रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1690

शाश्वत विकासासाठी आदिवासींच्या क्षमता अभ्यासा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि.24 : आदिवासी घटकांमधे खुप क्षमता आहेत त्यांचा वापर करून शाश्वत विकास साधण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे कुलगुरूंना दिल्या. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरूंच्या संमेलनात राज्यपाल बोलत होते. उपस्थित महाराष्ट्र व छत्तीसगड मधील कुलगरूंना राज्यपाल म्हणाले की, आपण या ठिकाणी आदिवासींसाठी विचारमंथन करत आहात, ही आनंदाची बाब आहे. तुम्ही देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या ज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासात योगदान द्यावे. आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण योगदान देत असताना,  आदिवासींची संस्कृती, परंपरा जपत त्यांना नव्या प्रवाहात येण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या कामांची प्रशंसा केली. आदिवासी आणि शिक्षणाचे महत्व सांगितले. व्यासपीठावर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डॉ.गजानन डांगे उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिवसभरातील विचारमंथनातून तयार केलेल्या श्वेतपत्रिकेचे अनावरण केले.

श्वेतपत्रिकेबाबत कुलगुरू बोकारे यांनी माहिती सादर केली. ते म्हणाले, आदिवासींचे हक्क आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी त्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या अर्थचक्रासाठी परंपरागत वनोपज गोळा करणे, प्रकिया करणे, उद्योग उभारणी करणे, तेथील झाडीपट्टी नाट्य व्यवसायाची नोंद घेणे. त्यांना आवश्यक ज्ञान देण्याची व प्रत्यक्ष माहिती गोळा करून संशोधन अहवाल व अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. या श्वेतपत्रिकेत शाश्वत विकासासाठी अनेक मुद्दयांचा समावेश करण्यात आला आहे. या संमेलनात पुणे मुंबईसह मराठवाडा, नाशिक तसेच बिलासपूर येथील विद्यापीठ कुलगुरू व प्राध्यापकांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक डॉ.गजानन डांगे यांनी केले. संचलन डॉ.श्याम कोरेटी यांनी तर आभार प्रदर्शन प्र-कुलगरू डॉ.संजय दुधे यांनी केले.

000

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर संपन्न

मुंबई, दि.24 : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड, साने गुरूजी  येथे आज बालकांसाठी मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये बालकांची दंत तपासणी आणि उपचार तसेच वैद्कीय तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरासाठी मोठ्या प्रमाणत बालके उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा उपस्थित होत्या.

नाताळ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो.  हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

000

Governor Koshyari greets people on Christmas

 

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended his Christmas and New Year greetings to the people.

In a message, the Governor has said

“The festival of Christmas reminds us of the noble life of Jesus Christ so full of love, courage, compassion and forgiveness. May the festival bring happiness, contentment, peace and prosperity to all. I extend my heartiest greetings and good wishes to the people on the occasion of Christmas and the New Year.”

 

सीमावर्ती भागातील प्रश्न सोडविण्यासाठी परस्पर समन्वय व्यापक व दृढ करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा चांगला परस्पर समन्वय आहे. तो दृढ व व्यापक करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे झाली. यावेळी दोन्ही राज्यांचे राज्यपाल व सीमावर्ती जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलडाणा व मध्यप्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा, सिवनी, बैतूल, बुऱ्हानपूर, खांडवा आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, दोन्ही राज्यांतील सीमावर्ती भागातील प्रश्न सौहार्दपूर्वक व सामंजस्याने सोडवावेत. त्यासाठी सातत्यपूर्ण परस्पर समन्वय ठेवावा. पूरस्थिती व सिंचन प्रकल्पासंबधीचे प्रश्न स्थानिक स्तरावर उपाययोजना आखून समन्वयाने सोडवावेत. स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या नोंदी विशेष ॲप तयार करून नियमित घ्याव्यात जेणेकरुन त्यांची माहिती दोन्ही राज्यातील प्रशासनाला मिळून त्यांना विविध योजनांचा लाभ देता येणे शक्य होईल. दोन्ही राज्यांनी सीमावर्ती जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

अवैध गोवंश वाहतूक, अवैध मानवी वाहतूक, बेकायदेशीर खनिज उत्खनन, अवैध शस्त्रे, गुटखा, दारुविक्री, मादक पदार्थ यांना पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा व्यवस्था पुरेसे मनुष्यबळ ठेवून सुसज्ज करावी. तसेच तिथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून चोख निगराणी ठेवावी. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलीस विभागाने संयुक्त अभियान राबवावे, असे निर्देश राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दिले.

मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री. पटेल म्हणाले की, सीमावर्ती जिल्ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्हीकडच्या प्रशासनात परस्पर चर्चा आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या समस्या राज्य स्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे त्याबाबत राज्य शासनाला सूचित करण्यात येईल. ही समन्वय बैठक पुढील काळात निश्चित लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपत्तीच्या काळात तसेच पूरस्थिती आदींबाबत पूर्वसूचना संबंधित जिल्ह्यांना परस्परांकडून वेळेत मिळणे आवश्यक आहे. तशी समन्वय यंत्रणा प्रत्येक जिल्ह्याने कार्यान्वित करावी. सारस पक्षी संवर्धन उपक्रमासारखे काही महत्वपूर्ण प्रकल्प दोन्हीकडे राबविता येणार असल्याने तशी माहिती संबंधित जिल्ह्यांना कळवावी, अशीही सूचना त्यांनी केली.

