रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1692

रेडक्रॉस सोसायटीमध्ये लोकांचा सहभाग वाढवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. २३ : देशात परोपकाराची भावना आजही कायम आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना मदत करण्यात येते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. कोश्यारी बोलत होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंगल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराचे अध्यक्ष डॉ. अशोक ब्राह्मणकर, उपाध्यक्ष डॉ. चंद्रमणी गुप्ता व सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामे करण्यात येतात. प्रत्येक व्यक्ती जागरूक झाला तर आपण आपल्या परिसरातील समस्यांवर मात करू शकतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

राज्यपालांच्या हस्ते डॉ. चंद्रमोहन गुप्ता यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ८१ वेळा रक्तदान करणारे प्रीतम राजाभोज, ४०० आजीवन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य करणारे ललित थानथराटे, २४ पदव्या प्राप्त करणारे ॲड. डॉ. सौरभ गुप्ता यांना देखील सन्मानित केले.

डॉ. ब्राह्मणकर यांनी प्रास्ताविकातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडारा राबवित असलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराचे हेमंत चंदावस्कर, डॉ. नितीन तुरस्कर, दिनेश पंचबुद्धे, प्रीतम राजाभोज, राजीव खवसकर, डॉ. निलेश गुप्ता, अमित वसानी, हनुमानदास अग्रवाल, किशोर चौधरी, रतन कळंबे, दीपक व्यवहारे, वासुदेव निर्वाण, डॉ. विशाखा गुप्ते, मीरा भट्ट, सुचिता गुप्ता व सुनीता गुप्ता यांची उपस्थिती होती.

000

विधानपरिषद लक्षवेधी

मौजा उदापूर येथील पुनर्वसनाच्या अनुषंगाने संयुक्त समिती गठित करणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर दि. 23 : यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी – डोल्हारी प्रकल्पांतर्गत मौजा उदापूर येथील पुनर्वसनाच्या अनुषंगाने संयुक्त समिती गठित करण्यात येणार असून समितीला दोन महिन्याच्या कालावधीत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

टाकळी-डोल्हारी प्रकल्पांतर्गत मौजा उदापूर, ता. नेर, जि. यवतमाळ येथील गावकऱ्यांची दिशाभूल करून, बेकायदेशीरपणे राबविण्यात आलेली पुनर्वसन प्रक्रिया रद्द करण्याबाबतची मागणी स्थानिक नागरिकांनी शासनाकडे केली होती. या अनुषंगाने सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, मौजा उदापूर येथील प्रकल्पग्रसतांचे पुनर्वसन हे पुनर्वसन आराखड्यानुसार सुरु आहे. त्यानुसार गावठाण निश्चित झालेले आहे. या गावाची ग्रामसभा अवैध असल्याने सदर पुनर्वसनाबाबत जिल्हा नियोजन व विकास मंडळ समितीच्या अभिप्रायार्थ पाठविण्याचे निर्देश शासनाने निर्देश दिले होते. या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी गठित समितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी  आणि प्रकल्प अभियंता असतील.

समितीचा अहवाल आल्यानंतर एक विशेष बैठक घेण्यात येऊन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी, निलय नाईक यांनी सहभाग घेतला.

0000

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसाठी लवकरच विस्तृत धोरण– मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि.२३ : सीना कोळेगाव प्रकल्पातील बऱ्याच खातेधारकांनी नियमानुसार ६५ टक्के रक्कम भरली नाही. त्यामुळे आता या खातेधारकांना ही रक्कम भरण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास तयार झालेला सध्याचा आराखडा विस्कळीत होईल, त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी एक सर्वंकष विस्तृत धोरण ठरवून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

सीना कोळेगाव प्रकल्पासंदर्भात विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना जमिनी खरेदी करून गावठाणास द्यावी लागल्यास ती देण्यात येईल.  त्याचबरोबर जमिनीचे वाटप करताना सर्व प्रकल्पग्रस्तांची एकत्रित बैठक घेऊन एकाच कुटुंबातील सदस्यांना जवळपास जमीन, प्लॉट देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.देसाई यांनी उत्तरादरम्यान सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेच विधानपरिषद सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही सहभाग घेतला.

