रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1689

रामसेतू सुंदर, आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. २५ : चंद्रपूर येथील दाताळा रोडवरील इरई नदीवर ब्रिज उभारण्याचे एक स्वप्न व संकल्प होता, ते पूर्णत्वास आले असून चंद्रपूरचा रामसेतू ब्रिज हा देशातील विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज असेल. सुंदर व आकर्षक अशा विद्युत रोषणाईने हा रामसेतू झळाळून निघणार आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

रामसेतू, दाताळा रोड, चंद्रपूर येथील विद्युत रोषणाई शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पुनम वर्मा, देवराव भोंगळे, राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर,राहुल पावडे आदी प्रामुख्याने उपथित होते.

रामसेतूवर सुंदर व आकर्षक अशा तीन कोटी रुपयाच्या विद्युत रोषणाई कामाचा शुभारंभ होत आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुंबईच्या सी-लिंक ब्रिजवरून जातांना वाटायचे की, चंद्रपूरमध्ये देखील असा देखणा ब्रिज व्हावा. मुंबईच्या धर्तीवर आणि पणजीमध्ये जो ब्रिज आहे तसाच हा रामसेतू होणार आहे. रामसेतू हा देशातील विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज असेल, ज्याला सर्वांगसुंदर लायटिंग व म्युझिकची व्यवस्था असणार आहे. विद्युत रोषणाईसह हा रामसेतू 26 जानेवारीपर्यंत सर्व नागरीकांना बघण्यासाठी मिळेल. सुंदर ब्रिज व विद्युत रोशनाई झाल्यानंतर रात्री लोक या ठिकाणी कुटुंबासह येतील तेव्हा सुंदर ब्रिज पाहून दिवसभरातील थकवा व कष्ट विसरून जातील, असा हा सर्वोत्तम ब्रिज होणार आहे.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून गणेश विसर्जन या नदीमध्ये करण्यात येत आहे, आता नव्याने दोन प्रकल्प हाती घेण्यात आले असून नदी परिसरात बाराही महिने पाणी असल्यास या ब्रिजची सुंदरता आणखी वाढेल. यासाठी जलसंधारण विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास जूनच्या पहिल्या पावसाच्या अगोदर या नदीवर बंधारा बाधंण्याचे काम पूर्णत्वास येईल. त्यासोबतच सुंदर घाट निर्मिती या ठिकाणी व्हावी यासाठी गणपती विसर्जनासाठी घाट बांधण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहे. देवी,गणेश विसर्जन तसेच इतर धार्मिक कार्यासाठी हा घाट निश्चितपणे उपयोगी पडेल, यासाठी घाट बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे या भागात पुराचे पाणी शिरते, यावर देखील नियोजन करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापनाकडे संरक्षण भिंत उभारणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूरीनंतर या ठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी देखील करण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रात उत्तम खेळाडू घडावेत यासाठी देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहे. उत्तम दर्जाच्या गुणवत्तेचा सिंथेटिक ट्रॅक महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळा, बल्लारपूर येथील स्टेडियम व जिल्हा क्रीडा संकुल ही तीन ठिकाणे आहेत.

जुबली हायस्कूल, माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, तीर्थक्षेत्र मार्कंडा या ठिकाणी देखील विकास कामे करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 200 कोटीचे टाटा टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रात चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु झाले आहे. एमआयडीसीच्या 20 एकर क्षेत्रात भारत सरकारचे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून जिल्ह्यातील युवक उत्तम दर्जाचे स्किल घेऊन आकाशात उंच भरारी घेऊ शकेल. अमृत महोत्सवी वर्षात महिला पुढे जाव्यात म्हणून चंद्रपूर बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 50 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. 250 कोटी रुपये खर्च करून मुलींना प्रशिक्षण व 43 स्किल शिकविणारे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्याचे 55 कोटी रुपये मंजूर केले. या उपकेंद्राचे बांधकाम पूर्णत्वास येईपर्यंत 10 प्रकारचे अभ्यासक्रम माहे जूनपासून सुरू करण्यात येत आहे.

