सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 167

पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’ ‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम

छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)-पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हा ही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. ह्या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करुन फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

पोफळा ता. फुलंब्री हे तसे लहानसे पण जरासे न्यारे गाव. गावात अवघा ७७ उंबरठा. पण समुद्रसपाटीपासून ७२५ मिटर उंचावर.  एन्ड्युरन्स टेक्नॉलीजी या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून  हे गाव संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्याचे ठरवले. त्यासाठी महावितरणने त्यांना सहयोग दिला. महावितरणने ह्या गावाचा अधिभार नियमित करण्यासाठी १०० केव्हीचे रोहित्र बसवून दिले. त्यामुळे वीज पुरवठा पुर्णवेळ सुरु राहू शकतो.

गावाने एक होऊन संपूर्ण वीज चोरी बंद केली. त्यानंतर ग्रीड पुरवठा पद्धतीने प्रत्येक घरावर १ केव्ही क्षमतेचे सौर पॅनेल बसविण्यात आले.  त्यासाठी प्रति पॅनेल, फिटींग, मिटर बसविणे असा प्रत्येक कुटुंबासाठी ५१ हजार रुपयांचा खर्च कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केला. एप्रिल महिन्यापासून संपूर्ण गाव हे सौर ऊर्जेवर शिफ्ट झाले, अशी माहिती एन्ड्युरन्सच्या सामाजिक उपक्रम विभागाचे सहा. व्यवस्थापक उदय दुधगावकर यांनी दिली. या शिवाय गावातील शाळा, जलसंधारण, वृक्ष लागवड अशी इतर कामेही या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून झाली आहेत.

संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आल्यामुळे गावातील वीज चोरी पूर्ण बंद झाली. सर्व जोडण्या वैध झाल्या. शिवाय प्रत्येक सौर पॅनेल सोबत घरावर वीज अटकाव यंत्रे, अर्थिंगही लावण्यात आली. त्यामुळे सुरक्षितता आपोआप वाढली.

संपूर्ण सौरग्राम झालेले पोफळा हे गाव संपूर्ण मराठवाडा विभागातील पहिलेच गाव ठरले आहे,असा दुजोरा महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला आहे. आता हीच कंपनी येत्या वर्षात म्हणजेच सन २०२५-२६ मध्ये मुंबापूरवाडी ता. खुलताबाद ह्या गावाला संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्यासाठी काम करीत आहे.

अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक करुन किमान  कार्बन उत्सर्जन करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे १२ हजार ७२५ कृषीपंपांना दिवसा वीज

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे.  याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १२ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती महावितरण कडून प्राप्त झाली आहे.

‘महावितरण’ ने दिलेल्या आकडेवारीनुसार, वैजापूर तालुक्यातील लोणी येथील १० मेगावॅटच्या प्रकल्पातून लोणी, वाकला, चिकटगाव, नायगव्हाण, खरज, तलवाडा व बाभूळल गावातील १६६५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथे ५ मेगावॅट प्रकल्पातून गेवराई गुंगी, रिधोरा देवी, कोलते टाकळी, धानोरा व निमखेडा गावातील ८५४ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील अन्वी उपकेंद्रांतर्गत रहिमाबाद येथील ५ मेगावॅट प्रकल्पातून रहिमाबाद व आसडीतील ९०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव उपकेंद्रांर्तत जोडवाडीतील ४ मेगावॅटच्या प्रकल्पातून १ हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत आहे. वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून भायगाव गंगा, उंदीरवाडी, राजुरा, पाशापूर, राहेगाव, सोनवाडीच्या ५३७ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून मंगरूळ, चांदापूर व पालोदच्या ८५० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.धोंदलगाव (ता.वैजापूर) प्रकल्पातून धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.  शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. वरखेडी (ता. फुलंब्री) प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील ५ मेगावॅट प्रकल्पातूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. जिल्ह्यात एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प येत्या मार्च २०२६  पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा सर्वांनी अंगीकार करावा- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