000

‘आनंदाचा शिधा’चा ९७ टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत माहिती

नागपूर, दि.23 : कोरोना काळात गरिबांची आर्थिक स्थिती खालावली होती. दिवाळीमध्ये त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आनंदाचा शिधा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, दिवाळीच्या तोंडावर गरिबांना चणाडाळ, साखर, रवा आणि पामतेल एक किलोप्रमाणे पोहोचवण्यासाठी त्वरित ई-लिलाव प्रक्रिया राबविली. यामध्ये 9 अर्जापैकी 6 संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने ई-लिलावात भाग घेतला होता. ही प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्ष पार पाडली. यामध्ये कोणतीही अनियमितता झाली नाही. त्यावेळी असलेल्या बाजारभावानेच चारही पदार्थ संस्थेने खरेदी केले. अत्यावश्यक बाब असल्याने NeML या पोर्टलच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया पार पाडली आहे.

राज्य शासनाने दिवाळीमध्ये गरिबांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून हा प्रयोग नवीन असला तरी यशस्वी झाला आहे. कंत्राटदारांना एक आठवडा शिधा पोहोचविण्यास उशीर झाल्यास निविदेच्या एक टक्का तर दोन आठवडे उशीर झाल्यास तीन टक्के दंड आकारला आहे. यातून सहा कोटी 51 लाख 805 रुपये दंड वसूल केला असून धान्य देण्याची प्रक्रिया ऑनलाईन न करता केवळ नोंद घेऊन करण्यात आल्याची माहितीही श्री.चव्हाण यांनी दिली.

ज्याठिकाणी जादा दराने वाटप झाले आहे, तिथे गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत एक कोटी 55 लाख 43 हजार 44 गरीब  कुटुंबाना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले असून उर्वरित वाटप ज्यांना मिळाले नसेल त्यांना वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ॲड. मनीषा कायंदे, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे यांनी सहभाग घेतला.

००००

 

मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्त्याचे वाटप

 उर्वरित निर्वाह भत्ता लवकरच देणार – मंत्री संजय राठोड

नागपूर, दि.२३ : राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी शासकीय वसतिगृहातील समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री.राठोड बोलत होते.

मंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, राज्यात मागासवर्गीय मुलामुलींचे ४४१ शासकीय वसतिगृहे असून मान्य विद्यार्थी संख्या ४३ हजार ३५८ इतकी आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात येतात. सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या पुरुष आणि महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी “संवाद” उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमामध्ये काही वसतिगृहातील गृहपालांविरुद्ध अनेक बाबी निदर्शनास आल्या. अशा गृहपालांना कारणे दाखवा नोटाला बजावून दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे, असे मंत्री श्री. राठोड यांनी उत्तरात सांगितले.

वसतिगृहामध्ये फर्निचर साहित्य पुरवठ्यासाठी ५९ कोटी

राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा आणि साहित्य पुरविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाला ५९ कोटी ४३ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून वसतिगृहात लोखंडी कॉट, ड्युअल डेस्क, साग टेबल, कपाट आदी फर्निचर साहित्य पुरवठा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री श्री. राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.

मागासवर्गीय वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी वर्ग

राज्यातील ३१ शासकीय वसतिगृहांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण ७ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आली असून दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे, असेही श्री. राठोड यांनी सांगितले.

वसतिगृहातील विनाप्रवेशित विद्यार्थ्यांबाबत चौकशी

शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश नसलेले आणि वर्षानुवर्षे वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. वसतिगृमध्ये विनाप्रवेशित विद्यार्थी राहत असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांची इतरत्र राहण्याची सोय करण्याच्या सूचना देखील देण्यात येईल, असे मंत्री श्री. राठोड यांनी उत्तरात सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.

०००००

चारचाकी वाहनांची प्रवासी नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता करण्याचे निर्देश – मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती 

नागपूर, दि.२३ : नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची प्रवासी नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सचिन अहिर यांनी नाशिक औरंगाबाद मार्गावरील अपघाताबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

श्री. देसाई यांनी सांगितले की, खाजगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू ही बाब गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वाहन परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत कडक धोरण राबविणार असून भरारी पथकांची क्षमता वाढ करण्यात येईल. भरारी पथक अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून पथकाला लक्षांक देऊन वाहने तपासण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख केली जाईल.

वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये सक्तीचे

प्रवाशांच्या सुरक्षेची आणि महामार्गवरील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी करण्यासाठी 24 तास विशेष तपासणी मोहीम चालू करणार आहे. वाहन सुस्थितीत असल्याचे वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यासाठी नियमावली तयार केली जाईल. हे प्रमाणपत्र लावण्यासाठी सक्तीचे केले जाईल. ऑक्टोबर 2022 मध्ये विशेष मोहिमेतर्गत वाहनांची तपासणी केली असता 3885 वाहनामध्ये विविध दोष आढळले आहेत, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

परिवहनमध्ये नवीन बसबाबत निर्णय घेतला जाईल

परिवहन विभागात साडेपाच हजार वाहने नवीन घेण्यात आली आहेत. काही डिझेलवरील वाहने सीएनजीवर केली आहेत. तसेच जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या एसटी बस नवीन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विविध सुट्टीच्या कालावधीत खाजगी बसला दीडपट दरवाढ करण्यास मान्यता आहे. मात्र यापेक्षाही जादा दर खाजगी बस घेत असतील तर उपप्रादेशिक परिवहन कारवाई करतील, असेही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

००००

 

 

विधानसभा लक्षवेधी

मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार – मंत्री उदय सामंत

नागपूर दि 23 : इस्माईल युसुफ महाविद्यालय ते पंप हाऊस, बिंबिसार नगर ते आरे चेक नाका जंक्शन, ओबेराय मॉल रस्ता जंक्शन ते आरे चेक नाका जंक्शन या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागपूर अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणा यांची बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, इस्माईल महाविद्यालय ते पंप हाऊसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या कामाकरिता मे.करगवाल कन्स्ट्रक्शन यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी कार्यादेश दिले असून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.

या सर्विस रोडचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्यासाठी शासनाच्या वतीने कारवाई केली जाईल, तसेच बायपासचे काम चांगल्या प्रकारे होईल या दृष्टीने प्रयत्न करणार. मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीसंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या जातील. तसेच अनधिकृत बांधकामाच्या बाबत वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ओबेरॉय जंक्शन ते आरे चेक नाका यादरम्यान सर्वोदय नगर येथील सेवा रस्त्यावर बेकायदेशीर उभ्या असणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यावर मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर वाहतूक विभागामार्फत गस्त करण्यात येत असून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

0000

प्रवीण भुरके/ससं/

अनुसूचित जमातीची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करणार – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 23 : अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रिक्त झालेल्या तीन हजार 898 जागांवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या पदांची भरती प्रक्रिया जुलै 2023 पर्यंत, तर गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

अनुसूचित जमाती संवर्गातील ज्या – ज्या कर्मचाऱ्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, किंवा ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे, अशा कर्मचाऱ्यांबाबत सदस्य सर्वश्री विनोद निकोले, डॉ. किरण लहामटे यांच्यासह अन्य सदस्यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले, की नाम साधर्म्य यामुळे दिलेले दाखले जात प्रमाणपत्र पडताळणी निकषात अवैध ठरले आहेत. त्यामुळे 3 हजार 898 जागा रिक्त करण्यात आल्या आहेत. तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भरावयाच्या 75 हजार जागांमध्ये आरक्षणाप्रमाणे अनुसूचित जमातीच्या जागा भरण्यात येतील. त्यामुळे नोकरीपासून वंचित राहिलेल्या मूळ आदिवासी बांधवांना 100 टक्के न्याय देण्यात येईल. याशिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून पडताळणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आले आहे. त्यांना अनुकंपा किंवा पदोन्नतीचा लाभ देण्यात येत नाही, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