हा जिल्हा विकासाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

000

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. २५: जिल्ह्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडांगणाची निर्मिती करण्यात येत आहे. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतरंराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, चेंजिग रुम व इतर क्रीडा सुविधांच्या 12 कोटी कामांचे लोकार्पण तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅकच्या 51 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मागील काळात पालकमंत्री व वित्तमंत्री  असतांना 2019 मध्ये या क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. आता त्याचे  लोकार्पण होत आहे, याचा आनंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धक, खेळाडू कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. सिंथेटिक ट्रॅकचे काम पूर्णत्वास आले तेव्हा काही क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की, सिंथेटिक ट्रॅकवर वॉकिंग केले तर त्याचे नुकसान होईल. याची दखल घेत त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करून सिंथेटिक ट्रॅकच्या बाजूला मातीचा वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने 50 लक्ष रुपये वॉकिंग ट्रॅक निर्मितीसाठी उपलब्ध करून दिले. येत्या दोन महिन्यात हा ट्रॅक पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जनतेच्या आरोग्यासाठी हा वॉकिंग ट्रॅक उत्तम साधन होईल, या दृष्टीने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या संकुलातील जलतरण तलाव जुना झाला असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. चंद्रपूरमध्ये जसा धावपटूचा विचार केला तसाच जलतरणपटूचाही विचार करण्याच्या दृष्टीने 1 कोटी 57 लक्ष 15 हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळवून देत 1 कोटी 10 लक्ष रुपये त्वरित क्रीडा विभागाच्या खात्यात जमा केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, युरोपच्या धर्तीवर येथील सैनिकी शाळेत ऑलंपिक स्तरावरचे स्टेडीयम निर्माण करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या क्रीडासंकुलाचा 56 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रातील बांधकाम करतांना या क्षेत्रातील कार्यरत मंडळी, तज्ज्ञ व सामाजिक संघटना यांच्याकडून सूचना घ्याव्यात. 56 कोटी रुपयांचा आराखडा त्यांच्याकडून तपासून घ्यावा. जेणेकरून, कोणतीही गोष्ट सुटता कामा नये. चंद्रपूरातील जिल्हा स्टेडियम विदर्भातले सर्वात उत्तम स्टेडियम होईल, या दृष्टीने कार्य करण्यास पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी केली आहे. आपल्या देशात या सर्व सुविधांची उत्तम वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तम दर्जाचे फक्त तीन सिंथेटिक ट्रॅक आहेत. ते म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल, सैनिकी शाळा, विसापूर व बल्लारपूर येथील क्रीडा स्टेडियम याठिकाणी. तिन्ही सिंथेटिक स्मार्ट ट्रॅक महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या ठिकाणी अनेक व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. तर सैनिकी शाळा, विसापूर येथे युरोपच्या धर्तीवर फुटबॉल ग्राउंडची निर्मिती करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन अकादमी येथे सुंदर मिनी स्टेडियम उभारण्याचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. महाकाली मंदिरासाठी मार्च 2019 मध्ये 60 कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ज्युबली हायस्कूलसाठी 8 कोटी रुपये व ज्युबली हायस्कूलच्या मागच्या 10 एकर ग्राउंडमध्ये वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे स्टेडियम निर्मितीसाठी 25 कोटी रुपये मार्च 2019 मध्ये जमा करण्यात आले आहे. नागपूर मुंबई व दिल्लीच्या धर्तीवर या जिल्ह्यात उत्तम असे एकही इनडोअर स्टेडियम नाही. त्यादृष्टीने 25 कोटी रुपयांमध्ये वातानुकूलित सोलरसहित वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्यासह वीरता व शूरता निर्माण करणारे स्टेडियम या ठिकाणी उभे राहत आहे. वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम व इनडोअर स्टेडियमच्या नवीन अंदाजपत्रकाच्या सूचना दिल्या आहेत. एकूण 47 कोटीमध्ये वातानुकूलित स्टेडियम चंद्रपूर मध्ये निर्माण होईल.

जलतरण तलावाच्या नूतनीकरणाकरता 1 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण आंतरराष्ट्रीय दर्जावरच्या सुविधा निर्माण करण्याकरीता 56 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर जिल्ह्यात तयार करावी, अशी मागणी केली आहे. लवकरच बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी चंद्रपुरात तयार करण्यात येईल. अनेक विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवीन चंद्रपूरचं काम हाती घेण्यात आले आहे.  या जिल्ह्यातील युवक-युवती उंच आकाशात भरारी घेऊ शकेल, यासाठी मोरवा धावपट्टीवर पुढील वर्षात फ्लाईंग क्लबची स्थापना करण्यात येणार आहे.  येथील तरुण पायलटचे शिक्षण उपलब्ध होणार असून फ्लाईट उडवणारा तरुण मुंबई पुण्याचा नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी  व्यक्त केला.

