मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 1688

विधानपरिषद लक्षवेधी

वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ : वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये 25 ते 30 वर्षापासून  राहणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना मालकी हक्काच्या सदनिका वाजवी दरात  देण्यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

वांद्रे वसाहत पुनर्विकास आणि तेथील रहिवाशी याबाबत सदस्य ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास प्रजासत्ताक कोरिया यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. यासाठी बृहत आराखडा आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या कोरिया लँड अँड हौसिंग कॉर्पोरेशनसोबत करारनामा केला आहे.

25 ते 30 वर्षांपासून राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २८ : रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना श्री. फडणवीस यांनी सांगितले की, राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये  ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले सर्व खटले शासन निर्णयामध्ये नमूद अटीवर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर खटले काढून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी सविस्तर सूचना व कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे. त्यातील तरतूदीनुसार ज्या गुन्ह्यामध्ये दि. ३१.०३.२०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. या शासन निर्णयामध्ये नमूद अटी व शतींची पूर्तता होत आहे, असे खटले मागे घेण्यासाठी कायदेशीर तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे.  तसेच सदर खटल्यांसदर्भात कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्राकरिता व जिल्ह्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्याकरिता महसूल उपविभागनिहाय महसूल उप विभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे. याप्रकरणी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गिरणी कामगारांच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल, प्रकल्प ग्रस्तांच्या  प्रलंबित असलेल्या नोकऱ्यासंदर्भात वस्तुस्थिती तपासून त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, सचिन अहिर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

00

मुंबईतील बीआयटी चाळी पुनर्विकासासाठी लवकरच सर्वसमावेशक निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २८ :- मुंबईतील बीआयटी चाळी 100 वर्षापेक्षा जुन्या आहेत. या चाळीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी विकासकामार्फत मुंबई महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवित आहेत. या संदर्भात सर्वसमावेशक निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

बीआयटी चाळी पुनर्विकासासंदर्भात सदस्य सचिन अहिर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ही माहिती दिली.

मुंबईतील बी.आय.टी. चाळीची निर्मिती होऊन जवळपास १०० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अशा चाळींचा पुनर्विकास हा विकास नियंत्रण नियमावली १९९१ अन्वये  करण्यात येत आहे. बी.आय.टी. चाळीतील रहिवाशांमार्फत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन संस्थेमार्फत विकासकाची नेमणूक करण्यात येते. तद्नंतर विकासकामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेस पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यात येतो, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत २२ वसाहतीमध्ये १३३ बी.आय.टी. इमारती आहेत, त्यापैकी ६१ इमारतींमध्ये महानगरपालिका भाडेकरुंच्या गृहनिर्माण संस्थांमार्फत नेमणूक केलेल्या विकासकांकडून पुनर्विकास प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. सदर ६१ इमारतींपैकी १७ इमारतींचा पुनर्विकास झाला असून ४४ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ७२ इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करुन महानगरपालिकेमार्फत नियमितपणे दुरुस्ती करण्यात येते. सद्य:स्थितीत १२ इमारतींच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

000

गोखले पुलासाठी लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोखले पुलाची तपासणी करून सदर पूल जीर्ण अवस्थेत असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत असल्याने रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भातील कामे लवकरात लवकर करावीत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितली.

गोखले पूल बंद असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांना सांगून पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला तशा सूचना दिल्या जातील, असेही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भातील लक्षवेधी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली तर सदस्य सचिन अहिर, ॲड.अनिल परब यांनी याबाबतच्या चर्चेत सहभाग घेतला.

0000

राज्यातील सर्व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ :  राज्यातील सर्व महानगरपालिकेत विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

राज्यातील महानगरपालिकेच्या विद्यार्थ्याचे वजन कमी असणे, तसेच बऱ्याच मुलांना डोळ्यांची तसेच दातांची समस्या असल्याने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात येईल, असेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये ६६.४१ टक्के, सन २०१५-१६ मध्ये ६६.८३ टक्के, सन २०१६-१७ मध्ये ७२.१२ टक्के, सन २०१७-१८ मध्ये ७७.६३ टक्के, सन २०१८-१९ मध्ये ७२.९५ टक्के तसेच सन २०१९-२० मध्ये ७९.४४ टक्के इतक्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहितीही मंत्री श्री.सामंत यांनी दिली.