अल्पसंख्याकांसाठीचा निधी अखर्चित राहणार नाही – मंत्री अब्दुल सत्तार

रिक्त पदभरती प्रकिया राबविणार

नागपूर, दि. 23 : अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल तसेच रिक्त पदभरतीसंदर्भात तात्काळ कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सत्तार बोलत होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागाच्या अंतर्गत असलेले मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात तीन महिन्यात कार्यवाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, अशीही माहिती मंत्री श्री.सत्तार यांनी दिली.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य अबू आझमी, आमिन पटेल, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य- उदय सामंत

नागपूर, दि. 23 : पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत कामे सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनील कांबळे यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

ते म्हणाले की, पुणे शहर हे भौगोलिकदृष्ट्या उंच व सखल भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जादा दाबाने व जादा वेळेसाठी पाणी उपलब्ध आहे व काही भागामध्ये अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या अनुषंगाने  पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना २४x७ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने  टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेचे पुनरूत्थान करणे, पंपिंग स्टेशन्स बांधणे तसेच नागरिकांच्या नळजोडांवर एएमआर मीटर्स बसविणे आदी बाबींचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प राबविण्याकरिता पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याकरिता एक निविदा, मुख्य      दाब नलिका टाकण्याकरिता एक निविदा व शहराच्या जलशुध्दीकरण केंद्रनिहाय पाच निविदा, अशी ७ निविदांची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या निविदांपैकी पाण्याच्या ८२ साठवण टाक्यांपैकी आज अखेर ४२ टाक्यांची कामे पूर्ण झालेली असून २२ टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून, टप्प्याटप्प्याने माहे सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

याशिवाय, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची निविदा मान्य झाली असून कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने एकूण ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे बांधणे (एकूण क्षमता ३९६ एम.एल.डी.) व ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकणे प्रस्तावित आहेत. या ११ मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पांपैकी नायडू हॉस्पिटल (१२७ एम.एल.डी.), भैरोबा (७५ एम.एल.डी.), धानोरी (३३ एम.एल.डी.), वडगाव (२६ एम.एल.डी.) या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांची कामे जागेवर सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम विहित मुदतीत मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून योजना कार्यान्वित झाल्यानंतर नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

लक्षवेधीवरील या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

न्यायालयीन आदेशाचा आदर राखून पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर दिनांक २३:  पवना  प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, या संदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. देसाई यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले, पवना प्रकल्प १९६५ पूर्वीचा आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियमातील तरतूद लागू नाहीत. पवना प्रकल्प हा जलकुंभ असल्याने या प्रकल्पास स्वत:चे लाभक्षेत्र नाही. या प्रकल्पामधील एकूण १२०३ प्रकल्पग्रस्तांपैकी ३४० प्रकल्पग्रस्तांना सन १९७४ दरम्यान मावळ व खेड तालुक्यात पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आले.  त्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. या याचिकेमध्ये नमूद ८६३ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करावयाचे शिल्लक आहे.  या ८६३ प्रकल्पग्रस्तांची यादी संबंधित २३ गावांमध्ये प्रसिद्धही करण्यात आली होती. तद्नंतर एकूण ५६७ प्रकल्पग्रस्तांनी तहसिल कार्यालय, मावळ येथे हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. या प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून प्रत्येकी १ एकर जमीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांनी अधिक जमीन मागणीसाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिला. त्यामुळे पर्यायी जमिन वाटपाची कार्यवाही करता आली नाही, अशी माहिती मंत्री श्री.देसाई यांनी सभागृहात दिली.

याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून काही मार्ग काढता येईल का याचाही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री. श्री.देसाई यांनी सांगितले.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य राम कदम यांनी सहभाग घेतला.