जुबली हायस्कूल, माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, तीर्थक्षेत्र मार्कंडा या ठिकाणी देखील विकास कामे करण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा जिल्ह्याचा उत्तम व्हावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 200 कोटीचे टाटा टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रात चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू झाले आहे. एमआयडीसीच्या 20 एकर क्षेत्रात भारत सरकारचे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून जिल्ह्यातील युवक उत्तम दर्जाचे स्किल घेऊन आकाशात उंच भरारी घेऊ शकेल. अमृत महोत्सवी वर्षात महिला पुढे याव्यात म्हणून चंद्रपूर बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 50 एकर जागा निश्चित करण्यात आली असून पहिल्या टप्प्याचे 55 कोटी रुपये मंजूर केले.

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मागील 10 वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्यप्राप्त व पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे  खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी व ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅकचे निर्माण देखील करण्यात आले आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे व वाढविण्याचे उत्तम असे कार्य होत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना याचा नक्कीच फायदा होईल व या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जिल्ह्यातून निर्माण होण्यास मदत मिळेल.

प्रस्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड म्हणाले की, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंड, चेंजिंग रूम आदी आंतरराष्ट्रीय दर्जांची अत्याधुनिक क्रीडा सुविधा विशेष निधीतून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात निर्माण करण्यात आल्या आहे. येत्या काही कालावधीत क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यात येणार आहे. अद्ययावत क्रीडा सुविधा, वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग पूल यांचे अद्ययावतीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत मागील कालावधीत उत्कृष्ट असे कार्य या जिल्ह्यात झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे कार्य केले जात आहे.

०००

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर, दि. २५, (जि. मा. का.) :सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालक रश्मी बागल, महेश चिवटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले की,  मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन कामांना गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.  करमाळा तालुक्यातील विकास प्रकल्प पूर्ण केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करा

श्री आदिनाथ कारखान्याचे संस्थापक गोविंदराव पाटील आणि दिगंबर बागल यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, या कारखान्याचे ३२ हजार सभासद असून, त्यांची कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी कारखान्याचे खासगीकरण होऊ नये, हा कारखाना सहकारी तत्वावरच चालावा, यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित, एक दिलाने काम करावे, सरकार नागरिकांच्या पाठीशी राहील.

महसूल व आरोग्य विभाग नाविन्यपूर्ण व चांगल्या योजना राबवत असल्याचे सांगताना आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाद्वारे  ४.५ कोटी महिलांची आरोग्य तपासणी होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कारखान्यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी – पालकमंत्री

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने समयसूचकतेने निर्णय घेतला. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे हित कायम राखले गेले आहे. शेतकऱ्यांना  नवसंजीवनी देण्याचा अध्याय या कारखान्याने सुरू केला आहे.  शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्यासाठी भैरवनाथ उद्योग समुहाने आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचाच राहणार – आरोग्य मंत्री

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.  सावंत म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचा आहे, तो सभासदांचाच राहणार  आहे. सभासदांच्या हितासाठी व कारखान्याच्या प्रगतीसाठी भैरवनाथ उद्योगसमुहाकडून यापुढेही या कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून, मोळी टाकून कारखान्याचा २७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

 

 

 

 

कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करावा – जिल्हाधिकारी 

नागपूर, दि. २५ :  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत मास्कचा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद,  निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राज गजभिये, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय बिजवे, एम्सच्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.विभा दत्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, टास्क फोर्सचे रवींद्र सरनाईक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चीनसह पूर्वेकडील देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. चीनमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात २७ डिसेंबरला ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तयारी संदर्भातील आढावा या मॅाक ड्रिलदरम्यान घेण्यात येईल. यात रुग्णालयातील खाटांची उपलब्धता,  आवश्यक औषधांची उपलब्धता, कोरोनाची तपासणी, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, टेलिमेडिसिन सेवा, मनुष्यबळाची उपलब्धता आदींचा आढावा यादरम्यान घेतला जाईल. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.

सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आढळल्यास कोरोनाची चाचणी करावी. स्वतःला सर्वांपासून विलग करून घ्यावे. कोरोनाच्या पंचसूत्रीचे पालन करावे. १८ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करावे. विशेषतः ६० वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण प्राधान्याने करावे. लसीकरण हाच कोरोनापासून बचावाचा मार्ग आहे. समाजध्यमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या कोरोना संदर्भातील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना संदर्भातील सुचना, माहिती व दिशानिर्देश वेळोवेळी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे.  ख्रिसमस व नववर्षाचे कार्यक्रम साजरे करताना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करा – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार, दि.२५ (जिमाका वृत्तसेवा): चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची बी-एफ-7 च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

‘कोविड-१९’ पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत  ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.रविदास वसावे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, मागील लाटेदरम्यान नंदुरबार जिल्ह्यात  प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आले असले, तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामधील आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. सर्व ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड्स, पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय साधनसामग्री, आरटीपीसीआर किट, ॲन्टीजन किटची मागणी आदींचे आतापासूनच नियोजन करावे. आरोग्य विभागाने लक्षणे असलेल्या संशयीत रुग्णांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे. नव्या  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. अद्यापही ज्या नागरिकांनी पहिला, दुसरा व बुस्टर डोस घेतला नसेल त्यांनी त्वरित डोस घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी मागील वर्षातील कोविड रुग्ण, ऑक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर, औषधसाठा, लसीकरण तसेच प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस तहसलिदार, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000

नाताळनिमित्त राज्यपालांची सेंट स्टीफन चर्चला भेट

मुंबई, दि. २५: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाताळनिमित्त वांद्रे मुंबई येथील सेंट स्टीफन चर्चला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रभू येशूची प्रार्थना केली तसेच सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्यपालांना ‘द चर्च ऑफ द हिल’ हे सेंट स्टीफन चर्चचा १७५ वर्षांचा इतिहास सांगणारे पुस्तक भेट देण्यात आले.  यावेळी मुख्य धर्मोपदेशक रेव्हरंड थॉमस जेकब, मानद सचिव के पी जॉर्ज, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अब्राहम मथाई आदी उपस्थित होते.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, दि. २५ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने  औरंगाबाद शहर व परिसरात आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले कि, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यातून सकारात्मक कृतीची प्रेरणा मिळते. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय केले हा विचार  रुजविण्याचे मोठे कार्य धर्माधिकारी कुटुंबियांनी केले आहे. आज राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून गावे आणि शहरांसाठी यातून प्रेरणा मिळते. त्यातील नागरिकांचा मोठा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणा देणारा ठरत असून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाजासाठी दिपस्तंभासारखे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असून आज लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. हे सरकार आपले आहे ही भावना महत्वाची आहे. सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी चांगले काम करुया.  प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ७४ हजार स्वयंसेवकांनी सहभागी होत ७४८ टन कचरा संकलन केला. या उपक्रमातून शहर स्वच्छ करण्यास मदत झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व सहभागी नागरिकांचे अभिनंदन केले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर तसेच परिसरात स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. राज्यातील अनेक शहरात याच धर्तीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. निरामयी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छता मोहिमेसोबतच संस्थेकडून आरोग्य, पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम राबविण्यात येतात हे महत्वपूर्ण आहे. प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेचा आदर्श घेत आपले शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी सर्व मिळून काम करुया, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले.

प्रतिष्ठानचे श्री. सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत आवाहन केले. या  स्वच्छता अभियानासाठी राज्यभरातून आलेले स्वयंसेवक उपस्थित होते.

000

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर -डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दि २५ (जिमाका वृत्तसेवा ): आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ८५ हजार घरकुले मंजूर करण्याचा निर्णय चालू अधिवेशनात शासनाने घेतला आहे. आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील मंजूर करण्यात आलेली घरकुलांची ही सर्वात मोठी संख्या आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

कोपर्ली येथे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, सरपंच सौ. ज्योती वानखेडे, उपसरपंच अरूण अहिरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गिरासे, सौ. मुखाबाई वळवी, जुलेलखाबी खाटीक, सौ.नलिनी गुजराथी, मंगला पवार, राजेंद्र पवार, सौ. वंदना पवार, नजूबाई भिल, विजया तावडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित यावेळी म्हणाले की, शेतकरी सुखी तर जग सुखी, अशी प्रचलित म्हण आहे. परंतु शेतकरी केवळ सुखी नाही तर शाश्वतरित्या सधन झाला पाहिजे, त्यासाठी त्याचे उत्पन्न पाच ते दहापटीने कसे वाढेल यासाठी आपला प्रयत्न आहे. आपल्या राज्यात प्रत्येकासाठी वैयक्तिक लाभाच्या व विकासाच्या योजना आहेत, त्या जनतेपर्यंत पोहचवणे ही शासनासोबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गावातील ज्यांचे आधार, रेशन, पॅन कार्डस् बॅंक खाते आहे अशा नागरिकांची एक यादी तयार करून योजनांच्या लाभाकरीता त्यांचे वर्गीकरण केल्यास संबंधितांना त्याचा लाभ मिळावा, याकरीता शासन वचनबद्ध असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