000

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 

नागपूर, दि. २८ : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील शाळामधील गुणवत्ता वाढण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल करणार आहे. सेंट्रल बोर्ड यापद्धतीने ही मॉडेल स्कूल असतील. सद्यस्थितीत 50 टक्के शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार असून सर्व परीक्षांचा निकाल मार्चमध्ये लागल्यानंतर आणि आधार लिंकिंग पूर्ण झाल्यानंतर 80 टक्के भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

पवित्र पोर्टलमध्ये कला आणि क्रीडा शिक्षक नाहीत, संच मान्यता झाल्यानंतर त्यांचा समावेश पोर्टलवर करू. संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर असून आधार लिंक केल्याने विद्यार्थी संख्या समजेल. 15 ते 20 वर्षे अनेक शाळांचे रोस्टर नव्हते. रोस्टर करून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उर्वरित अनुदान देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, नागो गाणार यांनी सहभाग घेतला.

000

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधान परिषद इतर कामकाज : सीमाप्रश्न

नागपूर, दि. २८ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रविण दरेकर, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, प्रसाद लाड आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासियांच्या पाठिशी राहण्याचा ठराव विधिमंडळाने एकमताने मंजूर केला आहे. यातून महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठिशी खंबीर उभे असल्याचा संदेश सीमाभागात पोहोचला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकावर अन्याय होऊ नये ही सामूहिक भावना सर्वांची राहिली आहे. महाराष्ट्र नेहमी संयम आणि समन्वयाच्या भूमिकेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. सीमा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दोन्ही राज्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उत्तरातून केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाचा मानवतावादी दृष्टिकोन राहिला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी इतक्या वर्षात पहिल्यांदाच केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे.

मुंबई ही महाराष्ट्राचीच

मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, या कर्नाटकातील मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध, धिक्कार करून त्यांना कर्नाटक सरकारने समज द्यावी. मुंबई ही कुणाच्या बापाची नाही, महाराष्ट्राची आहे. मुंबईवर अनेक संकट आली. कोरोना संकटाही मुंबईतील लोक मदतीसाठी आले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही मुंबईचे संरक्षण केले. १०५ हुतात्म्यांचे बलिदानही विसरता येणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात कर्नाटकचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या बांधवांनी भेट घेऊन महाराष्ट्राला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. सीमाभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या भावनांशी कोणीही खेळण्याचा प्रयत्न करू नये. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी महाराष्ट्र खंबीर उभा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सीमाप्रश्नी गेल्या ६६ वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. सीमाभागातील ८६५ गावे आपली आहेत. हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने न्यायालयाचा अवमान होता कामा नये. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापूर्वी संघर्ष प्रत्येकाने गरजेनुसार, प्रसंगानुरूप केला आहे. आपलेच लोक आहेत त्यांना मदत व्हावी म्हणून संघर्ष आंदोलन केली आहेत. आमच्या सरकारला काही महिनेच झाले असलेतरी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निर्णय घेवू. राज्य सरकार हे जनतेचे, काम करणारे सरकार आहे. सत्याची बाजू घेणारे सरकार आहे. कामातून उत्तर देवू, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उत्तरात सांगितले.

जत तालुक्यातील प्रश्न जुना असला तरी राज्य शासनाने ४८ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात सिंचनाचे १८ प्रकल्प कार्यान्वित आहेत. या भागामध्ये रस्ते, सोयीसुविधा देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. आपल्या देशाबद्दल, राज्याबद्दल प्रेम असले पाहिजे.