0000

जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 23 : जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 27 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांबाबत लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. त्यांनी सांगितले की, 11 मे 2017 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अमृत योजनेतील व मलनि:स्सारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे हाती घेण्यात येऊ नये, असे नमूद आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 49 रस्त्यांच्या पुर्नबांधणी करिता 38.28 कोटी रुपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या कामांचे कार्यादेश महानगरपालिकेतर्फे निर्गमित करून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी शासनाकडून 18.93 कोटी व महानगरपालिकेच्या हिश्श्यातील 5.10 कोटी रुपये याप्रमाणे पहिला हप्ता सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील अमृत योजना भुयारी गटार योजनेची कामे पूर्णत्वास येत आहेत.      त्या भागातील रस्त्यांच्या पुर्नबांधणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या इतर योजनेतून तसेच महानगरपालिकेच्या निधीतून देखील काही भागातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. काही भागातील रस्त्यांची डागडुजी  करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले

०००००

 

जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादाद्वारे समाजाचा विकास – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

नागपूर, दि. 23 : लोकशाहीत लोकप्रतिनिधीबद्दल लोकांच्या मनात पुरेसा विश्वास असेल तरच जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संवाद टिकून राहू शकतो आणि त्यातून संपूर्ण समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष श्री झिरवाळ म्हणाले, लोकप्रतिनिधींना मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते म्हणजे सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधित्व करुन त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवून एकप्रकारे त्यांची सेवा करीत असतात. गावचा सरपंचसुद्धा गावाचा चांगला विकास करु शकतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विविध विषयांचा सतत अभ्यास केला पाहिजे.

लोकशाहीत शिक्षण हा महत्त्वाचा असा भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे. आदिवासी बांधवांचीही शैक्षणिक प्रगती सुरु आहे. आदिवासी भागातील पाणीसाठे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे स्थलांतर थांबविले जाऊ शकते. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकांनी पाणी प्रश्नावर अभ्यास करुन चळवळ उभी करावी. भविष्यात पाणीवाटप हा महत्त्वाचा विषय राहणार असून युवकांनी याबाबत सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.झिरवाळ यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. झिरवाळ यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.उषा सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातून सुसंस्कृत युवा पिढी राजकारणात येईल – विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून  मिळालेल्या ज्ञानाद्वारे राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवा पिढी राजकारणात येईल. ही युवा पिढी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  व्यक्त केला.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

श्री.दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ सभागृह व विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जातात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे कायदे केले जातात. या सभागृहांचे प्रतिनिधित्व करण्याची अनेकांची इच्छा असते. आपले द्विसभागृह अमेरिका, इंग्लड येथील सभागृहाप्रमाणे समन्वय साधण्याचे काम करीत असतात. दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. कनिष्ठ सभागृहात एखादा कायदा करताना त्यामध्ये काही सूचना, बदल वरिष्ठ सभागृह सुचविते. त्यानंतर पाठिंबा दिला जातो. त्याबाबत कुठलीही कटुता ठेवली जात नाही. हे राज्यातील द्विसभागृहाचे वैशिष्ट्य असल्याचे श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री.दानवे यांनी विधानपरिषदेतील आजी माजी ज्येष्ठ व श्रेष्ठ सदस्यांचा त्यांच्या कामकाजाबाबतचा उल्लेख केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.दानवे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.दानवे यांचा परिचय करुन दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.गायत्री डुकरे-पाटील यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/

सुयोग येथील गझल मैफलीला कृषीमंत्र्यांची दाद

नागपूर, दि. 22 : सुयोग पत्रकार निवासस्थानी आज आयोजित गझल मैफलीला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून कलावंतांना भरभरून दाद दिली.

सुयोग येथे आज कृषी मंत्र्यांनी भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली व माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुयोग येथील सभागृहात आयोजित मैफलीला उपस्थित राहून गझलगायन सादर करणाऱ्या कलावंतांना भरभरून दाद दिली. शिबिरप्रमुख विवेक भावसार उपस्थित होते. नागपूर येथील स्वरराज संस्थेतर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

000

वॉटर स्क्रिनच्या माध्यमातून नागपूरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

नागपूर, दि. 22 : केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात हा शो विरंगुळा देत, आयुष्यातून ताणतणाव घालवून आनंद देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ‘म्युझिकल फाऊंटन शो’चे आयोजन आज सायंकाळी फुटाळा तलाव येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधी  यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती  होती.

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांचे मंत्रिमहोदय, वरिष्ठ अधिकारी,  माध्यम प्रतिनिधी शहरात आले आहेत. त्यांच्यासाठी या ‘विशेष ट्रायल शो’चे आयोजन करण्यात आले होते.