मध्यप्रदेश येथील राज्यपालांचे प्रधान सचिव डी.बी. आहुजा, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, नागपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे अमरावती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या बैलगाडीची प्रतिकृती दोन्ही राज्यपालांना भेट देण्यात आली. प्रबोधिनीचे सहाय्यक प्राध्यापक पंकज शिरभाते यांनी सूत्रसंचालन केले.

000

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. चहांदे ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ

नागपूर, दि. 24 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. चहांदे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, नितीन करीर, राजेश कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्या श्वेताली ठाकरे, डॉ. साधना महाशब्दे, प्राधिकरणचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, सचिव रंजनकुमार शहा, राजेंद्र मोहिते, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष पाटील, गोसीखुर्दचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के, पद्माकर पाटील, राजीवकुमार पराते, कन्नाजीराव वेमुलकोंडा उपस्थित होते.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. चहांदे यांना शपथ दिली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. संजय चहांदे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून 1988 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून एम.एस्सी केले आहे. अमेरिकेतून त्यांनी लोकप्रशासन ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आपल्या 34 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत. नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेस प्रारंभ,  मुंबई शहर व उपनगर येथे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त, यशदा पुणे येथे महासंचालक, महिला व बालविकास विभागाचे सचिव, मुख्यमंत्री कार्यालयात सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा विभागाचे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच केंद्रीय सेवेत असतांना आधारकार्ड प्रकल्पाचे उपमहासंचालक म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे.

000

जी२० बैठकीनिमित्त नागपूरचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व  प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, महानगरपालिका,सुधारप्रन्यास व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूर्वतयारीचा आढावा सादर केला. विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी प्राधान्याने सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगती पथावर असणारी कामे, प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा तलाव अशा प्रेक्षणीय  ठिकाणी पोहोचणाऱ्या रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा. मुंबई प्रमाणे उत्तम व दर्जेदार सुशोभीकरण करण्यात यावे. देशाच्या यजमान पदाला साजेशी उत्तम दर्जाची कामे करावी. स्थानिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या इमारती यांची भव्यता व आकर्षकता प्रतिबिंबीत झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

या बैठकीला उपस्थित प्रधान सचिव दीपक कपूर यांनीही मिहान व अन्य महत्वाच्या प्रकल्पांची माहिती बैठकांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे सादर व्हावी, अशा सूचना केल्या. या निमित्ताने दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे.आयोजनाची प्रसिद्धीही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

000

सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु एस.आर. चौधरी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, विद्यापीठाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरु एस.आर. चौधरी यांनी सादरीकरणातून पूर्वतयारीची माहिती दिली. दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. देशातील 7 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र अशा विविध 14 शाखांमधील नवनवीन शोध प्रबंध, प्रदर्शन, मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ विज्ञानस्नेही  विद्यार्थ्यांना होईल.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी यंत्रणा उभारा. राज्यातील अन्य ठिकाणावरूनही सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा. बाहेरुन येणाऱ्या प्रतिनिधींच्या निवास, प्रवासाची उत्तम व्यवस्था ठेवा. विदेशातून येणाऱ्या शास्रज्ञांच्या निवास व्यवस्थेबाबत विशेष काळजी घ्या, अशी सुचना त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की,   यंदा विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा प्रमुख कार्यक्रम समजून उत्तम प्रसिद्धी करा. या आयोजनाचे यजमान पद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राने विज्ञान, तंत्रज्ञान व सर्व क्षेत्रातील प्रगतीची भरारी प्रतिबिंबीत व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.                           

000

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर, दि.२३ :हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करण्‍याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली. या मागणीबाबत मुख्‍यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबतचे निवेदन सादर केले व चर्चा केली. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासीबहुल, वनव्‍याप्‍त जिल्‍हा असून ताडोबा सारख्‍या राष्‍ट्रीय उद्यानाला देशविदेशातुन पर्यटक भेट देण्‍यास येत असतात. हा जिल्‍हा विविध खनिजांनी समृध्‍द असून जिल्‍ह्याची अर्थव्‍यवस्‍था विद्युतनिर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्‍यामुळे राज्‍याच्‍या या भागातील वाहनांना देखील समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकरिता सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्‍ध होऊ शकेल.दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजीच्‍या पत्रान्‍वये नागपूर मुंबई सुपर कम्‍युनिकेशन एक्‍सप्रेसवे लिमिटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृध्‍दी महामार्गाचा नागपूर ते चंद्रपूर-राजुरा पर्यंत विस्‍तार करण्‍यासाठी सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल तयार करण्‍यासाठी व भूसंपादन करण्‍यासाठी अंदाजे २० कोटी रू. निधी महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाला उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती श्री. मुनगंटीवार यांनी केली होती. अद्याप त्‍यांच्‍या सदर विनंतीला मान्‍यता मिळालेली नाही. याबाबत मुख्‍यमंत्र्यांनी स्‍वतः लक्ष घालुन या अहवालाला मान्‍यता देण्‍याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

0000000

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

अमरावती, दि. 23 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया, 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील .

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची मुलाखत

मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 26, मंगळवार दिनांक 27 व बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले, 45 वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा 100 हून अधिक कलाकृती हाताळलेले, विविध पुरस्कारांनी सन्मानित, कलाकार घडविणारे नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने लिहिण्याची कारणे, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर विस्तृत माहिती संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

ताज्या बातम्या

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि.३ : महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक...

‘संपूर्णता’ अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी सन्मानीत

0
चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...