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही, एक गावही कर्नाटकात जाऊ देणार नाही, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र येवून लढा लढला पाहिजे. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करु नये, कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याची दक्षता घेतली आहे. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. महाराष्ट्राच्या बाजूने न्याय मिळेल यासाठी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकद लावली आहे. सीमा भागातील गावातील एक इंचही जागा सोडणार नाही, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्यायासाठी सगळं करू, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग

राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहे. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावातील १५ वर्ष वास्तव्यास असलेल्या लोकांना राज्याचे अधिवास देण्यात येईल. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनाचे लाभ देण्यात येतील. शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र करण्यात येईल. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात जागा राखीव ठेवण्यात येतील. सीमाभागातील मराठी बांधवांवरील विविध खटल्यांसंदर्भात वकीलांची फौज लावण्यात येईल, त्याचा खर्चही राज्य शासन देईल. सीमाभागातील बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग/कक्ष निर्माण करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

००००

पवन राठोड/ससं/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण रामेश्वर सब्बनवाड यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रामेश्वर सब्बनवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या यशस्वी विद्यार्थ्यांकडे बघितले तर ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या लक्षणीय दिसून येते. अपार मेहनतीची तयारी आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे या विद्यार्थ्यांच्या यशाकडे बघितले तरी जाणवून जाते.  लातूर जिल्ह्यातील हंडरगुळी गावात जन्मलेल्या रामेश्वर सब्बनवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन ‘स्वप्ने बघा, साकार होतात’ हाच संदेश दिला. त्यांच्या या यशाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून  दिली आहे.

000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात संजयसिंह चव्हाण यांची २९ व ३० डिसेंबरला मुलाखत

            मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. २९ व शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

     महाआवास अभियानात राज्यात पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल नुकतेच कोल्हापूर जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले आहे. यानिमित्त तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, समाजकल्याण अशा विविध विभागांच्या माध्यमातून साधल्या जात असलेल्या जिल्ह्याच्या विकासाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांची कामठी उपजिल्हा रुग्णालयास भेट

नागपूर, दि. २८ : संभाव्य कोविड चौथ्या लाटेच्या पूर्वतयारीस्तव सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मॉकड्रील घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव  संजय खंदारे यांनी कोविडबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यास्तव उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे प्रत्यक्ष भेट दिली.

प्रधान सचिव यांनी भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालय कामठी येथील ऑक्सीजन पी. एस.ए. प्लान्ट,डॉक्टर्स व स्टाफचे कोविड बाबत प्रशिक्षण, ऑक्सीजन खाटाची उपलब्धता, प्रत्यक्ष रुग्णभरतीची रंगीत तालीम इत्यादी बाबींचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयातील औषधी भंडार, कोविड रुग्णांकरीता तयार ठेवण्यात आलेला वॉर्ड, साधन सामुग्रीची उपलब्धता, स्टाफ ऑक्सीजन सिलींडर व कॉन्स्ट्रेटर वापरण्याचे प्रात्यक्षिक इत्यादी बाबींची पाहणी केली.

भेटीदरम्यान प्रधान सचिव यांचेसमवेत डॉ. विनिता जैन, उपसंचालक, आरोग्यसेवा, नागपूर मंडळ, नागपूर या देखील उपस्थित होत्या. मान्यवरांनी उपजिल्हा रुग्णालय कामठी  येथील व्यवस्था तपासून उपस्थित डॉक्टर्स व स्टाफ यांना पुढील संभाव्य लाटेबाबत तयार राहण्यासंबंधी सूचित केले.

000

विधानपरिषद लक्षवेधी

सुरजागड लोह प्रकल्पामध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

नागपूर, दि. 28 : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या लोह प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

सुरजागड लोह प्रकल्पाबाबत सदस्य जयंत पाटील यांनी सूचना मांडली होती, शिवाय याच विषयावर  सदस्य रामदास आंबटकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या दोन्ही प्रश्नावर संयुक्त  उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले की, हा लोहप्रकल्प 1993 मध्ये सुरू झाला. त्या भागातील नक्षलवादामुळे काही कालावधीत या प्रकल्पाचे काम पुढे नेऊ दिले जात नव्हते. त्यावेळी पालकमंत्री झाल्यानंतर प्रशासन, पोलीस यंत्रणा यांना नक्षलवादाचा बिमोड करण्याचे निर्देश देण्यात आले.  त्यानंतर सुरजागड प्रकल्प पुन्हा सुरू केला आहे. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाला स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता पाच हजारापेक्षा जास्त स्थानिक नागरिकांना या प्रकल्पात रोजगार दिला आहे.