‘म्युझिकल फाऊंटन शो’चे कौतुक करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिशय अप्रतिम फाऊंटन शो हा आज पहायला मिळाला आहे. जगातील सर्वात मोठे फाऊंटन नागपुरात आहे, ही अभिमानाची बाब आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ‘रोडकरी’ अशी ओळख आहे. हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना ‘रोडकरी’ संबोधायचे. रस्ते विकासाची अनेक दर्जेदार कामे त्यांनी राज्यात तसेच केंद्रात केली आहे. नागपुरच्याही विकासासाठीही त्यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच हा फाऊंटन शो जगासमोर आला आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव घालवून अनेकांच्या आयुष्यात हा शो आनंदाची पेरणी करेल. केवळ देशातील नव्हे तर जगभरातील नागरिक हा फाऊंटन शो पहायला येईल. स्व. लता मंगेशकर यांचे नाव या ‘फाऊंटन शो’ला देण्याचा विशेष आनंद असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

‘फाऊंटन’ला स्व. लता मंगेशकर यांचे नाव देणार – नितीन गडकरी

देशभरात नावलौकीक मिळविणा-या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ला स्व. लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या फाऊंटन शोच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांना लवकरच निमंत्रित करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

या प्रकल्पासाठी 250 कोटी रुपये खर्च आला आहे. यापैकी 50 कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत. तर उर्वरित निधी हा केंद्र शासनाने दिला आहे. फुटाळा परिसरातील भागाची विकासात्मक कामेही हाती घेण्यात आली आहे. फुटाळा तलावात लवकरच वॅाटर स्पोर्टस सुरू करण्यात येईल, असे श्री. गडकरी पुढे म्हणाले.

नागपूरला नवी ओळख मिळेल – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

म्युझिकल फाऊंटन शो’मुळे नागपूरला नवी ओळख मिळेल. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. असेच उपक्रम भविष्यात राबविण्यासाठी आमचे सहकार्य राहणार असल्याचे श्री. नार्वेकर म्हणाले.

‘म्युझिकल फाऊंटन’ देशातील आयकॅानिक प्रकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथील फुटाळा तलावात साकारण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन प्रकल्पाच्या बांधकामासाठी फ्रेंच आर्किटेक्चर, फवा-यांसाठी इटालियन आर्किटेक्चर आले असले तरी या प्रकल्पाचे खरे शिल्पकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच आहेत. सिंगापूर आणि दुबईपेक्षाही आकर्षक असा प्रकल्प नागपुरात असून देशातील हा आयकॅानिक प्रकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी राज्य शासनाने फक्त निधी उपलब्ध करून दिला. मात्र, नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प साकारण्यात आला. उर्वरित कामासाठी राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

‘म्युझिकल फाऊंटन शो’विषयी…

– संगीत कारज्यांची  लांबी 158 मी. असून हा जगातील सर्वात लांब तरंगता कारंजा आहे.
• ऑस्कर अवार्ड विजेते श्री. ए. आर. रहमान यांच्याव्दारा तयार केलेल्या ध्वनीफीतिद्वारे कारंज्यांचे सादरीकरण.
• पद्यश्री गुलजार यांच्या आवाजात नागपूर शहराच्या मागील 300 वर्षाच्या इतिहासाचे हिंदीमध्ये सादरीकरण.
• अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या आवाजात नागपूर शहराच्या मागील 300 वर्षाच्या इतिहासाचे मराठीमध्ये सादरीकरण.
• सुप्रसिध्द अभिनेते श्री. अभिताभ बच्चन यांच्या आवाजात नागपूर शहराच्या मागील 300 वर्षाच्या इतिहासाचे इंग्रजीमध्ये सादरीकरण.
• ऑस्कर विजेते श्री. रसूल पुकुट्टी यांनी प्रकल्पाचे साऊंड डिझाईन तयार केले आहे.
• तामील सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीमती रेवथी यांनी इतिहासाचे लेखांकन केले आहे.
• प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर अल्फाँस रॉय यांनी ग्राफीक डिझाईन्स केले आहे.
• थिम बेस्ड गाण्यांवर संगीत कारंज्याचे सादरीकरण
• फुटाळा तलाव शो चा एकूण कालावधी 35 मिनिटे आहे.
• आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्कॉच अवार्ड-2022 (सिल्वर) या प्रकल्पाने जिंकलेला आहे.
• काम सुरू करून पूर्ण करण्याचा कालवधी 1 वर्ष
• फुटाळा तलाव येथे फ्रान्स येथील क्रिस्टल गृपव्दारे फाऊंटनची उभारणी.