सोलापूर, दि. :- आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात आहे. महाराजांनी लोक कल्याणकारी आदर्शवत अशी राज्यकारभार पद्धत राबवली. त्याच पद्धतीच्या अवलंब करून आपले राज्य शासनही राज्यकारभार करत आहे. समाजातील प्रत्येक विद्यार्थी, नागरिक व पालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालय व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात किल्ले विकास मंत्री श्री. लोढा मार्गदर्शन करत होते. यावेळी कौशल विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव, पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचीम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनायक झुटे, मित्राचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. लोढा म्हणाले की, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  नोकरी किंवा उद्योग या दोन्ही पर्यायाचा विचार केला पाहिजे. स्वतःचे उद्योग उभारून त्या उद्योगातून इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. मित्रा या संस्थेच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध केली जात आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाच्या न्यू एज कोर्सेसच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थ्रीडी प्रिंटिंग, इलेक्ट्रिक वेहिकल साठी ईव्ही टेक्निशियन, सोलर टेक्निशियन हे कोर्सेस जुलै महिन्यापासून सुरू होत आहेत. या कोर्सेस द्वारे भविष्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा असेही आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री लोढा यांनी केले.

प्रारंभी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांनी यावेळी महाराजांना वंदन केले.

*उद्योजकांचा सत्कार –

विकास मंत्री श्री लोढा यांच्या हस्ते आयटीआय संस्थेमार्फत जे विद्यार्थी उद्योजक झालेले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये…

1)रवींद्र बगले मल्टिपल बिझनेस, 2)लक्ष्मण राजाराम श्रीमल इलेक्ट्रिक मेकॅनिकल हे सवोॅ शाईन सर्विसेस येथे काम करतात. 3)विष्णू थेटे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतात. 4)जसपाल सिंग तैयावाले रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्टर पदावर कार्यरत आहेत. 5) प्रकाश तैयावाले राधा इंटरप्राईजेस यांचा देखील सत्कार करण्यात आला.  त्यानंतर राष्ट्रगीताने  कार्यक्रमाचा समारोप झाला.

            **

शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. ६, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार यांच्या हस्ते ‘शिवस्वराज्य’ गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा सर्व जातीधर्माला न्याय देणारी असून सर्वांमध्ये जातीय सलोखा निर्माण करणारी आहे. ही विचारधारा राज्यातील, देशातील सर्वांमध्ये एकोपा ठेवणारी आहे या विचारांशिवाय आपण राज्य, देश पुढे नेऊ शकत नाही. या थोर महापुरुषांनी जी शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे तिचे सर्वांनी सतत स्मरण करून पुढील वाटचाल केली पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.

शिवराज्याभिषेकच्या दिवशी त्याकाळी घराघरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज आनंदाचे प्रतीक म्हणून सर्वत्र गुढी उभारली जाते. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी महाराष्ट्रात, देशात पहिल्यांदाच रयतेचे राज्य सुरू झाले, ‘शिवस्वराज्य’ स्थापन झाले. मराठी साम्राज्याला पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाले. मराठी राज्य स्थापना झाल्याचा हा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,आनंदाचा दिवस आहे. 6 जून हा ‘शिवस्वराज्य दिवस ‘म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र होत आहे. असे त्यांनी सांगितले.

सन 2019-20 या काळात कोरोना सारखे संकट, आजार अचानक जगात व देशात आले त्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आपले जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले या संकटात जिल्हा परिषद मधील व त्यांच्याशी संबंधित असलेल्या  42 अधिकारी,कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला या सर्वांची आठवण राहावी म्हणून,या 42 सहकाऱ्यांची नावे असलेल्या फलकाचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. त्यानंतर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमधील कोविड योद्धा स्मारकाचे व डिजिटल प्रणालीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुरु असलेल्या हिरकणी कक्षाची उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी  पाहणी केली.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

0000

 

महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण -पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबारदि.  : महावितरण कंपनीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रमांद्वारे वीसावा वर्धापन दिन साजरा केल्याचे कौतुक करताना, विज वितरण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शहरातील सीबी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री कोकाटे बोलत होते. कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंता एस.एस. दराडे, डॉ. अभिजीत मोरे, रतन पाडवी, नरेंद्र नगराळे, मोहन शेवाळे, सिताराम पावरा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “2006 मध्ये कंपनीच्या त्रिभाजनानंतर सुरू झालेल्या या प्रवासाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. कंपनीने आपल्या कार्यक्षमतेत सातत्य राखत उत्तम सेवा दिली असून, या माध्यमातून कार्यात सुसूत्रता निर्माण झाली आहे.” वर्धापन दिनानिमित्त महावितरणकडून रक्तदान शिबिर तसेच कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, “नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील नागरिक प्रामाणिक व कष्टाळू आहेत. या भागात मनापासून काम केल्यास लोक त्याचे योग्य ते कौतुक करतात. त्यामुळे महावितरणचे अधिकारी-कर्मचारी कुठेही कमी पडणार नाही” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री ॲड. कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाचेही स्मरण केले. “आजच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘रयतेचा राजा’ म्हणून मान्यता मिळाली. राज्य सरकारने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, याच पार्श्वभूमीवर मी उपस्थित आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व महावितरण अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

00000

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन प्रशिक्षण सत्राचे आयोजन

मुंबईदि. ६ :  सागरी मत्स्यव्यवसायनौकानयनसागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचलन याविषयी प्रशिक्षण सत्राचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा येथे दि. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषे खालील प्रशिक्षणार्थींसाठी १०० रुपये आणि दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींसाठी ४५० रुपये प्रतिमहिना शुल्क आकारण्यात येते. या प्रशिक्षणासाठी दि. २० जून २०२५ रोजी पर्यंत अर्ज करता येणार आहे.

प्रशिक्षणासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे :– प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सदृढ असावात्याचे वय १८ ते ३५ दरम्यान असावेपोहता येणे आवश्यक आहे. शिक्षण किमान चौथी पास असावेमासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभवप्रशिक्षणार्थी बायोमेट्रीक कार्ड/ आधारकार्ड धारक असावाविहित नमुन्यातील अर्ज असावा व त्यासोबत मच्छिमार संस्थेची शिफारस असावी. दारिद्र्य रेषे खालील प्रशिक्षणार्थींनी त्याबाबतचे गट विकास अधिकारी यांच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

प्रशिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दि. २० जून २०२५ रोजी पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मच्छिमार संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडूरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई – ६१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी सचिन भालेरावमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी मो.नं. 9920291237 व जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशकमो.नं. 7507988552 यांच्याकडे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

VIRENDRA DHURI

मुंबईदि. ६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावेअशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस महामंडळाचे महाव्यवस्थापक (स्थापत्य) श्री.दिनेश महाजनवास्तुविषारद श्री. लहीवाल आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ‘एसटी’च्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थितीव्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात. या जागांच्या विकासासाठी अब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. ज्यामध्ये शहरीनिमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यात 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानकआगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामांबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. या कामाला गती देवून तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद मुबारक! ईद  अल – अधा (बकरी ईद) हा सण त्यागकरुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांतीसौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांनाविशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतोअसे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

 Maharashtra Governor greets people on Bakri Eid

 The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan has greeted the people on the occasion of Eid al- Adha, also known as Bakri Id. In his message, the Governor has said:

             “Eid Mubarak ! The festival of Eid al – Adha gives the message of sacrifice, compassion and charity. May the festival bring happiness, peace, harmony and prosperity to all. Wishing all, especially Muslim sisters and brothers a happy Eid Al Adha.”

