रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1691

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा

मुंबई, दि. 23 : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. श्री. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग श्रीमती प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न  व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात,  सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पद्धतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र,  अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.

भेटी दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन,यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

​सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई श्री. केकरे, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

000

कामगारांसाठी सुधारित वेतनदर जाहीर

मुंबई, दि. 23 : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी  ‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २१ नोव्हेंबर २०२२ ते 31 डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता तसेच २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा’ या उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २३ नोव्हेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता ९ डिसेंबर २०२२ रोजी विशेष भत्ता दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा” या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६२०/- + ८५८/- = १७,४७८/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,१५०/- + ८५८/- = १६,००८/-

३) अकुशल कामगार : १४,०९५/- + ८५८/- = १४,९५३/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,७८०/- + ८५८/- = १६,६३८/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,३१०/- + ८५८/- = १५,१६८/-

३) अकुशल कामगार : १३,२५५/- + ८५८/- = १४,११३/-

औषधी द्रव्य व औषध बनविणारा उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६०५/- + ३७२/- = १६,९७७/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,१८५/- + ३७२/- = १५,५५७/-

३) अकुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,०००/- + ३७२/- = १६,३७२/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,५८०/- + ३७२/- = १४,९५२/-

३) अकुशल कामगार : १३,५६५/- + ३७२/- = १३,९३७/-

परिमंडळ ३ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,५९०/- + ३७२/- = १५,९६२/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-

३) अकुशल कामगार : १३,१५५/- + ३७२/- = १३,५२७/-

अभियांत्रिकी उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने याअधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,४५०/- + ३७२/- = १६,८२२/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,०२५/- + ३७२/- = १५,३९७/-

३) अकुशल कामगार : १४,०१०/- + ३७२/- = १४,३८२/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना)= एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,०४५/- + ३७२/- = १६,४१७/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,६२०/- + ३७२/- = १४,९९२/-

३) अकुशल कामगार : १३,६०५/- + ३७२/- = १३,९७७/-

परिमंडळ ३ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १५,२२५/- + ३७२/- = १५,५९७/-

२) अर्ध कुशल कामगार : १३,८०५/- + ३७२/- = १४,१७७/-

३) अकुशल कामगार : १२,७९५/- + ३७२/- = १३,१६७/-

000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा

नागपूर, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्राहकहित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ग्राहक हाच कोणत्याही बाजारपेठेचा कणा असतो, त्याचे हित हेच सर्वतोपरी असते. ग्राहकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनासोबतच या क्षेत्रात कार्यरत सर्व अशासकीय संस्था आणि व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे आहे. तसेच एक विकसित राज्य आणि राष्ट्र उभारणीत जागरूक ग्राहकाचे महत्त्व सर्वात अधिक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात पुढे म्हटले आहे की, जागतिकीकरणामुळे आता संपूर्ण जगच बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना निवडीची संधी प्राप्त झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा जसा ग्राहकांना होत आहे, तसेच या तंत्रज्ञानाचा वापर करून काही कुप्रवृत्तीच्या लोकांकडून ग्राहकांची फसवणूकही होत आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाचा ग्राहक संरक्षण विभाग सातत्याने सतर्क असून सक्रियपणे कार्यरत आहे. त्याला समाजातील विविध सामाजिक अशासकीय संस्थांचे मिळत असलेले बळही महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक चळवळीत सातत्याने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा.

000

कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 23 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी भागातील मुलामुलींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. विद्यापीठाने कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. अशा सूचना राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या.

आज राजभवनातील सभागृहात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रश्नाबाबत आयोजित आढावा सभेत श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती शैला ए., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक शैलेश देवळाणकर व शिक्षण विभागाच्या उपसचिव प्राची जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, विद्यापीठासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी अधिसूचना काढण्यात यावी. विद्यापीठासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येईल, त्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोबदला देण्यात यावा. त्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना या विद्यापीठात चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच स्थानिकांना विद्यापीठात काही प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण येथूनच मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 श्री. मुनगंटीवार म्हणाले, गोंडवाना विद्यापीठासाठी लागणारी जमीन अधिग्रहित करण्यात यावी. त्यासाठी शासन नियमाप्रमाणे मोबदला देता येईल. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उत्तुंग भरारी घेताना त्यांना अडचणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यापीठासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीची भूसंपादन प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी क्षेत्रातील विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यामुळे दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास मदत होईल.नाविन्यपूर्ण शैक्षणिक सुविधा गोंडवाना विद्यापीठात निर्माण झाल्या पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार डॉ. होळी म्हणाले, विद्यापीठाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देताना त्यांच्या मुलांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा.

श्री. रस्तोगी म्हणाले, देशातील वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या इतर विद्यापीठात कशाप्रकारच्या शैक्षणिक सुविधा व दर्जा देण्यात आला आहे, हे बघून त्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठासाठी काम करण्यात येईल.

श्री. मीणा यांनी गोंडवाना विद्यापीठासाठी उपलब्ध असलेली जमीन आणि संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीबाबतची माहिती नकाशाच्या माध्यमातून राज्यपालांना यावेळी दिली.