प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबरोबर कुशल काम येण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. यामध्ये महिला, तरुणांना प्रशिक्षण देवून कुशल कामगार तयार करण्यात येईल. याशिवाय याठिकाणी सिक्युरिटी अकादमी सुद्धा सुरू केली जाईल. यामुळे या प्रकल्पासाठी कुशल कामगार बाहेरून आणावे लागणार नाहीत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

प्रकल्पातून 342 कोटींचा महसूल

सुरजागड लोह प्रकल्पातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला. शिवाय 342 कोटींचा महसूलही शासनाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पात स्थानिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, या भागातील नक्षलवाद पूर्ण कमी झाला असल्याने पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही श्री शिंदे यांनी दिली.

उपप्रश्नाला उत्तर देताना खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, सुरजागड प्रकल्प सर्व परवानग्यांची पूर्तता करून 2021-22 या काळात पूर्ण क्षमतेत नियमाच्या अधीन राहून चालू आहे. गडचिरोली जिल्हा गौण खनिजाचा ठेवा आहे. यामधून आतापर्यंत 56 लाख टन गौण खनिज प्राप्त झाले आहे. याच कंपनीने घोनसरी येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प वर्षभरात सुरू होऊन 1500 जणांना रोजगार मिळणार आहे. परिसरातील गावात आरोग्य आणि पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला तात्काळ निधी दिला जाणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. २८ : “रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालय तसेच कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला पुढील दोन महिन्यांत तात्काळ निधी दिला जाईल”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

“वरळी येथील कामगार रुग्णालयात अतिदक्षता व सुपर स्पेशालिटी सुविधा देण्यासाठी ईएसआयसीला निर्देश दिले जातील. रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

“आर.एन. कूपर रुग्णालयात नेफ्रोलॉजी, कॅथलिक युनिट उभारण्याच्या परवानगीसह विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुविधा देण्यासाठी संबधितांना तात्काळ निर्देश दिले जातील”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर, विलास पोतनीस, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला होता.

0000

संजय ओरके/विसंअ

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार – मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

नागपूर, दि. 28 : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’  करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर  केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते.

मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर नामांतरसाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठविण्यास कळविले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं

 

इलेक्ट्रिक एसटी बसकरिता १७० ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. २८ : राज्य परिवहन महामंडळाकरिता  नवीन बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी  रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सन २०१६-१७ पासून २९२१-२२ या कालावधीत एसटी महामंडळाने ३२३४ बसेस घेतल्या आहेत. यात ६१७ बसेस या भाडेतत्त्वावर ते २६१७ बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन ७०० बसेस खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने २ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. 700 बसेस मध्ये ४५० डिझेल बसेस, ५० इलेक्ट्रिक बसेस तर २०० निम-आरामदायी बसेसचा समावेश आहे. या ७०० बसेस पैकी १९० बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडी बिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.

ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एस. टी.बसेसच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमंडळामार्फत दूर केल्या जातील, असेही मंत्री श्री.देसाई यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य राजेश राठोड, अभिजित वंजारी, जयंत आजगावकर यांनी प्रश्न विचारला होता

000

मनीषा पिंगळे/विसंअ

 

रामटेकळी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे जूनमध्ये होणार लोकार्पण – मंत्री डॉ. तानाजी सावंत          

नागपूर, दि. 28 : “रामटेकळी (ता. मानवत, जि. परभणी) येथील कोल्हापूरी बंधारा क्र.३ चे  ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. जून २०२३ मध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येईल”, अशी माहिती मंत्री डॅा. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या बंधाऱ्याच्या कामांची चौकशी करण्याबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात एकनाथ खडसे, अनिल परब आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री डॅा.तानाजी सावंत म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामटेकळी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामाचे कार्य आदेश सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. मध्यंतरी कोरोना काळात काम थांबले होते. कंत्राटदाराने उपविभागाकडून कामाची आखणी करून न घेता परस्पर दुसऱ्या ठिकाणी काम सुरु केले. ही बाब निदर्शनास येताच काम थांबविण्यात आले. याबाबत कंत्राटदार आणि उप अभियंत्यांना नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शासनाचा निधी वाया गेला नसून शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. तथापि या कामातील हलगर्जीपणाबाबत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कार्रवाई केली जाईल”, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले.

