेश आहे याची माहिती देण्यात आली.

यासह पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसाठी पार्किंग झोन आणि इतर सुविधा, शहराच्या विविध भागांना जोड मार्ग, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याची टाकी. घनकचरा व्यवस्थापन व मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी, अण्णासाहेब मगर स्टेडियम, संविधान भवनचे काम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्कृष्टता केंद्र यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

पीएमआरडीएकडून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या कामाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगले प्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत

इंद्रायणी नदीच्या पात्रातील अनधिकृत 36 बंगले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात आले. या बंगल्यांचे बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणात महानगरपालिकेच्या बीट निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, यातील दोषी व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशा सूचना उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी दिल्या.

00000

किरण वाघ/विसंअ

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले.

यंदाच्या पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांच्यासह विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती संदर्भात कोणतीही अचूक पूर्वसूचना मिळत नसते. अशा वेळी यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्व तयारी, तातडीचा प्रतिसाद आणि समन्वय महत्त्वाचा असून या काळात माहितीचा अचूक प्रसार आणि जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविणे गरजेचे असते. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपत्ती  संदर्भातील माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच प्रसारित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा  – हेमराज बागुल

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता यावर भर द्यावा असे सांगून संचालक (प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले, आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती आणि विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावे, असेही श्री. बागुल म्हणाले.

अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे

आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिक, राज्य  व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात. या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेऊन ती समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी.

जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणे, आणि आवश्यक सूचना पोहोचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी  प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावा, ज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावी, विशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले.

यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळे, मुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या.

००००

पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक नियोजनावर भर द्या – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबईत २५ जून रोजी होणार पुढील बैठक

नागपूर, दि. 5 : विधानभवन विस्तारीकरण करताना पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक नियोजनावर आपला भर आहे. यादृष्टीने विधानभवन विस्तारीकरणासंदर्भात येत्या २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिले.

विधानभवन नागपूर येथील विस्तारांतर्गत इमारतीचे बांधकाम व जमिनीच्या अधीग्रहणासंदर्भातील आढावा त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील विधानभवनात घेण्यात आला. या आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार  यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

विधिमंडळाची हेरिटेज इमारत कायम ठेवून हेरिटेज वास्तूव्यतिरिक्त उपलब्ध जागेच्या प्रस्तावित बांधकामाची माहिती सादर करण्यात यावी. विधिमंडळ परिसरात प्रस्तावित बांधकाम करताना पुरेशा प्रमाणात झाडे लावून पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात यावा. रस्ते मोठे व प्रशस्त असावेत. मुंबईतील पावसाळी अधिवेशनापूर्वी २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिले.

राजस्थान विधिमंडळात संग्रहालय उभारण्यात आले आहेत. याच धर्तीवर नागपूर विधिमंडळ परिसरात संग्रहालय उभारण्यात येऊ शकते का याची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर एफएसआय, पुरातत्व विभागाच्या परवानग्या यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकीत दिले.

विधिमंडळ परिसराची केली पाहणी

बैठकीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधिमंडळाची दोन्ही सभागृहे, मंत्रिदालनांसह विधिमंडळ परिसराची पाहणी करीत आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या.

आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

नागपूर, दि. 5 – आपणास देण्यात आलेले कोणतेही काम श्रेष्ठपणे करण्याची गरज आहे. कोणतेही काम छोटे अथवा मोठे असत नाही. प्रत्येक कामाला, कष्टाला सारखेच मूल्य असते. गीतेमध्ये हेच तत्वज्ञान सांगितले आहे. त्यामुळे आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करीत यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते.

रोजगार मेळाव्याला प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्र कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरचे उपायुक्त प्रकाश देशमाने, सहआयुक्त सुनंदा बजाज, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती.

कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसून प्रत्येक कामाचा स्वीकार करावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी पुढे बोलताना केले. महाराष्ट्र तसेच देशात रोजगाराची कमी नाही. मात्र, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पसंतीचा रोजगार मिळत नाही. कौशल्य अभाव असल्याने पीछेहाट होते. श्रमाचा सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळेच नळ कारागिराला ‘वॉटर इंजिनियर’चे नाव देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त केले तर यांच्यामधून मोठे उद्योजक तयार होतील आणि भारत विकसित होईल असे श्री लोढा म्हणाले.

इच्छा तेथे मार्ग – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे

इच्छा असेल तर मार्ग सापडतात रोजगाराचा मार्ग तयार करण्यात विद्यापीठ मदत करीत असल्याचे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केले. उद्योजकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास करावा, त्यांच्या कौशल्यातून कंपनीचा पर्यायाने भारताचा विकास होईल असे त्या यावेळी म्हणाल्या. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी ॲप’ बाबत माहिती देत ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता या रोजगार मिळाव्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरचे उपायुक्त प्रकाश देशमाने यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहआयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी रोजगार मेळाव्याच्या स्वरूपाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन यांनी मानले. रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सहभागी उद्योजक

रोजगार मेळाव्यामध्ये ॲक्सिस बँक, इंडोरामा, टाटा तनिष्क, लाईट हाऊस सिस्टीम, निको अलाॅय, करण कोठारी ज्वेलर्स, स्मार्ट हायजीया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएट नागपूर, मंशा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, टाटा स्ट्राईव्ह एक्सटेन्शन सेंटर वाडी नागपूर, ईराॅस मेटल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, महाचाय प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, एलआयसी ऑफ इंडिया, टाइम प्रो इव्हेंट अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या.

रोजगार मेळाव्याकरिता 19 कंपन्या तसेच 323 उमेदवार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...