0000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांची मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकस्वाती पांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणेशेतकऱ्यांना दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. याच दृष्टीकोनातून विमान वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून ग्रामीण उत्पादकांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला शहरी बाजारपेठेशी जोडणेसमन्वय साधणे यासाठी शासनस्तरावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मार्फत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच नागरी आणि खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणेहरित आणि स्मार्ट विमानतळ विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. याविषयी जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात श्रीमती पांडे यांनी माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.०० वा. प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

0000

जयश्री कोल्हे/विसंअ/

 

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दि. ६ (जिमाका): जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या, तसेच जलजीवन मिशन, सिंचन आणि विद्युतीकरणाच्या कामासंदर्भात शासन स्तरावर मंत्रालय येथे संबंधित खात्यांचे मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील जलजीवन मिशन, जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामकाज व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या कामांचा आढावा पालकमंत्री ॲड. कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

यावेळी विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम सुरू करण्याआधी सर्वप्रथम पाण्याचा स्रोत तपासावा, स्रोत नसलेल्या जागी योजना सुरू करण्याऐवजी स्रोत असलेल्या ठिकाणी योजनेचे नियोजन करावे. अपूर्ण योजनांबाबत योग्य मार्ग काढण्यावर भर द्यावा. कुठल्याही परिस्थितीत योजना अपयशी ठरता कामा नये. धडगाव तालुक्यात विहिरींना पाणी लागत नसल्यामुळे त्या ठिकाणी नर्मदेतून पाणी घेता येते का, त्याबाबतच्या पर्यायावर कार्यवाही करण्यात येईल. विद्युत पुरवठ्याअभावी पाण्याची योजना अपूर्ण असल्यास ती योजना नव्याने करून सोलरवर कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. जलजीवन योजनेचा नवीन सर्वे करताना सोलरसह करण्यात यावा. नंदुरबार जिल्ह्यासाठी सरदार सरोवर प्रकल्प व उकाई धरणातून पाणी देण्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. जलजीवन योजनेसाठी पाणी तपासून क्षारयुक्त पाणी असल्यास त्या ठिकाणी फिल्टर प्लांटचे नियोजन करावे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा

पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे, समाज कल्याण, वित्त विभाग व आरोग्य विभाग या विभागांचा तपशीलवार आढावा घेतला. दुर्गम भागात गाव वाड्यावरील अंगणवाडी मदतनीस भरती बाबत योग्य पर्याय निवडून स्थानिक महिलांची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

विद्युत वितरण कंपनीचा आढावा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आढावा घेताना पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी चालू वादळामध्ये पडलेल्या विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर यांच्या नुकसानीची माहिती घेतली. ज्या ठिकाणी खांब पडले असतील त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, तसेच शेतकऱ्यांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून देण्याबाबत संबंधित विभागास सूचना दिल्या. ज्यांचे सोलर कनेक्शन प्रतिक्षेत असतील त्यांना त्वरित सोलर कनेक्शन देण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी 398 कोटी रूपये मंजूर आहेत. त्यातील 50 कोटी प्राप्त झाले आहेत. जवळपास 400 वाड्या आणि सुमारे 30 गावांमध्ये विद्युतीकरणाची गरज आहे. त्यासाठी अजूनही काही निधी प्रतिक्षेत आहे. पुरवणी बजेटमध्ये जिल्ह्यासाठी किमान 100 कोटींची तरतूद करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार आमश्या पाडवी यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

०००

शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी  –  पालकमंत्री अतुल सावे

SPK DGIPR Mantralay Mumbai

नांदेड, दि. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवस्वराज्य दिन हे नव्या पिढीला प्रेरणा व नवचैतन्य देणारे स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली, शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सुशासनाचा आदर्श आजही प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी दिशादर्शक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श घेत जिल्हा परिषद ग्रामीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्रांगणात उभारलेल्या दोन गाळ्यांची चावी तिरंगा महिला प्रभाग संघाकडे सुपूर्द करण्यात आली. या गाळ्यांमध्ये महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून दुसऱ्या गाळ्यात कॅन्टीन चालवले जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने खिचडी, मसाला दूध व जिलेबीचे वाटप करण्यात आले. शाहीर रमेश गिरी व त्यांच्या संचाने शिवचरित्रावर आधारित पोवाडा व गीत सादर करून वातावरण शिवमय केले. सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी केले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...