तापी नदीचे पाणी घराघरात पोहचेल – डॉ. सुप्रिया गावित

जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ज्या तापी नदीचे पाणी आजपर्यंत केवळ शेतापर्यंत होते ते जलजीवन योजनेच्या माध्यमातून घराघरात नळाद्वारे, शुद्ध करून पोहचविले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमातून गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्येचे निराकरण जागेवरच केले जात आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर अडलेली कामे त्वरित होणार आहे, त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.

२०५४ पर्यंत पुरेल एवढे पाणी देणार – डॉ. हिना गावित

केंद्र सरकारच्या या जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०५४ पर्यंतच्या वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या पाणी क्षमतेचे नियोजन करण्यात येणार असून प्रत्येक गाव, घर आणि घरातील व्यक्ती या योजनेत केंद्रस्थानी ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. ‘हर घर नल व शुद्ध जल’ ही संकल्पना यातून साकार होणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी सांगितले.

000

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३; दिंडोरी लोकसभासाठी १२९ किमी लांबीच्या रस्त्यांना तत्वत: मंजुरी – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक 24 डिसेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत 2024-2025 वर्षासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने दिंडोरी, पेठ, चांदवड, देवळा, सुरगाणा, नांदगांव, मालेगाव, येवला, निफाड या तालुक्यातील 128.47 किमी लांबीच्या रस्त्यांना तत्वत: मंजूरी दिली असून त्यासाठी 97.46 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

ग्रामीण भागात दळणवळण सहज सोपे व्हावे यासाठी रस्त्यांचा विकास आणि रस्त्याच्या मजबूतीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 मध्ये तत्‍वत: मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमुळे दिंडोरी, पेठ, चांदवड, देवळा, सुरगाणा, नांदगांव, मालेगाव, येवला, निफाड या तालुक्यातील 22 महत्वाच्या रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण होणार आहे. आदिवासी बहुल तसेच ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास कराण्यासाठी रस्त्यांचा दर्जा आणि त्यांचे मजबुतीकरण होणे आवश्यक असल्याने केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा केल्यानुसार रस्ते विकासासाठी 97.46 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदाच होणार आहे. वरील तालुक्यातील 22 रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

देशाच्या ग्रामीण भागामध्ये वाढलेली कनेक्टिव्हिटी ही देशाच्या सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या नियोजित विकासामध्ये तेथील रस्त्यांचा विकास हे केंद्र सरकारचे मुख्य लक्ष असल्याने देशातील ग्रामीण रस्ते विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील 1000 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील

500 पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे जोडणे हा आहे. या योजने अंतर्गत बिगर आदिवीसी भागात 500 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील 250 पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे जोडण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या टप्पा क्रमांक 3 मध्ये राज्याला 6 हजार 550 किमी लांबीचे ग्रामीण रस्ते सुधारणा करण्याचे उद्दीष्ट दिले आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. 3 अंतर्गत रस्ते विकास कामाबाबत नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय खासदार उपस्थितीत असल्याचेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

सातारा, दि. 24  – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार श्री गोरे यांचा काल फलटण येथे अपघात झाल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विषयी माहिती मिळताच पालकमंत्री श्री. देसाई यांनी तातडीने नागपूर येथून पुणे येथे येत आमदार श्री. गोरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी आमदार श्री गोरे यांची दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री महोदयांशी बोलणेही करून दिले.

पालकमंत्री श्री देसाई यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली व आमदार श्री गोरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. आमदार श्री गोरे यांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहनही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.

तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व सबंधित अधिकारी यांच्याशी ही चर्चा केली.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, धैर्यशील कदम, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मुनोत यांच्यासह आमदार श्री. गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

ताज्या बातम्या

दिल्लीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

0
नवी दिल्ली, ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद...

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; आजपासून राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि.३ : महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक...

‘संपूर्णता’ अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी सन्मानीत

0
चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...