०००००

पवन राठोड/ससं

 

अकोल्यातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : “अमृत अभियानांतर्गत अकोला शहरात जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरिता नेमलेल्या एपी ॲण्ड जीपी एजन्सीने केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची चौकशी केली जाईल”, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

ही जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण राहिल्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, “अकोला शहरातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. या कामांच्या बिलांमध्ये तफावत दिसून येत आहे. कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. या योजनेच्या कामात एका टाकीविषयी स्थानिक वाद आहे. हा वाद सामंजस्याने सोडवून काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अमृत योजना टप्पा २ अंतर्गत कामाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल”, असेही मंत्री सामंत यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

००००

मनिषा पिंगळे/विसंअ

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत

नागपूर, दि. २८ : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन येत्या ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

 

गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि शुक्रवार दि. ३० डिसेंबर रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सभागृहात सांगितले.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे

महाड तालुक्यातील साकव बांधकामाचे काम प्रगतीपथावर – मंत्री रवींद्र चव्हाण

नागपूर, दि. 28 : “महाड तालुका, जिल्हा रायगड येथील सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेत साकवाच्या बांधकामात अनियमितता व गैरव्यवहार याबाबत तपासणी केली असता या साकवचे काम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल”, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

महाड तालुका, जिल्हा रायगड येथे साकव बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.

“कोकणात या प्रकारचे पूल बांधले जात असतात. या कामाची पाहणी करुन अहवाल सादर करण्याबाबत अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, कोकणभवन, नवी मुंबई यांना कळविण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्याचे नियोजन आहे. याबाबत दोन पुलांसाठी प्रत्येकी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या साकवाचे काम साकव पद्धतीने न होता इलिमेंटप्रमाणे केले आहे. साकव पद्धत पूर्वीप्रमाणे केल्यानंतर त्यावरुन छोटी-छोटी वाहने जाऊ शकतात”, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

000

प्रवीण भुरके/स.सं.

 

अजनी पुलाच्या बांधकामासाठी शासन निधी उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २८ : “नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही”, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

नागपूर शहरातील ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाबाबत सदस्य मोहन मते यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, अजनी पूल 1923 मध्ये बांधण्यात आला होता. मध्य रेल्वेने 15 जुलै 2019 रोजीच्या पत्रानुसार नागपूर महानगरपालिकेस कळविल्याप्रमाणे विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांनी या पुलाचे अंतरिम रचनात्मक लेखा परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केले आहे. या अहवालानुसार सात डिसेंबर 2019 पासून हा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलावरून सध्या केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. अजनी पूल हा प्रकल्प महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून एक नोव्हेंबर 2022 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पुलासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नितीन राऊत, विकास ठाकरे, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 28 : “अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू आहे ही कारवाई 1 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याबाबत  प्रश्न सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,ज्या शिक्षण संस्थांमध्ये असे बनावट आदेश जारी करून शिक्षकांना  घेण्यात आले होते, त्यांना पदावरून कमी करण्याची कारवाई चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होता जे शिक्षक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, हिंदसेवा मंडळ,अगस्ती महाविद्यालय,अकोले,प्रवरा शिक्षण मंडळ अशा या संस्थेत 14 शिक्षकाच्या सुनावण्य घेऊन 9 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता अयोग्य असल्याने रद्द करून त्याचे वेतन बंद केले आहे.

“हायकोर्टाने याबाबत स्टे दिला आहे. यामध्ये 675 प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी 442 जणांची सुनावणी चालू आहे. तर 659 माध्यमिक शिक्षका पैकी  259 शिक्षकाची सुनावणी चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई चालू आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण कसे करता येईल, यादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. काही संस्थांना चुकीची संच मान्यता दिली असेल, तर याची पडताळणी करून ती संच मान्यता रद्द करण्यात येईल. असे शिक्षक आढळून आल्यास त्यांना कमी करण्यात येईल.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र वायकर, बाळासाहेब पाटील, राहुल कुल यांनी प्रश्नाच्या चर्चेत सहभाग घेतला.

0000

प्रवीण भुरके/स.सं.

‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याच्या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विधानपरिषदेत अभिनंदन

नागपूर, दि. 28 :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या शौर्याला नमन करतानाच अंधारलेल्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे मोठे कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गुरु गोविंद सिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग या बालकांनी वीर मरण पत्करले. मोगलांसारख्या कट्टर धर्मांधांपुढे ते झुकले नाहीत. केवळ सहा आणि नऊ वर्षांच्या या बालकांनी मुघलांच्या अत्याचाराला जुमानले नाही. त्याची शिक्षा म्हणून त्यांना भिंतीत गाडून मारण्यात आले. हा बलिदानाचा इतिहास एकीकडे अंगावर काटा आणणारा आहे पण दुसरीकडे, त्यांच्यावर जे उच्च कोटीचे संस्कार झाले होते, त्यासाठी नतमस्तक करणारा आहे. एकीकडे क्रूरतेने सर्व मर्यादा तोडल्या, तर दुसरीकडे संयम, शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण होते. हे उदाहरण आम्हाला शतकानुशतके प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

“गुरु गोविंद सिंग हे शीख धर्मियांचे दहावे गुरु होते आणि त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. अन्याय, अधर्म आणि अत्याचाराविरोधात त्यांनी दिलेला लढा अजरामर आहे. त्यांच्यासारख्या निडर आणि देशाच्या स्वाभिमानासाठी जगणाऱ्या गुरूंच्या पुत्रांनी केलेले बलिदान, नवीन पिढीने विसरून जाऊ नये म्हणून ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याचा उद्देश आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मी स्वतः देखील उपस्थित होतो”, असे सांगतानाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना ज्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले होते, त्या लोकांचा सन्मान  होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

“आपल्या देशाच्या तरुण पिढीने भूतकाळात देश आणि धर्माचे कसे संरक्षण केले, त्याचा इतिहास नवीन पिढीला कळणे फार महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्र आणि पंजाब यांचे एक नाते आहे. चाफेकर बंधू महाराष्ट्राचे होते, भगतसिंगाबरोबर असलेले राजगुरू महाराष्ट्राचे होते.  पंजाबच्या घुमानमध्ये संत नामदेवांचे निवासस्थान होते आणि नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. ऑक्टोबर २००८  मध्ये नांदेडमध्ये आपण श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त गुरु-ता-गद्दी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. शेतीपासून ते सीमेवर रक्षण करण्यापर्यंत आणि संस्कृतीपासून राजकीय नेत्यांपर्यंत पंजाबी-मराठी संस्कृतीचा एकमेकांशी खूप घट्ट संबंध आहे”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

“महाराष्ट्र हा देखील लढवय्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या देशभक्तीसाठी आणि मुघलांविरुद्धच्या त्यांच्या अविस्मरणीय धाडसासाठी ओळखले जातात. गुरु गोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही धैर्य आणि संयमाची परीक्षा द्यावी लागली होती. छत्रपती संभाजी महाराजांनादेखील या अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं”, असं सांगून देश आणि धर्मासाठी बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग  यांच्या पराक्रमी बलिदानाचे स्मरण करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ताज्या बातम्या

बिहार मतदार यादीत दावे-हरकती सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाचे आवाहन

0
मुंबई, दि. 5 : बिहारच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि अपात्र मतदाराचा समावेश होणार नाही, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एक व्यक्ती अटकेत

0
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने विनय राजेश पारेख (वय ३७ वर्षे) रा. ए-४०२, कुंज पॅराडाईस, आयआयसीआय बँकेच्या समोर,...

सिंचन प्रकल्पाची कामे गतीने कालमर्यादेत करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि.५ :- राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे, शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बांधकामाधीन प्रकल्पांची कामे गतीने व कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशा सूचना जलसंपदा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा – उच्च व...

0
मुंबई, दि.५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत उपकेंद्राकरिता सार्वजनिक विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी पाच एकर जागा देण्यासंबंधी केलेली कार्यवाही तसेच ज्या ठिकाणी...

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

0
मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सुचवणार उपाययोजना गृह, नगरविकास, परिवहन, सांस्कृतिक कार्य सचिव आणि मराठी निर्माते, वितरक आणि मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश मुंबई, दि. ५...