0000

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

नागपूर दि.22 : नागपूर भेटीवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुरुवारी २२ डिसेंबर रोजी धंतोली येथील रामकृष्ण मठाला भेट दिली व सर्व भक्तांसह संध्या आरती केली.

राज्यपालांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतले तसेच माताजी श्री सारदा देवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना वंदन केले. त्यानंतर आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्यांबद्दल माहिती जाणून घेतली व विवेकानंद धर्मादाय मल्टी थेरपी डिस्पेन्सरी,ग्रंथालय व प्रकाशन विभागास भेट दिली.

मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांनी राज्यपालांचे स्वागत केले.यावेळी स्वामी विपाप्मानन्द,स्वामी ज्योतिस्वरूपानंद,स्वामी तन्निष्ठानंद, स्वामी ज्ञानमूर्त्यानंद व इतर साधुवृन्द उपस्थित होता.यावेळी राज्यपालांनी विद्यार्थी स्वयंसेवक तसेच भक्तवर्गाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

                                                            ******

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहीमेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. २२ :  भारतातून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण झाले पाहिजे. यासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढली पाहिजे. क्षयरोगाचे दूरीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहीमेत लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

आज 22 डिसेंबर रोजी राजभवनातील सभागृहात श्री. कोश्यारी यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती आरोग्य परिमंडळातील क्षयरोगाबाबतचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. सभेला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्यपालांचे प्रधान सचिव श्री. संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंगल, नागपूरचे मनपा अपर आयुक्त राम जोशी, नागपूर आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. विनिता जैन, आरोग्य अभियान पुण्याच्या डॉ. सुनिता गोलहीत, डॉ. रामजी अडकेकर, डॉ. अशोक रणदिवे यांचेसह नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, क्षयरुग्ण क्षयरोगमुक्त व्हावा यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या व औषधोपचार करण्यात येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना क्षयरोगमुक्त अभियानात सहभागी करुन घ्यावे. आपल्या देशात परोपकाराची भावना असल्यामुळे निश्चितपणे लोकांचा सहभाग यामध्ये मिळेल. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन त्यांच्यासोबत सभा घेऊन स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींना सभेला बोलावून या मोहिमेत त्यांचा सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

तालुका आणि जिल्हा पातळीवर निक्षय मित्र तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, कोणताही अधिकारी-कर्मचारी निक्षय मित्र होण्यास तयार असतील तर त्यांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे. एका महिण्याच्या आत प्रत्येक रुग्णामागे एक निक्षय मित्र असला पाहिजे. क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरु करावे. त्यामुळे हे रुग्ण उपचारातून त्वरीत बरे होतील. क्षयरोगमुक्तीसाठी येत्या काही दिवसात जास्तीत जास्त वेगाने आरोग्य विभागाने काम करुन ही मोहीम गांर्भीयाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

श्री. खंदारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षयरोगमुक्त भारत अभियानात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, पौष्टीक आहार, निक्षय मित्र योजना, क्षयरुग्णांसाठी उपचार पद्धती, तपासणीसाठी करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि राज्यातील क्षयरुग्णांची माहिती दिली.

यावेळी क्षयरोगमुक्त भारत अभियानात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पारसमल पगारिया फाऊंडेशन नागपूरचे जीवल पगारिया, डॉ. सुभाष राऊत व सहयोग फाऊंडेशनचे तारक धनवाणी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेला उपस्थित विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी आपआपल्या जिल्ह्यातील प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.

कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

नागपूरदि. २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नयेअसे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईलहे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजनआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतअन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीनजपानअमेरिकाब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले.  राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चाचण्याट्रॅकींगउपचारलसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....