डॉ. श्री. बोकारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात विविध कौशल्यविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. काही अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात येतील. सध्या 17 एकर  जागेवर विद्यापीठाचा परिसर आणि इमारती आहे. विद्यापीठाला आणखी 100 एकर जमीन आता उपलब्ध झाली आहे. ज्या जमिनीची विद्यापीठाला आवश्यकता आहे, ती जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादनासाठी लागणारा निधी उपलब्ध होणार आहे. दहावी आणि बारावीनंतर शिक्षण प्रवाहात नसलेल्या मुलांना विद्यापीठ कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे प्रस्तावित असल्याचे सांगून विद्यापीठाविषयी इतर माहिती त्यांनी यावेळी दिली.

000000

पाणी पुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री गुलाबराव पाटील

चंद्रपूर,दि.२३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यांना ३०० कोटी रुपये मिळाले असून या क्षेत्रातील ९० टक्के गावे नळजोडणीद्वारे जोडली गेली आहेत. या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत शंकरपूर येथे चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यातील ३०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, अधीक्षक अभियंता प्रशांत बुरडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ओमराज हेडाऊ, कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन अभियानामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग आहे. ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या अभियानांतर्गत ३२ हजार गावांचे डिपीआर तयार करण्याचे कार्य केले. पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सर्वात मोठे काम या क्षेत्रात झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नळ योजनेतून ४० लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होत होता, आता ५५ लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होणार आहे. विज बिलाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना सोलर प्रणालीवर कार्यान्वित करण्यात आल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून घरपोच पिण्याचे पाणी मिळत असल्याने महिलांचा त्रास कमी झाला असून पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. जलजीवन मिशन योजनेतंर्गत या क्षेत्रात चांगले काम करा, निकृष्ठ कामे केल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आमदार श्री. भांगडीया म्हणाले की, केंद्र सरकार जल जीवन मिशन देशात राबवित आहे. देशात व राज्यभरात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. हर घर नल से जल या योजनेच्या माध्यमातून महिलांचा त्रास कमी होणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुमारे ३००  कोटी रु. निधी या क्षेत्रासाठी मिळवून दिला आहे. जलजीवन मिशन अतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा सर्वप्रथम व सर्वाधिक लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला मिळाला आहे. तत्पुर्वी, मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पार पडले.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी प्रास्ताविक केले.

किशोर गलांडे यांनी सूत्रसंचालन केले तर राजू देवतळे यांनी आभार मानले.

 

000

 

आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. २३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल,  माजी मंत्री रमेश बागवे, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार  देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आमदार मुक्ता टिळक यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक म्हणून काम केले. नगरसेवक असतांना सभागृह नेता,स्थायी समितीवरही काम केले. पुणे महानगर पालिकेत २०१७ मध्ये त्यांनी पुणे शहराच्या महापौर पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. लोकमान्य टिळकांचा विचार त्या स्वतः जगत होत्या. सामाजिक कार्यात योगदान देताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी संघर्षही केला.  संघटनेचा आदेश कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका कशी पार पाडावी हे   राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी मुक्ताताईनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. टिळक कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, असे ते म्हणाले.

आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे, दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री.फडणवीस म्हणाले की, आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत दु:खाचा दिवस आहे. पुण्याच्या संपुर्ण सामाजिक-राजकीय पटलावर अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून मुक्ताताईंचा परिचय आहे. त्या नगरसेविका, महापौर आणि आमदार म्हणून जनतेशी जोडल्या गेल्या होत्या. टिळक घराण्याचा वारसा समर्थपणे सांभाळत होत्या. गेली तीस वर्षे भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून स्वत:च्या मेहनतीने आणि जनसंपर्काच्या बळावर सामान्य कार्यकर्तीपासून वेगवेगळ्या पदापर्यंत त्या पोहोचल्या.

मुक्ताताई कल्पक होत्या, चांगल्या वक्त्या होत्या. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या वेळी प्रकृती बरी नसतानाही त्या मतदान करायला आल्या. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रवास न करण्याची विनंती केली होती. मात्र, पक्षासाठी अशा स्थितीतही येऊन त्यांनी मतदान केले. असे समर्पित नेतृत्व, कार्यकर्ता निघून जाणे ही पक्षाची आणि समाजाची न भरून निघणारी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट यांची भेट

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. खासदार बापट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकर बरे होऊन घरी परततील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

000

संसदीय अभ्यासवर्गात रविवारी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले यांचे मार्गदर्शन

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ‘कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादीबाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनाद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/23.12.22

संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे मार्गदर्शन

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/23.12.22

 

 

विधानपरिषदेत दिवंगत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. 23 : विधानसभेच्या सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत मुक्ता शैलेश टिळक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६५ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. (मानसशास्त्र), डी. बी. एम., डी. एम. एम. पर्यंत झाले होते. दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विचार मंचच्या विश्वस्त म्हणून कार्य केले. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या उपाध्यक्षा, पुणे येथील प्रेरणा महिला मंडळाच्या संस्थापिका तसेच दृष्टी महिला विचार मंचच्या कार्यकारिणी सदस्या म्हणूनही उत्तम कार्य केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या.

दिवंगत टिळक या भारतीय जनता पक्ष पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत होत्या. सन २००२ ते २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या सदस्या, तसेच सन २०१७ ते २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या महापौर होत्या. त्या सन २०१९ मध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. त्यांनी गौरवशाली काम केले होते, असेही डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्तावात म्हटले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

ताज्या बातम्या

‘संपूर्णता’ अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी सन्मानीत

0
चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...